Pakistan ethnic conflict | पाकिस्तानातील वांशिक संघर्षाच्या मुळाशी... 
बहार

Pakistan ethnic conflict | पाकिस्तानातील वांशिक संघर्षाच्या मुळाशी...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

ज्या देशाचे अधिकृत धोरण दहशतवादाला खतपाणी घालण्याचे आहे, ज्या राष्ट्राने आपल्या अस्तित्वाच्या आरंभापासून जगाला केवळ दहशतवाद दिला, ज्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचे मूळच दहशतवाद या शब्दाभोवती गुंफलेले आहे, असा भारताचा शेजारी देश असणारा पाकिस्तान आपल्या या सर्व कुकर्मांची फळे भोगताना दिसत आहे.

फाळणीनंतरच्या गेल्या 75 वर्षांचा इतिहास पाहिल्यास पाकिस्तान हे एक अराजकवादी राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर एक डाग म्हणून संबोधले गेले. याउलट भारताने विश्वशांती, विश्वबंधुत्व, वैश्विक सहकार्य, विकास, लोककल्याण यांची कास धरली. बाह्यशक्तींकडून निर्माण केली गेलेली प्रचंड आव्हाने पेलत साडेसात दशके अखंडित लोकशाहीचा प्रवास केला आणि जगातील सर्वांत वेगाने आर्थिक विकास करणारा देश म्हणून सामर्थ्याने विश्वगुरूची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने जगाला आयटी इंजिनिअर्स दिले, कुशल मनुष्यबळ दिले. आज जगभरामध्ये 3.5 कोटी भारतीय विविध स्तरांवर, विविध क्षेत्रांत आपले योगदान देत आहेत, तर पाकिस्तानने केवळ आत्मघाती हल्लेखोर, नृशंस दहशतवादी आणि कट्टरतावाद, मूलतत्त्ववाद यांची निर्यात केली. संयुक्त राष्ट्रसंघटनेने जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या जगभरातील सर्व संघटनांपैकी 80 टक्के दहशतवादी संघटनांची मुख्यालये पाकिस्तानात आहेत.

ओसामा बिन लादेनही पाकिस्तानातच मारला गेला होता. अशा पाकिस्तानला आज दहशतवादाने रक्तबंबाळ केले आहे, हा नियतीचा न्याय म्हणायला हवा. हिलरी क्लिंटन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना पाकिस्तानसंदर्भात केलेले एक विधान बरेच गाजले होते. ‘तुम्ही तुमच्या घरामध्ये साप पाळता आहात, त्याला दूध पाजता आहात आणि तुमची अपेक्षा आहे की, त्या सापाने आपल्या शेजारच्यांना डंख मारावा; पण लक्षात ठेवा असे होणार नाही. एके दिवशी हा साप तुम्हालाही चावणार आहे,’ असे हिलरी यांनी म्हटले होते. आज त्यांचे हे शब्द तंतोतंत खरे ठरताना दिसत आहेत.

अलीकडेच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद ही एका प्रचंड धक्क्याने हादरली. या शहरातील एका मशिदीमध्ये आत्मघातकी बॉम्बरनी शक्तिशाली बॉम्बस्फोट घडवून आणला. एक सुसाईड बॉम्बर मशिदीच्या गेटवर गेला आणि त्याने स्वतःला उडवून दिले. या स्फोटात 35 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. शुक्रवारची प्रार्थना करण्यासाठी हे नागरिक या मशिदीमध्ये गेले होते. तेथे हा स्फोट घडवून आणण्यात आला. पाकिस्तानात झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला नाही. तसेच हा पहिला स्फोट नाही. गेल्या काही वर्षांत हे सातत्याने घडत आहे. 2025 मध्ये 700 हून अधिक आत्मघाती हल्ले वेगवेगळ्या पद्धतीने झाले आहेत आणि त्यामध्ये 4000 हून अधिक नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार घडवून आणण्याला आपले अधिकृत धोरण मानणार्‍या आणि ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ असे म्हणत भारताच्या प्रगतीच्या वाटेवर सातत्याने सुरुंग पेरणार्‍या पाकिस्तानात आज महाभयंकर स्थिती निर्माण झालेली आहे. याला दुसरे-तिसरे कुणी जबाबदार नसून पाकिस्तानातील डीप स्टेटच त्यास जबाबदार आहे.

सद्यस्थितीत पाकिस्तानात बलुचिस्तानातील स्वातंत्र्यलढा निर्णायक स्थितीत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानातील 12 शहरांमध्ये बलूच लिबरेशन आर्मीकडून 18 ठिकाणी भीषण हल्ले करण्यात आले. यामध्ये पाकिस्तानचे 200 हून अधिक सैनिक ठार झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला वेगळे करणारी ड्युरंड लाईन असणार्‍या खैबर पख्तुनवा भागामध्ये स्वतंत्र पख्तुनीस्तान निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष सुरू आहे. तहरीक ए तालिबानला आणि अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला ही ड्युरंड लाईन मान्य नाही. गिलगिट-बाल्टिस्तानमध्येही पाकिस्तानी राजवटीविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष धुमसतो आहे. तोच प्रकार पाकव्याप्त काश्मीरमध्येही दिसून येत आहे. सिंधमध्येही तशीच स्थिती आहे. म्हणजेच पंजाब हा प्रांत वगळता पाकिस्तानातील सर्व भागात रक्तपात आणि हिंसाचार सुरू आहे. अशातच आता बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्यातील संघर्षाने डोके वर काढले आहे. बहुसंख्याक म्हणजे पाकिस्तानातील सुन्नी समुदायाचे लोक आणि अल्पसंख्याक म्हणजे शिया समुदायाचे लोक. इस्लामाबादमध्ये झालेला ताजा बॉम्बस्फोट हा शिया समुदायाच्या मशिदीमध्ये करण्यात आला. पाकिस्तानात अशाप्रकारचे कोणतेही हल्ले झाले की, भारतासह अन्य देशांवर आरोप करण्याची जणू टूमच आली आहे. प्रत्यक्षात त्यात कसलेही तथ्य नाही; पण मग नेमका कुणी घडवून आणला हा हल्ला? या हल्ल्याबाबत सर्वांत पहिली संशयाची सुई वळते ती तहरीक ए तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी या संघटनेकडे जाते. यापूर्वीही त्यांनी अनेक हल्ले पाकिस्तानात केले आहेत; पण टीटीपीची काम करण्याची पद्धत पाहिली असता ते अशा हल्ल्यानंतर तातडीने त्याची जबाबदारी स्वीकारतात. इस्लामाबादमधील हल्ल्याची अधिकृत जबाबदारी टीटीपीने घेतलेली नाही.

दुसरी संशयाची सुई जाते ती इस्लामिक स्टेट खोरासन या संघटनेकडे वळते. ही संघटना पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’चेच अपत्य आहे. या संघटनेचा जन्म 2015 मध्ये आयएसआयच्या छुप्या समर्थनातूनच झाला होता. या संघटनेची बांधिलकी इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी होती; पण रशिया, अमेरिका, नाटोच्या सीरियासह अन्य भागांतील कारवायांमुळे आयसिस आता रसातळाला गेली आहे. ‘खोरासन’ या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण आणि मध्य आशिया यांना मिळून खोरासन परगणा असे म्हटले जाते. म्हणजेच दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि पश्चिम आशिया या तीन उपखंडांचा यामध्ये समावेश होतो. या खोरासनमध्ये शरीयाच्या धर्तीवर कडवी इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने या संघटनेची निर्मिती केली होती. अलीकडील काळात या संघटनेचा प्रभाव वाढत चालला आहे. याचे कारण पाकिस्तानच्या ‘डीप स्टेट’कडून म्हणजेच लष्कर आणि आयएसआयकडून त्यांना रसद पुरवली जात आहे. आयएस खोरासन ही तालिबानला विरोध करणारी दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे टीटीपीचा सामना करण्यासाठी आणि तालिबानी राजवटीशी संघर्ष करण्यासाठी पाकिस्तानने हे जाणीवपूर्वक उचललेले पाऊल आहे. याचाच अर्थ हे टोळीयुद्ध पाकिस्तानच घडवून आणत आहे. तिसरी शक्यता म्हणजे खुद्द आयएसआयनेही हा धमाका घडवून आणलेला असू शकतो. याचे कारण पाकिस्तानात सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाविरोधात तेथील सुन्नी समुदायाला एकत्र करणे असे प्रयोजन आयएसआयचे असू शकते. यापूर्वी आयएसआयने अशा प्रकारची ऑपरेशन्स राबवलेली असल्याने ही शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानचे असीम मुनीर आज जगाला आमचे राष्ट्र सुरक्षित असल्याचे ओरडून सांगत आहेत; पण उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ज्या इस्लामाबादमध्ये येणार आहेत, ती पाकिस्तानची राजधानीच सुरक्षित नाही. अशा महत्त्वाच्या दौर्‍यापूर्वी राजधानीत होणारा स्फोट हा जागतिक स्तरावर पाकिस्तानची नाचक्की करणारा आहे.

याला आणखी एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) बैठका सुरू असताना हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. ही संघटना दहशतवादाच्या नियंत्रणासाठी जगभरात काम करते. दहशतवादाला आर्थिक द़ृष्ट्या समर्थन देणार्‍या देशांना काळ्या यादीत टाकण्याचे काम ही संघटना करते. पाकिस्तान तीन वर्षे एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये होता; पण या संघटना अमेरिकेच्या इशार्‍यावर चालणार्‍या असतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृपाशीर्वादाने पाकिस्तान ब्लॅक लिस्टमधून बाहेर आला. काही काळ तो ग्रे लिस्टमध्ये होता. यंदाच्या बैठकीमध्ये पाकिस्तानबाबत पुढील निर्णय घेतला जाणार होता. या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून पाकिस्तान स्वतःला ‘दहशतवादाचा बळी’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. भारतावर आरोप करून आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवणे, हे पाकिस्तानचे जुने तंत्र आहे; परंतु आता जगाचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानची अंतर्गत यंत्रणा, तेथील डीप स्टेटच या सर्व दहशतवादी हिंसाचाराला जबाबदार आहे. यामध्ये पाकिस्तानातील निष्पाप नागरिक याला बळी पडत आहेत. हिलरी क्लिंटन यांच्या वक्तव्याची आज पाकिस्तानी नागरिकांना निश्चितपणाने आठवण येत असेल. या नागरिकांनीच आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लक्षात घ्या, ज्या-ज्या ठिकाणी इस्लामिक राजवटी होत्या तिथे लोकशाही प्रस्थापित झाली नाही, असे बिलकूल नाही. इंडोनेशिया किंवा बांगला देश यांसारख्या राष्ट्रांनी लष्करी राजवटी झुगारून लोकशाहीच्या मार्गावर पाऊल ठेवले. तेथे पाच-पाच वर्षांनी निवडणुका झाल्या. लोकशाही मार्गाने सत्तेचे हस्तांतरण झाले. बांगला देश आज राजकीय संकटात सापडला असला, तरी शेख हसीना यांच्या कार्यकाळात या देशाने लक्षणीय आर्थिक प्रगती साधली, हा इतिहास आहे. यामध्ये तेथील नागरिकांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. पाकिस्तानी जनतेला ही उपरती कधी होणार? पाकिस्तानमध्ये लोकशाही केवळ नावालाच उरली आहे. सत्ता कोणाचीही असो, खरी सूत्रे रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयातून हालतात. पाकिस्तानची जनता या ‘डीप स्टेट’च्या विरोधात ठाम भूमिका घेत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणे अशक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT