Nitin Nabin | राजकारणाला नवे वळण Pudhari File Photo
बहार

Nitin Nabin | राजकारणाला नवे वळण

पुढारी वृत्तसेवा

डॉ. योगेश प्र. जाधव

राजकारणाच्या द़ृष्टीने 45 वर्षांचे वय अजूनही तरुणच मानले जाते. भारतीय राजकारणात तरुण नेत्यांना थेट सर्वोच्च पदावर बसवण्याची परंपरा फारशी दिसून आलेली नाही; मात्र या पारंपरिक पद्धतींना छेद देत भाजपने पुन्हा एकदा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. औपचारिकद़ृष्ट्या ही नियुक्ती कार्यकारी अध्यक्षपदाची असली, तरी येत्या जानेवारी अखेरपर्यंत नितीन यांची पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल, असे संकेत दिले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज तिसरा कोणी लावू शकत नाही, हे गेल्या दहा वर्षांमधील घडामोडी पाहताना सहजगत्या लक्षात येते. मोठे आणि धाडसी निर्णय घेऊन त्यांनी नेहमीच पक्ष कार्यकर्त्यांसह देशाला ठाम संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, बहुतेक वेळा या निर्णयांचा यत्किंचितही मागमूस दिल्ली वर्तुळातील जाणत्या पत्रकारांना लागला नाही. ही मोदी-शहा यांच्या भाजपची कार्यपद्धत आहे. अलीकडेच बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करून मोदी-शहा यांनी अनेक दिग्गजांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेश भाजपची कमान पंकज चौधरी यांच्या हाती देण्यात आली, त्याच दिवशी सायंकाळी नितीन नबीन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. अवघ्या पंचेचाळीसाव्या वर्षी या महत्त्वाच्या पदावर पोहोचलेले नितीन नबीन हे या जबाबदारीवर विराजमान होणारे पक्षातील सर्वात तरुण नेते ठरले आहेत. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. तसे घडल्यास भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे ते बिहारमधून पुढे आलेले पहिले नेते ठरतील.

नबीन यांना संघटनेच्या राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून भाजप नेतृत्वाने दिलेला संदेश स्पष्ट आहे. जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असणार्‍या भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान होतो आणि मेहनत, प्रामाणिकपणा व पक्षनिष्ठा दाखवणार्‍यांना सर्वोच्च जबाबदार्‍या दिल्या जाऊ शकतात, हे यातून पक्षनेतृत्वाने दाखवून दिले आहे. एका तरुण नेत्याला इतक्या महत्त्वाच्या पदावर बसवून भाजपने पुढच्या पिढीच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सातत्याने भविष्यातील नेतृत्व घडवण्यावर भर देत आला आहे. पंतप्रधान मोदी यांनीही लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान तरुणांनी राजकारणात यायला हवे, असे आवाहन केले होते. आता नितीन यांच्या नियुक्तीमधून भाजपची द़ृष्टी 2029 आणि त्यानंतरच्या भारताकडे असल्याचे दिसून येते.

नबीन यांना राजकारणाचा वारसा, परंपरा वडिलांकडूनच मिळाला आहे. त्यांचे वडील नबीन किशोर सिन्हा हे जनसंघापासून भाजपशी जोडले गेले होते आणि ते सात वेळा आमदार राहिले. वडिलांच्या निधनानंतर 2006 मध्ये पाटणा पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने अवघ्या 26 वर्षांच्या नितीन नबीन यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी सुमारे 60 हजार मतांनी विजय मिळवत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच्या जवळपास दोन दशकांत नितीन नबीन यांनी बिहारच्या राजकारणात आपले स्थान अधिक द़ृढ केले. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द भाजपच्या विद्यार्थी संघटना अभाविपमधून सुरू केली. त्यानंतर ते भाजप युवा मोर्चाशी सक्रिय राहिले. मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, जिथे त्यांनी काँग्रेस सरकारला सत्तेतून खाली खेचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर बिहारच्या निवडणुकांमध्येही त्यांनी परिश्रमपूर्वक काम करत पक्षाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. सध्या ते बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत आणि पाटणा येथील बांकीपूर मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नबीन यांनी नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीप्रमाणे काम करत हजारो किलोमीटर रस्त्यांचे बांधकाम केले असून ते पंतप्रधान मोदी यांच्या पायाभूत सुविधा विकासाच्या द़ृष्टिकोनाशी सुसंगत ठरते. ते फायलींमागे लपणारे नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून परिणाम दाखवणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. सत्ता आणि संघटना या दोन्हींचा अनुभव त्यांच्याकडे आहे. इतकी वर्षे राजकारणात असूनही त्यांची प्रतिमा पूर्णपणे स्वच्छ राहिली आहे. प्रसिद्धीपासून दूर राहत काम करण्यावर ते विश्वास ठेवतात. कोणतेही भडक वक्तव्य नाही, भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप नाही. त्यामुळेच भाजपला सर्वोच्च संघटनात्मक पदासाठी अशाच व्यक्तिमत्त्वाची गरज होती, असे मानले जाते. पक्ष संघटना मजबूत करणे आणि आगामी राजकीय रणनीतीला धार देणे, यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 2020 मध्ये पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही 2024 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली. या पार्श्वभूमीवर नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही पक्षातील पिढीगत बदलाची नांदी मानली जात आहे. विशेष म्हणजे, नड्डा यांचाही जन्म बिहारमध्येच झाला असून त्यांचे प्रारंभिक शिक्षण पाटण्यात झाले होते.

नबीन यांच्या नियुक्तीकडे बिहारच्या राजकारणात भाजपच्या संघटनात्मक विस्ताराच्या द़ृष्टीनेही पाहिले जात आहे. त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवून भाजपने कायस्थ समाजाला स्पष्ट राजकीय संदेश दिला आहे. नितीन नबीन कायस्थ समाजातून येतात. जनसंघापासून भाजपपर्यंतच्या प्रवासात कायस्थ समाज हा पक्षाचा महत्त्वाचा आधार राहिला आहे. हा समाज शिक्षित, बौद्धिक आणि प्रशासकीय पातळीवर प्रभावी मानला जातो. देशातील बौद्धिक वर्ग आणि पारंपरिक मतदार यांचा विचार करून भाजपने नितीन नबीन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. जातीय समीकरणे साधताना नितीन नबीन ‘सबका साथ’ अशी सर्वसमावेशक प्रतिमा जपत आले आहेत. हिंदी पट्ट्यातील शहरी भागांमध्ये कायस्थ मतदार निर्णायक भूमिका बजावतात आणि त्यांच्यावर नितीन नबीन यांची पकड मजबूत मानली जाते. कायस्थ समाजाची संख्या कमी असली, तरी त्यांची बौद्धिक उपस्थिती, प्रशासनातील प्रभाव आणि शहरी नेतृत्वातील भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. नितीन नबीन यांनी ही भूमिका अधिक बळकट केली आहे. शांत स्वभाव, संतुलित भूमिका आणि वादविवादांपासून दूर राहून काम करण्याची पद्धत त्यांना कायस्थ समाजाचा स्वीकारार्ह आणि नैसर्गिक नेता बनवते.

या निवडीला आणखी एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे पश्चिम बंगालची. या राज्यामध्येही कायस्थ मतदार महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे नितीन नबीन यांच्या माध्यमातून बंगाललाही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून कायस्थ मतदारांचा विश्वास संपादन करून भाजपला सत्तेपर्यंत पोहोचता येईल. बिहारमध्ये 2020 मध्ये भाजपचे तीन कायस्थ आमदार होते. त्यापैकी दोन जणांचे तिकीट कापले गेले; मात्र नितीन नबीन यांच्यावर पक्षाने पूर्ण विश्वास ठेवला. त्यामुळे बंगाल निवडणुकांमध्ये ते भाजपसाठी महत्त्वाचा कणा ठरू शकतात.

राजकारणाच्या द़ृष्टीने 45 वर्षांचे वय अजूनही तरुणच मानले जाते. भारतीय राजकारणात तरुण नेत्यांना थेट सर्वोच्च पदावर बसवण्याची परंपरा फारशी दिसून आलेली नाही. इतिहासाची पाने धुंडाळताना दिसणारे एक उदाहरण म्हणजे 1959 मध्ये अनेक दिग्गज नेते असतानाही काँग्रेसने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड केली होती. त्यावेळी इंदिराजींचे वय केवळ 42 वर्षे होते. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हे पद जितके सन्मानाचे आहे, तितकेच प्रचंड आव्हानात्मकही आहे. युवा मोर्चा चालवणे आणि मुख्य संघटना हाताळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांनी भरलेल्या भाजप संघटनेला सांभाळणे हे नितीन नबीन यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. भाजप ही केडरआधारित संघटना असल्याने त्यांना फार अडचणी येणार नाहीत, असा एक मतप्रवाह आहे.

1980 मध्ये स्थापन झालेल्या भाजपचे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जनकृष्णमूर्ती, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि अमित शहा अशी दिग्गज व्यक्तिमत्त्वे या पदावर विराजमान झाली. त्या यादीत नितीन नबीन यांचे नाव जोडले जाईल की नाही, हे येणारा काळ ठरवेल. पुढील वर्षी जानेवारीअखेर त्यांची पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. जे. पी. नड्डा यांच्या बाबतीतही आधी त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले होते. नितीन नबीन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करतील, पक्षाच्या धोरणांना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवतील आणि भाजपचा विस्तार करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT