हर्ष काबरा
जगभरातील निवडणुका दाखवतात की, ट्रोलसेनेने ऑनलाईन लोकप्रियतेचा फुगा कितीही फुगवला, तरी मतपेटी त्याला भेदते. गदारोळ मतदारांचे मन जिंकत नाही, आशय जिंकतो. ब्राझील, इस्रायल आणि अमेरिका या तीन देशांत अलीकडेच झालेल्या निवडणुकांत टोकाच्या ट्रोलधार्जिण्या प्रचारशैलीवर अवलंबून असलेल्या पक्षांना नुकतेच पराभवाला सामोरे जावे लागले.
ब्राझील, इस्रायल आणि अमेरिका या तीन देशांत अलीकडेच निवडणुका रंगल्या. तिन्ही देशांतील राजकीय लढाया वेगवेगळ्या; पण तिन्ही ठिकाणी टोकाच्या प्रचारशैलीवर अवलंबून असलेल्या पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकांमधील समान धागा होता प्रचाराचे नवे तंत्र. समाजमाध्यमांवरील गदारोळ म्हणजे जनतेचा पाठिंबा, या समजुतीने काही पक्षांनी विरोधकांवर शिवराळ हल्ले चढवले, धक्कादायक चित्रांचा मारा केला आणि खोट्या माहितीचा महापूर आणला. समाजमाध्यमांवर या ट्रोलधार्जिण्या प्रचाराने विरोधकांचा आवाज दाबला खरा; पण मतपेटीपर्यंत पोहोचताना त्याची हवा निघाली. ट्रोलसेनेचा नव्हे, तर मतदारांचा शब्द अखेरचा ठरला.
ब्राझीलमध्ये फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी एक्स, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी वैयक्तिक टीका, एआयनिर्मित चित्रे आणि खोटे दावे यांचा वापर केला. इस्रायलमध्येही बेंज्यामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने एआयनिर्मित चित्रफितींचा धडाकाच लावला. विवादास्पद मंत्री इतामार बेन-ग्वीर यांनी ४० लाखांहून अधिक वेळा पाहिली गेलेली चित्रफीत प्रसारित केली. त्यात लठ्ठ पॅलेस्टिनी कैद्यांना तुरुंगात जबरदस्तीने वजन घटवण्यास भाग पाडले जात असल्याचे दाखवले होते. अशा क्लृप्त्यांमुळे कट्टर समर्थकांची पसंती मिळते. समाजमाध्यमांची अल्गोरिदम्स टोकाच्या मजकुराला खतपाणी घालतात; पण पसंती मिळणे म्हणजे मते मिळणे नव्हे. बोल्सोनारो आणि नेतान्याहू यांच्या बाबतीतही हेच घडले. समाजमाध्यमांवरील हालचालींनी निवडणूक ताकदीचे फसवे चित्र निर्माण होते. प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये अनेक मतदार याच टोकाच्या भूमिकांमुळे दुरावतात. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या अनिश्चित मतदारांच्या बाबतीत हे तंतोतंत खरे ठरते.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांनी हे दाखवून दिले. प्रचाराच्या शेवटच्या दिवसांत इलॉन मस्क यांनी ‘एक्स’वर एआयने तयार केलेले एक चित्र टाकले. त्यात वाईट शक्तींच्या विजयाचे प्रतीक म्हणून ‘स्टार वॉर्स’चा ऐनाकिन स्कायवॉकर सम्राटासारख्या स्थितीत दाखवला होता. स्कायवॉकर हा एकेकाळचा नायक पुढे बंडखोर योद्धा आणि खलनायक बनतो. ‘हेच आपल्याला हवे होते, डाव्यांनी ते हिसकावून घेतले,’ असे मस्क मिष्कीलपणे म्हणाले. सामान्य लोकांना यातील विनोद समजणे कठीण होते, तरीही त्या चित्राला दोन लाखांहून अधिक पसंती मिळाली. मतांनी मात्र वेगळीच कहाणी सांगितली. रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देण्यासाठी मस्क यांनी सुमारे ४४.५ कोटी डॉलर खर्च केले होते; परंतु अनेक मतदारांनी त्यांच्या उमेदवारांविरुद्ध मतदान केले. मस्क यांनी जिथे आपल्या कंपन्या उभारल्या आहेत, त्या टेक्सासमध्ये रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला. समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष पाठिंबा यातील दरी म्हणजे समर्थनाचा आभास. तो व्यक्ती, देश आणि व्यासपीठानुसार बदलतो. समाजमाध्यमे जनमत दाखवण्याऐवजी वास्तव विकृतही करू शकतात.
संताप म्हणजे धोरण नव्हे
कॅनडातही हेच पाहायला मिळाले. गेल्या वर्षी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पोइलिव्हरे राष्ट्रीय निवडणूक आणि स्वतःचा कार्लटन मतदारसंघही हरले. त्यांचा प्रचार समाजमाध्यमांवर अवलंबून होता. त्यात व्यवस्थाविरोधी चित्रफिती व घोषणा होत्या. टीकाकारांनी त्यांच्या सुरांना शत्रुत्वपूर्ण, ‘ट्रम्पछाप’ आणि सांस्कृतिक वादात अडकलेले म्हटले. यामुळे उत्साही समर्थक तयार झाले; पण महागाई, घरे आणि अर्थव्यवस्थेबाबत स्पष्ट आराखडा मांडणारे मार्क कार्नी विजयी झाले. नेदरलँड्समध्ये गिर्ट वाइल्डर्स यांच्या पीव्हीव्ही पक्षाने आश्रयार्थी, इस्लाम आणि व्यवस्थेविषयीचा राग पेटवून टाकणारा जोरदार प्रचार केला; परंतु ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांच्या ११ जागा घटून ते पुन्हा विरोधी पक्षात गेले. परदेशी बनावट खात्यांनी विभाजनकारक आणि चिथावणीखोर संदेशांना खतपाणी घातले, तरीही संतापाची धग आघाडी उभारण्याचे कौशल्य आणि व्यवहार्य धोरणांची जागा घेऊ शकली नाही.
स्वीडनमध्ये ‘स्वीडन डेमोक्रॅट्स’ पक्षाची मते २०२६ मध्ये २०.५ टक्क्यांवरून १७.५ टक्क्यांवर आली. परिणामी, डाव्या आघाडीने निसटता विजय मिळवला. गुन्हेगारी, सरकारी लाभांचा गैरवापर आणि स्वीडिश भाषेची अपुरी जाण यांबाबत कठोर भूमिका घेणारे संदेश त्यांनी मोठ्या प्रमाणावर पसरवले होते. यामुळे कट्टर समर्थक पेटून उठले; पण पुरेसे अनिश्चित मतदार वळवता आले नाहीत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पचे काही ‘मागा’ समर्थक सातत्याने वंशद्वेषी व्यंगचित्रे आणि चिथावणीखोर मजकूर टाकत होते. काही तर व्हाईट हाऊसच्या अधिकृत खात्यांवरही दिसले; पण या कशानेही खऱ्या समस्या लपल्या नाहीत. इंधनाचे गगनाला भिडलेले दर आणि जीवघेणी महागाई, यांसारख्या चिंता दूर करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाकडे कोणतीही लोकप्रिय धोरणे नव्हती.
डेमोक्रॅटिक पक्षाने तरुण पुरुषांमध्ये लोकप्रिय असलेला जो रोगनसारखा स्वतःचा संवादक शोधण्यासाठी दोन वर्षे घालवली; पण तो काही त्यांना सापडला नाही, तरीही २०२४ मध्ये ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या तरुण श्वेतवर्णीय पुरुषांची मते त्यांनी मध्यावधी निवडणुकांमध्ये परत मिळवली. रोमानियाने वेगळीच बाजू दाखवली. २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी नियोजित टिकटॉक मोहिमेमुळे कॅलिन जॉर्जेस्कू यांची लोकप्रियता अचानक वाढली; पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या सुमारे ८०० टिकटॉक खात्यांचा संबंध रशियाशी असल्याचे आणि प्रभावशाली व्यक्तींना छुपे पैसे दिल्याचे आरोपही समोर आले. निवडणुकीच्या पहिल्या फेरीचा निकाल रद्द करण्यात आला आणि मे २०२५ च्या फेरनिवडणुकीत त्यांना बंदी घालण्यात आली.
मतदार आणि संस्था प्रामाणिकपणा व नियमांचा आदर यांचा आग्रह धरतात, तेव्हा पडद्याआडून चालवलेल्या समाजमाध्यमी मोहिमांचा पोकळपणा कसा उघडा पडतो, हे यातून दिसले. समाजमाध्यमांवरील उपद्रवींशी वाद घालणे सहसा चुकीचे असते. ते मुद्दाम चिथावणी देतात आणि कुहेतूने वाद घालतात. त्यांना प्रत्युत्तर दिल्याने त्यांच्या मजकुराची पोहोच वाढते, तरीही सर्व राजकीय बाजूंच्या कार्यकर्त्यांना हा धडा अंगवळणी पडलेला नाही. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्या अनपेक्षित सत्तावापसीनंतर अनेक देशांमधील विविध पक्ष 'जॅनोनिझम'कडे आकर्षित झाले आहेत. लुला यांच्या एका जवळच्या सल्लागाराने विकसित केलेली समाजमाध्यमांवरील सक्रियतेची ही शैली म्हणजे चिथावणीखोर आणि उपद्रवी खात्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मजकुराची पोहोच रोखणे.
आशयाचाच विजय होतो
चिथावणीखोरी नेहमीच अपयशी ठरते, असे नाही; पण जेव्हा प्रचार केवळ शत्रू, अपमान, व्यंगचित्रे आणि घबराटीभोवती फिरतो, तेव्हा मतदारांना त्यांच्या आर्थिक चिंतांची उत्तरे मिळत नाहीत. कमकुवत कार्यक्रम किंवा निकृष्ट उमेदवारांची उणीव समाजमाध्यमे भरून काढू शकत नाहीत, तसेच सरकारच्या खराब कामगिरीच्या आठवणीही पुसू शकत नाहीत.
आज मोठ्या प्रमाणावर संदिग्ध आणि भ्रामक संदेश पसरवणे सोपे झाले आहे. परदेशी गटदेखील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू शकतात, तरीही पक्ष कशासाठी उभा आहे, त्याचे उमेदवार काय देऊ करतात आणि त्याने राज्यकारभार कसा केला, हेच दर्पोक्तींच्या गदारोळापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते. ऑनलाईन लोकप्रियतेचा आभास राजकारण्यांसाठी धोकादायक सापळा ठरू शकतो. तो सभ्यतेचा मुखवटा उतरवून त्यांचे खरे रंग उघडे पाडण्यास प्रवृत्त करतो; पण निवडणुकीच्या रिंगणात मतदार अखेर वल्गना, बोलघेवडेपणा आणि नेतृत्व यांतला फरक ओळखतात. केवळ आक्षेपार्ह प्रचाराच्या बळावर जनादेश मिळत नसतो.