सचिन बनछोडे
पुरातन काळापासून ‘ॐ’ या एक अक्षरी शब्दाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. वेदांपासून संत साहित्यापर्यंत सर्वत्र ओंकाराची महती गायिलेली दिसून येते. गीतेतही भगवंतांनी म्हटले आहे की ‘ओमित्येकाक्षरं ब्रह्म’ (ॐ हे एक अक्षररूप ब्रह्म आहे) गीता ही उपनिषदांचे सार आहे. उपनिषदांमध्ये तर ओंकाराचे अतिशय सुंदर वर्णन आढळते आणि त्यामधील गूढ अर्थही उकलून सांगितलेला आढळतो, तो जाणून घेणे आनंददायी ठरतेे.
ओंकार किंवा प्रणव याकडे आज अनेक लोक केवळ एक शुभचिन्ह किंवा जपासाठीचा मंत्र म्हणून पाहत असतात; मात्र ओंकाराचे महत्त्व किंवा प्रणवोपासना आपल्याकडे अतिशय प्राचीन काळापासूनच अस्तित्वात आहे आणि त्यामागे अतिशय सखोल विचार किंवा गहन अर्थ दडलेला आहे. सृष्टीच्या प्रारंभीचा मूळ ध्वनी ओंकार होता, असे मानले जाते. सर्वत्र व्यापून असलेले व सर्व नामरूपांमध्येही असलेले मूळ तत्त्व म्हणजेच ‘ब्रह्म’ हे ओंकार या नावाने ओळखले गेले. ‘ओम’ हे पहिले बीजाक्षर आहे आणि अनेक मंत्रांचा प्रारंभ ओंकारानेच होतो. या ‘ओम’मध्ये असे काय दडलेले आहे, ज्यामुळे त्याला इतके महत्त्व प्राप्त झाले, हे पाहताना उपनिषदांची मदत अतिशय चांगल्या प्रकारे होते. वेदांचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे चार भाग असतात. त्यापैकी या शेवटच्या किंवा कळसाध्याय अशा उपनिषदांमध्ये तत्त्वचिंतन आढळते. साहजिकच ओंकाराविषयीचे चिंतनही त्यामध्ये आहेच. इतकेच नव्हे, तर ‘मांडुक्य’ नावाचे उपनिषद तर पूर्णपणे ओंकाराचे स्वरूप प्रकट करणारेच आहे. उपनिषदांमधील ओंकाराविषयीचे विवेचन मुळातूनच वाचण्यासारखे आहे, तरीही त्याची तोंडओळख करून घेणेही महत्त्वाचे ठरते.
उपनिषदांची संख्या बरीच मोठी सांगितली जाते. 108 उपनिषदे आहेत असेही म्हटले जाते; मात्र आद्य शंकराचार्यांनी ज्यावर भाष्ये लिहिली किंवा ज्या उपनिषदांमधील उद्धरणे दिली, ती अधिक महत्त्वाची मानली जातात. प्रमुख दहा उपनिषदांमध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक या उपनिषदांचा समावेश होतो. याशिवाय श्वेताश्वतर, कौषितकी, जाबाल अशी अन्यही काही उपनिषदे प्रसिद्ध आहेत. उपनिषदांमध्ये निखळ ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. सर्वांतर्यामी असलेला शुद्ध ‘मी’ म्हणजेच आत्मा. तोच सर्वव्यापी परमात्माही आहे. या आत्मा व परमात्म्याच्या ऐक्याचे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान. याचा अर्थ आपलेच व्यापक स्वरूप जाणून घेणे हा परमार्थाचा मूळ हेतू आहे. हा ‘आत्म’ साक्षात्कार झाला की, मनुष्य जन्माची कृतार्थता येते, माणसाचे आयुष्य सार्थकी लागते. सर्व प्रकारच्या संकुचितपणाला झिडकारून निरातिशय तत्त्वाला जाणून घेऊन तेच ‘मी’ आहे, हे जाणणे ही मानवी बुद्धीची उत्तुंग झेप आहे. या निरातिशय तत्त्वालाच छांदोग्य उपनिषदात ‘भूमा’ असे म्हटले आहे. हे तत्त्व प्रपंचामध्ये तसेच स्वतःच्या मूळत्वातही कसे राहते, याचे एका अक्षरात केलेले वर्णन म्हणजे ‘ओम’! कठोपनिषदात ब्रह्मविद्येचे महान आचार्य असलेल्या व मृत्यूची देवता यमराजांनी नचिकेता नावाच्या बालकाला उपदेश करताना म्हटले, सर्व वेद ज्या पदाचे वर्णन करतात, ज्याच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारचे तप केले जाते, जे मिळवण्याच्या इच्छेने मुमुक्षु ब्रह्मचर्याचे पालन करतात ते पद मी तुला संक्षेपात सांगतो. ‘ॐ’ हेच ते पद आहे.
हे अक्षरच ब्रह्म आहे, हे अक्षरच पर आहे, हे अक्षरच जाणून जो ज्याची इच्छा करतो, ते मिळवतो. हेच श्रेष्ठ आलम्बन आहे व त्याला जाणून व्यक्ती ब्रह्मलोकात महिमान्वित होते. तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे की ‘ॐ’ हा शब्द ब्रह्म आहे. कारण, ‘ॐ’ हे सर्वरूप आहे. ‘ॐ’हे अनुकृती (संमतीसूचक संकेत) आहे. प्रश्नोपनिषदात महर्षी पिप्पलाद यांनी सत्यकाम या शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, हा ओंकारच पर आणि अपर ब्रह्म आहे, हे निश्चित समज. त्यामुळे विद्वान याच्या आश्रयानेच आपापल्या उपासनेनुसार यापैकी एक (पर किंवा अपर) ब्रह्म प्राप्त करतो. मुंडक उपनिषदात म्हटले आहे की, ‘प्रणव’ धनुष्य आहे (सोपाधिक). आत्मा बाण आहे आणि ब्रह्म हे त्याचे लक्ष्य आहे. त्याचे सावधानपूर्वक वेधन केले पाहिजे आणि बाणासारखे तन्मय झाले पाहिजे. याचा अर्थ ज्याप्रकारे धनुष्य हे लक्ष्य ठिकाणी बाणाच्या प्रवेशासाठीचे साधन आहे. त्याचप्रकारे सोपाधिक आत्मरूप बाणाला आपले लक्ष्य असलेल्या अक्षरब्रह्मामध्ये प्रवेश करण्यासाठीचे साधन ओंकार आहे. ज्याप्रमाणे बाणाचे आपल्या लक्ष्याशी एकरूप होणे, हेच फल आहे. त्याचप्रमाणे आत्मतत्त्वाचे अक्षरब्रह्माशी एकात्म होणे हे फल आहे. छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की, ‘ॐ इत्येतत् अक्षरः’ याचा अर्थ ‘ॐ’ हे अविनाशी, अव्यय आणि क्षरणरहित आहे. तसेच ‘ओंकार एवेदं सर्वम्’ (हे सर्व काही ओंकारच आहे.).
ओंकाराचे अतिशय सुंदर विवेचन मांडुक्य उपनिषदात केलेले आहे. अथर्ववेदाच्या या छोट्याशा उपनिषदात केवळ बारा मंत्र आहेत. दशोपनिषदांपैकी हे आकाराने सर्वात छोटे उपनिषद असले, तरी त्याचे महत्त्व फार मोठे आहे. आद्य शंकराचार्यांचे आजेगुरू गौडपादाचार्यांनी या उपनिषदावर सुंदर कारिका लिहिल्या आहेत. हे गौडपादाचार्य म्हणजे शंकराचार्यांचे गुरू असलेल्या गोविंदपादाचार्य यांचे गुरू होते. त्यांनी या उपनिषदावर लिहिलेल्या कारिका आणि आद्य शंकराचार्यांचे उपनिषद्भाष्य यामुळे अद्वैतसिद्धांताला तात्विक मताच्या स्वरूपात भक्कम अधिष्ठान लाभले. मांडुक्य उपनिषदात ओंकाराच्या तीन मात्रा ‘अ’, ‘उ’ व ‘म’द्वारे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराचे अभिमानी असलेल्या विश्व, तैजस आणि प्राज्ञचे वर्णन करीत त्याचे समष्टी अभिमानी वैश्वानर, हिरण्यगर्भ आणि ईश्वराशी अभेद दर्शवला आहे. त्यांच्या अभिव्यक्तीच्या अवस्था अनुक्रमे जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ति आहेत. तसेच त्यांचा भोग स्थूल, सूक्ष्म आणि आनंद आहे. जाग्रत अवस्थेत जीव उजव्या डोळ्यात, स्वप्नावस्थेत कंठात आणि सुषुप्तिमध्ये हृदयात राहतो असे प्रतीकात्मक वर्णन आहे. यालाच ‘प्रपंच’ किंवा ‘संसार’ असे नाव आहे. परमार्थतत्त्व हे यापेक्षा विलक्षण, त्यामध्ये अनुगत तसेच त्याचे अधिष्ठान आणि साक्षीही आहे. त्याला ओंकाराच्या चतुर्थपाद अमात्र तुरीयात्मरूपाने वर्णन केले आहे. थोडक्यात म्हणजे, सर्व भौतिक संसाराचे किंवा या संसारारूप भ—माचे वर्णन ओंकाराच्या ‘अ’,‘उ’ व ‘म’ या तीन मात्रांमध्ये केले असून त्याचे अधिष्ठान असलेले मूळ तत्त्व ओंकाराच्या चतुर्थ किंवा अमात्रपादमधून (तुरीया) केले आहे. तुरीया हे नित्य, शुद्ध, ज्ञानस्वरूप, सर्वात्मा आणि सर्वसाक्षी आहे. ते प्रकाशस्वरूप असून त्यामध्ये अन्यथाग्रहणरूप स्वप्न किंवा तत्त्वाग्रहणरूप सुषुप्तिचा पूर्णपणे अभाव आहे. ज्यावेळी अनादिमायेमुळे झोपलेला जीव जागतो, त्याचवेळी त्याला या अजन्मा तसेच स्वप्न व निद्रारहित अद्वैततत्त्वाचा बोध होतो. एकंदरीत हे उपनिषद ओंकारामध्ये नश्वर भौतिक प्रपंच आणि त्याचे अविनाशी अधिष्ठान असलेले मूळ तत्त्व यांचा समग्रतेने समावेश कडडडरून त्याचे यथार्थ वर्णन करते. हाच ओंकाराचा संपूर्ण अर्थ आहे.