आचार्य प्र.के. अत्रे  Pudhari Flie Photo
बहार

असे आचार्य अत्रे पुन्हा न होणे!

आचार्य प्र. के. अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी

पुढारी वृत्तसेवा
प्रा. मिलिंद जोशी

आचार्य प्र. के. अत्रे यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे, साहित्यिकाचे आणि वक्त्याचे खरे सामर्थ्य दिसले ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात. या काळात त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीच्या पात्यासारखी धारदार झाली होती. चतुरस्र आणि अष्टपैलू हे शब्द थिटे वाटावेत इतके आचार्य प्र. के. अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार, विडंबनकार, नाटककार, वक्ता आणि पत्रकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजोड ठरली. आचार्य अत्रे यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्ताने...

श्री. म. माटे म्हणत ‘माणूस गेल्यानंतर जितका काळ त्याची आठवण काढली जाते तितका काळ तो जिवंत असतो.’ मराठी माणसाच्या बोलण्यात अत्र्यांविषयीचा उल्लेख निघाला नाही असा एकही दिवस जात नाही. ‘अफाट’ या एकाच शब्दात आचार्य अत्रे यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करावे लागेल. चतुरस्र आणि अष्टपैलू हे शब्द थिटे वाटावेत इतके त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने विविध साहित्य प्रकारात विपुल साहित्यनिर्मिती करून अत्रे यांनी आपली अमीट नाममुद्रा मराठी साहित्यात उमटवली. शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार ,विडंबनकार, नाटककार, वक्ता आणि पत्रकार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजोड ठरली. त्यांनी साहित्याकडे लोकजागृतीचा पाया आणि विनोदाकडे जीवनाच्या युद्धात लढण्याचे प्रभावी शस्त्र म्हणून पाहिले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि राम गणेश गडकरी यांनी समृद्ध केलेल्या मराठी विनोद परंपरेला आपल्या खेळकर विनोदांतून अत्रेंनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निर्माण झालेली कर्‍हा नदी, पराक्रमाचा पुरुषार्थ सांगणारा पुरंदर किल्ला, सोपानदेवांची वीणा आणि जेजुरीचा खंडोबा अशा सासवड परिसरातील वातावरणात वाढलेल्या अत्र्यांच्या वाट्याला जो ‘भक्ती-शक्ती’ योग आला, त्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टींवर मनापासून भक्ती करायची आणि सर्व वाईट गोष्टींचा सर्वशक्तीनिशी सामना करायचा, हा संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाला. पाच वर्षांच्या वयातच आजोबांनी त्यांच्याकडून आर्या, दिंड्या भक्तिपदे पाठ करून घेतली. आजीच्या माहेरी होणार्‍या दत्त जयंतीच्या सोहळ्यातील लळितादि कार्यक्रमातून त्यांच्या मनात काव्यबीज रुजले. मराठी चौथ्या इयत्तेपासून त्यांना वाचनाची आवड लागली ती बक्षीस म्हणून मिळालेल्या ‘बाळाजी विश्वनाथ पेशवे’ या चरित्रामुळे. गावाच्या बाहेर असणार्‍या ख्रिस्ती वाचनालयातील मासिक मनोरंजनातील ‘जुलिया’ या कथेने त्यांना अक्षरशः भारावून टाकले. बालवयातच त्यांच्या मनात साहित्यप्रेम निर्माण झाले.

1911 मध्ये अत्रे पुण्याला आले व त्यांचे पुढील शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये झाले. पुण्यातील तत्कालीन वाङ्मय जगताने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळेच वळण दिले. 1912 मध्ये राम गणेश गडकरी यांच्याशी अत्र्यांची भेट झाली. या भेटीचा व त्यानंतर गडकरींशी आलेल्या संबंधांचा अत्रे यांच्या साहित्यावर बराच प्रभाव पडला. गडकरींप्रमाणेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, ना. वा. टिळक, बालकवी यांच्याशी त्यांचा परिचय झाला. केशवसुत, गोविंदाग्रज व बालकवी यांच्या कवितेने ते झपाटले गेले आणि त्यांच्या हातून काव्यरचना घडली. ‘झेंडूची फुले’ हा अत्रे यांचा अजरामर ठरलेला विडंबन कवितासंग्रह म्हणजे रविकिरण मंडळाची कवितेच्या अंगाने काव्यभाषेत केलेली समीक्षाच आहे. अत्रे यांनी नाटक, काव्य, पाठ्यपुस्तकनिर्मिती, व्यक्तिप्रधान लेखन, विनोदी लेखन, विनोदी कथा, कादंबरी, आत्मचरित्र, चरित्र, प्रवासवर्णन, समीक्षा, स्फुटलेखन, संपादन अशा साहित्याच्या सर्व क्षेत्रात अस्सल मराठी वळणाचे सुंदर, प्रासादिक व खुमासदार लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून मान्यता मिळवलीच; शिवाय आपल्या निर्मितीने नाटकांत व विनोदात अपूर्व असे मानदंड निर्माण केले. अत्रे यांनी काही वेळा मकरंद, केशवकुमार, आनंदकुमार, आत्रेय, घारुअण्णा घोडनदीकर, सत्यहृदय, प्रभाकर, साहित्य फौजदार, वायुपुत्र, काकाकुवा, अस्सल धुळेकर, निकटवर्ती, जमदग्नी, महाराष्ट्र सेवक इत्यादी टोपण नावे वापरली. आधुनिक महाराष्ट्रात इतके विविधांगी कर्तृत्व दाखविणारा दुसरा लेखक सांगणे अतिशय अवघड आहे.

विनोदी लेखक आणि वक्ता म्हणून अत्र्यांना महाराष्ट्रात जेवढी लोकप्रियता मिळाली तेवढी दुसर्‍या कोणाच्याही वाट्याला आली नाही. ‘विनोद’ हा जसा अत्र्येंच्या लेखणीचा प्राणभूत घटक होता तसाच तो त्यांच्या वाणीचाही होता. त्यांचा विनोद हा पंडिती वा कोटीबाज नाही. मानवी वर्तनातील व स्वभावातील विसंगती टिपणारा, काही वेळा बोचकारणारा, खट्याळ व क्वचित शिवराळही आहे. परंतु, त्यातील ताजेपणा आणि उत्स्फूर्तता मराठीतील दुसर्‍या कुठल्याच विनोदकारात आढळत नाही. अत्रेंच्या व्यक्तिमत्त्वातील धाडस आणि आक्रमकता यांचा त्यांच्या साहित्यातही आविष्कार घडतो आणि तोच त्यांच्या साहित्याला वेगळेपणा बहाल करतो. आचार्य अत्रे वीस वर्षे शिक्षण क्षेत्रात रमले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीला त्यांनी नावारूपाला आणले. ही संस्था अत्र्यांच्या वक्तृत्वाची, नाट्यलेखनाची आणि समाजसेवेची प्रयोगशाळा होती. प्राथमिक शाळेसाठी ‘नवयुग वाचनमाला’ आणि माध्यमिक शाळेसाठी ‘अरुण वाचनमाला’ या दोन मराठी क्रमिक पुस्तकांच्या माला त्यांनी वि. द. घाटे आणि प्रा. कानेटकर यांच्या सहकार्याने लिहिल्या. महाराष्ट्रातील लक्षावधी मुलांची मराठी भाषा या पुस्तकांनी घडविली. 1937 साली काँग्रेसचे सभासद झाल्यानंतर पुण्याच्या पूर्व भागातून म्युन्सिपालटीत निवडून गेलेले अत्रे जेव्हा स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले तेव्हा पुण्यातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, जिजामाता बाग, संभाजी पार्क, बससेवा या सुधारणा त्यांच्या कार्यकाळात झाल्या. रे मार्केटला ‘महात्मा फुले मार्केट’ आणि भांबुर्ड्याला शिवाजीनगर ही नावे त्यांनीच दिले. प्राथमिक शिक्षकांसाठी नगरपालिकेतर्फे त्यांनी ‘गांधी ट्रेनिंग कॉलेज’ काढले.

चित्रपट क्षेत्रातील त्यांची वाटचालही थक्क करणारीच आहे. ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन टॉकिजमध्ये तब्बल बावन्न आठवडे हाऊसफुल्ल चालला. ‘श्यामची आई’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, तर ‘महात्मा फुले’ या चित्रपटाला रौप्यपदक मिळाले. अत्र्यांनी सतरा मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. किर्लोस्कर-देवलांपासून उगम पावलेल्या आणि गडकरी-खाडीलकरांच्या काळात शिखरावर पोहोचलेल्या मराठी रंगभूमीला मूकपट आणि बोलपटाच्या काळात जेव्हा वाईट दिवस आले तेव्हा नट बेकार झाले होते. नाटक कंपन्या बंद पडत होत्या. रसिक नाटकांपासून दूर गेले होते. अशा काळात नाटककार अत्रेंनी चोवीस दर्जेदार नाटके लिहून मराठी रंगभूमीला सावरत नवे चैतन्य निर्माण केले. अच्युतराव कोल्हटकरांना आदर्श मानून पत्रकारिता करताना ‘वाङ्मयाच्या मधुर पाकात राजकारण तळून ते वाचकांना द्यावयाचे’ हे अच्युतरावांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य अत्रेंनीही त्यांच्या पत्रकारितेत जपले. ‘नवयुग’ साप्ताहिक व दैनिक ‘मराठा’तील पत्रकारितेमुळे त्यांच्यावर अनेक प्राणांतिक संकटे ओढवली, तरीही त्यांनी आपला बाणा सोडला नाही.

साहित्य, राजकारण आणि समाजकारणाच्या ज्या ज्या प्रवाहात अत्रे शिरले, तो तो प्रवाह अत्र्यांनी केवळ गतिमान केला नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाचे असंख्य तरंग त्यांनी त्या प्रवाहात निर्माण केले. एखादा मोठा जलप्रवाह जसा खळाळत अनेक पात्रांतून वाहत राहावा, तसे त्यांचे कर्तृत्व समाजजीवनाच्या अनेक पात्रांतून खळाळत राहिले. वाहत्या प्रवाहांच्या मार्गात जसे अडथळे येतात तसेच त्यांच्याही मार्गात आले; पण ते आपल्या वाक्चातुर्याने, विनोदबुद्धीने आणि धैर्याने दूर करत अत्रे पुढे जात राहिले. आचार्य अत्रे यांच्यातल्या योद्धा पत्रकाराचे, साहित्यिकाचे आणि वक्त्याचे खरे सामर्थ्य महाराष्ट्राला दिसले ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशी गर्जना त्यांनी केली. या काळात त्यांची लेखणी आणि वाणी तलवारीच्या पात्यासारखी धारदार झाली होती. त्या बळावर 1955 ते 1960 अशी पाच वर्षे ते दिल्ली सरकारला हादरवीत राहिले. त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला. त्या काळात अत्र्यांच्या वाग्बाणांनी भले भले पुढारी जखमी झाले.

1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा विजय जितका महाराष्ट्राचा तितकाच अत्रे नावाच्या झंझावाताचाही होता.

अत्रे पर्वात गाजलेले अत्रे-फडके, अत्रे-माटे आणि अत्रे-भावे वाद यांची चर्चा साहित्यविश्वात नेहमीच होत असते. एखाद्याने टीका केली तर त्याकडे दुर्लक्ष करणे हा अत्र्यांचा स्वभाव नव्हता. आचार्य अत्रे जीवनातील सौंदर्याचे पूजक होते. साहित्याच्या आणि वक्तृत्वाच्या नभांगणातील लखलखते नक्षत्र होते. वक्तृत्वाच्या रणांगणावर पराक्रम करण्यासाठीची सारी आयुधे त्यांच्याकडे होती. त्या आयुधांचा त्या त्या प्रसंगी वापर करण्यात ते वाक्बगार होते. त्यांच्या विनोदाने आणि वक्तृत्वाने महाराष्ट्राला केवळ हसविले नाही, तर रसरशीत जीवनद़ृष्टी आणि सौंदर्यद़ृष्टी दिली. मराठीपणातल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. कोतेपणाच्या चौकटीतून बाहेर पडायला शिकविले. दुसर्‍याच्या चांगल्या गुणांचे कौतुक करण्यासाठीची गुणग्राहकता आणि उदारमनस्कता दिली. जीवनाच्या लढाईत हेतूपुरस्सर अडथळ्यांचे डोंगर उभे करणार्‍यांशी दोन हात करण्याचे धारिष्ट्य दिले. आपल्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन जर कोणी आपल्या प्रांतिक आणि भाषिक अस्मितेची विटंबना करणार असेल, तर त्यांना धडा शिकविण्यासाठी रणशिंग कसे फुंकायचे याचा वस्तुपाठ अत्र्यांनी घालून दिला. जीवनाचे कोणतेही क्षेत्र माणसांनी त्याज्य मानता कामा नये, हा संस्कार केला. विसाव्या शतकातल्या पहिल्या पन्नास वर्षांवर आपल्या विविधांगी अफाट कर्तृत्वाची मुद्रा उमटवीत ‘आचार्य अत्रे पर्व’ निर्माण करणारा हा महान साहित्यकार 13 जून 1969 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले होते.

सर्वांगाने भोगी जीवन

परि ज्याच्या उरी विरक्ती

साधुत्वाचा गेला पूजक

कलली, खचली, श्री शिवशक्ती

एखाद्याचे तोंडभरून कौतुक करताना प्रसंगी अतिशयोक्तीचा वापर करून आचार्य अत्रे म्हणत, ‘गेल्या दहा हजार वर्षांत अशी गोष्ट झाली नाही.’ आचार्य अत्रे यांच्याबाबतीत प्रामाणिकपणे असेच म्हणावे लागेल, ‘दहा हजार वर्षात असा माणूस होणे नाही.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT