अनिल टाकळकर
एनव्हिडिया या अमेरिकन कंपनीने भारताच्या 4 ट्रिलियन (लाख कोटी) डॉलर्स मूल्यांकनाइतका विक्रमी टप्पा गाठून जगाच्या कार्पोरेटविश्वात एक नवा इतिहास घडविला आहे. या कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ जेनसेन हुआंग या चिप निर्मात्याने एआयचे भविष्य यामुळे नव्याने परिभाषित केले असून जगात क्रांतिकारक परिवर्तन घडून येणे आता अटळ आहे.
आपल्या देशाने गाठलेल्या 4 लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या आकाराइतका पल्ला या महिन्यामध्ये अमेरिकेच्या एकट्या एनव्हिडिया या कंपनीने साध्य करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगातील अशा प्रकारची ही पहिली पब्लिक कंपनी ठरली असून अॅपल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या तंत्रज्ञानातील दिग्गज कंपन्यांना तिने मागे टाकावे, हे विशेष म्हटले पाहिजे. 2024 च्या उत्तरार्धात अॅपलचे बाजारपेठीय मूल्यांकन 3.195 लाख कोटी डॉलर्स, तर पंधरा दिवसांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे हेच मूल्यांकन 3.708 लाख कोटी डॉलर्स होते. डाऊ जोन्स मार्केटच्या आकडेवारीनुसार एस अँड पीअंतर्गत 214 छोट्या कंपन्यांच्या एकत्रित मूल्यांएवढे मूल्य एनव्हिडियाने प्राप्त केले आहे. हे केवळ या कंपनीच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक नाही, तर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व सेमीकंडक्टर उद्योगांतील तिच्या मध्यवर्ती भूमिकेचे महत्त्व यातून अधोरेखित होते. या अभूतपूर्व जादूमय वाटणार्या परिवर्तनाचे श्रेय तैवानी-अमेरिकन जेन्सेन हुआंग या कंपनीच्या दूरदर्शी सीईओ आणि सहसंस्थापकाकडे जाते. धाडसी रणनीती आणि एआय व चिप उत्पादनाबाबतचा दूरद़ृष्टीपूर्ण विचार याच्या साहाय्याने ते कंपनीला या यशाच्या शिखरावर नेऊ शकले.
1993 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये (सॅन्टा क्लारा) स्थापन झालेल्या एनव्हिडियाने सुरुवातीला गेमिंग उद्योगासाठी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटस् (GPUs) तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले होते. RIVA आणि GeForce मालिका यांसारखी कंपनीची प्रारंभिक उत्पादने त्यांच्या उत्कृष्ट ग्राफिक्स रेंडरिंग क्षमतेमुळे गेमर्स व डिजिटल कलाकारांमध्ये लवकरच लोकप्रिय झाली. हे क्षेत्र केवळ GPU गेमिंगपुरते मर्यादित नाही. ते वैज्ञानिक संशोधन, डेटा सेंटर्स आणि अखेरीस कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असलेल्या क्लिष्ट गणनांसाठीदेखील आदर्श आहे, हे कंपनीच्या लक्षात आल्यावर तिच्या यशाला पंख मिळाले.
एनव्हिडियाच्या महत्त्वाच्या वाटचालीची सुरुवात 2010 च्या दशकाच्या मध्यात झाली. त्यावेळी कंपनीने आपल्या GPUs ना एआयसाठी लागणार्या कामांसाठी रूपांतरित करायला प्रारंभ केला. परंपरागत CPUs (सेंट्रल प्रोसेसिंग युनिटस्) च्या तुलनेत GPUs समांतर प्रक्रियेसाठी डिझाईन केले गेले आहेत. डीप न्युरल नेटवर्क्सचे प्रशिक्षण देण्यास व मोठ्या प्रमाणावर डेटा हाताळण्यास ते अत्यंत उपयुक्त ठरले. इतकेच नव्हे, तर हा आर्किटेक्चरल फायदा एआय संशोधन वापरासाठी निर्णायक ठरला.
कॉम्पुट युनिफाईड डिव्हाईस आर्किटेक्चर (CUDA) प्लॅटफॉर्मच्या सादरीकरणाने विकसकांना एनव्हिडियाच्या GPUs चा उपयोग सर्वसामान्य संगणनासाठी करता येऊ लागला. त्यामुळे मशिन लर्निंग, स्वयंचलित वाहने, रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांत नवोन्मेषासाठी दरवाजे खुले झाले.2010 च्या दशकाच्या अखेरीस एनव्हिडियाच्या चिप्स जगातील आघाडीच्या एआय संशोधन प्रयोगशाळा व क्लाऊड सेवा प्रदात्यांच्या कामकाजाचा महत्त्वाचा भाग झाल्या. भाषा मॉडेल्स व प्रतिमा तयार करणार्या जनरेटिव्ह एआय मॉडेल्सच्या विकासाच्या जागतिक स्पर्धेने एनव्हिडियाचे वर्चस्व अधिकच बळकट केले. आव्हाने अजूनही आहेत; पण एनव्हिडियाचा प्रवास धाडसी नेतृत्वाच्या व तंत्रज्ञानाच्या अमर्याद क्षमतेचा जिवंत पुरावा म्हणावा लागेल.
H100 आणि A100 या तिच्या चिप्स डेटा सेंटर्सच्या आता महत्त्वाचा कणा बनल्या आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स आणि सरकारे अधिकाधिक प्रगत एआय प्रणाली तयार करून त्या वापरात आणू शकल्या. एनव्हिडियाने एआय क्रांतीची गरज ओळखून तिची पूर्तता केल्यामुळे तिच्या समभागांच्या किमतीने नव्या उंचीचे शिखर गाठले आहे. 2023 पर्यंत तिने 1 लाख कोटी (ट्रिलियन) डॉलर्सचे मूल्य पार केले आणि फक्त दोन वर्षांत त्यात तिप्पट वाढ करून ती जगातील पहिली 4 ट्रिलियन डॉलर्सची कंपनी बनली. एनव्हिडियाचे हे विक्रमी मूल्य केवळ गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतीक नाही, तर तंत्रज्ञान क्षेत्रात कंपनीची महत्त्वाची भूमिका ते निदर्शनास आणून देत आहे. जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड संगणन व उच्च कार्यक्षमतेच्या संगणनाच्या पायाभूत सुविधा तयार करण्यात एनव्हिडियाच्या चिप्स आता अपरिहार्य ठरल्या आहेत.
कंपनीने हे यश मिळविताना बाजारातील अस्थिरता, व्यापार तणाव आणि सरकारी नियामक अडचणींच्या अडथळ्यांशी सामना केला. आवश्यक तिथे लवचिक धोरण स्वीकारले. चीनला या चिपची निर्यात करण्यावरील निर्बंध हा मोठा अडथळा दूर करण्यात हुआंग यांनी यश मिळविले असले, तरी त्यावरील वादाचे सावट कायम राहणार आहे. इतर मोठ्या भाषा मॉडेल्सच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात आणि अल्प कालावधीत चीनने डीपसीक हे चॅटबॉट मॉडेल सादर करून सर्व जगाला मध्यंतरी आश्चर्याचा धक्का दिला; पण एनव्हिडियालाही हे मोठे आव्हान होते. एनव्हिडियाच्या एच 800 च्या सुमारे 2000 प्रोसेसर्सचा वापर यासाठी करण्यात आला. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत हा वापर अत्यल्प मानला जातो. याचा अर्थ अधिक शक्तिशाली एआय सॉफ्टवेअर कमीत कमी कॉम्प्युटिंग पॉवर वापरून अधिक स्वस्तात जलद रीतीने करता येते, हे चीनने याद्वारे दाखवून दिले आहे. त्यामुळे या बातमीनंतर एनव्हिडियाचा समभाग सुमारे 20 टक्क्यांनी घसरला; पण कंपनीच्या सर्वात मोठ्या ग्राहकांनी अधिकाधिक खर्च करण्याची तयारी दाखविल्यावर हे समभाग सावरले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जेन्सन हुआंग यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना चीनला चिप निर्यात करण्यास त्यांनी परवानगी दिली. हा एनव्हिडियाचा मोठा विजय मानला जात आहे. एआय क्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी चीन आणि अमेरिकेत सध्या मोठी स्पर्धा असल्यामुळे या परवानगीला विशेष महत्त्व आहे. या एच ट्वेन्टी चिप विक्रीतून 15 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न या कंपनीला चालू वर्षात मिळणार आहे. चिनी लष्कर आपल्या शत्रूवर हल्ले करण्यासाठी किंवा नवीन शस्त्रास्त्रे विकसित करण्यासाठी या चिपचा वापर करण्याची आणि एआयमध्ये अमेरिकेला मागे टाकण्यासाठी करेल, अशी अमेरिकन सरकारची चिंता आहे. एनव्हिडियाच्या द़ृष्टीने जगातील 50 टक्के एआय विकसक चीनमध्ये आहेत. जगात चिपवर सर्वाधिक खर्च चीन करत आहे. ही बाजारपेठ सोडणे एनव्हिडियाला घातक आहे. कारण, तसे झाल्यास चीनची ‘व्हावे’ ही टेक जाएंट म्हणून ओळखली जाणारी कंपनी आपली विक्री वाढवून एनव्हिडियाशी जागतिक बाजारपेठेत मोठी स्पर्धा करेल. त्याचा मोठा तोटा अखेर अमेरिकन टेक कंपन्यांना होण्याची भीती हुआंग यांनी बोलून दाखविली आहे.
अमेरिकन तंत्रज्ञानावर निर्बंध घातल्यास चीनमधील स्थानिक स्पर्धकांचा वेग वाढेल व अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका पोहोचू शकतो, असा इशारा त्यांनी म्हणूनच दिला आहे. ‘चायना इज अ कॉम्पिटिटर अँड अडवर्सरी, नॉट आवर एनेमी ’ असे हुआंग यांचे म्हणणे आहे. त्यावर अद्याप टोकाचे मतभेद असल्याने या आघाडीवर नेमके काय होते, यावर जगातील एआयच्या स्पर्धेचे भवितव्य अवलंबून असेल चीनच्या आव्हानांवर मात करताना मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर रणनीतिक भागीदारी करून एनव्हिडियाने आपले स्थान आणखी बळकट केले. या सहकार्यामुळे एनव्हिडियाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर विविध प्लॅटफॉर्म्सवर (क्लाऊड सेवांपासून ते स्वयंचलित वाहनांपर्यंत) समाविष्ट करता आले.
जेनसेन हुआंग हे तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात. नावीन्यपूर्णतेचा सतत पाठपुरावा करण्यासाठी ते ओळखले जातात. एनव्हिडियाचा मुख्य भर गेमिंगवरून एआय व वेगवान संगणनाकडे वळवण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला. संगणकीय मागणीत झपाट्याने होत असलेली वाढ पारंपरिक CPUs ने भागवता येणार नाही, हे त्यांनी ओळखले. GPUs च्या समांतर क्षमतेस CPUs बरोबर जोडून त्यांनी वेगवान संगणनाचा पुरस्कार केला आणि यामुळे एनव्हिडियाला पुढील तंत्रज्ञान लाटेच्या अग्रभागी ठेवण्यात त्यांनी यश मिळविले. चिप उत्पादन हे एआय व वेगवान संगणनासाठी आदर्श उपयोगाचे आहे, असे त्यांचे ठाम म्हणणे होते. अमेरिकेत पुन्हा उत्पादन प्रक्रियेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी ट्रम्प यांनी आखलेल्या टॅरिफच्या धोरणाला त्यांचा पाठिंबा आहे. उत्पादन हे आर्थिक स्थैर्य व तांत्रिक नेतृत्वासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उत्पादन क्षमता ही आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे ते म्हणतात.
कंटाळवाणे डिजिटल काम एआयकडे सोपविल्याने आपण खर्याअर्थाने महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकू. आपण माणूस म्हणून काम करण्याचा मार्ग त्यामुळे सुकर होईल, असे त्यांना वाटते. हुआंग यांच्या मते, भविष्यातील कंपन्या दोन प्रकारच्या फॅक्टरी चालवतील. 1) भौतिक वस्तू तयार करणारी फॅक्टरी 2) एआय मॉडेल्स तयार करणारी व त्यात नवनवीन सुधारणा करणारी फॅक्टरी. ही एआय फॅक्टरी एनव्हिडियाच्या चिप्सवर चालणार असून ऑटोमोटिव्हपासून हेल्थकेअरपर्यंत सर्वच उद्योग क्षेत्रांमध्ये ती क्रांती घडवेल.
एआयमुळे प्रत्येक नोकरीचे स्वरूप बदलणार आहे; मात्र ते याकडे संधी म्हणून पाहतात, धोका म्हणून नाही. एआय मानवी क्षमतेत प्रचंड वाढ करेल आणि सर्जनशीलता व नावीन्य यांना चालना देणारा तो ‘महान समतोलक (ग्रेट एक्वलायझर) ठरेल. श्रीमंत आणि गरीब ही विषमतेची दरी दूर करण्याचे सामर्थ्य त्यात असेल, असा त्यांना विश्वास आहे; मात्र उद्योग क्षेत्रांनी नवनवीन कल्पना आणि नावीन्य आणले नाही, तर एआयमुळे लाखो नोकर्या जाण्याचा धोका आहे, असा इशाराही ते द्यायला विसरत नाहीत. एआय बहुधा माझ्यासह प्रत्येकाच्या नोकर्यांमध्ये बदल घडवून आणेल, हेही त्यांनी नमूद केले आहे. एआयविषयी नैतिक व सामाजिक चिंता ते अव्हेरत नाहीत. म्हणूनच त्यांनी जबाबदारीने एआयचा विकास व उपयोग करावा, तसेच उद्योग, सरकार व शैक्षणिक क्षेत्र यांच्यात सहकार्य असावे, यासाठी आग्रह धरला आहे.
जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी अजूनही नाजूक अवस्थेत आहे आणि बहुतेक प्रगत चिप्स तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून (TSMC) तयार होत आहेत. हुआंग यांनी परदेशी पुरवठ्यावरील अवलंबन कमी करण्यासाठी स्थानिक उत्पादनात अधिक गुंतवणुकीची गरज व्यक्त केली आहे, जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळेल. सध्या एनव्हिडिया एआय चिप बाजारात आघाडीवर असली, तरी स्पर्धा प्रचंड वाढत आहे. विशेषतः चीनमधील कंपन्या स्वतःची एआय चिप्स विकसित करत आहेत आणि AMD d Intel यांसारखे प्रतिस्पर्धी accelerated computing मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. एनव्हिडियाचा 4 ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारमूल्यापर्यंतचा प्रवास हा दूरद़ृष्टी, नावीन्य आणि धोरणात्मक जोखमीच्या घेतलेल्या निर्णयांची फलनिष्पत्ती आहे. हुआंग यांच्या नेतृत्वाखाली एनव्हिडियाने केवळ चिप उद्योग नव्याने घडवला नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीच्या केंद्रस्थानी स्वतःला उभे केले.