MS Dhoni retirement | ‘कॅप्टन कूल’ची पावले निरोपाकडे...  
बहार

MS Dhoni retirement | ‘कॅप्टन कूल’ची पावले निरोपाकडे...

पुढारी वृत्तसेवा

नितीन कुलकर्णी

आयपीएल 2026 या स्पर्धेतील फटकेबाजीची, धावांची, विक्रमांची चर्चा होत असतानाच या पर्वाच्या समाप्तीनंतर भारतीय किक्रेटचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल आणि चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती स्वीकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पोटर्‍यांना झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये माहीने एकही सामना खेळला नाही. फोटो सेशननंतर मैदानावरून बाहेर जातानाही मान खाली घालून मैदानाबाहेर जाणारा धोनी भावुक झालेला सर्वांनी पाहिला. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील निवृत्तीनंतर आयपीएल स्पर्धांनाही अलविदा केल्यास क्रिकेटच्या इतिहासातील एका पर्वाची सांगता होईल.

एम. एस. ऊर्फ महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेटला लाभलेले एक सुवर्णरत्न. भारतीय क्रिकेटला जगाच्या शिखरावर नेणारा हा शांत वृत्तीचा महानायक आयपीएल 2026 च्या सांगतेनंतर आता विराम घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वयाच्या 44 व्या वर्षी धोनीने घेतलेला हा निर्णय आकस्मिक वाटत असला, तरी त्यामागे त्याची शारीरिक मर्यादा आणि संघाच्या भविष्याचा विचार दडलेला आहे. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणार्‍या धोनीने आपल्या 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात भारतीय क्रिकेटला जे दिले, ते अभूतपूर्व आहे.

धोनीच्या निवृत्तीमागील सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे, त्याची सातत्याने सतावणारी दुखापत होय. आयपीएल 2026 चा हंगाम सुरू झाला तेव्हाच धोनीच्या पायाच्या स्नायूला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत साधारण वाटत होती; पण वाढत्या वयामुळे ती बरी होण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. क्रिकेटमध्ये कौशल्याबरोबरच कमालीची शारीरिक चपळता लागते आणि धोनी कधीही तंदुरुस्तीशी जराही तडजोड न करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. संघात केवळ एक यष्टिरक्षक किंवा फलंदाज म्हणून स्थान अडवून ठेवणे त्याच्या तत्त्वात बसणारे नव्हते. त्यामुळे आपले शरीर आता सर्वोच्च पातळीवरील क्रिकेटच्या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाही, याची जाणीव झाली तेव्हा त्याने अत्यंत शांतपणे मैदानाबाहेर होण्याचा निर्णय घेतला. स्वतःपेक्षा संघाचे हित आणि तरुण खेळाडूंना मिळणारी संधी, हीच त्याच्या क्रिकेटची खरी व्याख्या होती.

धोनीचा 22 वर्षांचा भारतीय क्रिकेटमधील प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनीस म्हणून काम करणार्‍या एका तरुणाने हातात बॅट धरली आणि क्रिकेटची व्याख्या बदलत इतिहास रचला. लांब केसांचा महेंद्रसिंग धोनी भारतीय संघात आला, तेव्हा त्याच्याकडे केवळ फटकेबाजी करण्याचे तंत्र होते; पण बघता बघता त्याने स्वतःमध्ये कमालीचा बदल केला. 2007 मधील पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद, त्यानंतर 2011 मध्ये वानखेडे मैदानावर मारलेला ऐतिहासिक षटकार आणि मिळवून दिलेला एकदिवसीय सामन्यांतील विश्वचषक आणि 2013 मधील चॅम्पियन्स ट्रॉफी... आयसीसीच्या या तिन्ही मुख्य स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार ठरला. धोनीच्याच काळात भारतीय क्रिकेटला परदेशात जिंकण्याची ‘सवय’ झाली आणि आत्मविश्वास मिळाला.

कसोटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेल्या धोनीने आयपीएलच्या माध्यमातून चाहत्यांशी आपले नाते टिकवून ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्याने आपल्या नेतृत्वाखाली 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले. केवळ विजेतेपदच नाही, तर चेन्नईच्या संघात त्याने अशा काही खेळाडूंची फौज तयार केली, ज्यांनी पुढे जाऊन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. मैदानावर कितीही कठीण परिस्थिती असली, तरी चेहर्‍यावर कोणताही भाव न आणता थंड डोक्याने निर्णय घेण्याच्या त्याच्या शैलीमुळेच जग त्याला ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखू लागले. अगदी शेवटच्या षटकातही सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता ही गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी होती.

एम.एस.चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे, खेळाकडे पाहण्याची आणि दबाव हाताळण्याची त्याची धोरणे आणि भूमिका. मैदानावर जेव्हा 90 हजारांहून अधिक प्रेक्षक ओरडत असायचे आणि शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असायची, तेव्हाही धोनीचा चेहरा शांत समुद्रासारखा दिसायचा. ही शांतता वरवरची नसायची. तो त्याच्या रणनीतीचा भाग असायचा. गोलंदाजाच्या मानसिकतेचा अभ्यास करून, त्याच्या पुढील चालीचा अंदाज लावण्यात धोनीचा हात कोणीही धरू शकणार नाही. क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान फलंदाज आणि कर्णधार झाले; परंतु मैदानावर संपूर्ण सामन्याचे नियंत्रण आपल्या बोटांवर ठेवणारा आणि सहकार्‍यांमध्ये विजयाचा विश्वास निर्माण करणारा धोनीसारखा कर्णधार विरळाच.

दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, यष्टीच्या मागे उभे राहून त्याने केलेले काम होय. यष्टिरक्षक म्हणून धोनीने चेंडू पकडण्याबरोबरच तिथून संपूर्ण सामन्याची दिशा बदलली. चेंडू फिरकी असो वा वेगवान, फलंदाजाने रेषा ओलांडली की, सेकंदाच्या काही शतांश भागात (0.09 सेकंद) यष्ट्या उडवण्याचा त्याचा वेग विज्ञानाच्या नियमांनाही आव्हान देणारा होता. संथ गतीने चालणार्‍या सामन्यात अचानक धावबाद करून किंवा यष्टिचीत करून सामन्याचा नूर बदलण्यात तो पटाईत होता. इतकेच नव्हे, तर पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या तंत्रात (डीआरएस) त्याचा अचूकता दर इतका जास्त होता की, चाहत्यांनी त्याला अधिकृतपणे ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ असे नाव दिले होते. यष्टिरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजेच 195 यष्टिचीत (स्टम्पिंग) करण्याचा अजोड विक्रम त्याच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 84 वेळा नाबाद राहण्याचा विक्रमही त्याच्या नावावर असून, अंतिम षटकांमध्ये सामना संपवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळेच त्याला क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट ‘फिनिशर’ मानले जाते. 2011 च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील त्याची नाबाद 91 धावांची खेळी प्रत्येकाच्या स्मरणात आहेच; परंतु 2005 मध्ये विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्ध त्याने केलेली 183 धावांची झंझावाती खेळी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एका यष्टिरक्षकाने काढलेली सर्वोच्च धावसंख्या म्हणून नोंदली गेली आहे.

धोनीने इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला केवळ एक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा न ठेवता, तिला एका जागतिक उत्सवाचे स्वरूप दिले. 2008 मधील पहिल्या हंगामाच्या लिलावापासूनच धोनी चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) चेहरा बनला. त्याने चेन्नई सुपर किंग्जला तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले, तर 2 वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावून दिले. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ विक्रमी वेळा बाद फेरीत (प्लेऑफ) आणि अंतिम सामन्यात पोहोचला. त्याने या स्पर्धेत 5,000 पेक्षा जास्त धावा केल्या असून, अंतिम षटकांमध्ये गोलंदाजांवर मानसिक दडपण आणण्याची त्याची शैली अजोड होती. 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्याच नावावर आहे. अनेकदा अशक्य वाटणारे सामने त्याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून चेन्नईच्या बाजूने झुकवले.

धोनीचे आयपीएलमधील सर्वात मोठे योगदान म्हणजे, त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला दिलेली भविष्यातील खेळाडूंची फौज होय. ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, दीपक चहर यांसारख्या अनेक खेळाडूंना धोनीच्या छत्रछायेखाली स्वतःची ओळख निर्माण करता आली. मैदानावर चूक झाल्यानंतर खेळाडूला ओरडण्याऐवजी त्याला शांतपणे समजावून सांगण्याची आणि त्याच्यावर विश्वास दाखवण्याची त्याची पद्धत आयपीएल संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनली. त्याने प्रस्थापित केलेला वारसा, नेतृत्वशैली आणि चेन्नईच्या संघाशी असलेले त्याचे भावनिक नाते आयपीएलच्या इतिहासात सदैव अजरामर राहील.

चेपॉक मैदानावर जेव्हा चेन्नईचा सामना संपला आणि धोनीने मैदानातील कर्मचार्‍यांसोबत छायाचित्रे काढली, तेव्हाच चाहत्यांना कळून चुकले होते की, हा लाडका ‘थाला’ आता पुन्हा या पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही. धोनीची निवृत्ती एका संपूर्ण पिढीच्या क्रिकेट पाहण्याच्या आनंदाचा शेवट आहे. त्याने क्रिकेटला जे दिले ते संख्या आणि आकडेवारीच्या पलीकडचे आहे. 7 क्रमांकाच्या जर्सीतील धोनी क्रिकेट रसिकांच्या हृदयात सदैव जिवंत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT