प्राचार्य डॉ. राजेंद्र पोंदे
कर्नाटकमधील गोकर्णजवळच्या जंगलातील एका गूढ व रहस्यमय घटनेमुळे देशात आणि विदेशात खळबळ उडाली आहे. गोकर्ण परिसरातील रामतीर्थ टेकड्यांच्या घनदाट जंगलात एका गुहेमध्ये नीना कुटिना ही चाळीस वर्षांची रशियन महिला आपल्या दोन मुलींसह राहत असल्याचे आढळून आले. इथल्या पाच वर्षांच्या काळात ती गुहेमध्ये कशी काय जगू शकली, याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली आहे.
नीना कुटिना आणि तिच्या मुली याच्या निमित्ताने प्रसिद्ध कादंबरी ‘रॉबिन्सन क्रूसो’च्या कथेची आठवण होते आहे. डॅनियल डिफो या ब्रिटिश लेखकाची ‘रॉबिन्सन क्रूसो’ ही जगप्रसिद्ध कादंबरी 18 व्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे 1719 मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीची कथा ही एका सत्य घटनेवर आधारित आहे. अलेक्झांडर सेलकिर्क हा ब्रिटिश खलाशी त्याचे जहाज पॅसिफिक महासागरात बुडाल्यानंतर एका निर्जन बेटावर पोहोचला आणि चार वर्षे त्या बेटावर एकाकी राहिला. हा खलाशी चार वर्षे एका गुहेत एकटाच राहिला होता. तेथे त्याने जिवंत राहण्यासाठी खूप धडपड केली होती व त्यानंतर त्याची सुटका झाली व तो इंग्लंडला परतला.
अलेक्झांडर सेलकिर्कप्रमाणेच नीना आपल्या मुलींसोबत साप, किडे, वटवाघळे आणि विंचू यांच्यासोबत गुहेमध्ये राहत होती. रामतीर्थ टेकड्यांवरील जंगलात किंग कोब्रा, नाग, मण्यारसारख्या अतिविषारी सापांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर वन्य प्राण्यांची संख्या ही जास्त आहे. जंगलातील गुहेत मी माझ्या मुलींबरोबर सुखाने जगत होते आणि आम्हाला कधीही जंगली श्वापदांची भीती वाटली नाही, असे ती म्हणते. त्यामुळेच नीना आणि तिच्या मुली अगदी सहजपणे गुहेत राहत होत्या. इतकेच काय, तर तिच्या मुलींचा जन्मही याच स्थितीत कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय झाला, असे ती म्हणते.
नीना एका विशिष्ट परिस्थितीमुळे जंगलात राहायला आली असण्याची शक्यता आहे. कारण, 2017 मध्ये तिच्या व्हिसाची मुदत संपली होती व तिचा पती ड्रोर गोल्डस्टीन हा इस्रायलला निघून गेला होता. त्यामुळे ती गुहेमध्ये राहायला आली असावी; पण दोन लहान मुलींबरोबर जंगलामध्ये राहण्याचे मोठे धाडस तिने केले आहे. यासाठी मोठे मानसिक सामर्थ्य आणि निसर्गाची आवड असणे गरजेचे असते. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये नीनाने ‘जंगलच माझे खरे घर आहे’ असे म्हटले आहे. तिच्या मुलींनीसुद्धा जंगलामध्ये, गुहेत राहणे आत्मसात केले होते. त्या कधीही आजारी पडल्या नाहीत. त्या निसर्गाच्या सान्निध्यात एकांतातील जीवनशैलीशी एकरूप झाल्या होत्या. नीनाचा पती ड्रोर गोल्डस्टीन यानेसुद्धा निसर्गाची ओढ व आवड असल्यानेच आम्ही दोघे एकत्र आलो होतो असे सांगितले आहे. नंतर नीनाने आध्यात्मिक एकांत शोधण्यासाठी गोव्याहून गोकर्ण गाठले होते. जंगलातील गुहेमध्ये तिने हिंदू देवतांच्या मूर्ती ठेवल्या होत्या. ध्यानधारणा आणि योगा करून गुहेमध्ये तिला मन:शांती मिळत होती. इतकेच काय, तर गुहेमध्ये टपकणार्या पाण्याच्या थेंबांच्या आवाजाने सुद्धा तिला आनंद मिळत होता. भूक आणि भीती याची अजिबातच चिंता तिला कधीही वाटली नाही. तिच्या द़ृष्टीने तिच्यासाठी आणि तिच्या मुलींसाठी जंगल सुरक्षित होते, माणसे मात्र नाही!
मानवी वस्तीपासून दूर जंगलाने वेढलेल्या गुहेत राहणे सर्वसामान्य माणसासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. चार्लस् डार्विनच्या ‘सर्वाव्हल ऑफ दि फिटेस्ट’ या सिद्धांताचा विचार केला, तर नीना कुटीना ही मानसिकद़ृष्ट्या खंबीर आणि शारीरिकद़ृष्ट्या सक्षम असल्यानेच तिने हे विलक्षण धाडस केले. तिने गुहेमध्ये गॅस बर्नर, वीज, पाणी, रेफ्रिजरेटर, ए. सी., फोन अशा मूलभूत आणि भौतिक सुविधा नसताना आपल्या लहान मुलींसह वास्तव्य केले. गुहेपासून जवळचे गाव हे काही किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे तिला कोणतीही वस्तू व अन्नपदार्थ सहजपणे मिळणे अशक्य होते. तिने गुहेमधील वास्तव्याच्या काळात काय खाल्ले असेल, याची मोठी उत्सुकता सर्वांनाच असणे साहजिक आहे; परंतु निसर्गाशी एकरूप होऊन जगताना तिने आपल्या गरजा कमी केल्या होत्या. तीन दगडांच्या चुलीवर तिने भात, वरण, नूडल्स इत्यादी अन्नपदार्थ बनवून आणि फळे खाऊन तिने गुजराण केली. पिण्याचे पाणी ती नैसर्गिक स्रोतांमधून मिळवत होती. गुहेजवळील ओढ्यामध्ये, झर्यामध्ये ती आणि तिच्या मुली आंघोळ करीत असत. निसर्गाच्या सान्निध्यात राहताना तिला कशाचीच कमतरता भासली नाही.
जीवनात आनंद मिळवण्यासाठी ‘निसर्गाकडे चला’ हे एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश-जर्मन निसर्गवादी कवींचे आणि लेखकांचे घोषवाक्य! युरोपातील स्वच्छंदवाद (रोमॅन्टिसीझम) आणि अमेरिकेतील आतिशायितावाद (ट्रान्सिडेंटॅलिझम) हा मानवाची निसर्गाशी एकरूपता आणि मानव-निसर्ग साहचर्य या सिद्धांतावर आधारित आहे. राल्फ वॉल्डो ईमर्सन आणि हेन्री थारो या अमेरिकन लेखक, विचारवंतांनी निसर्गाच्या सान्निध्यात व साधेपणाने राहण्यासाठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले होते. निसर्ग हा मानव आणि देव यांच्यातील दुवा आहे व आत्मिक शांतीसाठी निसर्ग हाच एकमेव उपाय आहे, असे ते मानत होते. राल्फ वाल्डो ईमर्सन आणि हेन्री थोरो यांनी त्यासाठी ‘ट्रान्सेंडेंटल क्लब’ची स्थापना 1832 मध्ये केली होती. हेन्री थोरो यांनी दोन वर्षे, दोन महिने, 11 दिवस ‘वॉल्डेन’ या तळ्याकाठी निसर्गाच्या सान्निध्यात एकांतात वास्तव्य केले होते. या अनुभवावरच त्यांनी आपले ‘वॉल्डेन’ हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिले आहे.
भारतातील निसर्गसौंदर्य, भारतीय संस्कृती, शिल्पकला, आध्यात्म, भारतातील जैवविविधता याचे प्रचंड आकर्षण येथे येणार्या परदेशी पर्यटकांना आणि नागरिकांना असते. निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा, हिमाचल प्रदेश, काश्मीर, राजस्थान येथे परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. नीना कुटिना ही त्यापैकीच एक! तिचे गुहेतील वास्तव्य उघडकीस आल्यावर हे कसे शक्य झाले? याचा विचार केला, तर असे दिसून येते की, तिचे निसर्ग प्रेम आणि आध्यात्माचे आकर्षण तिला गुहेपर्यंत घेऊन गेले. आज जगात चंद्रावर आणि मंगळावर मानवी वसाहतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात शहरीकरणाचा वेग वाढत आहे. लोक शहरांकडे आणि भौतिक सुखाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. असे असताना एक विदेशी महिला जंगलातील गुहेत इतका काळ राहते ही एक विलक्षण आणि विचार करायला लावणारी घटना आहे. आता नीना कुटिनाला कायदेशीर प्रक्रिया करून रशियाला परत पाठवण्यात येईल; पण तिला मात्र जंगलातील गुहेतच राहायचे आहे.