महेश कोळी, संगणक अभियंता
मानव संस्कृतीचा इतिहास पाहिला, तर नेहमीच अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे; पण चीनकडून आलेली एक बातमी सध्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. चीनमधील कायवा टेक्नॉलॉजी या कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी प्रेग्नन्सी रोबोट म्हणजेच गर्भाशयासारख्या कृत्रिम यंत्रणेने बाळ धारण करणारा रोबोट विकसित केला आहे. हा रोबोट स्त्रीप्रमाणे आपल्या कृत्रिम गर्भाशयात भ्रूणाला दहा महिने वाढवून पूर्णपणे निरोगी बालकाला जन्म देऊ शकतो. हा शोध मानवासाठी वरदान ठरेल की शाप, हे येणारा काळच ठरवेल.
मानव संस्कृतीचा इतिहास पाहिला, तर नेहमीच अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चंद्रावर जाण्यापासून इंटरनेटच्या क्रांतीपर्यंत आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधापर्यंत विज्ञानाने मानवाच्या क्षमतांच्या मर्यादा मोडीत काढल्या आहेत; पण चीनकडून आलेली एक बातमी सध्या जगभर चर्चेचा विषय ठरली आहे. चीनमधील कायवा टेक्नॉलॉजी या कंपनीने असा दावा केला आहे की, त्यांनी प्रेग्नन्सी रोबोट म्हणजेच गर्भाशयासारख्या कृत्रिम यंत्रणेने बाळ धारण करणारा रोबोट विकसित केला आहे. हा रोबोट स्त्रीप्रमाणे आपल्या कृत्रिम गर्भाशयात भ्रूणाला दहा महिने वाढवून पूर्णपणे निरोगी बालकाला जन्म देऊ शकतो.
या तंत्रज्ञानात भ्रूणाला एका पारदर्शक थैलीसारख्या संरचनेत ठेवले जाते. त्या थैलीत अम्नियोटिक फ्लुईडसारखे द्रव असते, जे भ्रूणाला पोषण, ऑक्सिजन आणि सुरक्षा देते. भ्रूणाला आईच्या गर्भातील नाळेसारख्या नळीशी जोडले जाते. एआय प्रणाली सतत भ्रूणाची वाढ, धडधड, पोषण याची तपासणी करते आणि आवश्यक तेव्हा ऑक्सिजन, पाणी व पोषण पुरवते. म्हणजेच आईच्या गर्भाशयात जे नैसर्गिकरीत्या घडते त्याची हुबेहुब नक्कल कृत्रिम यंत्रणेत केली जाते. या शोधाला प्रेग्नन्सी रोबोट असे नाव देण्यात आले असून त्यामागील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. झांग किफेंग आहेत.
या प्रणालीत बाळाचा जन्मही स्वयंचलित पद्धतीने घडवला जातो. संपूर्ण प्रक्रियेचा खर्च साधारण 14 लाख रुपयांपर्यंत जाईल असे सांगितले जाते. सरोगसीच्या जगात हा शोध क्रांतिकारक बदल घडवू शकतो. कारण, आज अनेक गरीब महिला आर्थिक अडचणीमुळे सरोगेट आई बनतात आणि अनेकदा त्याचा गैरफायदा घेतला जातो. काही देशांनी सरोगसीवर बंदीही घातली आहे. अशावेळी हा रोबोट त्या कुटुंबांसाठी पर्याय ठरू शकतो, जे संततीसुख इच्छितात; पण नैसर्गिक गर्भधारणा किंवा सरोगसी त्यांच्यासाठी शक्य नाही. त्यामुळे अपत्यहीन दाम्पत्यांना मुलाचा आनंद मिळू शकतो आणि महिलांवरील शारीरिक व मानसिक ताण कमी होऊ शकतो.
याचबरोबर या तंत्रज्ञानाचे वैद्यकीय उपयोगही मोठे आहेत. अकाली जन्मलेली (प्रीमॅच्युअर) बाळे कृत्रिम गर्भात ठेवून त्यांचे प्राण वाचवता येतील. गर्भपाताचा धोका, विविध आजार व अपघातांपासूनही संरक्षण मिळेल; मात्र या शोधासोबत अनेक गंभीर प्रश्नही जोडले गेले आहेत. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, आई-बाळातील भावनिक नाते. एक यंत्र आईसारखा ममतेचा अनुभव देऊ शकेल का? बाळाचा जन्म मशिनमधून होऊ लागला, तर नैसर्गिक मातृत्वाची किंमत उरणार का? याशिवाय नैतिक आणि सामाजिक प्रश्नही मोठे आहेत. एखाद्या मशिनद्वारे जीवनाची निर्मिती करणे योग्य आहे का? या प्रणालीचा गैरवापर झाला तर? फक्त श्रीमंत लोकांनाच हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले, तर समाजात असमानता आणखी वाढेल का? हेही प्रश्न उभे राहतात.
प्रत्यक्षात कृत्रिम गर्भाशयाची संकल्पना नवीन नाही. 1924 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जे. बी. एस. हॉल्डेन यांनी एक्टोजेनेसिस म्हणजे बाह्य गर्भधारणेची कल्पना मांडली होती. 2017 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी मेंढीच्या भ्रूणाला कृत्रिम थैलीत वाढवून यशस्वीपणे जन्म दिला होता. जपान आणि इस्राएलमध्येही अशा प्रयोगांवर संशोधन सुरू आहे; मात्र चीनचा हा प्रयत्न पहिल्यांदा व्यावसायिक पातळीवर येत असल्यामुळे तो विशेष ठरत आहे. भारतात सरोगसी आधीपासूनच वादग्रस्त ठरली आहे आणि सरकारने त्यासाठी कायदे केले आहेत. प्रेग्नन्सी रोबोट भारतात आला, तर सरोगसी उद्योग कोलमडू शकतो. त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण होतील. आईची परिभाषा नेमकी काय राहील? मानवी समाज पूर्णपणे मशिनवर अवलंबून होईल का? एखादे दाम्पत्य रुग्णालयात जाऊन केवळ आम्हाला बाळ हवे असे सांगेल आणि नऊ महिन्यांनी मशिन निरोगी बाळ देईल ही कल्पनाच विज्ञानकथेप्रमाणे वाटते; पण चीनचा हा प्रयोग दाखवतो आहे की, हे लवकरच वास्तव होऊ शकते. एकंदरीत, प्रेग्नन्सी रोबोट हा विज्ञानाचा मोठा चमत्कार असून लाखो अपत्यहीन दाम्पत्यांसाठी आशेचा किरण आहे; मात्र तो केवळ विज्ञानाचा प्रश्न नाही, तर तो समाज, धर्म, नैतिकता आणि संस्कृतीशी निगडित असा गहन मुद्दा आहे. त्यामुळे हा शोध मानवासाठी वरदान ठरेल की अभिशाप, हे येणारा काळच ठरवेल.
प्रेग्नन्सी रोबोटमुळे कृत्रिम गर्भाशय प्रणालीत भ्रूणाची वाढ होत असताना त्याचे जीनोमिक मॉनिटरिंग करता येईल. त्यामुळे बाळ जन्मण्यापूर्वीच काही आजारांचे निदान आणि उपचार शक्य होऊ शकतात. भू्रणाच्या वाढीची प्रत्येक अवस्था बारकाईने अभ्यासता येईल. मानवी विकासातील गुपिते उलगडण्यास याचा मोठा फायदा होईल. भविष्यात भू्रणाऐवजी मानवी पेशींमधून कृत्रिम अवयव विकसित करण्यासाठीही अशीच यंत्रणा वापरली जाऊ शकते.
आज मातृत्व हे फक्त स्त्रीशी जोडले जाते; पण जर बाळाचा जन्म मशिनमधून होऊ लागला, तर वडील आणि आई या भूमिकांचा अर्थच बदलू शकतो. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान सहज उपलब्ध झाले, तर लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊ शकते. महिलांवर असलेला गर्भधारणेचा शारीरिक व मानसिक ताण नाहीसा झाला, तर पुरुष-स्त्री समानतेकडे एक मोठे पाऊल टाकले जाईल.
‘प्रेग्नन्सी रोबोट’चे काही नैतिक आणि कायदेशीर पैलूही तपासणे गरजेचे आहे. मशिनमधून जन्मलेले बाळ हे आईचे म्हणावे का, वडिलांचे म्हणावे का, की फक्त जन्मदाता म्हणून मशिनचे? कायद्याच्या द़ृष्टीने त्याचा हक्क कसा ठरवला जाईल हा प्रश्न आहे. अनेक धार्मिक परंपरांमध्ये जन्म, गर्भ, मातृत्व याला पवित्र मानले जाते. अशावेळी रोबोटद्वारे बाळ जन्मणे हे धार्मिक वादांचे कारण ठरू शकते. तांत्रिक चुका किंवा डेटा हॅकिंग झाल्यास बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
प्रेग्नन्सी रोबोटमुळे आयव्हीएफ क्लिनिक, सरोगसी केंद्रे आणि प्रसूतिगृहे यांच्यावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे प्रत्येक देशाला या तंत्रज्ञानाला परवानगी द्यायची का, कोणत्या अटींवर आणि कोणत्या खर्चात हे ठरवावे लागेल. चीनने हे तंत्रज्ञान व्यापारी स्वरूपात यशस्वी केले, तर वैद्यकीय क्षेत्रात त्याचे जागतिक वर्चस्व प्रस्थापित होऊ शकते.
बाळाला कृत्रिम गर्भाशयातून वाढवून डिझायनर बेबी संकल्पना अधिक प्रत्यक्षात येऊ शकते. तसेच युद्ध, महामारी किंवा अवकाश मोहिमांमध्ये मानवी प्रजोत्पत्ती ही मशिनद्वारे सुरक्षित ठेवता येऊ शकते. काही शास्त्रज्ञ तर असेही म्हणतात की, भविष्यात मानवी प्रजातीच पूर्णपणे कृत्रिम गर्भाशयावर अवलंबून होऊ शकते.