बहार

साष्-टांग नमस्‍कार : येवा, अयोध्या तुमचीच आसा!

Arun Patil

आणखी चार वर्षांनी पंचाहत्तरीला पोचणारे, 7 महिने 17 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, शिवसेना-काँग्रेस-भाजप व्हाया महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भ्रमण करूनही जय कोकण म्हणणारे, थोर पत्रकार, उद्योजक, राजकारणी तडका श्रीमान नारायण तातू राणे यांचे चरणी बालके मालवणी कडकाचा साष्टांग प्रणिपात…

शृंगरी मठाचे शंकराचार्य भारतीतीर्थ महाराज, गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज, शारदा मठाचे शंकराचार्य सदानंद महाराज आणि जोतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपणासारखा कमळहनुमान संतापून जाणे साहजिकच आहे. देशातील अनेक राजकारणी, उद्योजक, कलाकार, खेळाडू, विद्वान, किसान आणि जवान 'येवा, अयोध्या तुमचीच आसा' या आपल्या आवाहनास प्रतिसाद देऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजर राहणार आहेत. असे असताना मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच प्राणप्रतिष्ठा करणे शास्त्रीय विधींना धरून नाही, त्यामुळे या सोहळ्यास आम्ही उपस्थित राहणार नाही, असे शंकराचार्यांनी जाहीर केले आहे. यावर हिंदू धर्मासाठी तुम्ही काय योगदान दिलेत, असा रोखठोक सवाल करून आपण धूम उडवून दिली आहे. आपल्या या सवालाने चारही शंकराचार्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास पुन्हा सुरू केला आहे आणि योगदान करावे की रक्तदान करावे की मतदान करावे, यावर खल सुरू केला आहे, अशी आमची माहिती आहे.

'राणे तेथे काय उणे' अशी नवी म्हण प्रचारात आणल्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आपले अभिनंदन करतो. मराठी भाषेला आपण दिलेल्या या सूक्ष्म, लघु व मध्यम योगदानाबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. तथापि त्याप्रीत्यर्थ, मुळात आद्य शंकराचार्य कोण होते आणि त्यांनी हिंदू धर्माला काय योगदान दिले, याबद्दल थोडे माहितीदान आपणास करावे, हे आम्ही आमचे हिंदूधर्माप्रति कर्तव्य समजतो. आद्य शंकराचार्यांच्या जन्म व समाधीबाबत मतमतांतरे आहेत. तथापि ते केवलाद्वैतवादाचे प्रवर्तक व युगकर्ते वेदान्ती होते आणि त्यांनी इसवी सन पूर्व काळात हिंदूधर्मात जे शैथिल्य आले होते, ते दूर करून त्यात चैतन्य आणले व हिंदू तत्त्वज्ञानाची नीट घडी बसवली, यावर समस्त हिंदूधर्मीयांचे (आपण वगळून) एकमत आहे.

आद्य शंकराचार्यांनी भारत वर्षात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण क्षेत्रात चार मठांची स्थापना करून खरा हिंदू धर्म कोणता व खर्‍या हिंदूंचे आचरण कसे असले पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्या शिष्यांकरवी अथक प्रयत्न केले. पुढे ही परंपरा त्यांच्या नंतरच्या विविध शंकराचार्यांनी चालू ठेवली. विद्यमान चार मठांचे शंकराचार्यसुद्धा तीच परंपरा पुढे चालवत आहेत. त्यामुळे आम्ही श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेविरुद्ध नाही; परंतु आम्हाला धर्मविरोधी कृती करण्यासही मुभा नाही, असे विधान त्यांनी केले आहे. या विधानांकडे नकारात्मक पद्धतीने न बघता सकारात्मक पद्धतीने आपण बघितल्यास शंकराचार्यांबाबतची आपली नाराजी दूर होईल, असा आम्हांस विश्वास वाटतो. आद्य शंकराचार्यांबाबतचा स्वयंप्रकाशित असा एक श्लोक राणेसाहेबांनी केवळ एकदा म्हणून दाखविल्यास त्यांनी शंकराचार्यांपेक्षा हिंदू धर्मासाठी अधिक योगदान दिल्याचे आम्ही मान्य करू, असे आपल्या विरोधकांनी म्हटले आहे. तो श्लोक पुढीलप्रमाणे –

अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद
षोडशे कृतवान भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यागात

(अर्थ : शंकराचार्यांनी आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांच्या ज्ञानाची प्राप्ती, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व बत्तीसाव्या वर्षी महाप्रस्थान केले.)

विरोधकांच्या या आव्हानाकडे आपण दुर्लक्ष केंद्रित करून 2024 चे तिकीट आपणांस कसे मिळेल याकडे सर्व लक्ष केंद्रित करावे, असा आमचा विनम्र सल्ला आहे. हिंदू धर्मास आपण काही योगदान दिले नाही तरी चालेल; पण कोकणचा कॅलिफोर्निया किंवा कॅलिफोर्नियाचा कोकण करण्यासाठी आपण जे योगदान देणार आहात, ते महत्त्वाचे आहे. तळकोकणचे पुढारपण आपण अभिमानाने करता आणि कोकणी माणसेही वेळोवेळी आपल्यामागे उभी राहतात, हे वारंवार दिसून आले आहे. आपले एकेकाळचे राजकीय विरोधक प्रमोद जठार, दीपक केसरकर आणि असे अनेकजण आपणास पाठिंबा देत आहेत. हे सगळे हिंदूच ओहत.

आपणही आहात. तेव्हा कोकणच्या सगळ्या राजकीय हिंदूंनी मिळून लवकरात लवकर मुंबई-कोकण-गोवा हायवे मार्गी लावावा आणि कोकण विकासाची प्राणप्रतिष्ठा करावी, अशी आपणास विनंती आहे. तसेच कोकणात मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण महाविद्यालय, नौदल प्रशिक्षण विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आपण एवढे योगदान कोकणला दिले तर इतिहासात आपले नाव अमर होईलच, असा संपूर्ण विश्वास असणारा…

विनम्र बालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT