बहार

NCP Internal Conflict : राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला सध्याचा वाद सोडवण्याची जबाबदारी अर्थातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला सध्याचा वाद सोडवण्याची जबाबदारी अर्थातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच आहे. व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड धक्क्याला सामोरे जाऊनही त्या ठामपणे उभ्या उभ्या राहिल्या, हे खरे आहे; मात्र मुलगा पार्थ पवार आणि पतीचे सहकारी यांच्यातील दरी मिटवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. माय-लेकराचा पक्ष अशी प्रतिमा पक्षाला उपयोगी पडणार नाही, याची जाणीव त्यांना निश्चितच असेल.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली, अपघाती निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अपघाताचे कारण, चौकशी समितीचा काही महिने उलटून गेले, तरी अद्याप अंतिम न झालेला अहवाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातला खरा मित्र, उत्तम प्रशासक काळाच्या पडद्याआड गेल्याने सोसावे लागणारे नुकसान हे प्रश्न तर महत्त्वाचे आहेतच; पण त्यापेक्षाही महत्त्वाचा, खरे तर उग्र होत चाललेला प्रश्न म्हणजे दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाहेर पडलेल्या आमदार, कार्यकर्त्यांच्या पक्षाचे भवितव्य. गेल्या आठवड्यात हा प्रश्न थेट दिल्ली दरबारात गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आणि चार-पाच महिन्यांपासून सुरू असलेली हलक्या आवाजातली कुजबुज एकदम चव्हाट्यावर आली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अस्तित्वात आलेल्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातला हा पक्ष ही भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेली राजकीय संघटना आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या पक्षात काही उणे- अधिक होत असेल, तर या पक्षाचे निर्माते त्यात लक्ष घालत करतेधरते होण्याची भूमिका घेणार, हे उघड आहे. त्यांना असे करण्याची संधी का मिळते आहे, याचा शोध आज सुरू असलेल्या वादाच्या प्रश्नावरचे उत्तर आहे. कदाचित भविष्यातील वाटचालीसाठीची उपाययोजनाही त्यातच दडलेली असेल.

अजित हा पुतण्या आपला एकमेव राजकीय वारसदार नसून त्या जागेत कन्या सुप्रियाही असेल, असा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रातल्या एका बड्या प्रादेशिक पक्षातील समीकरणे पार विस्कटली. खरे तर काही जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला हा पक्ष तेव्हा विस्ताराचे स्वप्न पाहत होता. सुप्रिया पवार-सुळे या कमालीच्या उत्साही होत्या. शिकायची तयारी असलेल्या तरुणी होत्या आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांना अजितदादांबद्दल कमालीचे प्रेम होते. सुप्रियाताई राजकारणात जसजशा अधिकाधिक रस घेऊ लागल्या तसतसे अजितदादा अस्वस्थ होऊ लागले. भारतीय जनता पक्षाने हे अचूक ओळखले. प्रत्येक राजकीय कुटुंबातल्या फटीकडे लक्ष द्यायची शरद पवरांसह प्रत्येक राजकारण्याला सवय असते. ही सवय असेल किंवा खोड; पण पवार कुटुंबात वाढणाऱ्या या फटीकडे भाजपने लक्ष दिले आणि ती फट रुंद होईल याची सोय बघितली.

शरद पवार यांनी २०१९ मध्ये 'तुमच्याबरोबर येतो' असा शब्द देऊन प्रत्यक्षात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदासाठी दिलेला पाठिंबा हा भाजपसाठी विघटनाचा मुद्दा होता, असे या विषयातले जाणकार सांगतात. उध्वजींच्या शपथविधीपूर्वी पुतण्याला गळाला लावून भाजपने पहाटेच्या शपथविधीचा अयशस्वी प्रयोग केला. काकांना आव्हान देणाऱ्या पुतण्याने केलेले बंड केवळ काही तासांत म्यान झाले; पण भाजपने काही महिन्यांत मोठ्या पवारांचे सहकारी असलेल्या एकेकाच्या विरोधातील प्रकरणांना हाताशी धरून पक्ष फोडला. सिंचन घोटाळ्यात ज्या अजितदादांविरोधात रान उठवले, त्यांना जवळ करत भाजपने एकेक मोहरा फोडला अन्‌ आपल्या पक्षात न घेता त्याला अजितदादा गटात पाठवले. पर्यायी राष्ट्रवादी तयार झाली. पवार कुटुंबातल्या नणंद-भावजय बारामती या बालेकिल्ल्यात परस्परविरोधात निवडणूक रिंगणात उभ्या राहिल्या. पवार विरोधक म्हणू लागले, दुसऱ्यांच्या बाबत जे पेरले ते आता यांच्याकडेही उगवले. लोकसभेचा सामना धाकले पवार हरले; पण विधानसभेत मतांची टक्केवारी थोरल्या पवारांपेक्षा कमी असली, तरी ४१ आमदार जिंकून आणून बाजीगर ठरले.

या संपूर्ण प्रवासात त्यांच्या समवेत असलेली खात्रीची व्यक्ती म्हणजे सुनील तटकरे. अजितदादा कमालीचे अस्वस्थ होते त्या वेळेपासून, तर ते ४१ आमदारांचे नेते ठरले त्या वेळेपर्यंत त्यांना मनापासून साथ देणारे सुनील तटकरे हे दादा गटातील तसे एकमेव महत्त्वाचे नेते आणि बडे सहकारी होते. सुनील तटकरे यांच्यावर अवलंबून अजितदादा पवारांनी कित्येक गणिते मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली. सर्वाधिक विश्वासू सहकारी असलेले सुनील तटकरे अजितदादांच्या मुलावर पार्थवर नाराज आहेत, हा सध्याच्या वादातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.

सध्या जे नाराजीसत्र सुरू आहे, त्यात पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असे दोन उभे गट पडले आहेत. गेले चार महिने हा विस्तव विझत नाही अशी स्थिती होती. प्रफुल्ल पटेल हे दिल्ली दरबारात एक मोठे खेळाडू असल्यामुळे त्यांचे सर्वपक्षीय संबंध. ते भारतीय जनता पक्षातील काहींच्या जवळचे. सुनील तटकरे मात्र संपूर्णतः दादांचे जीवस्यकंठस्य सहकारी होते आणि त्यांची ओळखच दादांचा उजवा हात अशी होती. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर अचानक राजकारणात पुनर्प्रवेश केलेल्या पार्थ यांचे या दोघांशीही पटत नाही, हा भांडणाचा खरा मुद्दा आहे. महत्त्वाचे निर्णय पार्थ पवार परस्पर घेतात आणि त्याबद्दल आम्हाला माहितीही दिली जात नाही, असे या दोघांचे म्हणणे होते किंवा आहे. त्यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे -पाटील अशा मध्यममार्गी नेत्यांची भर पडली आणि वाद उभ्या दाव्यापर्यंत पोहोचला. हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे, असे पार्थ म्हणतात, अशी चर्चा आहे. तटकरे यांनी माझ्या वडिलांचा फायदा घेतला, असेही या चिरंजीवांना वाटते, अशी कुजबुज असते.

अजितदादा सरकार चालवण्याच्या प्रक्रियेत असल्याने संघटनात्मक बाबी तटकरे बघत. दादांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर पार्थ यांनी जमलेल्या लाखोंच्या समुदायाला ज्या विनम्र भावनेने नमस्कार केला, ते दृश्य पक्ष चालवण्यात ते मोठी भूमिका बजावणार, याचे निदर्शक होते. आपण अजितदादा आणि पार्थ यांच्या जवळचे आहोत असा दावा करणारे काही नेते पटेल, तटकरे यांच्यावर दादाही नाराज झाले होते, असे सांगतात. यात खरे किती, खोटे किती ते ठाऊक नाही; पण निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतून पटेल, तटकरे यांची नावे वगळल्याने वाद वाढले. रायगड लोकसभेतील दारुण पराभवानंतर पुन्हा पित्याच्या निधनानंतर सक्रिय झालेले पार्थ चुका करत असल्याची भावना पसरली. खरे तर, पुणे येथील जागांच्या प्रकरणावरून पार्थ यांच्यावर मोठे आरोप आहेत. कोणत्याही क्षणी यासंदर्भातील हालचाली होऊ शकतील असे त्यांचे विरोधक खासगीत सांगत असतात.

मुंबई शहरात पक्षाला पाय रोवून उभे राहायचे असेल, तर दिशांची..... हा अल्पसंख्याक चेहरा पक्षाचा अध्यक्ष कसा होऊ शकतो. सिद्दिकी यांना या पदावर नेमणे हे काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाच्या राजकारणात योग्य ठरले असते, असेही मानले जाते. या संबंधात सल्ला विचारला असता, तर योग्य झाले असते, असे भुजबळ, वळसे-पाटील अशा ज्येष्ठांचे मत आहे. अर्थात, पार्थ यांचीही काही बाजू आहे. ही मंडळी पक्षाचा वापर करत मोठी झाली. पक्षाच्या तिजोरीत मोठी भर घातली गेली नाही, ही बाब पार्थ यांना प्रशांत किशोर यांनी पटवून दिली असल्याचीही चर्चा आहे. प्रशांत किशोर हे व्यक्तिगत आणि कौटुंबिक मित्र आहेत, असे पार्थ बोलत असले, तरी भारतीय जनता पक्षालाही ते मान्य नाही. किशोर यांच्या सल्ल्याने हा पक्ष जात असेल, तर काही खरे नाही, असे मानणारा मतप्रवाह तटकरे, पटेल यांच्या बाजूने सक्रिय झाला आहे.

अजितदादा पवार यांच्या अत्यंत दुर्दैवी निधनानंतर शोकाची बाजू काहीशी दूर ठेवत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि दिवंगत पतीचा वारसा पुढे नेण्यास आपण तयार आहोत, समर्थ आहोत असे संकेतही दिले होते. आजही त्या राजकारणात नवागत असल्या, तरी संयतपणे वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला सध्याचा वाद सोडवण्याची जबाबदारी अर्थातच सुनेत्रा पवार यांचीच आहे, असे मानले जाईल. व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड धक्क्याला सामोरे जाऊनही त्या कोलमडून न पडता व्यक्तिगत दुःख बाजूला ठेवून उभ्या आहेत, हे खरे आहे. अजितदादा यांची जबाबदारी सांभाळायला आपण सज्ज आहोत, याची जाणीवही त्यांना आहे; मात्र मुलगा आणि पतीचे सहकारी यांच्यातील दरी मिटवण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. माय-लेकराचा पक्ष अशी प्रतिमा उपयोगी पडणार नाही, याची जाणीव त्यांना निश्चितच असेल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सध्या सुरू केलेले विस्तारकार्य लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला मराठा समाजाची उत्तम बाजू मांडणाऱ्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गडबड होऊ नये, ते गुण्यागोविंदाने नांदावेत, असे वाटत असणार हे उघड आहे. त्यासाठी जर सर्व मंडळी दिल्लीत गेली असतील, तर त्यात काही गैरही नाही. कदाचित सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीतच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमच्या पक्षातील सहकाऱ्यांशीही बोला, असे सांगितले असावे, हे मानण्यासही जागा आहे; मात्र विद्यमान स्थितीत सुरू असलेले कवित्व दूर करणे, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. काळाने सुनेत्रा पवार यांच्यावर काटेरी मुकुट ठेवत मोठी जबाबदारी सोपवली आहे. या जबाबदारीचे पालन त्यांना करावे लागेल. मुलाला बरोबर घेऊन पक्षातील सर्वांची मने सांभाळून घ्यावी लागतील. मोठ्या-मोठ्या सरदारांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही.

प्रत्येकाचे अर्थकारण, तसेच सत्ताकारणातील फायदे-तोटे लक्षात घेता ही मंडळी कायम सत्तेच्या दिशेने वाटचाल करतात आणि सत्तेत राहतात, हेही आजवरचे सत्य आहे. ते सांभाळायची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांवर येऊन पडली आहे. पार्थ पवार यांनी पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात तसे घडते का हे दिसेलच. महाराष्ट्रात सातत्याने प्रादेशिक पक्षांचे राजकारण काही वेगळे करत असते. राष्ट्रीय प्रवाहातील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या मुख्य दोघांना येथे जागा असली, तरी प्रादेशिक पक्षदेखील येथे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. शरद पवार यांच्या पक्षाला या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवणे अर्थातच आवडत असेल. त्यांची या घडामोडींना मागून साथ आहे किंवा फूस आहे का, हे सांगणे आज तसे कठीण आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रादेशिक पक्ष म्हणून जो मान ४१ आमदार निवडून आलेल्या अजितदादांच्या पक्षाला आहे तो वाढवणे हे मोठे आव्हान आहे. पक्षातील काही आमदार भारतीय जनता पक्षाने पाठवलेले आहेत. काही ठिकाणी मात्र खरोखरच दादांच्या करिश्मामुळे निवडून आलेल्या मंडळींची संख्या लक्षणीय आहे. ही मंडळी बरोबर ठेवत स्वतःचा पक्ष वाचवणे आणि वाढवणे हे मोठे आव्हान असेल.

निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी जवळपास अडीच वर्षे आहेत. या अडीच वर्षांत सुनेत्रा पवार हा पक्ष आणि पक्षासमोरची आव्हाने कशी सावरतात, याकडे भारतीय राजकारणाचे लक्ष असेल. महाराष्ट्रात महिला नेतृत्व कधीही शीर्षस्थानी आजवर आलेले नाही. नियतीने ही संधी सुनेत्रा पवार यांना दिलेली आहे. त्या या कसोटीस उतरतात काय, हे येणारा काळ सांगेल. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार असे समांतर राष्ट्रवादीतील नेते कसे डाव टाकतात, हा प्रश्न एकीकडे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विस्तारवादी राजकारण मराठा समाजाला आम्हीच तुमचे पुढचे कैवारी हे सांगण्याचा प्रयत्न करणार का, हा दुसऱ्या बाजूने पुढे येणारा प्रश्न आहे. वडिलांचा वारसा चालवायला पुढे आलेल्या पार्थ पवार यांना सर्वांना समवेत घेऊन आईचे हात मजबूत करणे गरजेचे आहे. भारतातले प्रादेशिक पक्ष, मग तो समाजवादी असो किंवा डीएमके, आजवर वारशावरच चालत आला आहे, हे तटकरे आणि पटेल यांना उमजत असणारच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT