डॉ. सुकृत खांडेकर
मोदींचा पंतप्रधान म्हणून बारा वर्षांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले पंतप्रधान झाले. तीन वेळा त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभेतील बहुमताअभावी पहिल्यावेळी अवघ्या तेरा दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसर्यावेळी तेरा महिन्यांत त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली होती. नंतर मात्र तिसर्यांदा एनडीए सरकारचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर त्यांनी पाच वर्षांची टर्म पूर्ण केली.
दि. 26 मे 2026 रोजी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला बारा वर्षे पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून प्रथम सूत्रे हाती घेतली. नंतर 2019 व 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींनी पंतप्रधानपदाची सलग तीन वेळा शपथ घेऊन हॅट्ट्रिक संपादन केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सलग तीनवेळा केंद्रात भाजपाप्रणीत एनडीए सरकार स्थापन झाले. भारताच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. राजकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांना वेगळी दिशा मिळाली. विरोधी पक्षांची सर्वत्र दाणादाण उडाली. दहा वर्षे तर विरोधी पक्षाकडे (काँग्रेस) किमान संख्याबळ नसल्याने लोकसभेत विरोधी पक्ष नेताच नव्हता. आज देशात 22 राज्यांत एनडीएचे सरकार आहे. सतरा मुख्यमंत्री तर भाजपचे आहेत. देशातील 80 टक्के लोकसंख्या भाजपाशासित राज्यांत राहते. मोदींचा करिष्मा आणि अमित शहांचे संघटन कौशल्य यातून भाजपचा अश्वमेध गेली बारा वर्षे देशभर दौडत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाची शत-प्रतिशतकडे वाटचाल चालू आहे. पार्लमेंट ते पंचायत हे इप्सित साध्य करण्याच्या दिशेने भाजपची वेगवान प्रगती चालू आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’ ही घोषणा भाजपने गेल्या बारा वर्षांत अनेकदा वास्तवात आणून दाखवली आहे. नरेंद्र दामोदरदास मोदी हे देशातील सर्वात शक्तिशाली व सर्वात लोकप्रिय नेते आहेत. लोकप्रियता व कार्यक्षमता या निकषांवर पक्षात त्यांच्या जवळपास दुसरा कोणीही नाही आणि देशात विरोधी पक्षात त्यांना आव्हान देणारा कोणी पर्याय नाही.
मोदींच्या तपपूर्तीनिमित्त प्रदेश भाजपने मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे एक छान कार्यक्रम योजला होता. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या पंतप्रधान मोदींच्या बारा वर्षाच्या कार्याचा व कर्तृत्वाचा आलेख मांडणार्या कॉफी टेबलबुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मुंबईतील माध्यम क्षेत्रातील पत्रकार आणि पक्षाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मुंबईचे मंत्री मंगलप्रभात लोढा, सुनील राणे, निरंजन डावखरे, योगेश सागर असे निवडक मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण म्हणजे आजवर त्यांनी केलेल्या सर्वोत्तम भाषणांपैकी एक होते असेच म्हणावे लागेल. देवाभाऊंच्या हातात कोणताही कागद नव्हता. देशाला जगात उंचावर नेण्याचे काम मोदींनी करावे व मोदींनी केलेल्या कामाची गाथा देवाभाऊंनी सांगावी, असा तो प्रसंग होता. मोदींनी विविध क्षेत्रांत केलेल्या कामांची देवाभाऊंनी नुसती जंत्री सांगितली नाही; पण त्यांच्या कामामुळे देशाने विविध क्षेत्रांत जगात कशी भरारी मारली व देशातील गरिबी कशी कमी झाली, हे त्यांनी आकडेवारीनिशी पटवून दिले.
मोदींचा पंतप्रधान म्हणून बारा वर्षांचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले पंतप्रधान झाले. तीन वेळा त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लोकसभेतील बहुमताअभावी पहिल्यावेळी अवघ्या तेरा दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. दुसर्यावेळी तेरा महिन्यांत त्यांच्यावर राजीनामा देण्याची पाळी आली होती. नंतर मात्र तिसर्यांदा एनडीए सरकारचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यावर त्यांनी पाच वर्षांची टर्म पूर्ण केली. वाजपेयी पंतप्रधान असताना एनडीएमधील दीड डझनपेक्षा जास्त मित्र पक्षांना बरोबर घेऊन सरकार चालवत होते. आज मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील सर्व मित्र पक्ष हे मोदींची मर्जी राखून असतात. एच. डी. देवेगौडा, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, चिराग, पासवान, जीतमराम मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, उपेंद्र कुशवाह, संजय झा आदी मित्र पक्षांचे नेते त्यांच्या भविष्यासाठी मोदींवर अवलंबून असलेले दिसतात. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अप) हे महायुतीतील दोन्ही मित्र पक्ष मोदी-शहांच्या मर्जीवर अवलंबून आहेत, असे वारंवार जाणवते. ‘मोदी’ या एका शब्दात भाजपची सर्व शक्ती एकवटली आहे. म्हणूनच पक्षाचा उमेदवार कोण आहे, हे न बघता निवडणुकीत केवळ मोदींसाठी मतदार कमळ चिन्हावर बटण दाबतो. पक्षाचा विस्तार करताना ज्यांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले, अशा विविध पक्षातील आयारामांना भाजपने प्रवेश दिला व त्यांना सन्मान दिला. आयारामांवर झालेल्या टीकेची पर्वा न करता भाजपने बारा वर्षांत पक्षाचा वेगाने विस्तार केला व सर्व स्तरावरील निवडणुका पाठोपाठ जिंकण्याचा सपाटा लावला.
अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण, काश्मीरसाठी असलेले 370 वे कलम रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, भारताला 11 व्या क्रमांकावरून जगाच्या 4 थ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर आणणे, आयुष्यमान भारत, 81 कोटी लोकांना दरमहा 5 किलो रेशन मोफत देणे, 25 कोटी लोकांना दारिद्य्र रेषेतून बाहेर काढणे, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जनधन योजना आदी मोदींनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांनी देशात सामाजिक परिवर्तन घडले. देशवासीयांच्या जीवनात अमूलाग्र क्रांती करणारे असे निर्णय आपण घेऊ शकतो, असा काँग्रेसने सत्तेवर असताना कधी विचार केला नसावा. भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू हे नरेंद्र मोदी आहेत आणि अंत्योदय विचार हा मोदी सरकारचा कारभाराचा केंद्रबिंदू आहे. ‘सबका साथ-सबका विकास’ या मोदींच्या घोषणेवर जनतेचा विश्वास आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हा पारदर्शक व्यवस्थेचा मंत्र आहे.
गेल्या बारा वर्षांत जम्म-काश्मीरमधील रक्तरंजित क्रूर दहशवादाला लगाम बसला आहे. कलम 370 रद्द झाल्याने भारताचे संपूर्ण संविधान काश्मीरला लागू झाले आहे. काश्मीरमधील प्रत्येक शासकीय कार्यालयावर तिरंगा दिमाखाने फडकतो आहे. ‘एक देश-एक कर’ या संकल्पनेतून जीएसटी लागू झाला. हा निर्णय क्रांतिकारी होता. जीएसटीला आठ वर्षे पूर्ण होणे हा भारताच्या आर्थिक वाटचालीत मैलाचा दगड आहे, असे स्वत: मोदींनीच म्हटले आहे. जगातील 49 टक्क्यांपेक्षा जास्त डिजिटल व्यवहार भारतात होतात. यूपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंटस् इंटरफेस ही तर भारताने जागतिक अर्थव्यवस्थेला दिलेली देणगी आहे. वन रँक वन पेन्शन प्रणालीमुळे लक्षावधी निवृत्त लष्करी जवानांच्या परिवारांना स्थैर्य प्राप्त झाले आहे. कोव्हिड काळात भारताने शंभरपेक्षा जास्त देशांना विनामूल्य व सवलतीच्या दराने लस पुरवली. एक देश-एक रेशन कार्ड योजना तर सर्वसामान्य जनतेला वरदान ठरली आहे. कोव्हिड काळापासून देशातील 81 कोटी जनतेला दरमहा 5 किलो मोफत धान्य पुरवले जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात थेट जमा होतात. आजवर 11 कोटींहून अधिक शेतकर्यांच्या खात्यात 3 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. जनधन योजनेत 55 कोटी 48 लाख खाती असून 2 कोटी 37 लाखांपेक्षा जास्त रक्कम त्यात आहे. बारा वर्षांत आवास योजनेखाली 4 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली.
एअर स्ट्राईक-उरी दहशवादी हल्ल्यानंतर (सप्टेंबर 2026), एअर स्ट्राईक बालाकोट हल्ल्यानंतर (फेब्रुवारी 2019) व ऑपरेशन सिंदूर- पहलगाम हल्ल्यानंतर (मे 2025) या कारवाईमध्ये भारताने आपले लष्करी सामर्थ्य जगाला दाखवून दिले. बारा वर्षांपूर्वी देशात 194 जिल्हे नक्षलग्रस्त होते. 2026 मध्ये ही संख्या 10 आहे. नक्षलवाद संपुष्टात आणण्यात मोदी सरकारने यश मिळवले. बुलेट ट्रेन, वंदे भारत, वंदे मेट्रो, सेमीकंटक्टर, रस्ते, द्रुतगती महामार्ग, रेल्वेचा विस्तार, शस्त्रास्त्रांची निर्मिती, आत्मनिर्भर भारत आदी क्षेत्रांत विकासाचा वेग लक्षणीय आहे. आता ‘एक देश-एक निवडणूक’ हा संकल्प आहे.
नरेंद्र मोदींची देशाचा सर्वोच्च नेता म्हणून सरकार, पक्ष व प्रशासनावरील पकड घट्ट आहे. भारत म्हणजे मोदी अशी जगाला ओळख आहे. मोदी केंद्रातील सत्तेवरून कधी हटणार, या विचाराने विरोधी पक्ष चिंताग्रस्त आहे. मोदी हुकूमशहासारखे वागतात, घोटाळे करून भाजप निवडणुका जिंकतो, तपास यंत्रणा व निवडणूक आयोग सरकारसाठी कामे करतात, मशिन्स मॅनेज केली जातात, मोदी कधीच पत्रकार परिषद घेत नाहीत, त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, भ्रष्टाचाराने सारा देश पोखरून निघाला आहे, विरोधी पक्षांची तोडफोड करून व विरोधी नेत्यांना इडी, सीबीआयचा धाक दाखवून नामोहरम केले जाते, मोदी अमेरिकेच्या आहारी गेले आहेत, ठरावीक उद्योग समूहांना ते झुकते माप देतात, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण व्हावे, यासाठी सतत जाती-धर्मांत तेढ निर्माण केली जाते, कितीही घोटाळे झाले, तरी कोणीही मंत्री राजीनामा देत नाही, नोटाबंदी फसली, नीट पेपरफुटीमुळे 23 लाख विद्यार्थ्यांना मन:स्ताप झाला, सबका साथ ते मेलोडी चॉकलेट असे सतत प्रसिद्धीच्या वलयात मोदी रमलेले असतात, अशी टीका विरोधी पक्षांकडून सतत ऐकायला मिळते. देशाच्या पंतप्रधानांना गद्दार आणि दलिंदर म्हणणे हे नैराश्य आल्याचे लक्षण आहे; पण गेल्या बारा वर्षांत मोदी यांची लोकप्रियता, करिष्मा व जनतेचा विश्वास तसूभरही कमी झालेला नाही. त्यांच्या नेतृत्वाला अद्याप तोड नाही आणि पर्यायही नाही.