उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असणार्या कुंभमेळ्यामध्ये नेहमीप्रमाणेच नागा साधूंकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात नागा साधूंबरोबर विविध रिल्सही तयार केल्या जात आहेत. नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यातील पहिले मंगलस्नान नुकतेच पार पडले. 27 फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या कुंभमेळ्याला प्रचंड संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. प्रत्येक कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणारे नागा साधू सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अंगावरील भस्म, केसांच्या जटा, ध्यानधारणेची अनोखी पद्धत या गोष्टी चर्चेच्या ठरतात. याहीवेळी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात नागा साधू आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. सोशल मीडियाशी संबंधित नागरिक त्यांच्यासमवेत रिल्स करत आहेत. यंदा नागा साधूंनी अमृतस्नानाच्या दिवशी स्नान केले. धर्माचे संरक्षक समजले जाणारे नागा साधू केवळ महाकुंभ किंवा कुंभमेळ्यातच दिसतात. एरवी एवढ्या संख्येने ते अन्यत्र कुठेही दिसत नाहीत. नागा साधूंच्या आयुष्याविषयी, दिनक्रम, दीक्षा याविषयी असंख्य भारतीयांच्या मनात कुतूहल असते.
नागा साधूंचा संबंध शैव परंपरेशी जोडलेला आहे. सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी आणि या परंपरेला पुढे नेण्यासाठी प्रत्येक महाकुंभात वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यांमध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अवलंबली जाते. कुंभमेळ्यात 13 आखाड्यांचे साधू सहभागी होतात आणि ते क्रमानुसार पवित्र स्नान करत असतात. कुंभमेळा आटोपल्यानंतर नागा साधू आखाड्यात निघून जातात. नागा साधू होणे ही सोपी बाब नाही. या साधूंना प्रपंचाशी, संसाराशी काही देणेघेणे नसते. ते संसाराच्या मायाजालातून बाहेर पडलेले असतात. ते नेहमीच ईश्वरभक्तीत लीन झालेले असतात. नागा साधू प्रामुख्याने भगवान शिवाची उपासना करत असतात. नागा साधू हे भगवान शिवाचे अनुयायी असल्याचा परंपरागत मतप्रवाह आहे. त्यांच्याकडे तलवार, त्रिशूळ, गदा, धनुष्य आणि बाण यांसारखी शस्त्रे होती.
कोणत्या व्यक्तीला नागा साधू करायचे आणि कोणाला नाही हे ठरविण्याचा अधिकार आखाडा समितीला असतो. यासाठी प्रत्येकाला कठीण परीक्षेतून जावे लागते. यात सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कठोर परीक्षेत यश मिळवणार्या साधकाला पाच गुरूंकडून दीक्षा मिळवावी लागते. शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश यांना पंचदेव असेही म्हणतात. नागा साधू बनण्यासाठी प्रथम दीर्घकाळ ब्रह्मचारी जीवन जगावे लागते. यानंतर त्यांना ‘महापुरुष’ आणि नंतर ‘अवधूता’चा दर्जा दिला जातो. महाकुंभादरम्यान अंतिम प्रक्रिया पूर्ण होते, जिथे त्यांचे स्वतःचे पिंड दान आणि दांडी संस्कार केले जातात. याला ‘बिजवान’ म्हणतात. नागा साधूंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना भिक्षेतून मिळालेले अन्नच सेवन करतात. एखाद्या दिवशी भोजन मिळाले नाही तर त्यांना अन्नाविना उपाशी राहावे लागते. नागा साधू हे शरीरावर कधीही वस्त्र घालत नाहीत. ते केवळ भस्म लावतात. नागा साधू समाजातील लोकांसमोर नतमस्तक होत नाहीत आणि ते आयुष्यभरात कोणावरही टीकाटिप्पणी करत नाहीत. ते वाहनांचा वापर करत नाहीत. नागा साधू कुंभमेळ्यानंतर आपापल्या आखाड्यात परततात. हे आखाडे भारताच्या विविध भागात आहेत. तेथे नागा साधू ध्यानधारणा, तपश्चर्या, धार्मिक शिक्षणाचा अभ्यास करतात. काही नागा साधू वाराणसी, हरिद्वार, ऋषिकेश, उज्जैन, प्रयागराजसारख्या प्रसिद्ध ठिकाणी वास्तव्य करतात.
नागा साधू होण्याची म्हणजेच दीक्षा घेण्याची प्रक्रिया ही प्रयागराज, नाशिक, हरिद्वार, उज्जैन येथील कुंभमेळ्यात केली जाते. मात्र त्यांना वेगवेगळे नागा साधू म्हटले जाते. प्रयागराज येथे दीक्षा घेणार्या नागा साधूंना राजराजेश्वर म्हटले जाते, तर उज्जैन येथे दीक्षा घेणार्यांना खुनी नागा साधू. तसेच हरिद्वार येथे दीक्षा घेणार्यांना बर्फानी नागा साधू म्हणतात. नाशिकमध्ये दीक्षा घेणार्यांना बर्फानी आणि खिचडीया नागा साधू म्हणतात. प्रयागराज येथील तिसरे शाही स्नान तीन फेब्रुवारी वसंत पंचमीच्या दिवशी असून त्यानंतर नागा साधू आपापल्या आखाड्यात निघून जातील. कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक नागा साधूंचा कोणत्या ना कोणत्या आखाड्याशी संबंध आहे. मात्र नागा साधूंचे सदस्य रद्द करण्याचा अधिकारही आखाड्यांना असतो. आखाड्यात एखाद्या नागा साधूचा मृत्यू झाल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. त्याच्या मृत्यूनंतर त्या आखाड्याशी त्यांचा संबंध संपुष्टात आल्याचे गृहित धरले जाते. मृत नागा साधूंना जलसमाधी किंवा जमिनीत समाधी देण्याची प्रथा आहे.
नागा साधू चारित्र्यवान समजले जातात. कोणताही आखाडा एखादा व्यक्ती नागा साधू होण्याची इच्छा बाळगत असेल तर सर्वांत आधी त्याचे चरित्र तपासतो. शिवाय साधू झाल्यानंतरही आखाडे नागा साधूंच्या व्यक्तिमत्त्वावर सतत लक्ष ठेवून असतात. एखाद्या नागा साधूचे चरित्र दोषपूर्ण वाटले तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. एकदा त्याचे सदस्यत्व रद्द झाले की नंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व दिले जात नाही. नागा साधू होताना अनेकदा मानसिक आजार बळावण्याची शक्यता राहते. काहींना प्रसंगी वेडही लागू शकते. अशावेळी आखाड्याकडे त्या साधूचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार असतो. अर्थात त्या साधूवर उपचाराची सोय केली जाते.
संत-महतांच्या आखाड्यात बाल नागा साधू देखील असतात. या लहान नागा साधूंना पाहून इतक्या कमी वयात कठीणमय असणारे साधू जीवन त्यांनी कसे काय निवडले, असा प्रश्न पडतो. कुंभ काळात बाल नागा साधू कधी आखाड्यात लाठीकाठीचा सराव करताना दिसतात, तर कधी गुरूच्या सेवेत. बाल साधू कुठून येतात आणि कसे होतात, हा कुतूहलाचा विषय आहे. काहीवेळा गरीब पालक तर अनेकदा श्रद्धेपोटी आई-वडील मुलांना आखाड्याकडे सुपूर्द करतात. आणखी मागे गेल्यास असेही प्रकार घडले की, अनेकदा नवजात बालक म्हणजे दहा ते बारा महिन्यांचे बाळ आखाड्यास सोपविले जाते. एखाद्या जोडप्याला अनेक मुलेबाळे असताना पुन्हा अपत्य झाले आणि त्याचा सांभाळ करण्यात ते असमर्थ असतील अशावेळी ते बाळाला आखाड्याकडे सोपवितात. पंचायती आखाड्यामार्फत प्रत्येक कुंभ काळात अशा बाल नागा साधूंना दीक्षा दिली जाते. या बालकांचे वय चौदापेक्षा कमी असते. हे बाल नागा कपडे घालतात आणि शाळेतही जातात. नंतर त्यांच्या इच्छेनुसार वैदिक शिक्षण आणि संस्कृत शिक्षणही घेतात. तरुणपणी त्यांना आखाड्यात शास्त्राबरोबरच शस्त्राचेही शिक्षण दिले जाते. बाल्यावस्थेत त्यांचे पिंडदान होत नाही. बाल नागा साधू इच्छेनुसार 12 ते 24 वयोगटात नागा अवस्था सोडू शकतात किंवा आयुष्यभर राहू शकतात. बाल साधू हा संपूर्ण आयुष्यभर नागा राहण्याचा संकल्प करतो तेव्हा त्यांना अखंड भभूती या नावाने ओळखले जाते. पुढे त्यांना आखाड्याच्या संकल्पाचे आणि नियमांचे पालन करावे लागते.
कडाक्याच्या थंडीतही नागा साधू नग्नावस्थेत कसे तग धरून राहतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण थंडीपासून बचाव करण्यासाठी नागा साधू तीन प्रकारची योगासने करतात आणि त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींसह विचारांवर नियंत्रण ठेवतात. नागा साधू कठोर तपश्चर्या, नाडीशोधन, अग्निध्यान आणि सात्विक आहार करतात. त्यामुळे ते थंडीचा सामना सहजपणे करतात. काही पौराणिक संदर्भांनुसार, आद्य शंकराचार्यांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी नागा योद्ध्यांना तयार केले होते. पवित्र धार्मिक स्थळांचे, धार्मिक ग्रंथांचे आणि आध्यात्मिक ज्ञानाचे बाह्य आक्रमणांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी नागांवर सोपवली होती. सर्व प्रकारची ऐहिक सुखे त्याग करून, नागा साधू फक्त 17 अलंकार घालण्यावर विश्वास ठेवतात. यामध्ये भभूत, चंदन, रुद्राक्ष माला, दुल्ल माला, डमरू, चिमटा आणि पायल यांचा समावेश आहे. पौराणिक मान्यतेनुसार, नागा साधूंचे हे अलंकार शिवभक्तीचे प्रतीक आहेत.