संघाची शतकोत्तरी साद 
बहार

संघाची शतकोत्तरी साद

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

संघ आणि समाज वेगळे असू नयेत, ते एकरूप व्हावेत, हे संघाचे संस्थापक आद्यसरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे ध्येय होते. ते पूर्ण व्हावे, यासाठी शंभरी गाठलेला संघ जराही न थकता नवा पट साकारू बघतो आहे. शंभर वर्षांच्या वाटचालीचे संचित आता दिसू लागले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीचा टप्पा ओलांडून आता नव्या शतकात प्रवेश करतो आहे. शंभर वर्षे एखादी संघटना टिकून राहणे जेथे दुर्मीळ तेथे संघ या प्रदीर्घ कालावधीत दशदिशांनी विकसित होत गेला. असे विस्तारणे हे संस्था जीवनाचा एकूण आवाका पाहिला, तर आश्चर्यचकित करणारे आहे. बोचरी टीका, कमालीची उपेक्षा आणि टोकाची अवहेलना सहन करीत येथवर पोहोचलेल्या संघ कार्याला आता सर्वव्यापी व्हायचे आहे. शंभर वर्षांच्या या वाटचालीत बंदीच्या वेळा आल्या, गैरसमजावर आधारलेली टीका झाली. एकीकडे कार्य विस्तारत गेले, तसे दुसरीकडे टिकेचे स्वर टिपेला गेले. ‌‘सर्वेषाम अविरोधेन‌’ म्हणजे कुणाचाही विरोध नको ही भूमिका असल्याने संघ शांतपणे विस्तार करत राहिला. आता या नव्या टप्प्यावर हेच सूत्र पुढे नेण्याचा विचार दिसतो आहे.

मुंबईत समाजातील ‌‘हुज हू‌’शी संवाद साधताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अत्यंत व्यापक भूमिका घेत भारताच्या भल्यासाठी काम करणारा प्रत्येकजण आपलाच अशी मांडणी केली आहे. हे फार मोठे विधान आहे. आमचाच विचार मान्य करा, अशी सक्ती न करता तुम्ही चांगले काही करत असाल, तर आम्ही तुम्हाला ‌‘शाब्बास‌’ म्हणू असे सांगत भागवतांनी प्रत्येक समजोपयोगी कामाची स्वीकारार्हता मान्य केली आहे. आमच्यात या, संघ शाखेत स्वागत आहे, आम्हाला बघा, आमचे काम अजमावा असे आवाहन करतानाच तशी तयारी नसेलच, तर हरकत नाही, भारताला बलशाली करण्याचे काम आपापल्यापरीने करत राहा, संघाला तुमचे कौतुक असेल अशी अतिव्यापक मांडणी या संवादाचे विशेष होते. भारतातील प्रत्येक चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा देणे, हे बलशाली भारताची संकल्पना प्रत्यक्ष्ाात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग असावा. आपण सगळेच संघवाले, राष्ट्रहितैषी असल्याची ही भावना नवा अध्याय आहे. हिंदू म्हणा, हिंदवी म्हणा, भारतीय म्हणा सगळे एकच आहोत, असे हे सूत्र आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनकाळात ‌‘आपण सारेच अण्णा‌’ म्हणत भ्रष्टाचारविरोधी लढाईत सारे भारतीय काही काळासाठी का होईना एकत्र आले होते. तसेच राष्ट्राला पुढे नेण्यासाठी सगळेच एकत्र यावेत, असा संघाचा प्रयत्न दिसतो आहे.

संघ आणि समाज वेगळे असू नयेत, ते एकरूप व्हावेत, हे संघाचे संस्थापक, आद्यसरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे ध्येय होते. ते पूर्ण व्हावे, यासाठी शंभरी गाठलेला संघ जराही न थकता नवा पट साकारू बघतो आहे. शंभर वर्षांच्या वाटचालीचे संचित आता दिसू लागले आहे. नाकारली, हिणवली जाणारी हिंदुत्ववादी विचारधारा गुरुस्थानी मानणाऱ्या पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात राज्य करत आहे. बऱ्याच राज्यात या पक्षाची सत्ता आहे. नेमक्या याच कालावधीत आधीच्या राजवटींनी केलेल्या प्रयत्नांना फळ मिळून भारत आर्थिक महासत्ता होऊ पाहते आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सतत झटणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अशा अनुकूल वातावरणात भारताचा विश्वगुरू करावे, असं वाटत असेल, तर तो त्यांच्या निष्ठेने काम करण्याचा भाग आहे. त्यात काही गैर नाही. संघकार्याला त्यासाठी भारतात सर्वमान्यता मिळवणे आवश्यक असेल. हे फारसे सोपे नसल्याची जाणीव संघाला आहे. आम्ही कोण, हे जनतेने जाणून घ्यावे, यासाठी संघाचे नेतृत्व या शताब्दीवर्षात विविध समाजगटांशी संवाद साधू पाहते आहे. चार महानगरांतील मान्यवरांशी संवाद हा त्यामुळेच महत्त्वाचा! आपल्याला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरू व्हायचे आहे, हेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले आहे.

खरे तर, विश्वगुरू होण्याचा किंवा महासत्ता होण्याचा खरा अर्थ काय, यावर वाद होऊ शकतील. ज्या देशात शेतकरी कारण नसताना आत्महत्या करतात किंवा बालके कुपोषित आहेत, महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात फारशी घट नाही, विषमतेचे थैमान आहे, श्रीमानवर्गालाही वाहतूक कोंडी, भ्रष्ट व्यवस्थेचा सामना करावा लागतो आहे, तेथे बऱ्याच बदलाची गरज आहे. विश्वगुरू किंवा महासत्ता होणे या केवळ काही वर्गासाठी रोमँटिक कल्पना आहेत काय, हा मुद्दा आहेच. या मुद्द्याला हाताशी धरून विरोध होत असतो. उजव्या परिवाराच्या वाढीला विरोध करणारी वैचारिक आंदोलने विश्वगुरू कल्पनेची खिल्लीही उडवतात; मात्र या वैचारिक आंदोलनांची शक्ती अत्यंत क्षीण असल्याने सध्या भारतातील विस्तारणाऱ्या मध्यमवर्गीय समाजाचा आणि राजकीय वर्तमानाचा स्वर हा संघ परिवाराला पाठिंब्याचा आहे. संघ परिवार या वर्गाला संघटित करतानाच विरोधकांच्या आक्षेपांवर मात करत सर्वसमावेशक कसे होता येईल आणि हिंदू राष्ट्राला परम वैभवाला कसे पोहोचवता येईल, याचा विचार संघ करताना दिसतो आहे. या विचार प्रवासात आता समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी संवादाचे पर्व सुरू झाले आहे. शताब्दी वर्षामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी चार महानगरांत आयोजित केलेली व्याख्यानमाला ही या संवाद प्रयत्नांचा भाग होती. मुंबईत धर्मगुरू, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी, न्यायवृंद, कलावंत, माध्यमप्रमुख या समाजावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसमवेत भटके विमुक्त, पाथरवट अशा समुदायांनाही बोलावले गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नीती निर्धारावर तसेच अर्थकारणावर पकड असलेल्या लोकांना विश्वासात घेणे आता आवश्यक वाटते आहे. हे आवश्यक वाटणे हे एका अर्थाने योग्यच आहे. वाद असतील, तरी त्याबद्दल संवाद करता येणे ही समाजाला मोठे करण्याची एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि याच मालिकेतला शेवटचा संवाद मुंबईमध्ये आयोजित केला. मुंबईतील नामचीन मंडळी या संवादासाठी विशेषत्वाने आमंत्रित केली गेली होती. अर्थकारणातील दिशादर्शक व्यक्ती, प्रशासनाला चालना देणारी अधिकारी मंडळी माध्यमसृष्टीचे कर्णधार असे सारेच महत्त्वाचे लोक या संवादासाठी आमंत्रित होते.

या संवादात सरसंघचालक मोहन भागवत जे म्हणाले ते फार महत्त्वाचे. पूर्वीपासूनच संघ समाजाचे केवळ दोन वर्ग करतो. एक वर्ग म्हणजे आज स्वयंसेवक असलेला आणि दुसरा उद्या स्वयंसेवक होणारा. या चिवट आशावादामुळे संघाचे काम प्रतिकूल परिस्थितीत वाढले, हे विरोधकांनाही नाकारता येणार नाही. आता व्याप्ती आधुनिक काळाला अनुसरून मोठी करायची हा निर्णय संघाने घेतलेला दिसतो. मुंबईतील महत्त्वाच्या व्यक्तींची संवाद साधताना सरसंघचालक भागवतांनी स्वयंसेवक आणि संघहितैषी यांना चार वर्गवारीत विभाजित केले. त्यातील पहिला वर्ग म्हणजे स्वयंसेवक असलेला, दुसरा संघाच्या कामाबद्दल आस्था असलेला, तिसरा संघाशी थेट संबंध नसलेल्या कामात गुंतलेला आणि चौथा संघाशी कोणताही संबंध नसतानाही उत्तम काम करणारा! हे सर्व वर्ग आपलेच आहेत आणि संघात या सर्व वर्गवारींचे स्वागत आहे असा संदेश मोहन भागवतांनी या व्याख्यानांमधून दिला.

दोन दिवसांच्या या व्याख्यानात पहिला दिवस मोहन यांच्या वक्तव्यांचा होता, तर दुसरा दिवस हा प्रश्न उत्तरांचा होता. प्रश्नोत्तरे साधारणतःनेहमीचीच होती. संघ आणि भारतीय जनता पक्षाचे संबंध, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न केव्हा मिळणार, आरक्षणाबद्दल संघाचे मत काय अशा नेहमीच्या प्रश्नांमध्ये चर्चा गुंतून राहिली. ही चर्चा संघाची भूमिका समजून घ्यायला आवश्यक होतीच; परंतु पहिल्या दिवशी मान्यवरांना संघ यात्रेत सामील करण्यासाठी भागवतांनी केलेले उद्बोधन हे सर्वाधिक महत्त्वाचे होते. दोन वर्गवारी आता संपुष्टात आणून भारताच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सगळे आपलेच, असे नमूद करत मोहनजींनी राष्ट्र उभारणीच्या कामात गुंतलेल्या प्रत्येकाला आम्ही आपला म्हणायला तयार आहोत, असे सांगून टाकले. या विधानाचे अत्यंत व्यापक अर्थ आहेत. सगळ्यांना आपले माना हा संघाचा आजवरचा मंत्र आहे. कुणालाही विरोध न करता शांतपणे आपले काम करत राहणे, ही आजवरची वृत्ती संघाने आता अधिकच विस्तारली आहे. भारताच्या भल्यासाठी जो जो काम करत असेल, तो तो आमचाच, तो आपलाच असे म्हणण्याची आमची तयारी असल्याचे मोहन भागवत यांनी जमलेल्या मंडळींच्या मार्फत सर्वांना सांगून टाकले. या विधानाची संघाच्या विरोधकांनी कितपत दखल घेतली की आता अशी विरोध विचारधारा जुन्याच गृहितकात अडकली आहे? या विधानातील अर्थ त्यांना जाणून घ्यायचा आहे काय, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT