सुजाता पेंडसे
रामायण हा सदासर्वकाळ लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे. सध्या ‘रामायण’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याची वाढती लोकप्रियता पाहताना मागील आणि पुढील अशा तीनही पिढ्यांना ज्यांनी भुरळ घातली, अशा ‘गीतरामायण’, टीव्हीवरील रामानंद सागरांची मालिका ‘संपूर्ण रामायण’ आणि हा नवा चित्रपट अशा तीनही माध्यमातून तितकेच प्रेम, लोभ मिळाला आहे. मिळतो आहे.
५ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटाला नव्या-जुन्या पिढीने आपलेसे केले आहे. काळ कितीही बदलला तरी ‘श्रीराम’ या सर्वश्रेष्ठ अशा आदर्शाच्या बाबतीत जनमतात बदल झालेला नाही. सत्यवचनी, एकपत्नी, एकबाणी राम आजही लोकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवून टिकवून आहे हे चित्र आनंददायी आहे. खरं तर रामायण या महाकाव्याची कथा वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या रूपातून अबाधित राहिली आहे. माणसाने कसे असावे, किंवा नसावे हे सांगणारे रामायण राम-सीता यांच्यातील प्रेमाचे, त्यागाचे कर्तव्यपालनाचे श्रेष्ठ उदाहरण आहे. आज २०२६ मध्ये याकडे बघताना रामायणाच्या सादरीकरणातील भिन्न माध्यमांचा विचार मनात येतो. सलग तीन पढ्यांमध्ये ‘रामायण’ तीन प्रकारे आपल्या समारे आले.
यात पहिले माध्यम होते श्राव्य माध्यम. १९५५-५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रावरून ‘गीतरामायण ’ प्रसारित झाले. ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून ज्यांना संबोधले ते ग. दि. माडगुळकर यांनी रामायणाच्या कथेतील प्रसंगांवर ५६ गाणी लिहिली. स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या आवाजात, त्यांच्याच संगीताचा साज लेऊन लोकांपर्यंत पोचली. त्यानंतर गीतरामायणाचे सादरीकरण रंगमंचावरूनही होत राहिले. त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. गीतरामायणाचे बाबूजींच्या आवाजातले प्रत्यक्ष गीतांचे सादरीकरण व याचे आजपर्यंत उत्तम गायकांचे असंख्य कार्यक्रम होत आलेले आहेत. अगदी एक नवे उदाहरण सांगायचे तर देवांश भाटे नावाचा सुकुमार असा लहान वयाचा मुलगा गीतरामायण असे काही गातो की, आजही श्रोते कडाडून टाळ्या देत मनःपूर्वक दाद देतात.
गीतरामायणातल्या गीतांबद्दल बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही, इतकी अप्रतिम गीतरचना आणि गायन ‘गदिमा आणि बाबूजी’ या प्रतिभावंत द्वयीने दिली आहे. त्याची सुरुवात होते तीच मंजुळ अशा संगीताने. मग मनःपूर्वक गायलेले शब्द येतात ते ‘श्रीराम... श्री राम..., श्री ऽऽ.. राम’... हे ऐकत असताना नकळत आपण त्यात गुंतून जातो आणि सजगपणे पुढे ऐकू लागतो. रामजन्माचे गाणे ‘राम जन्मला गं सखी’ त्याचे सावळे रूप वर्णन करणारे ‘सावळा गं रामचंद्र’ हे गाणे, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’, ‘मार ही त्राटिका रामचंद्रा’ हे गाणे अहिल्येला शिळामुक्त केल्यावरचे गाणे ‘आज मी शापमुक्त झाले’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, पुढे वनवासाला निघालेल्या श्रीरामांना ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’ असे निक्षून सांगणाऱ्या सीतेचे गाणे अशी सर्व कथा गाण्यातून निरतिशय सुंदर अशी रंगवत नेली आहे. प्रेम, विरह, कर्तव्य, शौर्य, त्याग अशा अनेक रसांत ती रंगून जाते. ती पुढे ‘दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ असे जीवनाचे सार सांगणाऱ्या गीतापर्यंत पोचते.
रामायण पुन्हा वेगळ्या माध्यमातून समोर आले ते श्राव्य माध्यमाकडून दृश्य माध्यमाकडे. इतकी वर्षे मनामध्येच दिसणारी चित्रे छोट्या पडद्यावरून आपल्यासमोर येणार होती. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेल्या या काव्याची भुरळ रामानंद सागर यांनाही पडली. त्यामुळे ‘संपूर्ण रामायण’ या महामालिकेची निर्मिती त्यांनी केली. २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या दरम्यान दर रविवारी सकाळी ९.३० वाजता असे ७८ भाग प्रसारित झाले. या काळात लोकप्रियतेचे नवनवे उच्चांक झाले. या पौराणिक मालिकेची लोकांच्या मनात इतकी श्रद्धा होती की, रविवारी या प्रसारणादरम्यान रस्त्यांवरही सामसूम असे.
रामायणातली सर्व पात्रे ज्या अभिनेता- अभिनेत्रीने साकारली, त्यांच्या मूळ नावासह सर्वांना वेगळीच ओळख मिळाली. यामध्ये रामाच्या भूमिकेतील अरुण गोविल ‘राम’ म्हणून इतके प्रभावी, लाघवी, संयमी, मितभाषी दिसले की, आता ‘राम’ फक्त अरुण गोविलच साकारू शकतात, अन्य कुणीही नाही, असे सर्वांना ठामपणे वाटत राहिले. लक्ष्मणाच्या भूमिकेतील बंधुप्रमाने भारलेला, पण काहीसा तापट वाटणारा सुनील लाहिरीही खूप लोकप्रिय झाला. भरतच्या भूमिकेतील संजय जोग यांनीही लोकांना आपलंसं करून टाकलं होतं. दीपिका चिखलिया या अभिनेत्रीचे सोज्वळ, सालस रूप दीर्घकाळ लोकांच्या मनात लोकांच्या मनात घर करून राहिले. रावणाच्या भूमिकेतले अरविंद त्रिवेदी हे तर लोकांच्या रागाला आणि तितक्याच प्रेमाला पात्र ठरले. हनुमानाच्या भूमिकेतील दारासिंग यांनी तर त्यांच्या भूमिकेत कमाल केली. रामायणातील सर्व प्रसंग सविस्तरपणे दाखवल्यामुळे या मालिकेचा खूप मोठा प्रभाव जनमानसावर पडला. हे रामायण मुख्यतः ‘वाल्मिकी रामायणा’वर, तसेच तुलसीदासजींच्या ‘रामचरित मानस’वर आधारित होते. तर काही भाग कम्ब रामायणवर आधारित होता.
रामानंद सागर यांच्या या महामालिकेची लोकप्रियता हळूहळू वाढत जाऊन सर्वोच्च स्थानावर पोचली. या दरम्यान लोकांच्या श्रद्धाळू वर्तनाचे इतके किस्से समोर आले की, ‘इंडिया टुडे’ने या काळाला ‘रामायण फीवर’ असे नाव ठेवले. त्या काळात ज्यांच्याकडे टीव्ही नव्हता ते लोक इतरांकडे जाऊन का होईना, पाहात असत. तेव्हा पुनः प्रसारणाची सोय नसल्याने मालिकेची वेळ कुणीही चुकवत नसे. यानंतर जवळ जवळ ३२ वर्षांनी कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन घोषित झाला तेव्हा पुन्हा एकदा रामायण मालिका प्रसारित झाली. तेव्हा दूरदर्शन चॅनेलवर त्याला सर्वाधिक रेटिंग मिळालं होतं. आजही ही मालिका यू ट्यूबवर उपलब्ध आहे. तीही पाहणारे असंख्य लोक आहेत. आता नमित मल्होत्रा निर्मित नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपट माध्यमातून आलेल्या ‘रामायण’ला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. इतके उत्साहाने लोक भारतातच नव्हे तर अन्य देशातही ‘रामायण’ बघायला जात आहेत.
सध्याचा काळ हा तंत्रकुशलतेचा आहे. त्यात एआयच्या वापरानेही तंत्रज्ञानाला एक वेगळा आयाम लाभलेला आहे. शिवाय नवी पिढी ही सोशल मिडियाच्या माध्यमतान एआयचा वापर स्वतः करणारी प्रयोगशील आहे. अशा पिढीसमोर ‘रामायण’ चित्रपट माध्यमातून दाखवणे आव्हानात्मक तर होतेच, तसे थोडे कठीणही होते. कारण नवी पिढी उगाचच इमोशनल होत नाही. एखादी गोष्ट आवडली तर डोक्यावर घेते. पण नाही आवडली, नाही पटली तर सरळ नाकारून पुढे चालू लागते. त्यामुळे रामायण बनवण्याचे तगडे आव्हान निर्मात्यांसमोर होते. पण या चित्रपटाने हे शिवधनुष्य खरोखर पेलले आहे. व्हीएफएक्सच्या भरपूर वापरासह, रिअल सेट वापरूनही चित्रपटाची भव्यता दाखवली आहे. टूडी आणि थ्रीडीसह आणखी नव्या तंत्रज्ञानासह हा चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.
या चित्रपटातील स्टारकास्टबद्दल बोलायचं तर सर्वप्रथम ‘राम’ या भूमिकेबद्दल बोलू. रणबीर कपूरचा या भूमिकेत कस लागणारच होता. कारण त्याची आधीची इमेज आणि आता साक्षात प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणं हे त्याचीही परीक्षा पाहणारच होतं. परंतु त्याने ही भूमिका चांगल्या पद्धतीने निभावली आहे. शांत... संयमी राम, धनुर्धारी राम योग्य पद्धतीने दाखवला आहे. अरुण गोविल यांची जनमानसातील रामाची प्रतिमा मागे टाकून स्वतःचे अस्तित्व लोकमान्य करण्याचे आव्हान पेलेले आहे.