गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. चालू वर्षातील चार महिन्यांत 25 टक्क्यांनी वधारून सोन्याने एक लाखाच्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर भरारी घेतली आहे. सध्याचा जागतिक अस्थिरता, अनिश्चिततेचा काळ पाहता सोन्याच्या भावात फार मोठी घसरण होण्याची शक्यता नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. भविष्यात डॉलरमध्ये घसरण झाल्यास सोन्याला नवी झळाळी प्राप्त होईल.
भारतीय सराफा बाजारात अलीकडेच चोवीस कॅरेटच्या सोन्याने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख रुपये असा सार्वकालिक ऐतिहासिक भावाचा टप्पा पार केला. गेल्या दहा वर्षांत सोन्याने तब्बल 265 टक्के परतावा दिला आहे. प्रामुख्याने कोरोना काळानंतर सोन्याने विक्रमी भरारी घेतली आणि ती आता थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. कोरोनाची साथ थांबल्यानंतर युक्रेन युद्ध भडकले आणि त्यास भरीस भर म्हणजे हमासने इस्रायलवर हल्ले करत जागतिक बाजाराची स्थिती संकटात टाकली. ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर पुकारल्याने अनिश्चिता निर्माण झाली आणि साहजिकच ग्राहक सोन्याकडे वळले. दुसरीकडे, चीनने सोन्याची भरमसाट खरेदी करत खळबळ उडवून दिली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाला सोने हाच सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय वाटल्यामुळे या धातूचे भाव एक लाखावर गेेले. चालू वर्षी म्हणजे अवघ्या साडेतीन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भारतात अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे सोन्याचा भाव त्या दिवशी प्रतिदहा ग्रॅम एक लाख रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज वर्तविला गेला होता; परंतु आठ दिवस अगोदरच 21 एप्रिल रोजी चोवीस कॅरेटच्या सोन्याने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला. अर्थात, सोने-चांदीच्या भावातील वाढ जागतिक बाजारातील अस्थिरतेने आली आहे. या वाढीचा गुंतवणूकदारांना लाभ होत असला, तरी सर्वसामान्य ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी आहे. प्रामुख्याने लग्नसराई किंवा अन्य कारणांनी प्रासंगिक खरेदी करणार्या ग्राहकांना या भाववाढीचा तोटा सहन करावा लागणार आहे. सोन्याबरोबरच चांदीचा भावही एक लाख रुपयांना गवसणी घालत आहे. सद्यस्थितीत दिसणारा जागतिक तणाव आणि बाजारातील अनिश्चितता, यामुळे सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. या वर्षाखेरीस सोने नवी ऐतिहासिक किंमत पातळी गाठेल, असा अंदाज बांधला जात आहे. गेल्या महिन्यात सोन्यात घसरण दिसली; पण ती अल्पकाळ टिकली. अमेरिकेचा व्यापारी दबाव कमी झाल्यानंतर सोन्याचे भाव पुन्हा वधारले.
गेल्या पाच वर्षांत सोन्याच्या किमतीत 110 टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात सोने सर्वात चांगले रिटर्न देणारे असेट क्लास ठरले आहे. गेल्या काही वर्षांत अनेकजण शेअर बाजारापेक्षा सोन्यात पैसे गुंतवत आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे, हमखास मिळणारा परतावा. भारताप्रमाणे परदेशातही सोन्याला चांगलीच मागणी आहे. कारण, सुरक्षितता आणि परतावा या आघाडीवर सोने नेहमीच उजवे ठरले आहे.
2015 मध्ये प्रतिदहा ग्रॅम सोन्याचा भाव 26,343 रुपये एवढा होता. 2020 मध्ये 48,651 रुपये होता, तर 2025 मध्ये 99,800 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला, तर सोन्याने मागील दहा वर्षांत शेअर बाजाराला मागे टाकले आहे. सोन्याने 265 टक्के परतावा दिलेला असताना निफ्टी हा दहा वर्षांपूर्वी 7,825 अंश होता आणि तो आता 24 हजारांवर पोहोचला आहे. म्हणजे त्याने 200 टक्के परतावा दिला आहे. कोटक सिक्युरिटीजचे ए.व्ही.पी. कायनात चैनवाला यांच्या मते, अमेरिकी डॉलर तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवल यांना हटविण्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षित गुंतवणुकीला मागणी वाढली. त्यामुळे सोन्याचे भाव वधारले. यावर्षी तर पहिल्या चार महिन्यांत सोन्याचा भाव 25 टक्क्यांनी वाढला असून, यात 2 एप्रिल रोजी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाची घोषणा झाल्यानंतर त्यात अचानक सहा टक्के वाढ झाली.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, मागच्या वर्षी भारतात सुमारे 800 टन सोन्याची विक्री झाली आणि त्यापूर्वी 2023 मध्ये ती 750 टन होती. या स्थितीमुळे भारताला सोन्याची अधिक आयात करावी लागत आहे. आताच्या बाजारातील अस्थिरता पाहता सोन्याची मागणी वाढत चालली आहे. लहान-मोठे गुंतवणूकदारदेखील सोन्याकडे वळताना दिसताहेत.
वास्तविक, इतिहासावर नजर टाकल्यास जेव्हा जेव्हा जगभरात संकटे आली किंवा अस्थिरता निर्माण झाली तेव्हा सोन्याच्या भावाने उसळी घेतल्याचे दिसते; परंतु सध्या रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष समाप्तीकडे जाऊ लागल्याचे दिसत असल्याने सोन्याची मागणी कमी राहील आणि पर्यायाने भावही गडगडतील, असा अंदाज व्यक्त होत होता; परंतु तसे घडले नाही. याचे कारण, नोव्हेंबर 2024 मध्ये ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भविष्यातील जागतिक अस्थिरतेचे संकेत स्पष्टपणाने मिळत होते. ग्रीनलँड, पनामा कालवा, रिसीप्रोकल टॅक्स या मुद्द्यांबाबत त्यांनी निकालानंतरच सूतोवाच करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे भांडवली बाजारांसह आर्थिक पटलावर अस्थिरता दिसत होती. त्याचा परिणाम सोन्याच्या भावातील तेजीमध्ये दिसून आला. अलीकडील काळात कर्जात बुडालेल्या अमेरिकेच्या अर्थकारणाबाबतही चिंता निर्माण होऊ लागली होती. त्यामुळेही सोन्याची मागणी वाढत गेली.
दुसरीकडे, विविध देशांकडून सोन्याची प्रचंड खरेदी केली जात आहे. यामध्ये चीन, भारत, रशिया, तुर्कस्तान, सौदी अरेबिया आणि अगदी अमेरिकेचाही समावेश आहे. 2022-23 या कालावधीत केंद्रीय बँकांनी मिळून 1,136 टन इतके सोने खरेदी केले होते. हा 1967 नंतरचा सर्वोच्च वार्षिक आकडा होता. यानंतर 2024 मध्ये हा आकडा आणखी वाढून 1,200 टनांच्या पुढे गेला. आजघडीला अमेरिका सर्वाधिक सुवर्णसाठा असणारा देश असून, या जागतिक महासत्तेकडे सुमारे 8,133.46 टन सोने आहे. याची अंदाजे किंमत 6.09 अब्ज डॉलर आहे. या यादीत दुसर्या क्रमांकावर जर्मनी असून, या देशाकडे 3,351.53 टन सोने आहे आणि त्याची किंमत अंदाजे 2.51 अब्ज डॉलर इतकी आहे. यानंतर इटली (2,451.84 टन, 1.8 अब्ज) आणि फ्रान्स (2,436.97 टन, 2.436 अब्ज) यांचा क्रमांक लागतो. रशियाकडे 2,335.85 टन सोने आहे. रशियाने विशेषतः पाश्चिमात्य निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आपल्या सोन्याच्या साठ्यांत वाढ केली आहे. चीनकडे सध्या एकूण 2,292 टन सोने साठवलेले आहे, जे देशाच्या अधिकृत विदेशी राखीव संपत्तीच्या सुमारे 6.5 टक्के आहे. ‘गोल्डमॅन सॅक्स’च्या माहितीनुसार, एका फेब्रुवारी महिन्यात चीनने 50 टन सोने खरेदी केले होते.
आज सार्वकालिक उच्चांकी पातळीवर असूनही सोने भविष्यात आणखी नवी भरारी घेऊ शकते. त्यामुळे काही अभ्यासकांसाठी ही किंमत पातळी खरेदीसाठी योग्य आहे, असे वाटते; परंतु काही तज्ज्ञांच्या मते, येणार्या काळात सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता असून, त्यावेळी केलेली खरेदी अधिक परतावा देऊ शकेल. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे, सोने अनिश्चित काळात सुरक्षिततेचा पर्याय असला, तरी सर्व गुंतवणूक सोन्यात करणे व्यवहार्य ठरणारे नाही. गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओत दहा ते पंधरा टक्के भाग सोन्यात ठेवावा, असे गुंतवणूक सल्लागार सांगतात. तसेच, सोने खरेदी केल्यानंतर त्याची सुरक्षिततादेखील महत्त्वाची असते. यासाठी बँकेचे लॉकर घेतल्यास त्याचे भाडे, सोन्याचा विमा, कर यासाठीच्या संपूर्ण शुल्काचा आढावा घेऊन मगच आपली निर्णयनिश्चिती करावी.
इतिहासाचे आकलन करता, शेअर बाजारातील तेजीच्या काळात सोन्याचे भाव कमी होतात, असे दिसून येते. तसेच, व्याज दर वाढतात तेव्हाही सोन्याचे भाव घसरत असत. परंतु, 2022 पासून हा ट्रेंड बदलला आहे. व्याज दर आणि शेअर बाजार वाढत असूनही सोने कडाडते आहे.
अमेरिकन डॉलर हे जागतिकस्तरावर वापरले जाणारे चलन आहे आणि सोन्याची किंमत अनेकदा डॉलरमध्ये दर्शविली जाते. त्यामुळे, डॉलरच्या मूल्यावर सोन्याच्या किमतीचा थेट परिणाम होतो. डॉलरवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. जागतिक संकट, अमेरिकन केंद्रीय मध्यवर्ती बँकेकडून होणारी डॉलरची अतिरिक्त छपाई, यामुळे डॉलर अन्य चलनांच्या तुलनेत घसरल्यास सोन्याचे भाव वाढतात. कोरोना काळात याचा अनुभव आपण घेतला आहे. येणार्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन डॉलरचे भाव कमी करायचे आहेत. कारण, डॉलरचे उच्चांकी मूल्य अमेरिकन उद्योगांचा उत्पादन खर्च वाढवणारे ठरते. यासाठी ते फेडरल रिझर्व्हला व्याज दरात कपात करण्यासाठी दबाव आणत आहेत. अमेरिकेतील व्याज दरात कपात झाल्यास सोन्याचे भाव वाढतात, असे इतिहासातील आकडेवारी दर्शवते. त्यामुळे येणार्या काळात सोन्याच्या भावात फारशी घसरण होण्याची शक्यता नाही, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. यामुळेच सोन्याचा साठा करण्यासाठीची अहमहमिका थांबलेली नाहीये.