File Photo
बहार

पाकिस्तानवरच उलटला पोसलेला दहशतवाद

पुढारी वृत्तसेवा
डॉ. योगेश प्र. जाधव

नव्या वर्षाच्या आगमनानंतर संपूर्ण जगाने एका नव्या वैश्विक वातावरणात प्रवेश केला आहे. 2025 हे वर्ष संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक असणार आहे, असा घंटानाद मावळत्या वर्षाच्या उत्तरार्धापासून कर्कशपणाने ऐकू येऊ लागला आहे. जागतिक पटलावरची अस्थिरता, बदलते भूराजकारण, अर्थकारणाच्या चिंता यामुळे काळजी वाढलेली आहे. आशिया खंडाचा विचार करता इस्रायल आणि हमास यांच्यातील घनघोर युद्ध सुरू असतानाच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडाला आहे.

अफगाण तालिबानचे लढवय्ये ड्युरंड रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडले आहेत. तेथील चौक्या काबीज करत आहेत. आपल्या सैन्याला वाचवण्यासाठी पाकिस्तान हवाई हल्ले करत आहे. यामुळे ड्युरंड लाईन ही वर्तमानातली सर्वात धोकादायक सीमा म्हणून पुढे आली आहे. भयंकर स्वरूपाच्या युद्धामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. युद्धाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी ड्युरंड रेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. त्यामुळे या संघर्षाला अघोषित युद्ध म्हटले जात आहे. या अघोषित युद्धात अनेक लोक मारले गेले आहेत.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील 2640 कि.मी. लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेला ड्युरंड लाईन असे म्हटले जाते. या रेषेजवळच्या भागात पंजाबी आणि पश्तून समाजाची लोकवस्ती आहे. यातील बहुतेक पंजाबी आणि पश्तून हे सुन्नी मुस्लिम आहेत. पंजाबी हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा वांशिक गट आहे तर पश्तून अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा आदिवासी गट आहे. यापैकी पश्तूनांचा आरोप आहे की, या सीमेमुळे त्यांच्या घरांमध्ये फूट पडली आहे. अनेक दशकांपासून ते आपल्या कुटुंबासह आणि कुळांसह त्या भागात राहात होते. परंतु ब्रिटिश सरकारच्या नियोजनाचा भाग म्हणून ते पश्तूनबहुल भागात स्थायिक झाले.

ड्युरंड लाईनचा संबंध ब्रिटिश काळापासूनचा आहे. वास्तविक दक्षिण आशियातील आपले हित जपण्यासाठी ब्रिटिशांनी ड्युरंड रेषा तयार केली होती. सर हेन्री ड्युरंड यांच्या नावावरून या सीमारेषेला ड्युरंड लाईन हे नाव देण्यात आले. त्या काळात तत्कालीन अफगाण शासक अब्दुर रहमानच्या सहकार्याने ब्रिटिशांनी ही सीमारेषा आखली होती, असे सांगितले जाते. ब्रिटनने आपले हित साधण्यासाठी अफगाणिस्तानची सत्ता रहमानकडे सोपवली होती. एवढेच नाही तर ड्युरंड रेषेचा मोठा भाग पीओकेमधून जातो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी ही रेषा तयार करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तान हा भारताचाच भाग होता. सोव्हिएत रशियाच्या विस्तारवादी धोरणाला शह देण्यासाठी ब्रिटिश साम्राज्याने अफगाणिस्तानचा बफर झोन म्हणून वापर केला होता. ही रेषा तयार करताना स्थानिक जमाती आणि भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे विचारात न घेतल्याने ती वादात सापडली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश आपापल्या सीमेवर दावा करतात. तालिबान या रेषेला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन मानते. तालिबानने ड्युरंड रेषेला ‘काल्पनिक सीमा’ म्हटले आहे आणि हा भाग अफगाणिस्तानचा भाग असल्याचा दावा केला आहे. याच ड्युरंड लाईनवरून तालिबान पुरस्कृत तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये सतत हल्ले करत असते. सध्या हा संघर्ष इतक्या विकोपाला गेला आहे की, तालिबानने पाकिस्तानच्या अनेक भागांवर दावा केला असून यामध्ये पेशावरचाही समावेश आहे.

अमेरिकन फौजा माघारी फिरल्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी अफगाणिस्तानसह तोरखाम क्रॉसिंगवर एक भव्य पत्रकार परिषद घेतली होती आणि तालिबान सत्तेवर आल्याने ‘नवीन गट’ तयार होईल आणि या क्षेत्राला जागतिक महत्त्व प्राप्त होईल, असा दावा केला होता. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान असणार्‍या इम्रान खान यांनी तालिबानच्या सत्तेत पुनरागमनाची तुलना अफगाणांनी ‘गुलामीची बेडी तोडण्या’शी केली होती. पण आज हाच तालिबान पाकिस्तानच्या मुळावर उठला आहे. अफगाण तालिबानी हे कट्टर लढवय्ये म्हणून ओळखले जातात. एकेकाळी त्यांनी अफगाणिस्तानात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 40 हून अधिक देशांच्या युतीविरुद्धही लढा दिला. त्या काळात अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या भागात तालिबानी नेत्यांनी आश्रय घेतला होता.

क्वेटा, पेशावर आणि नंतर कराचीसारख्या प्रमुख शहरांमध्येही त्यांनी आपले अस्तित्व प्रस्थापित केले होते. अनेक तालिबानी नेते दारुल उलूम हक्कनियासारख्या पाकिस्तानी इस्लामिक धार्मिक शाळांचे पदवीधर आहेत. पाकिस्तानच्या पाठिंब्याशिवाय तालिबानला अफगाणिस्तानातील लढाई लढणे किंवा तेथे सत्ता प्रस्थापित करणे कदापि शक्य नव्हते. किंबहुना, अफगाणिस्तानात तालिबानला सत्तेत बसवणे हा पाकिस्तानच्याच एका व्यापक कटाचा भाग होता. त्यावेळी पाकिस्तान दुटप्पी भूमिका घेत एकीकडे जगाला आपण अमेरिकेसोबत दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहभागी असल्याचे दाखवायचा; तर दुसरीकडे छुप्या मार्गाने तालिबानला आर्थिक रसदीपासून शस्त्रास्त्रे, दारूगोळा पुरवायचा. पण आज या दोघांमध्ये जणू हाडवैर निर्माण झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केल्यामुळे या दोघांमधील संंबंध कमालीचे तणावग्रस्त बनले आहेत. पाकिस्तानने नैसर्गिक मित्र म्हणून अफगाणिस्तानात तालिबानचे स्वागत केले होते; परंतु तालिबान सरकार पाकिस्तानला अपेक्षेप्रमाणे सहकार्य करत नसल्याचे दिसते. तालिबानी नेत्यांना दहशतवादी गट असल्याचा शिक्का पुसून सरकार म्हणून स्वतःला प्रस्थापित करावयाचे आहे. पाकिस्तानवर जास्त अवलंबून राहण्याचा त्यांचा इरादाही नाही.

दुसरीकडे, 2022 पासून खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दल, तसेच पोलिस दलांवर दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यापैकी बहुतांश हल्ल्यांची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने घेतली आहे. टीटीपी आणि अफगाण तालिबान यांनी वर्षानुवर्षे वझिरीस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या इतर पाकिस्तानी भागात आश्रय घेण्याबरोबरच संसाधने वाटून घेतली आहेत. टीटीपी नेत्यांवर कारवाई करण्याची कोणतीही पाकिस्तानी मागणी तालिबान मान्य करत नाही. कारण यामुळे इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) सारख्या इतर अतिरेकी संघटनांना जागा मोकळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीटीपी हा पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा आहे आणि पाकिस्तानने त्यांचे प्रश्न देशांतर्गत सोडवले पाहिजेत, अशी भूमिका तालिबान घेत आहे. तालिबानच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानला आपल्या इतिहासातील कुकर्मांची आठवण निश्चितपणे झाली असावी. जम्मू-काश्मीरमध्ये तीन दशकांपूर्वीपासून पाकिस्तानकडून दहशतवादी हिंसाचाराला खतपाणी घातले जात आहे. नव्वदच्या दशकामध्ये हा हिंसाचार परमोच्च पातळीवर पोहोचला होता. काश्मीरच्या नंदनवनामध्ये रक्ताचे पाट वाहिले जात होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्रसंघासारख्या जागतिक व्यासपीठावर भारताकडून पाकिस्तानवर टीका केली असता पाकिस्तान अशाच प्रकारे ‘काश्मीरमधील हिंसाचार हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे’, अशी भूमिका घेऊन हात झटकत होता. आज काळाची चक्रे उलटी फिरली आहेत.

टीटीपीकडून होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्करातच आज भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण टीटीपी प्रामुख्याने पाक सैन्यालाच लक्ष्य करत आहे. पण अशाच प्रकारे पाकिस्तानी लष्कराच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिपत्याखाली पोसलेल्या शेकडो दहशतवाद्यांनी भारतमातेच्या भूमीतील अनेक शूर जवानांचे प्राण घेतले. त्यावेळी भारतातून होणार्‍या आक्रोशाचा पाकिस्तानने आनंद घेतला. आज टीटीपीचे दहशतवादी पाकिस्तानी लष्कराला पळता भुई थोडी करून आनंद घेत आहेत. वर्षानुवर्षांपासून पाकिस्तान फक्त आणि फक्त द्वेष आणि दहशतवादाची बीजे पेरत आला आहे. आज त्याचीच कटू फळे पाकिस्तानात जागोजागी उगवत आहेत. बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्यवादी चळवळींनी जोर धरला आहे. मागील काळात टीटीपीने वझिरीस्तानसह काही भागात आपले सरकारच प्रस्थापित केले होते आणि हा प्रदेश स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. हे लक्षात घेता येणार्‍या काळात पाकिस्तानचे त्रिभाजन होण्याच्या शक्यता आंतरराष्ट्रीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT