Operation Mahadev In Pahalgam | हर हर ‘महादेव’! Pudhari File Photo
बहार

Operation Mahadev In Pahalgam | हर हर ‘महादेव’!

‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

प्रा. सतीश कुमार, आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानला जबर तडाखा दिला गेला. परंतु, या हल्ल्यातील मुख्य आरोपी टिपले गेलेले नव्हते. अलीकडेच लष्कराच्या ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे पहलगामचा बदला पूर्ण झाला असला तरी दहशतवादाविरुद्धची कारवाई निरंतर चालणारी आहे.

एप्रिल 2025 मधील पहलगाम हत्याकांड हा जम्मू-कश्मीरच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस ठरला. बर्फाच्छादित डोंगररांगा, रम्य दर्‍या आणि पर्यटकांनी गजबजलेले हे ठिकाण एका क्षणात रक्तरंजित झाले. निरपराध भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी प्रथम पर्यटकांची धार्मिक ओळख पटवण्यासाठी त्यांना कलमा वाचायला भाग पाडले आणि नंतर निर्दयपणे गोळ्या झाडून हत्या केली. या अमानुष हत्याकांडात तब्बल 26 निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. देशभरात संतापाची लाट उसळली. सोशल मीडिया, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि संसद भवन या सगळीकडे एकच प्रश्न घुमू लागला, की पहलगामच्या हल्लेखोरांवर काय कारवाई होणार? निरपराधांचे रक्त वाया जाणार का? विरोधी पक्षही सरकारवर टीका करत होते, की केवळ भाषणात कडक भूमिका घेऊन काहीही साध्य होणार नाही. दुसरीकडे सुरक्षा दल आणि तपास यंत्रणा शांतपणे, पण अत्यंत नियोजनबद्धपणे काम करत होत्या.

या हल्ल्यानंतर भारताने दोन महत्त्वाच्या स्तरांवर प्रत्युत्तराची आखणी केली. पहिली मोहीम होती ऑपरेशन सिंदूर. ही मोहीम सीमापार पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित करून सुरू करण्यात आली. भारताने स्पष्ट संदेश दिला, की दहशतवादाला आश्रय देणार्‍यांची आणि त्यांना मदत करणार्‍यांची आता गय केली जाणार नाही. हवाई दल आणि विशेष दलांनी एकापाठोपाठ एक अचूक हल्ले केले. या हल्ल्यांत तब्बल शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली.

दुसरी मोहीम होती ऑपरेशन महादेव. ही मोहीम भारताच्या सीमेत राहून, जम्मू-काश्मीरच्या जंगलात आणि डोंगरात लपलेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांचा पूर्ण नायनाट करण्यासाठी आखण्यात आली होती. या मोहिमेची गुप्त तयारी अनेक आठवडे सुरू होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), जम्मू-कश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराने एकत्रितपणे काम करून हल्ल्याच्या सूत्रधारांचा शोध लावला. तपासातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, हल्ल्याचे प्रमुख सूत्रधार पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबाशी संबंधित होते. या गटाने भारतीय पर्यटकांवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर त्यांनी सीमा ओलांडून पळ काढला नव्हता; तर दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाच्या दाट जंगलात लपून बसले होते. सुरक्षा दलांनी त्यांचा माग काढण्यासाठी आधुनिक ड्रोन, थर्मल इमेजिंग आणि उपग्रह माहितीचा वापर केला. शेवटी पहाटेच्या काळात लष्कराच्या 24 आरआर युनिट आणि चार पॅरा स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी संयुक्तपणे धाड टाकली. या धाडीस ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास जंगलात भीषण चकमक झाली. काही तासांच्या संघर्षानंतर तीन दहशतवादी ठार झाले. त्यात पहलगाम हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार सुलेमान शाह आणि त्याचे दोन साथीदार अबू हमजा ऊर्फ हारिस आणि यासीर होते. हे तिघेही पाकिस्तानचे नागरिक असल्याचे नंतर स्पष्ट झाले. या कारवाईने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला अंशतः पूर्ण झाला, ही भावना जनमानसात उमटली.

ऑपरेशन महादेवच्या यशाने देशातील राजकीय वातावरण बदलले. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सरकारवर जोरदार हल्ले होत होते. काँग्रेस व समाजवादी पक्षाचे नेते सरकारला वारंवार विचारत होते, की पहलगाम हत्याकांडातील दहशतवादी अजून मोकाट का? समाजवादी पक्षाचे रमाशंकर राजभर यांनी तर संसदेतून सरकारवर थेट आरोप केला, की हे सरकार केवळ घोषणा करते; कृती मात्र शून्य आहे. मात्र, ऑपरेशन महादेवच्या यशस्वी कारवाईनंतर विरोधकांना स्पष्ट उत्तर दिले गेले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले, की या मोहिमांमुळे भारत आता शांत बसणार नाही, हा संदेश जगाला गेला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही संसदेत सांगितले, की भारतावर हल्ला कराल, तर आम्ही तुमच्या भूमीत घुसून प्रत्युत्तर देऊ. ही बदललेल्या भारताची आणि बदललेल्या धोरणाची किमया आहे. यामुळेच गेल्या दहा वर्षांत पाकिस्तानाकडून होणार्‍या कारवायांना पूर्वीच्या तुलनेत मर्यादा आली आहे.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सरकारी प्रवक्ते आणि माध्यमांनी लगेच प्रचार सुरू केला, की भारताने स्टेज्ड एन्काउंटर केला आहे. त्यांच्या मते, भारताने आधीच पकडलेल्या पाकिस्तानी नागरिकांना जंगलात नेऊन ठार मारले आणि त्याला दहशतवादी चकमक म्हटले. काही माध्यमांनी तर 56 पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेऊन प्रचारासाठी वापरल्याचा दावा केला. या प्रचाराला भारताने ठोस पुराव्यांनी उत्तर दिले. चकमकीच्या ठिकाणी सापडलेले सॅटेलाईट फोन, आधुनिक शस्त्रसाठा आणि लष्कर ए तोयबाशी संबंधित कागदपत्रे पाकिस्तानचे आरोप सपशेल खोटे असल्याचे सिद्ध करणारे आहेत.

‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवादाविरुद्धची भारताची कारवाई निरंतन चालणारी आहे, हेही पाकिस्तानला कळून चुकले आहे. पंतप्रधानांनी यापूर्वीच जाहीर केले होते, की असा हल्ला पुन्हा झाला तर तो भारतावरील युद्ध मानला जाईल. लष्करी कारवाया या आततायीपणाने केल्या जात नाहीत. तसेच त्या भावनेच्या भरातही केल्या जात नाहीत. त्यासाठी स्थळ, काळ, वेळ या सर्व बाबी अत्यंत नियोजनबद्धतेने ठरवल्या जातात. याचा मागमूस शत्रूला लागू नये, यासाठी भारताने सर्वांत आधी कूटनीतीच्या पातळीवर सिंधू पाणी वाटप करार थांबवण्यासह अन्य काही निर्णय घेतले. त्यानंतर सीमापार अचूक हल्ले केले आणि अखेरीस ऑपरेशन महादेवद्वारे पहलगाम हत्याकांडाच्या सूत्रधारांचा नायनाट केला. ही तीन पावले भारताच्या संयमाची व सामर्थ्याची प्रचिती देणारी ठरली. यामध्येे सुरक्षा दलांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय आहे.

या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला आहे. नेहमीप्रमाणे भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि लष्करी अधिकारी करत आहेत. भारतीय लष्करावरही टीका करत आहेत. यामध्ये नवल वाटण्याचे कारण नाही. परंतु चिंतेची बाब अशी, की देशाच्या सुरक्षा जवानांवर, शासनावर विश्वास ठेवण्याऐवजी पाकिस्तानच्या दाव्यांचा आधार घेत भारतातीलच सन्माननीय लोकप्रतिनिधी, नेते आणि काही व्यक्ती, संस्था जर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतील, साशंकता व्यक्त करत असतील तर ते अक्षम्य आहे. राजकारणासाठी या देशात मुद्द्यांची कमी नाही. राजकीय हेवेदावे सुरू राहण्यातही गैर नाही; पण त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा वापर केला जात असेल, तर त्यातून चुकीचा संदेश जातो, ही बाब सर्वांनीच लक्षात घ्यायला हवी. लष्कराच्या मनोधैर्यावरही अशा प्रकारच्या शंका उपस्थित करणार्‍या भूमिकांमुळे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. कूटनीती असो किंवा लष्करी कारवाया असोत, यामध्ये अनेकशा गोष्टी स्पष्टपणाने उद्धृत केल्या जात नाहीत. याचा अर्थ असा नाही, की आपण उदासीन आहोत. पडद्यामागे अनेक गोष्टी घडत असतात; पण त्या ठळकपणाने एक अधिक एक म्हणजे दोन अशा स्वरुपात मांडायच्याच नसतात. पण संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहामध्ये याबाबत जर विरोधी पक्ष आग्रही धरून सरकारची कोंडी करण्यासाठी त्याचा वापर करत असतील, तर ते चिंताजनक आहे.

मागील काळात गलवान संघर्षाच्या वेळीही हाच प्रकार पाहायला मिळाला होता. अशा प्रकारच्या राजकारणाचा राष्ट्रविरोधी शक्ती अचूक फायदा घेत असतात. याउलट केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरबाबतची भारताची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करून आपल्या एकजुटीचे दर्शन घडवून आणले. पण संसदेत आणि राज्यसभेत यावरही टीका करण्यात आली. एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही, असा सूर काहींनी आळवला. यामध्ये तथ्य असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणातील समीकरणे त्याला कारणीभूत असतात. प्रत्यक्षात भारताने केलेली कारवाई चुकीची असल्याचे मत एकाही देशाने नोंदवलेले नाही, हे आपल्यासाठी मोठे यश आहे. जागतिक राजकारणात तूप खाल्लं की रुप येत नाही. अनेकदा केवळ पेरणी करावी लागते. त्याची फळे यथावकाश चाखायला मिळतात. राष्ट्रांशी संबंधित विकसित होण्यामध्ये त्याचा फायदा होतो. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रसंगांमध्ये भारताला या संबंधांचा फायदा झालेला आहे. कतारमधील निवृत्त लष्करी अधिकार्‍यांना सुनावण्यात आलेली फाशी रद्द करण्यामध्ये भारताची कूटनीती यशस्वी ठरली. त्यामुळे राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांचा वापर करताना सर्वांनीच तारतम्याचे भान ठेवायला हवे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT