Labelling Regulations | ग्राहकहिताचे पाऊल 
बहार

Labelling Regulations | ग्राहकहिताचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

सूर्यकांत पाठक, सदस्य, राष्ट्रीय ग्राहक पंचायत

खाद्यपदार्थांवरील हिरवे आणि तपकिरी चिन्ह पाहून शाकाहारी- मांसाहारी पदार्थ ओळखण्याची सवय भारतीय ग्राहकांना झाली आहे. आता साबण, शाम्पू, टूथपेस्ट, फेसवॉशसह दैनंदिन वापराच्या सौंदर्यप्रसाधनांवरही अशाच प्रकारची खूण दिसणार आहे. एखाद्या उत्पादनात प्राणिजन्य घटक आहेत की नाहीत, हे स्पष्टपणे सांगण्याची जबाबदारी उत्पादकावर टाकणारा हा बदल स्वागतार्ह आहे.

खा द्यपदार्थ खरेदी करताना पाकिटावरील हिरवा किंवा लाल संकेत पाहून त्यात शाकाहारी की मांसाहारी घटक आहेत, हे सहज समजते. आता साबण, शाम्पू, टूथपेस्ट आणि वैयक्तिक वापराच्या इतर वस्तूंबाबतही अशीच व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या उत्पादनांमध्ये प्राणिजन्य घटकांचा वापर झाला आहे की वनस्पतिजन्य घटकांचा, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना पाकिटावरच देण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत. यामागचा मुख्य उद्देश ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटकांचे स्वरूप समजावे आणि त्यानुसार निवड करता यावी, हा आहे. विशेषतः धार्मिक श्रद्धा, वैयक्तिक जीवनशैली किंवा शाकाहार-मांसाहाराबाबत विशिष्ट भूमिका असलेल्या ग्राहकांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. सध्या खाद्यपदार्थांच्या पाकिटावर हिरव्या किंवा तपकिरी संकेताद्वारे उत्पादन शाकाहारी आहे की मांसाहारी, हे दर्शविण्याची व्यवस्था आहे; मात्र साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक वापराच्या अनेक वस्तूंमध्येही वनस्पतिजन्य तसेच प्राणिजन्य घटक वापरले जातात. अशा उत्पादनांच्या पाकिटावरील घटकांची यादी सामान्य ग्राहकासाठी अनेकदा गुंतागुंतीची असते. एखाद्या रासायनिक किंवा तांत्रिक नावामागे नेमका कोणत्या प्रकारचा घटक आहे, हे ग्राहकाला सहज समजत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थांप्रमाणेच या वस्तूंवरही सहज ओळखता येईल असा संकेत असावा, अशी भूमिका पुढे आली आहे.

नियमांमध्ये बदल : यासाठी ग्राहक व्यवहार विभागाने वैधानिक मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, २०११ मध्ये बदल करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या नियमांमध्ये सुधारणा करून पॅकबंद वस्तूंवर त्यांच्या घटकांच्या स्वरूपाविषयी अधिक स्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेबाबत २०१४मध्येही चर्चा झाली होती. त्यावेळी काही उत्पादनांवर शाकाहारी-मांसाहारी स्वरूप दर्शविण्याबाबत विचार करण्यात आला होता; मात्र आता ग्राहकांच्या माहितीच्या अधिकाराला अधिक महत्त्व देत हा मुद्दा पुन्हा पुढे आला आहे. नव्या व्यवस्थेत साबण, शाम्पू, टूथपेस्टसारख्या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले घटक प्राणिजन्य आहेत की वनस्पतिजन्य, हे संकेताद्वारे स्पष्ट करण्याचा विचार आहे.

ग्राहकांना नेमका फायदा काय?

आज एखादा ग्राहक ही उत्पादने खरेदी करतो, तेव्हा त्याच्या पाकिटावर घटकांची यादी असते; मात्र त्यातील प्रत्येक घटकाचा उगम समजणे सर्वसामान्यांसाठी सोपे नसते. काही घटक वनस्पतींपासून मिळतात, तर काही प्राणिजन्य स्रोतांपासून मिळू शकतात. त्यामुळे केवळ रासायनिक नाव वाचून त्याचे मूळ ओळखणे कठीण ठरते. नव्या संकेत पद्धतीमुळे ग्राहकाला उत्पादन हातात घेतल्यानंतरच त्याचे स्वरूप समजू शकेल. यामुळे विशेषतः शाकाहारी उत्पादने वापरण्याला प्राधान्य देणार्‍या ग्राहकांना अधिक स्पष्टपणे निवड करता येईल. धार्मिक कारणांमुळे काही विशिष्ट प्राणिजन्य घटक टाळणार्‍या ग्राहकांसाठीही ही माहिती उपयुक्त ठरेल.

कंपन्यांसमोर मात्र नवे आव्हान

अर्थात, ही व्यवस्था प्रत्यक्षात आणणे तितके सोपे नाही. साबण किंवा टूथपेस्टसारख्या उत्पादनांमध्ये अनेक घटक वापरले जातात. त्यापैकी काहींचा उगम वनस्पतिजन्य असू शकतो, तर त्याच प्रकारचा घटक दुसर्‍या उत्पादनात प्राणिजन्य स्रोतापासून मिळालेला असू शकतो. त्यामुळे कंपन्यांना आपल्या पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाचा स्रोत तपासावा लागेल. कच्चा माल कुठून आला, त्याची निर्मिती कशी झाली आणि प्रक्रियेदरम्यान अन्य कोणते घटक वापरण्यात आले, याची नोंद ठेवण्याची जबाबदारी वाढू शकते. एखाद्या उत्पादनात अनेक प्रकारचे घटक असतील, तर त्याचे वर्गीकरण नेमके कसे करायचे, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नियम लागू करताना सरकारला उत्पादनांच्या विविध शेणी आणि त्यांच्या निर्मितीप्रक्रियेचा विचार करावा लागेल.

येथे एक बाब स्पष्ट असणे आवश्यक आहे. उत्पादनावरील हिरवा किंवा अन्य संकेत हा त्या उत्पादनाच्या गुणवत्तेचा किंवा सुरक्षिततेचा दर्जा ठरवणारा शिक्का नसेल. तो केवळ उत्पादनातील घटकांचे स्वरूप ग्राहकाला समजावून सांगण्यासाठी असेल. म्हणजे हिरवा संकेत असलेले उत्पादन अधिक चांगले आणि दुसरा संकेत असलेले उत्पादन कमी दर्जाचे, असा त्याचा अर्थ काढता येणार नाही. ग्राहकाला उत्पादनात कोणत्या प्रकारचे घटक वापरले आहेत, याची माहिती देणे एवढाच त्यामागचा हेतू असेल. त्यामुळे संकेत पाहतानाच ग्राहकांनी उत्पादनाची गुणवत्ता, उपयोग, किंमत, वापरण्याची पद्धत आणि इतर आवश्यक माहितीही तपासणे गरजेचे आहे.

अर्थशास्त्रातील सिद्धांतानुसार उत्पादक आणि ग्राहक यांच्यात नेहमीच माहितीची मोठी विषमता असते. प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणारे घटक सामान्यतः अत्यंत गुंतागुंतीच्या रासायनिक संज्ञांमध्ये लिहिलेले असल्यामुळे त्यातील घटक वनस्पतिजन्य आहेत की प्राणिजन्य, हे सर्वसामान्य ग्राहकाला सहज ओळखता येत नाही. उत्पादनाच्या दर्शनी भागावर सोपी रंगीत खूण अनिवार्य केल्यामुळे ग्राहकाचा माहिती मिळवण्याचा वेळ वाचू शकतो. कोणतीही वस्तू खरेदी करताना त्या पॅकेटच्या आत नेमके काय आहे, हे जाणून घेण्याचा पहिला हक्क ग्राहकाचाच आहे. कोणत्याही उत्पादनातील ‘इनग्रेडियंट्‌स’ किंवा वापरण्यात आलेले घटक खरोखरीच कोणते आहेत, हे उत्पादकांना शंभर टक्के माहिती असते. त्यामुळे त्याची माहिती देण्याची प्राथमिक जबाबदारीही त्याचीच असायला हवी. निवडीसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती उपलब्ध असते तेव्हाच निवड करण्याचा अधिकार अर्थपूर्ण ठरतो.

या बदलामागे एक मोठी न्यायालयीन प्रक्रिया आहे. हा विषय केवळ पाकिटावर लाल किंवा हिरवे निशाण नमूद करण्यापुरता मर्यादित नव्हता. रेकिट बेंकिझर इंडिया या ग्राहक उत्पादने बनवणार्‍या कंपनीने या तरतुदीला न्यायालयात आव्हान दिले होते. ही कंपनी साबण आणि वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित उत्पादने बनवते. दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना विधिक मापविज्ञान विभाग आणि औषध नियंत्रक यांना या विषयावर स्पष्ट भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयासमोर वेगवेगळ्या नियमांमधील आणि नियमन व्यवस्थेमधील कोणत्या तरतुदीनुसार शाकाहारी किंवा मांसाहारी मूळ दर्शवण्याची जबाबदारी आणि कायदेशीर आधार कसा लागू व्हावा, हा मुख्य प्रश्न होता. तसेच मूळ तरतूद २०१४ पासून अस्तित्वात असूनही तिच्या अंमलबजावणीवर वाद निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने आता केलेला बदल म्हणजे जुन्या तरतुदीला नियमांच्या नव्या रचनेत समाविष्ट करण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे. अर्थात, ही व्यवस्था प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरते, हे अंतिम नियमांचे स्वरूप, उत्पादनांचे वर्गीकरण आणि कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या माहितीच्या स्पष्टतेवर अवलंबून राहील.

ग्राहकांच्या माहितीच्या हक्काला बळ

पॅकबंद वस्तूंच्या बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. ग्राहक आता केवळ किंमत किंवा ब्रँड पाहून वस्तू निवडत नाही. उत्पादनात नेमके काय आहे, ते कसे तयार झाले, कोणते घटक वापरले गेले आणि ते आपल्या वैयक्तिक पसंतीशी जुळते का, याचाही विचार केला जातो. त्यामुळे उत्पादनाविषयी शक्य तितकी स्पष्ट माहिती देण्याची जबाबदारी उत्पादकांवर वाढत आहे. साबण, शाम्पू आणि टूथपेस्ट या रोजच्या वापरातील गोष्टीतील घटकांबद्दल बहुतांश ग्राहक फारसा विचार करत नसले, तरी उत्पादनाच्या लेबलवर सहज समजणार्‍या पद्धतीने माहिती उपलब्ध झाली, तर ग्राहक स्वतःच्या पसंतीनुसार निर्णय घेऊ शकतो.

SCROLL FOR NEXT