Pitru Paksha and Water | पितृपक्ष आणि पाणी 
बहार

Pitru Paksha and Water | पितृपक्ष आणि पाणी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मंगेश कश्यप

पाणी हे पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या वारशाचे आणि आपण पुढच्या पिढीला द्यायच्या वारशाचे प्रतीक आहे. आज आपण अर्पण केलेले स्वच्छ जल उद्याच्या पिढ्यांना स्वच्छ नद्या, विहिरी आणि तलाव म्हणून मिळावे, हीच खरी पितृसेवा ठरेल. तर्पणाचे पाणी ओंजळीतून सोडताना मनात पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि पाण्याविषयी जबाबदारी, या दोन्ही भावना असाव्यात.

मागच्याच आठवड्यात आपण महाराष्ट्रासह अख्खा देश जल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, याकडे लक्ष वेधले जात असताना आता महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. त्यातही नेमकी गोष्ट अशी की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा पितृपक्ष आला आहे. भारतीय संस्कृतीत पाणी म्हणजे केवळ तहान भागवणारा घटक नाही. ते जीवनाचा आधार, पवित्रतेचे प्रतीक आणि देवतास्वरूप मानले गेले आहे. म्हणूनच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जवळपास प्रत्येक संस्कारात पाण्याचा सहभाग दिसतो.

पितरांचा उद्धार आणि पाणी यांचा सर्वात प्रसिद्ध संबंध गंगावतरणाच्या कथेत दिसतो. सगर राजाचे साठ हजार पुत्र कपिल मुनींच्या क्रोधाने भस्म झाले. त्यांना सद्‌गती मिळावी म्हणून वंशज पिढ्यान्‌ पिढ्या प्रयत्न करत राहिले. अखेर भगीरथाने कठोर तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवर आणले आणि तिच्या जलस्पर्शाने पूर्वजांचा उद्धार झाला. (वाल्मीकी रामायण, बालकांड, सर्ग ३८ ते ४४; भागवत पुराण, नववा स्कंध) या कथेचा अर्थ असा की, पूर्वजांसाठी केलेला प्रयत्न पिढ्यांच्या पलीकडेही सुरू राहतो आणि पाणी हे त्याचे माध्यम असते. तसेच आपण आणि आपले दिवंगत पूर्वज यांना जोडणारा भावनिक दुवा ठरते. भाद्रपद वद्य पक्षातील हा पंधरवडा म्हणजे पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे. पितृपक्षातील श्राद्धविधीची सुरुवातच स्नानाने होते. शरीर आणि मन शुद्ध करूनच पितरांचे स्मरण करावे, अशी परंपरा आहे. पाणी शुद्धता, शीतलता आणि प्रवाहीपणा यांचे प्रतीक आहे. ते मनातील कटुता धुवून टाकते आणि शांत, कृतज्ञ भावनेने कर्म करण्याची प्रेरणा देते. पंचमहाभूतांपैकी जल हे तत्त्व सर्वांना सामावून घेणारे आणि सर्वांना जगवणारे आहे. म्हणूनच पितरांप्रती तर्पणाच्या माध्यमातून श्रद्धा अर्पण करण्यासाठी पाण्याहून योग्य माध्यम नाही, असे मानले जाते.

'तर्पण' हा शब्द 'तृप्' म्हणजे तृप्त करणे या धातूपासून आला आहे. हातात दर्भ आणि काळे तीळ घेऊन, पितरांचे नाव व गोत्र उच्चारून ओंजळीतून पाणी सोडले जाते. या जलांजलीने पितर तृप्त होतात, अशी श्रद्धा आहे. तर्पणाचा भावार्थ असा की, आपल्याला जे काही मिळाले ते पूर्वजांच्या कष्टांमुळे, त्यागामुळे आणि संस्कारांमुळे मिळाले. त्याची आठवण ठेवून पाणी आणि पिंडाचे दान करणे म्हणजे 'तुम्ही आमच्या स्मरणात आहात' हे सांगणे आहे. वस्तूंची किंमत या विधीत नसते. मनातील भाव हेच त्याचे खरे मोल असते. पिंडदानात शिजवलेला भात, काळे तीळ, तूप आणि पाणी यांपासून तयार केलेले पिंड पितरांना अर्पण केले जातात. पिंड हे देहाचे प्रतीक मानले जाते. पंचमहाभूतांतून निर्माण झालेला देह अखेर पुन्हा निसर्गात विलीन होतो, हा जीवनचक्राचा संदेश यातून मिळतो. त्यामुळे पिंडदान हे केवळ कर्मकांड नाही. ते मृत्यूकडे शांतपणे पाहण्याची, जन्म-मृत्यूच्या अखंड प्रवाहाची जाणीव करून देणारी एक साधना आहे. पूर्वी नदीकाठी, तीर्थक्षेत्री किंवा वाहत्या पाण्यात हे विधी करण्याची प्रथा रूढ झाली, ती याच प्रवाही जलाच्या पावित्र्यामुळे.

आज मात्र या श्रद्धेच्या आड एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पितृपक्षात नदीघाटांवर मोठी गर्दी होते. प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे द्रोण, निर्माल्य, रासायनिक रंग, वापरलेले कपडे आणि साबण-शाम्पू थेट नदीत जातात. ज्या पाण्याने पितरांना तृप्त करायचे, तेच पाणी आपल्या हातून दूषित होत असेल, तर हे विसंगत ठरते. दूषित नदी हा पूर्वजांच्या वारशाचा अपमानच आहे. कारण, अनेक पूर्वजांनी विहिरी खोदल्या, तळी बांधली, बारव उभारली आणि झाडे लावली. जलस्रोतांचे रक्षण हा त्यांचा संस्कार होता. यावर उपाय कठीण नाहीत. तर्पण घरच्या घरी तांब्याच्या किंवा पितळेच्या ताम्हणात करून ते पाणी नंतर तुळशीच्या किंवा झाडाच्या मुळाशी घालता येते. पिंड नदीत टाकण्याऐवजी गायीला, पक्ष्यांना किंवा मातीत विसर्जित करता येतात. पत्रावळी, केळीची पाने आणि मातीची भांडी वापरून प्लास्टिक व थर्माकोल टाळता येते. निर्माल्याचे खत करता येते. जिथे नदीकाठी विधी करावे लागतात, तिथे घाट स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण स्वतः उचलू शकतो. श्राद्ध हा शब्द 'श्रद्धा' या मूळ धातूपासून आला आहे. श्रद्धा असेल, तर विधीचे स्वरूप काळानुसार बदलले, तरी त्याचा आत्मा टिकून राहतो.

पितृपक्षाचा मूळ गाभा कृतज्ञता हा आहे. आपण एकट्याने काहीही घडवलेले नाही. आपल्या मागे पिढ्यान्‌ पिढ्यांच्या कष्टांची, संस्कारांची आणि त्यागाची साखळी आहे. वर्षातून काही दिवस थांबून त्या साखळीचे स्मरण करणे, हे माणूस म्हणून आपल्याला अधिक विनम्र आणि संवेदनशील बनवते. त्यातून सर्व जीवांविषयी करुणा आणि निसर्गाशी नाते जपण्याचा विचार दिसतो.

पाणी हे पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या वारशाचे आणि आपण पुढच्या पिढीला द्यायच्या वारशाचे प्रतीक आहे. आज आपण अर्पण केलेले स्वच्छ जल उद्याच्या पिढ्यांना स्वच्छ नद्या, विहिरी आणि तलाव म्हणून मिळावे, हीच खरी पितृसेवा ठरेल. तर्पणाचे पाणी ओंजळीतून सोडताना मनात पूर्वजांविषयी कृतज्ञता आणि पाण्याविषयी जबाबदारी, या दोन्ही भावना असाव्यात. पितृपक्षाचा खरा संदेश हा आहे की, आपण पूर्वजांचे ऋण मानतो आणि त्यांनी जपलेला जलसंवर्धन,संगोपन, संयोजन, याचे भान ठेवून पुढच्या पिढीसाठी शुद्ध, प्रदूषणरहित जलस्रोत जपून ठेवायला हवेत. ही जलसंवर्धनाची परंपरा पुढे नेणे हीच खरी आपल्या पितरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT