10th board exam results | उत्तीर्णांच्या गर्दीत मराठीची पीछेहाट 
बहार

10th board exam results | उत्तीर्णांच्या गर्दीत मराठीची पीछेहाट

पुढारी वृत्तसेवा

संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

दहावीच्या निकालातील गुणांची चढती कमान काही काळ चर्चेचा विषय ठरेल; परंतु मराठीत अपयशी ठरणार्‍या विद्यार्थ्यांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. समाज म्हणून आपण हा इशारा वेळेत समजून घ्यायला हवा. अन्यथा गुणांच्या झगमगाटात भाषेचा पाया खचत जाण्याने शिक्षणाचा आशय हरवण्याची भीती आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाने यंदा दोन परस्परविरोधी चित्रे एकाच वेळी समोर आणली आहेत. एका बाजूला गुणांची उंचावलेली टक्केवारी, उच्च श्रेणीतील विद्यार्थ्यांची वाढती संख्या, पैकीच्या पैकी गुण मिळवणार्‍यांचे विक्रमी प्रमाण आणि शंभर टक्के निकाल देणार्‍या हजारो शाळा, तर दुसर्‍या बाजूला मातृभाषेतच अपयशी ठरणारी हजारो मुले. या दोन वास्तवांपैकी अधिक गंभीर कोणते, असा प्रश्न विचारला तर उत्तर स्पष्ट आहे. कारण, गुणांची सूज हा शिक्षण पद्धतीतील दोष असू शकतो; परंतु मातृभाषेतील अपयश हे विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन भविष्याबाबत चिंता व्यक्त करणारे आहे. म्हणूनच यंदाच्या निकालाचे विश्लेषण करताना केवळ टक्केवारीच्या चष्म्यातून न पाहता मराठी विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेला सुमारे 15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍यांची संख्या तब्बल 65 हजारांच्या घरात पोहोचली. पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थीही शेकड्यांत दिसले. निकालाचा हा चकाकणारा भाग पाहिला की, महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था अत्यंत सक्षम असल्याचे चित्र उभे राहते; मात्र त्याच निकालपत्रकात मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांची संख्या चिंताजनक ठरणारी आहे.

प्रथम भाषा मराठी असलेल्या आणि प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 10 लाख 87 हजार 699 इतकी आहे, तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 10 लाख 6 हजार 896 इतकी आहे. याचा अर्थ मराठी हेच ज्या शाळेचे माध्यम आहे आणि मराठी भाषा हेच शिक्षणाचे, विद्यार्थ्यांचे माध्यम आहे, तेथे मराठी विषयात विद्यार्थी मागे पडले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत 80 हजार 803 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. इतर माध्यमांच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी मराठी भाषेची द्वितीय अथवा तृतीय भाषा म्हणून निवड करतात. अशा विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 13 हजार 917 इतकी आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 176 इतकी आहे. याचा अर्थ येथेदेखील मराठी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 741 इतकी आहे. यातील इंग्रजी माध्यमातील साधारण 3 लाख 65 हजार 203 विद्यार्थी आहेत व उर्वरित विद्यार्थी उर्दू व इतर माध्यमांची आहे. एकूण मिळून राज्यात 94 हजार 544 विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण झाले आहेत.

इयत्ता बारावीत मराठी विषयाला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 8 लाख 6 हजार 769 इतकी होती; तर मराठी विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7 लाख 74 हजार 253 आहे. याचा अर्थ बारावीच्या वर्गात 32 हजार 519 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत. दहावी आणि बारावीत मराठी विषयात नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही 1 लाख 27 हजार 60 इतकी मोठी आहे. जन्मानंतर मूल जगाला ज्या भाषेत प्रथम ओळखू लागते, ज्या भाषेत ते आईचा आवाज ऐकते, भावना समजून घेते, आनंद व्यक्त करते आणि भीती सांगते, तीच त्याच्या विचारविश्वाची पहिली पायरी असते. या मातृभाषेच्या माध्यमातूनच मूल वस्तू, नाती, अनुभव आणि समाज यांचे आकलन करू लागते. त्यामुळे मातृभाषा ही विचार करण्याची पद्धत घडवणारी शक्ती असते. मातृभाषेवरील पकड मजबूत असणार्‍या मुलाला इतर विषय समजून घेणे, प्रश्न विचारणे, स्वतःचे मत मांडणे आणि नवीन ज्ञान आत्मसात करणे अधिक सहज शक्य होते. म्हणूनच भाषेचा पाया मजबूत असायलाच हवा; तरच शिक्षणाचा संपूर्ण प्रवास सक्षम होतो. भाषा हे काही केवळ गुण मिळवण्याचे साधन नाही. विषयज्ञान समजून घेण्याचा तो पाया आहे. हा पायाच कमकुवत झाला, तर शिक्षणाचा संपूर्ण डोलारा कधी ना कधी डळमळण्याची भीती असते. म्हणूनच मराठीत अपयशी ठरणार्‍या विद्यार्थ्यांबाबत गांभीर्याने विचार करायला हवा.

आज अनेक पालकांच्या मनात इंग्रजी माध्यमाविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. इंग्रजी म्हणजेच प्रगती, इंग्रजी म्हणजेच करिअर आणि इंग्रजी म्हणजेच आधुनिकता अशी समजूत समाजात खोलवर रुजली आहे. त्यातून मराठी भाषेकडे दुय्यम द़ृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. घरात मराठी बोलणारे पालकही मुलांशी अर्धवट इंग्रजीत संवाद साधताना दिसतात. मराठी वाचनाची सवय झपाट्याने कमी होत आहे. मोबाईल, सामाजिक माध्यमे आणि लघुरूप संवादाच्या संस्कृतीमुळे भाषेचे शुद्धपण, अभिव्यक्तीची समृद्धी आणि विचारांची सलगता यांमध्येही बदल होत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे भाषिक आकलन मर्यादित होत चालले आहे. ते पाठांतर करू शकतात; पण सखोल वाचन, आशय समजून घेणे, स्वतःच्या शब्दांत मांडणी करणे किंवा भाषेतील सौंदर्य अनुभवणे यामध्ये मागे पडत आहेत.

याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे, शिक्षणव्यवस्थेनेही गुणांच्या स्पर्धेला इतके महत्त्व दिले आहे की, भाषिक संस्कार दुय्यम ठरत आहेत. विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांचे तयार संच, अपेक्षित उत्तरे, गुण मिळवण्याच्या युक्त्या आणि परीक्षाकेंद्रित तयारी यांमध्ये अडकवले जात आहे. भाषा ही अनुभवायची आणि जगायची गोष्ट असताना ती फक्त गुण मिळवण्याचा विषय बनली आहे. त्यामुळे विद्यार्थी मराठी शिकतात; पण मराठी समजून घेत नाहीत. ही दरी वाढत गेली, तर पुढील पिढी माहिती मिळू शकेल; पण ही मुले प्रभावीपणाने आपले विचार व्यक्त करू शकणार नाहीत. मराठीला अलीकडे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे. मराठी ज्ञानभाषा व्हावी, संशोधनाची भाषा व्हावी, तंत्रज्ञानाच्या युगातही सक्षमपणे उभी राहावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे; परंतु शालेय पातळीवरच हजारो विद्यार्थी मराठीत अपयशी ठरत असतील, तर हा विरोधाभास दुर्लक्षित करून चालणार नाही. भाषा शासनाच्या घोषणांनी जिवंत राहत नाही. विद्यार्थ्यांच्या मनात मराठीविषयी आत्मियता निर्माण झाली नाही, तर अभिजाततेचा सन्मान हा केवळ औपचारिक ठरेल.

या परिस्थितीकडे भावनिकतेपलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षणपद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज आहे. मराठी विषयाचे अध्यापन अधिक प्रभावी, अनुभवाधारित आणि संवादात्मक व्हायला हवे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावणे, कथाकथन, नाट्य, लेखन आणि चर्चेच्या माध्यमातून भाषेशी त्यांचा संबंध द़ृढ करणे आवश्यक आहे. शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रमातील बदल आणि शाळांमधील भाषिक वातावरण यांचाही गांभीर्याने विचार करावा लागेल. केवळ गुणांसाठी नव्हे, तर विचारक्षम आणि संवेदनशील पिढी घडवण्यासाठी भाषा शिक्षणाला केंद्रस्थानी आणावे लागेल. दहावीच्या निकालातील गुणांची चढती कमान काही काळ चर्चेचा विषय ठरेल; परंतु मराठीत अपयशी ठरणार्‍या विद्यार्थ्यांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा आहे. समाज म्हणून आपण हा इशारा वेळेत समजून घ्यायला हवा. अन्यथा गुणांच्या झगमगाटात भाषेचा पाया खचत जाण्याने शिक्षणाचा आशय हरवण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT