आता लवकरच आपल्याकडे गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील एक अत्यंत उत्साह आणि ऊर्जेने भरलेला सण सुरू होईल. बाजारात सगळीकडे उत्साही वातावरण आतापासूनच पाहायला मिळत आहे. घराघरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्राची शान. मंडप सजतात, प्रबोधनपर देखावे सादर केले जातात. आरतीचे स्वर वातावरणात घुमतात आणि श्रद्धेने फुले, हार, दुर्वा, पत्री, नारळ, फळे आणि विविध पूजासाहित्य गणरायाला अर्पण केले जातात. काही दिवसांनी विसर्जनाची वेळ येते आणि त्याच वेळी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो.
गणरायाला अर्पण केलेल्या या निर्माल्याचे पुढे काय करायचे? श्रद्धेने देवाला अर्पण केलेल्या वस्तू नदीत किंवा तलावात सोडणे ही परंपरा असू शकते; परंतु आजच्या पर्यावरणीय परिस्थितीत त्या परंपरेचा अर्थ नव्याने समजून घेण्याची वेळ आली आहे. निर्माल्य म्हणजे केवळ कचरा नाही. त्यामध्ये निसर्गातून आलेल्या असंख्य वस्तू असतात. फुले, पाने, दुर्वा, पत्री, नारळाचे अवशेष, फळांचे तुकडे आणि इतर जैविक पदार्थ यांचा त्यात मोठा वाटा असतो. त्यामुळे त्याचे योग्य व्यवस्थापन केले, तर हेच निर्माल्य पुन्हा मातीमध्ये परतू शकते; परंतु जेव्हा हजारो किंवा लाखो भक्त एकाच काळात निर्माल्य नदी, तलाव किंवा इतर जलाशयांमध्ये टाकतात, तेव्हा परिस्थिती वेगळी होते. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ पाण्यात गेल्याने त्यांचे विघटन सुरू होते आणि त्यासाठी पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर होतो. त्याचा जलचरांवर परिणाम होऊ शकतो आणि पाण्याच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
येथे प्रश्न केवळ प्रदूषणाचा नाही. प्रश्न आपल्या नागरिकत्वाच्या जाणिवेचा आहे. आपण गणरायाला विघ्नहर्ता मानतो. मग, त्यांच्या नावाने आपण निसर्गासमोर नवे विघ्न का निर्माण करावे? नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नाही. ती एखाद्या शहराची, गावाची आणि संपूर्ण परिसंस्थेची जीवनवाहिनी आहे. तिच्यामध्ये मासे, जलवनस्पती, जलचर, सूक्ष्म जीव आणि असंख्य जीवसृष्टीचे जीवन गुंफलेले आहे. त्यामुळे नदीमध्ये निर्माल्य टाकताना आपण केवळ पाण्यात काही फुले सोडत नसतो. नकळत आपण एका मोठ्या पर्यावरणीय व्यवस्थेवर भार टाकत असतो.
यासाठी सर्वप्रथम निर्माल्याची घरातूनच योग्य वर्गवारी करणे आवश्यक आहे. पूजेनंतरचे जैविक निर्माल्य वेगळे ठेवावे. प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, कृत्रिम सजावटीचे साहित्य, धातू किंवा इतर अजैविक वस्तू त्यात मिसळू नयेत. नैसर्गिक फुले आणि पाने स्वतंत्रपणे गोळा केली, तर त्यांचे कंपोस्टिंग, गांडूळ खत किंवा इतर जैविक प्रक्रियांमध्ये रूपांतर करता येते. त्याचप्रमाणे वापरता येणारे नारळाचे अवशेष किंवा इतर जैविक घटक स्वतंत्रपणे प्रक्रिया करता येतात. म्हणजेच निर्माल्याची समस्या घरापासूनच एका संसाधन व्यवस्थापनाच्या संधीमध्ये बदलू शकते. यामध्ये नागरिकांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायत अथवा स्वयंसेवी संस्थांनी जागोजागी निर्माल्य संकलन केंद्रे उभारलेली असतात. त्या विषयी अजूनही पुरेशी जनजागृती घडून आलेली नाही; पण या संपूर्ण व्यवस्थेचा पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा दुवा नागरिक आहे. आपल्याला निर्माल्य नदीत टाकायचे नाही. ते योग्य ठिकाणी द्यायचे आहे. एवढी साधी जाणीव निर्माण झाली, तरी मोठा फरक पडू शकतो.
यासाठी धार्मिक भावनेला विरोध करण्याची गरज नाही. उलट धार्मिक भावनेलाच पर्यावरणीय संवेदनशीलतेशी जोडण्याची गरज आहे. देवाला अर्पण केलेले फूल नदीत टाकल्यावरच त्याचा सन्मान होतो असे मानण्याऐवजी तेच फूल पुन्हा मातीमध्ये मिसळून झाडाला पोषण देईल, त्यातून तयार झालेले खत एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाईल आणि त्या मातीतून पुन्हा फुले उमलतील, अशी कल्पना आपण स्वीकारू शकतो. हा कुणाच्या श्रद्धा दुखावण्याचा विचार नाही. हा श्रद्धेचा अधिक व्यापक अर्थ आहे.
गणेशोत्सव हा सार्वजनिक सहभागाचा उत्सव आहे. त्यामुळे निर्माल्य व्यवस्थापनही सामूहिक सहभागाचा भाग बनू शकते. प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या परिसरात निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली, प्रत्येक कुटुंबाने निर्माल्य स्वतंत्र ठेवले, प्रत्येक शाळेने मुलांना त्याचे पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगितले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संकलित निर्माल्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले, तर महाराष्ट्रात एक मोठी परिवर्तनाची चळवळ उभी राहू शकते. खरे तर, या प्रक्रियेकडे आपण कचरा व्यवस्थापन म्हणून पाहण्यापेक्षा अर्थव्यवस्थेच्या एका छोट्या पण प्रभावी प्रयोगाप्रमाणे पाहिले पाहिजे. निसर्गातून आलेले पदार्थ पुन्हा निसर्गाकडे परतवणे आणि त्यातून नवे मूल्य निर्माण करणे हीच त्याची मूलभूत कल्पना आहे. आज नदीला निर्माल्यापासून वाचवण्याची गरज आहे; पण त्याच वेळी निर्माल्याला कचऱ्याच्या ढिगापासून वाचवण्याचीही गरज आहे. कारण, योग्य व्यवस्थापन केले, तर त्यात भविष्यातील खत, रोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेची बीजे दडलेली आहेत.
गणरायाचे विसर्जन झाले की, उत्सव संपतो असे आपण मानतो; परंतु खरी जबाबदारी त्यानंतर सुरू होते. गणपती बाप्पाला निरोप देताना आपण नदीलाही एक वचन देऊ शकतो. माझी श्रद्धा तुझ्यावर भार बनणार नाही. माझे निर्माल्य तुझ्या पाण्यात जाणार नाही. माझ्या उत्सवामुळे तुझ्या जीवनाला धोका निर्माण होणार नाही. गणरायाला निरोप देताना प्रत्येक नागरिकाने हे छोटेसे वचन मनापासून घेतले, तर कदाचित यंदाचा गणेशोत्सव केवळ भक्तीचा उत्सव राहणार नाही. तो नदीशी नव्याने नाते जोडण्याचा उत्सव बनेल. कारण, गणरायाला आपण मोदक अर्पण करतो, फुले अर्पण करतो, दुर्वा अर्पण करतो; पण त्यांना सर्वांत प्रिय अर्पण कोणते असेल, तर ते नक्कीच स्वच्छ नदी, निरोगी निसर्ग आणि जबाबदार नागरिकत्व असेल.