हेमंत महाजन (निवृत्त)
भारतापासून फुटून स्वतंत्र राष्ट्र बनलेल्या पाकिस्तानला आज 75 वर्षांनंतर आपले राष्ट्र एकसंध ठेवण्याचे आव्हान भेडसावू लागले आहे. पीओके, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनवा या भागातील फुटिरतावादी चळवळींचा जागतिक पटलावर मोठ्या प्रमाणावर बोलबाला होतो. त्या तुलनेत सिंध प्रांतातील आक्रोशाची फारशी दखल घेतली जात नाही; पण गेल्या काही वर्षांपासून या प्रांतातील असंतोषाची धग वाढत चालली असून तेथेही लवकरच निर्णायक लढाई सुरू होण्याची शक्यता गडद केली आहे.
पाकिस्तानातील सिंध प्रांत पुन्हा एकदा अस्वस्थतेच्या छायेत सापडला आहे. अलीकडेच कराची ते हैदराबाद या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली दिसून आले. ‘जेय सिंध महाज’ या राष्ट्रवादी संघटनेने मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनामागे केवळ काही कार्यकर्त्यांची अटक किंवा बेपत्ता होणे एवढाच मुद्दा नाही, तर ही संपूर्ण चळवळ सिंधच्या दीर्घकालीन स्वतंत्र सिंध प्रांताच्या स्वप्नाशी जोडलेली आहे. पाकिस्तानात फुटिरतावादाची भावना सर्वाधिक खोलवर जर कोणत्या प्रांतात रुजली असेल, तर ती सिंधमध्ये आणि आजच्या घडीला पुन्हा एकदा ती भावना उफाळून येताना दिसत आहे.
सिंधचा इतिहास आणि वेगळेपणाची बीजे
पाकिस्तानातील सिंध प्रांत हा दक्षिण आशियातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेला प्रदेश आहे. सिंधू संस्कृतीचा उगम याच भूमीवर झाला होता, असे मानले जाते. मोहेंजोदडो आणि हडप्पा या स्थळांनी या भूमीला ऐतिहासिक वैभव दिले. नंतरच्या काळात आठव्या शतकात मोहम्मद बिन कासिमने अरब सैन्यासह या प्रदेशावर आक्रमण केले तेव्हा सिंध इस्लामिक जगतात समाविष्ट झाला. त्यानंतर सिंधचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रवास सतत बदलत राहिला; पण त्याची विशिष्ट अशी सिंधी ओळख कायम राहिली.
ब्रिटिश राजवटीत सिंध हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता; मात्र 1936 मध्ये सिंधला स्वतंत्र प्रांताचा दर्जा मिळाला. याच काळात सिंधी राष्ट्रवादाचे बीज रोवले गेले. सिंधी समाज शिक्षण, व्यापार आणि संस्कृतीच्या माध्यमातून इतर प्रांतांपेक्षा वेगळा आणि प्रगत मानला जात होता; पण पाकिस्तान निर्मितीनंतर सिंधच्या सामाजिक संतुलनात मोठी उलथापालथ झाली.
1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर लाखो उर्दू भाषिक मुस्लीम शरणार्थी उत्तर भारतातून कराची, हैदराबाद आणि इतर सिंधी शहरांत आले. या स्थलांतरामुळे सिंधमधील मूळ सिंधी लोकसंख्या अल्पसंख्याक बनली. कराची ही सिंधची राजधानी होती. ती नवीन पाकिस्तानची आर्थिक राजधानी बनली आणि तिच्यावर नव्याने आलेल्या मोहाजीर समुदायाचा प्रभाव वाढला. या घडामोडींमुळे सिंधी समाजात परकेपणाची भावना निर्माण झाली आणि आमचा प्रांत आमच्या हाती राहिला नाही, ही भावना हळूहळू राष्ट्रवादाच्या रूपात आकार घेऊ लागली.
जेय सिंध चळवळीचा उदय
1970 च्या दशकात पाकिस्तानात झुल्फिकार अली भुट्टो सत्तेवर आले. ते स्वतः सिंधी होते; पण त्यांच्या सत्ताकाळातही सिंधमधील आर्थिक विषमता आणि रोजगारातील अन्याय संपला नाही. या काळात ‘जेय सिंध’ चळवळ सुरू झाली. सिंधी बुद्धिजीवी आणि तत्त्वज्ञ जी. एम. सय्यद हे या चळवळीचे मूळ प्रेरणास्थान होते. ते पाकिस्तानचे अत्यंत प्रभावशाली राष्ट्रवादी नेते होते. त्यांनी सुरुवातीला मुस्लीम लीगमध्ये काम केले; पण नंतर त्यांना वाटू लागले की, पाकिस्तानात सिंधी लोकांना त्यांच्या ओळखीचे, भाषेचे आणि सांस्कृतिक अधिकारांचे संरक्षण मिळत नाही. यातूनच 1972 मध्ये त्यांनी जेय सिंध आंदोलन सुरू केले. याचा मुख्य उद्देश सिंधला पाकिस्तानपासून वेगळे करून सिंधुदेश हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा होता. सय्यद यांच्या विचारांना सिंधमधील तरुण वर्गाने जोरदार प्रतिसाद दिला. या चळवळीचा गाभा सांस्कृतिक स्वाभिमान, भाषिक ओळख आणि आर्थिक न्याय या मुद्द्यांवर आधारित होता. सिंध पाकिस्तानचा भाग नाही, ती एक वेगळी संस्कृती आहे, हा सय्यद यांचा संदेश सिंधी समाजात खोलवर पोहोचला.
दडपशाही आणि आंदोलनांचा इतिहास
पाकिस्तानातील सत्ताधार्यांनी सुरुवातीपासूनच सिंधी राष्ट्रवादाला देशद्रोह म्हणून पाहिले. जनरल झिया उल हकच्या लष्करी राजवटीत, तर या चळवळीवर अत्यंत क्रूर दडपशाही झाली. हजारो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली, अनेकांना बेपत्ता करण्यात आले आणि अनेकांनी तुरुंगात छळ सहन केला.
1990 च्या दशकात जेय सिंध चळवळ अनेक गटांमध्ये फुटली. त्यातून जेय सिंध क्वामी महाज, जेय सिंध मुत्ताहिदा महाज, जेय सिंध विद्यार्थी संघटना इत्यादी संघटना स्थापन झाल्या. तथापि, या सर्व गटांमध्ये सिंधसाठी स्वायत्तता किंवा पूर्ण स्वातंत्र्य हा विचार कायम होता; मात्र पाकिस्तानातील राज्यसंस्था, विशेषतः आयएसआय आणि सीटीडी (काऊंटर टेररिझम डिपार्टमेंट) यांनी या संघटनांवर सतत लक्ष ठेवले आणि त्यांचे अनेक नेते रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले.
गेल्या काही वर्षांत सिंधमध्ये जबरदस्तीने बेपत्ता करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, सिंधमधील शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्ते, विद्यार्थी आणि लेखक गेल्या दशकभरात बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचा मागोवा घेता आलेला नाही आणि न्यायालयात त्यांची प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.
जेय सिंध महाजचे नेते रियाझ अली चंडिओ यांनी अलीकडील आंदोलनात म्हटले की, सिंधमध्ये कायद्याचा, लोकशाहीचा आणि न्यायाचा संपूर्ण लोप झाला आहे. लोकांना आपल्या भूमीत परके असल्यासारखे वाटते. त्यांचा आरोप आहे की, जे कार्यकर्ते शांततामय पद्धतीने सिंधच्या अधिकारांबद्दल बोलतात त्यांना दहशतवादी म्हणून दाखवले जाते; पण भ्रष्ट राजकारणी, नदीकाठचे डाकू आणि ड्रग तस्कर मात्र राज्याच्या छायेखाली सुखाने जगतात.
सिंधमध्ये गेल्या दोन दशकांहून सत्तारूढ पाकिस्तान पिपल्स पार्टी अधिक काळ सत्तेत आहे; पण या सत्तेने सिंध प्रांतात भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि बेरोजगारी वाढवली. पाणीटंचाई, शिक्षणातील ढासळलेली स्थिती आणि आरोग्यसेवेतील दुर्दशा यामुळे जनतेचा रोष वाढला आहे. राष्ट्रवादी संघटनांच्या मते, पीपीपीने सिंधचा वापर फक्त राजकीय प्रयोगशाळा म्हणून केला आणि सिंधी हितासाठी काहीच केले नाही.
सध्याचे आंदोलन आणि वाढता तणाव
अलीकडील काळात सीटीडीने चंडिओ आणि सरमद मीरानी या दोन तरुणांना अटक केल्याचे सांगितले. हे दोघे जेय सिंध महाजच्या यादीत बेपत्ता म्हणून नोंदले गेले होते. या घटनेने सिंधमध्ये संतापाची लाट उसळली. जेएसएमने कराची-हैदराबाद महामार्गावर धरणे आंदोलनाची घोषणा केली. हा लढा न्यायासाठी आहे, असे रियाझ अली चंडिओ यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन केवळ वाहतूक विस्कळीत करण्यासाठी नाही, तर ते सिंधमधील वाढत्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्धचा व्यापक आक्रोश आहे.
सिंध आणि पाकिस्तानचा राजकीय संघर्ष
पाकिस्तानाच्या स्थापनेपासूनच सिंधमधील राष्ट्रवादाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका मानले गेले आहे; पण या द़ृष्टिकोनाने समस्येचे मूळ अधिकच खोलवर गेले. पाकिस्तानातील सत्ताकेंद्रे नेहमी पंजाब आणि लष्करी उच्चवर्गाच्या ताब्यात राहिली. त्यामुळे सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांना आपली राजकीय आणि आर्थिक उपेक्षा वाटत राहिली. सिंधमध्ये नैसर्गिक व औद्योगिक संपत्ती विपुल असूनही तिचा फायदा स्थानिकांना मिळत नाही. कराचीसारख्या शहरात पाकिस्तानची सुमारे 70 टक्के कर महसूलनिर्मिती होते; पण सिंधच्या ग्रामीण भागात गरिबी, बेरोजगारी आणि पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे सिंधी युवकांमध्ये असंतोष वाढत आहे.
मानवाधिकार संघटनांनी वारंवार पाकिस्तान सरकारकडे या बेपत्ता प्रकरणांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत; पण आंतरराष्ट्रीय समुदायाने सिंधच्या परिस्थितीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. बलुचिस्तानच्या प्रश्नाप्रमाणेच सिंधमधील संघर्षही पाकिस्तानचा अंतर्गत विषय म्हणून झाकून ठेवला जातो. परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांना कोणतेही बाह्य संरक्षण किंवा समर्थन मिळत नाही.
सिंधी ओळखीचा गाभा तिच्या भाषेत आणि संस्कृतीत आहे; पण उर्दू भाषिक वर्चस्वामुळे सिंधी भाषा शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रणालीत बाजूला पडली. 1972 मध्ये सिंधी भाषेला प्रांतीय दर्जा देण्यात आला; पण उर्दू भाषिक समुदायाच्या विरोधामुळे भाषा दंगली उसळल्या. या घटनेने सिंधी जनतेच्या मनात कायमची ठेच निर्माण केली. आजही शहरी भागात सिंधीपेक्षा उर्दू आणि इंग्रजी भाषांना प्राधान्य दिले जाते. यामुळे सांस्कृतिक असुरक्षितता अधिक तीव्र झाली आहे.
आजच्या सिंधी तरुण पिढीत राष्ट्रवादाच्या पारंपरिक घोषणांपेक्षा आर्थिक हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व यांची मागणी वाढली आहे. ते थेट वेगळेपणापेक्षा खर्या स्वायत्ततेचा आणि न्याय्य संसाधन वाटपाचा आग्रह धरत आहेत, तरीही सतत होणारी दडपशाही आणि बेपत्ता कार्यकर्त्यांच्या घटना या तरुणांना पुन्हा कट्टर मार्गाकडे ढकलत आहेत. सिंधमध्ये वाढणारा असंतोष केवळ प्रांतीय प्रश्न राहिलेला नाही. तो आता पाकिस्तानच्या राज्य घटनात्मक रचनेला आव्हान देणारा सामाजिक उद्रेक बनत आहे. या असंतोषाला संवादाद्वारे मार्ग मिळाला नाही, तर बलुचिस्तानप्रमाणेच सिंधमध्येही सशस्त्र संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. जेएसएम आणि इतर संघटनांच्या मागण्या केवळ भावनिक नाहीत, त्या एका दीर्घकाळ चाललेल्या अन्यायाच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. पाकिस्तान सरकार या मुद्द्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या नजरेतूनच पाहत राहिले, तर सिंधमधील विभाजनवादी भावना आणखी तीव्र होईल.