Pratapsinh Jadhav 80th birthday |गौरवाचा टिळा, धन्य तो सोहळा! 
बहार

Pratapsinh Jadhav 80th birthday | गौरवाचा टिळा, धन्य तो सोहळा!

पुढारी वृत्तसेवा

सुरेश पवार

‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा अभूतपूर्व उत्साहात जनसागराच्या साक्षीने पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्य, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मातब्बर नेते व्यासपीठावर होते आणि ‘द मोस्ट पॉवरफुल स्टेज इन द कंट्री’ असे स्टेजचे वर्णन करण्यात आले. साहेब आणि सौ. गीतादेवी यांच्या सत्कारप्रसंगी सर्व लोक भारावून गेले.‘न भूतो न भविष्यति’ अशा सोहळ्याची इतिहासात नोंद झाली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उभारण्यात आलेला भव्य मंडप, मंडपाबाहेरही झालेली अफाट गर्दी, अत्याकर्षक व्यासपीठावरील एलईडी स्क्रीनवर ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कार्यमग्न प्रतिभांचे दर्शन, सार्‍या मंडपात उत्साह सळसळत असलेला, होऊ घातलेल्या लोकोत्सवाची ही होती पूर्वतयारी आणि औचित्य होते डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे.

ऐंशी वर्षांपर्यंत व्यक्तीच्या जीवनात पौर्णिमेच्या हजार चंद्रांचे दर्शन होते आणि हा एक विशेष योग आपल्या संस्कृतीत मानला गेला आहे. डॉ. जाधव तथा आम्हा सर्वांचे साहेब यांच्या जीवनात हा अनुपम योग आला आणि त्यांच्यावर प्रेम करणार्‍या, आदर करणार्‍या विविध थरांतील मान्यवरांनी हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्याचे ठरवले. दीड-दोन महिन्यांपूर्वीची ही गोष्ट. लगेच उत्साही कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त बैठक घेतली. साहेबांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त जाहीर गौरव करण्याचा एकमुखी निर्णय झाला. गौरव समितीची स्थापना झाली. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आणि खा. शाहू छत्रपती यांनी ही जबाबदारी मोठ्या आनंदाने पार पाडण्यास संमती दिली. वेळ थोडा होता. गौरव समिती झपाट्याने कामाला लागली. जणू घरचे काम असावे, अशा रीतीने गौरव समितीला सर्वदूर प्रतिसाद मिळत गेला. गौरव समितीसह अनेक संस्था, कार्यकर्ते यांनी मोठ्या उत्साहाने ठिकठिकाणी कमानी उभ्या केल्या. साहेबांचा गौरव करणारे भव्य होर्डिंग उभे केले. सार्‍या शहरात प्रमुख ठिकाणी कमानी आणि होर्डिंग उभे राहिले.

सोहळ्यासाठी मोठी वातावरणनिर्मिती झाली आणि काही वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या वातावरण निर्मितीविषयी कौतुकोद्गार काढले. साहेबांवर प्रेम करणार्‍या, त्यांच्याविषयी आपुलकी असलेल्या कार्यकर्त्यांनी साहेबांविषयी असलेल्या आपल्या उत्कट भावनाच त्यातून प्रकट केल्या. या अभूतपूर्व अशा सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आणि मुंबईत अतिमहत्त्वाचा कार्यक्रम असूनही ते सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही उपस्थित राहण्याची संमती दिली आणि दोघेही सोहळ्याला आले. त्यांच्या समवेत चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आदी ज्येष्ठ मंत्र्यांसह बहुसंख्य मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व उपमुख्यमंत्री नीलम गोर्‍हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही अगत्यपूर्वक उपस्थित होते. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष (शरद पवार) खा. शरद पवार यांनी सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे मान्य करत उपस्थित राहिले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ हेही निमंत्रणानुसार उपस्थित राहिले.

अधिवेशन झाले असते : मुख्यमंत्री फडणवीस

गौरव सोहळ्याला बहुसंख्य मंत्र्यांसह मातब्बर नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याचा असा प्रसंग विरळाच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात एवढे सारे मंत्री, आमदार, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती येथे आले, तर मग इथे मंत्रिमंडळ बैठकच काय पण विधिमंडळाचे अधिवेशनही घेता आले असते, अशी टिप्पणी केली. उभ्या महाराष्ट्राचे साहेबांवर केवढे उत्कट प्रेम आहे, याचीच ही साक्ष असल्याचे त्यांनी मार्मिक विधान केले, तेव्हा उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.

निवेदकांनी या व्यासपीठावरील मान्यवरांच्या मांदियाळीच्या आपल्या निवेदनात दखल घेतली. ‘द मोस्ट पॉवरफुल स्टेज इन इंडिया’ असे अचूक वर्णन निवेदकांनी केले आणि ही ‘पुढारी’ची पॉवर असल्याचे म्हटले आणि तेव्हाही टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढे सोहळ्यात टाळ्यांचा कडकडाटाचा सिलसिला चालूच राहिला. उत्स्फूर्त दाद येतच राहिली.

सकाळी 9 वाजल्यापासून लोक यायला प्रारंभ झाला. भगव्या फेट्यातील गौरव समितीचे सदस्य सुहास्य वदनाने त्यांचे स्वागत करीत होते. बसण्याची व्यवस्था सांगत होते. ‘पुढारी’चा सोहळा म्हणजे परस्पर भेटीची पर्वणी. त्याचाही नेहमीप्रमाणे अनुभव येत होताच.

साडेनऊ वाजेपर्यंत मंडप हाऊसफुल्ल होऊन बाहेर गर्दी झाली होती आणि लोकांची रीघ चालूच होती. लोक येत होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून लोक आले. बेळगाव सीमाभागातून आणि पुणे, मुंबई, नगर जिल्ह्यातून आले. उत्तर कोकणातून, उत्तर महाराष्ट्रातून आले. विदर्भ, मराठवाड्यातूनही लोकांची उपस्थिती होती. ‘पुढारी’चा आणि अर्थातच साहेबांचा प्रभाव किती दूरवर आहे, याची जणू प्रचितीच आली.

माहोल भारावला

दरम्यान, वाद्यवृंदावर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण सुरू झाले. प्रारंभी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ हे ईशस्तवन झाले. पाठोपाठ देशभक्तीपर गीतांनी सारा माहोल भारावून गेला. सोहळ्याची वेळ जवळ येत चालली. देशभक्तीपर गीतांपाठोपाठ गौरवगीत गायन झाले. साहेबांच्या उदंड कर्तृत्वाचे नेमके वर्णन असलेले हे गीत उपस्थितांना भावून गेले.

आणि मग झांजपथकाच्या जल्लोषात साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एक-एक मंत्री, आमदार, खासदार व्यासपीठावर स्थानापन्न होऊ लागले. सारे पाहुणे आले आणि ‘पुढारी’चे चेअरमन व ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या प्रास्ताविकाने गौरव सोहळ्याची नांदी झाली.

डॉ. योगेश जाधव आपल्या पित्याविषयी अगदी भरभरून बोलले. प्रास्ताविकाच्या प्रारंभीच त्यांनी साहेबांचा ‘पत्रकारितेतील भीष्माचार्य’ असा उल्लेख केला आणि लोकांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. साहेब म्हणजे पत्रकारितेचे विद्यापीठ अशी तुलना त्यांनी केली, त्यावेळीही श्रोत्यांनी पसंतीची पावती दिली.

श्रीमंत छ. शाहू महाराज यांनी स्वागतपर भाषणावेळी कोल्हापूरचे काही प्रश्न मांडले. (नंतर आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील विकासकामांसाठी दिल्या जात असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची यादीच सादर केली.... ते अर्थमंत्री आहेत.... कोल्हापूरची हद्दवाढ करा ना, असाही सल्ला त्यांनी दिला.)

तुम्ही अनेकांची करता ऐशी तैशी म्हणून तुम्ही पुरी केली वर्षे ऐंशी

असे उत्स्फूर्त काव्य करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पेटंट हंशे आणि टाळ्या मिळवल्या. तुमच्यामुळे आम्ही पुढारी झालो, अशी कृतज्ञ भावनाही त्यांनी व्यक्त केली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही साहेबांवर स्तुतीसुमने उधळली. एकनाथ शिंदे म्हणाले, डॉ. जाधव यांनी जनतेपुढे दीपस्तंभ उभा केला आहे, तर साहेबांमुळेच ‘पुढारी’ महाराष्ट्रात ताठपणाने उभा असल्याचे सांगत अजित पवार यांनी साहेबांच्या निर्भीड बाण्याचे गुणवर्णन केले.

जनतेचे ऋण मर्मबंधातील ठेव : साहेब

साहेबांनी आपल्या अनुभवसंपन्न भाषणात आम जनतेचे ऋण मुक्तकंठाने मान्य करीत जनतेचे ऋण हे आपल्या मर्मबंधातील ठेव असल्याची उत्कट भावना व्यक्त केली. या ऋणातच आपल्याला कायमचे राहायचे आहे, अशी मानसिकताही त्यांनी प्रकट केली.

अनुपमेय गौरव सोहळा; सर्वांची उभे राहून मानवंदना

साहेबांच्या भाषणानंतर साहेब आणि सौ. गीतादेवी यांचा भावोत्कट गौरव झाला. गौरव समितीच्या वतीने तलवार आणि सन्मानचिन्ह तसेच शाल देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सौ. गीतादेवी यांचा सत्कार विधान परिषद सदस्य नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते करण्यात आला, तेव्हा समस्त उपस्थित जनसागराने उभे राहून साहेबांना मानवंदना दिली. फार क्वचित अशा उत्कट प्रेमाचा, आदराचा अनुभव येतो.

‘सिंहायन’चे प्रकाशन

याचवेळी साहेबांचे आत्मचरित्र असलेल्या ‘सिंहायन’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ पार पडला. एक हजारावर पाने असलेला हा ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही जडणघडणीचा इतिहास असल्याचे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात काढले. व्यासपीठावरील मान्यवर ‘सिंहायन’ चाळून पाहत होते. एखादे प्रकरण वाचताना दिसत होते आणि चेहर्‍यावरील प्रतिसादातून पसंतीची पावतीही मिळत होती.

प्रश्नात मार्ग काढले : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीदार भाषणात बाळासाहेबांच्या पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्याचा मनपूर्वक गौरव केला. साहेबांना जनतेनेच पुढारपण दिले आहे आणि साहेबांनी पत्रकारितेचा व्रतस्थपणे वसा सांभाळला आहे, या त्यांच्या उद्गारातून साहेबांच्या पत्रकारितेतील योगदानाची आणि सामाजिक कार्याची महती स्पष्ट केली. बाळासाहेबांनी जनतेचे उदंड प्रेम मिळवले. अनेकांना जीवनाचा मार्ग दाखवला आणि वेगवेगळ्या आंदोलनाचे, लढ्यांचे केवळ नेतृत्वच केले नाही, तर प्रश्नामध्ये त्यांनी मार्गही काढले, असे सांगत फडणवीस यांनी साहेबांच्या प्रश्न मार्गी लावण्याच्या कौशल्याचे कौतुक केले आणि टोल लढ्यासह अनेक प्रश्नांत त्याचा अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक इतिहासात ‘पुढारी’चे योगदान अविस्मरणीय : शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सामाजिक इतिहासात ‘पुढारी’चे योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगत साहेबांचा गौरव केला. सियाचीनमध्ये ‘पुढारी’ने जवानांसाठी उभे केलेले हॉस्पिटल अभिमानास्पद असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.

लोकगंगेला महापूर

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा बाळासाहेबांनी खासबागेत भव्य सत्कार आयोजित केला होता, तेव्हा खांडेकर यांनी ऐन उन्हाळ्यात लोकगंगेला महापूर आला आहे, असे उद्गार काढले होते. आपण तेव्हा उपस्थित होतो, अशी आठवण सांगत आताही बाळासाहेबांच्या गौरव सोहळ्याला लोकगंगेला महापूर आला आहे, असे ते म्हणाले, तेव्हा सारा आसमंत टाळ्यांच्या कडकडाटाने निनादला. बाळासाहेब, त्यांचे सुपुत्र योगेश यांनी ‘पुढारी’ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत नेला, असे सांगत त्यांनी पिता-पुत्रांच्या कर्तृत्वाची पावती दिली.

शिस्तबद्ध, शानदार सोहळा

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आभार प्रदर्शनाने आणि पोलिस बँडवर वाजविण्यात आलेल्या राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली. हा सोहळा अतिशय शिस्तबद्ध, शानदार, दिमाखदार असा झाला. दुपारची वेळ असल्याने ‘पुढारी’च्या प्रशासनाने सर्वांसाठी फूड पॅकेटची व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी वॉटर स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची सोय होती. स्वच्छतागृहे होती. या सार्‍या चोख व्यवस्थेमुळे लोकांची कसलीही गैरसोय झाली नाही आणि एकूण व्यवस्थेबद्दल समाधानाची भावना दिसून आली.

आनंदाचा रंग, आनंद तरंग,

अवघे श्रोतेजन, सोहळ्यात दंग

सोहळा नवरंग, आनंद अभंग,

अपूर्व प्रसंग, उजळे अंतरंग,

सहस्रचंद्र दर्शन, सोहळा हो सांग

जन जनार्दन, साक्षीस अथांग

याप्रमाणे या लोकोत्सवाची भावविभोर, भावावस्था झाली असल्यास नवल नाही. अभूतपूर्व असा हा आनंदसोहळा पिढ्यान् पिढ्यांच्या कथनातून स्मरणात राहील, यात शंका नाही.

विश्वासार्हता जपण्याचा संदेश

पत्रमहर्षी साहेबांनी नव्या पिढीला त्यांच्या स्वभावाप्रमाणे परखड संदेशही दिला. पत्रकारितेची आयुधे आता पूर्णपणे बदलली आहेत. डिजिटल आणि आता तर पत्रकारितेत एआयचा जमाना आला आहे. अत्याधुनिक तंत्र आले आहे म्हणून पत्रकारितेचा आत्मा बदललेला नाही आणि हा आत्मा म्हणजे पत्रकारितेतील विश्वासार्हता! हा आत्मा बदलू शकत नाही, असे त्यांनी कळकळीने नव्या पिढीला बजावले.

Journalist may get tired, but never retired ही उक्ती सांगत आपण पत्रकारितेतून निवृत्त होणार नाही, होऊ शकत नाही, अशा शब्दांत पत्रकारितेशी असलेल्या अतूट नात्याचा आविष्कार त्यांनी केला. अजूनही आपल्याला खूप काही करायचे आहे, असा आशय व्यक्त करणारी रॉबर्ट फ्रॉस्ट यांची प्रसिद्ध कविता त्यांनी उद्धृत केली.

Woods are lovely

dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep.

या काव्यपंक्तीतून त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पत्रकारितेवर असलेली अढळ निष्ठाच त्यांनी व्यक्त केली. त्यांचे हे भाषण म्हणजे एक मुक्त चिंतनच म्हटले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT