संजय पाठक
कोणत्याही शहराची खासियत म्हणजे शहरात असणार्या विविध ठिकाणांची नावे. अशी नावे त्या शहराची ओळख सांगतात. याला पंढरपूर तरी कसे अपवाद असेल! पंढरपूर म्हणजे भक्तीचा मळा. त्यास अनुसरूनच या भक्तीनगरीतही नामरूपी भक्ती रस ओसंडून वाहत आहे.
जेव्हा नव्हते चराचर ।
तेव्हा होते पंढरपूर ॥
जेव्हा नव्हती गंगा गोदा ।
तेव्हा होती चंद्रभागा ॥
तीर्थक्षेत्र पंढरपूरचा संत, महंतांनी वर्णिलेला हा महिमा. पूर्व भारतात जगन्नाथ पुरीची यात्रा भरते. त्याला लाखो भक्त येतात; परंतु तीर्थक्षेत्र पंढरपुरी भरणारी आषाढी यात्रा त्यापेक्षा मोठी असते. महाराष्ट्रासह आसपासच्या विविध राज्यांतून पंढरीकडं भक्तांचा येण्याचा ओघ दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आयुष्यात एकदातरी पंढरीची वारी करावी, पंढरपूरला जाऊन यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं हे अवघ्या संतांचं लाडकं तीर्थक्षेत्र पंढरपूर आहे तरी कसं, हे आपण जाणून घेऊया!
हे शहर वसलंय भीमा नदीच्या काठी; पण हीच भीमा पंढरपुरात आल्यावर चंद्रभागा होते. ते का, तर भीमा नदी ही पंढरपुरात चंद्राकार वाहते. त्यामुळं या भीमा नदीला फक्त पंढरपूरपुरतंच चंद्रभागा असं संबोधलं जातं. संत नामदेवरचित श्री विठ्ठलाच्या आरतीमध्येदेखील या नदीचा उल्लेख, ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती॥’ असा आहे.
शहरातील विविध भाग, रस्ते आदींना महापुरुष, ऐतिहासिक पुरुषांच्या नावाची मांदियाळी ठरलेलीच असते. अनेकदा वेगवेगळी नावेही दिली जातात, जसे की जो कोणी प्रवर्तक असेल त्याचं नाव. अशीच नावं पंढरपुरातील विविध भागांनाही असून ती परंपरागत आहेत. ती सर्व नावं आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत आहेत. वानगी दाखल या ठिकाणच्या काही नावांचा उल्लेख करणं उचित ठरेल. ज्ञानेश्वर मंडप, नाथ चौक, नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिमद्वार, तरटीद्वार, कालिकादेवी चौक, संत पेठ, भक्ती मार्ग, तुळशी वन, अंबाबाई मैदान, राम बाग, लक्ष्मण बाग अशी ही नामावली. आपल्याला भक्तिरसात डुंबवणारी.
या शहरात एकमेकांना एखाद्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी खाणाखुणा सांगण्याची पद्धतही अशीच आध्यात्मिक नावांशी निगडीत आहे. म्हणजे असं... तांबड्या मारुतीपासून सरळ गेलं की, नाथ चौक लागतो. त्या चौकातच ज्ञानेश्वर मंडप आहे. काळा मारुती मंदिराच्या मागून थोडं पुढं जाऊन उजव्या हाताला वळलं की, तिथं गजाननबाबांचा मठ आहे. त्या मठापासून थोडं पुढं गेलं की, डाव्या बाजूला भक्तिमार्ग लागतो. कालिकादेवी चौकातून काळ्या मारुतीकडं जावा, वाटेत बंकटस्वामींचा मठ, बेलीचा महादेव, सेना महाराज मंदिर आहे. अशा पद्धतीनं पंढरपुरात पत्ता सांगण्याची पद्धत आजही आहे.
प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक शुद्धातील, तर दुसरी वद्यातील. म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. या सर्वच एकादशीदिवशी पंढरपुरात पान खाणं निषिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर कुणी पानपट्टीत पान घेण्यासाठी गेलं अन् पानपट्टीचा मालक मुस्लीम असेल, तर तो आपल्या ग्राहकाला एकादशीची आठवण करून देतो. एखादा ग्राहक एकादशी करत नसला, तरी त्यादिवशी त्यानं पान खावं की खाऊ नये, हा निर्णय त्याचा त्यानंच घ्यायचा असतो; मात्र त्यावेळी पानपट्टीचालक मुस्लीम व्यक्तीलाही हा पारंपरिक रिवाज पाळला जावा, असं मनापासून वाटतं व तो एकादशीची आठवण ग्राहकास आवर्जून करून देतो.
प्रत्येक गावाची, शहराची एक खासियत असते. एखादी गोष्ट, वस्तू, जिन्नस त्याच भागात मिळतात; परंतु हल्लीच्या ऑनलाईनच्या जमान्यात कोणत्याही गावाची, शहराची वस्तू, जिन्नस आपल्याला हवे तिथं मिळू शकतात; मात्र याला पंढरपूर अपवाद आहे. कारण, पंढरीतील काही वस्तूंना स्थान माहात्म्याचा महिमा आहे. त्यामुळे काही वस्तू, गोष्टी, जिन्नस या तीर्थक्षेत्र पंढरपुरातच मिळतात. त्या तिथंच घेणं प्रत्येकाला भावतं, पटतं, योग्य वाटतं.
तुळशीची माळ : अपेय पान, अभक्ष भक्षण, परस्त्रीसंग यापासून दूर राखण्याची ताकत पंढरीच्या तुळशीच्या माळेत असल्याची ठाम श्रद्धा वारकर्यांसह सर्वच भाविकांत आहे. त्यामुळं पंढरीतच तुळशीच्या माळेची खरेदी-विक्री केली जाते. ती पंढरपुरातच गळ्यात घातली जाते. याचा अर्थ तुळशीची माळ अन्यत्र मिळत नाही, असा नव्हे. मात्र, तुळशीच्या माळेमागचा पंढरीचा विचारमहिमा अगाध आहे.
पखवाज, वीणा, टाळ : वारकरी संप्रदायात भजन, कीर्तन, प्रवचनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी पखवाज, वीणा आणि टाळ हे तीन घटक खूप महत्त्वाचे असतात. हे घटक तीर्थक्षेत्र पंढरपुरात मोठ्या प्रमाणात घेतले जातात. त्याची दुकानातच श्रद्धेने पूजा करून त्यापुढं माथा टेकून या नव्या साहित्यासह नामदेव पायरीजवळ हरिपाठ पठण करणं, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा तुकाराम’ या नामस्मरणासह नगर प्रदक्षिणा केली जाते.
गोपीचंदन, बुक्का, अष्टगंध : वारकरी संप्रदायाची कपाळावर गंध लावण्याची एक विशिष्ट रीत आहे. कपाळावर गोपीचंदनाच्या दोन उभ्या रेघा, त्याखाली अर्धवर्तुळ, त्यामधोमध खालील बाजूस बुक्का आणि वरील बाजूस अष्टगंधाचा टिळा हे गंध म्हणजे वारकरी असे समीकरण. गंधांच्या या तिन्ही साहित्याची खरेदी पंढरपुरातच करण्यात स्थान महात्म्य आहे.
लाखंचा चुडा : श्री रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून सौभाग्यवती महिला पंढरपुरात आल्यावर लाखंचा चुडा हातामध्ये घालतात. सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गोट, तोडे यापेक्षाही कितीतरी मोल या लाखंच्या चुड्यास वारकरी संप्रदायात आहे. हा चुडा हातामध्ये घालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. हाताचे अंदाजे माप घेऊन चुडा निखार्यावर गरम करून तो मध्येच कापून पुन्हा गरम करून तो जोडला जातो. ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटातील संवादात एक शब्द आपण जरूर ऐकला असेल तो म्हणजे, ‘गरम बांगडी, गरम बांगडी.’ ती गरम बांगडी म्हणजेच चुडा होय.
सर्वसाधारणपणे सर्वत्र पगाराशी निगडीत तारखांना व्यवहार करण्याची रीत आहे. याला अपवाद आहे ते तीर्थक्षेत्र पंढरपूर. या ठिकाणी शाळांची फी, फ्लॅटचे हफ्ते, घर व नळपट्टी, हफ्त्यावर घेण्याच्या वस्तू, पैशांची भिशी, उधार-उसनवारीचे व्यवहार हे सारे व्यवहार पंढरपुरात बहुतांशरीत्या एकादशीशी निगडीत असतात. कारण, यादिवशी व्यापारउदीम मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे याच दिवशी पैसे देणे-घेणे, एखादी वस्तू देणे-घेण्याशी संबंधित आर्थिक व्यवहार होत असतात. तीर्थक्षेत्र पंढरीत मात्र शुद्धातील एकादशीला, वद्यातील एकादशीला अशा वायद्यातून होतात.
एकमेकांना नमस्कार, रामराम करण्याची आपली रीत आहे; मात्र तीर्थक्षेत्र पंढरपुरात एकमेकांना ‘जय हरी’ म्हणण्याची पद्धत आहे. यानिमित्तानं देवाचं नाव उच्चारलं जातं. एकप्रकारे दिवसभर आपण दहा-वीस जणांना ‘जय हरी’ म्हटलं, तर तेवढाच आपल्या मुखातून हरिनामाचा जप झाला अशी श्रद्धा पंढरपूरकरांची आहे. त्यामुळे या ठिकाणी ‘गुडमॉर्निंग’, ‘रामराम’, ‘नमस्कार’ नव्हे, तर एकमेकांना ‘जय हरी’ म्हटलं जातं.