नीलेश जैन, सिनेदिग्दर्शक-गीतकार
‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पीयूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरू होते. माणूस म्हणून ते अतिशय भावुकस्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वाक्यं जितकी प्रसिद्ध होती, तितकंच त्यांच्या डोळ्यांतील पाणीही लोकांनी अनुभवलं. त्यांनी जाहिरातीचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं; पण ते माणसं आणि त्यांच्या भावना वाचू शकत होते. ते ‘मोठे’ होते. कारण, ते इतरांना ‘मोठं’ बनवू इच्छित होते. केवळ इच्छेपुरतं हे मर्यादित राहिलं नाही. मोठ्या संधी देऊन त्यांनी अनेकांना मोठं केलंही.
भारतीय जाहिरात विश्जवाचे प्रतिभावंत शिल्पकार अशी ओळख असणार्या अॅड गुरू पीयूष पांडे यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पाश्चिमात्य केंद्रित जाहिरातींपासून जाहिरात विश्वाला दूर नेत भारतीय द़ृष्टी आणि भावनिक आशय देण्याचा प्रयत्न केला. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’सारख्या अजरामर ओळी लिहिणारे पीयूष म्हणजे भावनांची शिकवण देणारे महान गुरू होते. माणूस म्हणून ते अतिशय भावुक स्वभावाचे होते. त्यांच्या बोलण्यातली वाक्यं जितकी प्रसिद्ध होती, तितकंच त्यांच्या डोळ्यांतील पाणीही लोकांनी अनुभवलं. त्यांनी जाहिरातीचं औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं; पण ते माणसं आणि त्यांच्या भावना वाचू शकत होते. हाच गुण त्यांच्या ‘एशियन पेंटस्’च्या जाहिरातींमधून झळकला. यामध्ये त्यांनी रंगांच्या माध्यमातून माणसांच्या नात्यांचा रंग दाखवला.
पीयूष यांच्या आत एक मूल दडलेलं होतं. ते स्वतःही हसत असायचं आणि इतरांनाही हसवायचं. ‘फेव्हिकॉल’च्या जाहिरातींमधील त्यांची विनोदाची धार आजही स्मित आणते. ‘कॅडबरी’साठी त्यांनी लिहिलेलं ‘कुछ खास हैं जिंदगी में...’ हे वाक्य खरं तर त्यांच्या स्वतःच्या जिंदादिलीचं तत्त्वज्ञान होतं. त्यांच्या मोठ्या मिशा त्यांच्या राजस्थानी पार्श्वभूमीची ओळख देणार्या होत्या. आपल्या संस्कृतीशी असलेल्या खोल नात्याचं ते प्रतीक होतं. साधेपणा हे पीयूषजींचं सर्वांत मोठं बलस्थान होतं. कोणतीही भावना साध्या शब्दांत नजाकतीने, अलगद; पण काळजाला भिडणार्या स्वरूपात व्यक्त करणं यामध्ये असणारी त्यांची हातोटी दुर्मीळ होती. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे, लोकांची प्रतिभा ओळखणं आणि त्यांना योग्य संधी देणं. जाहिरातविश्वात मला घेऊन येणारे आणि माझ्यावर विश्वास ठेवणारे तेच होते. खर्या अर्थाने एक चांगले ‘टीम लीडर’ म्हणून त्यांनी योग्य कामासाठी योग्य क्रिएटिव्ह निवडला. स्पर्धेच्या युगात असुरक्षिततेच्या भावनेतून इतरांना संधी द्यायला कचरणार्या किंवा सर्व कामे स्वतःकडे ठेवण्यासाठी आटापिटा करणार्यांच्या गर्दीतील ते दुर्मीळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यासोबत काम करताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ते कधीच कोणाला ‘बरोबर’ किंवा ‘चूक’ या तराजूत मोजत नसत. एखादी गोष्ट वेगळी वाटली, तरी ते ‘हे असं का लिहिलंस? काय सांगायचं आहे यामधून?’ एवढंच विचारत असतं. क्रिएटिव्ह लोकांचा अतिशय सन्मान करणं, हा त्यांचा मूलतः स्वभाव होता.
एकदा ‘गूगल’च्या जाहिरातीसाठी माझ्या एका गाण्यावर ते इतके खूश झाले की, आपल्या पुस्तकात त्यांनी त्या गीताचा उल्लेख माझ्या नावासह केला. ते ‘मोठे’ होते. कारण, ते इतरांना ‘मोठं’ बनवू इच्छित होते. केवळ इच्छेपुरतं हे मर्यादित राहिलं नाही. मोठ्या संधी देऊन त्यांनी अनेकांना मोठं केलंही. त्यांच्या आत अत्यंत संवेदनशील माणूस सदैव होता. कोरोना महामारी आली तेव्हा त्यांनी सांगितलं की, आता सिनिअर्सना पुढे यावं लागेल. कारण, वादळ मोठं आहे. महामारीच्या काळात त्यांनी कोणाचाही पगार कमी होऊ दिला नाही. उलट गरज पडली, तर सगळ्यात आधी माझा पगार कमी करा, असं सांगितलं. एखाद्याच्या आजारात त्याची चौकशी करणं किंवा एखादा विनोद सांगण्यासाठी अचानक फोन करणं हे त्यांचं नेहमीचंच होतं. पीयूषजी जे काही चांगलं वाचत किंवा ऐकत, ते लगेच सगळ्यांशी शेअर करत असत. त्यांच्या मनात मुलासारखं निरागसपण होतं. काही नवीन लिहिलं की, लगेच वेळ न बघता फोन करून ते वाचून दाखवणं ही त्यांची ओळख होती.
दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना एक कविता भेट देत असे. ते त्या कवितेची आतुरतेने वाट बघत. त्यांनी जिवंत असताना लिहिलेली एक कविता, आज त्यांच्या आठवणीत रूपांतरित होईल, असं कधी वाटलं नव्हतं...
एक इंसान जो उठा कभी जमीं से
आज पहुंच गया फलक तक
फिर भी जुड़ा हैं जमीं से....
उसके दिलों की धड़कन
प्यार से आबाद हैं
कहकहों में छिपे हैं जो अश्क
उनमें गहरे दर्द का एहसास हैं...
उसके पास सबसे अलग एक आंख हैं
जिसमें मंजर हैं दूर का
पर वह देखता आसपास हैं...
उसका कागज, कलम और स्याही से तो
बस कहने को रिश्ता हैं
वह अपनी तहजीब, अपनी जुबान में
बस जज्बात से लिखता हैं...
औरों को दिखती होंगी उसकी ऊंचाईंया
मगर हमें तो वह बुनियाद सा दिखता हैं।
तो खरोखरच एक ‘मॅग्नेट’ होता. लोकांना आकर्षित करणारा, ऊर्जा देणारा. त्यांचा हजरजबाबीपणा विलक्षण होता. कधी कधी तर ते क्लायंटशीही चुटकी घेत बोलायचे; पण लोकांना माहिती होतं की, पीयूषजी जे काही बोलतात, त्यामागे नक्की काहीतरी गंभीर अर्थ असतो.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेहमी एक ऊर्जा होती. कोणालाही प्रोत्साहित करण्याची संधी ते सोडत नसत. एकदा मी त्यांना सांगितलं की, मी फिचर फिल्म दिग्दर्शित करणार आहे. यावर ते इतके आनंदित झाले की, लगेच त्यांनी मला मेसेज पाठवला, ‘दिल से बनाओ, खुलकर बनाओ.’ मी सांगितलं की, शूटिंग बाराबंकीत होणार आहे, तर ते म्हणाले, ‘अरे ती जागा छोटी आहे; पण काम मोठं करून घेते. माझ्या सुरुवातीच्या काळात जाहिरात सर्वेक्षणासाठी मी बाराबंकीच्या खेड्यांत गेलो होतो आणि तिथेच मी ‘चलो पढ़ाएं, कुछ कर दिखाएं’ ही ओळ लिहिली होती.
माझी फिचर फिल्म पूर्ण होऊन प्रदर्शित झाली तेव्हा मी ‘थँक्स’मध्ये त्यांचं नाव सर्वात वर ठेवलं; पण दुर्दैवाने ती त्यांना दाखवू शकलो नाही. ही खंत आयुष्यभर राहील.