Gen Z Diet | 'जेन झी'च्या नजरेतून माझा कालबाह्य आहार  
बहार

Gen Z Diet | 'जेन झी'च्या नजरेतून माझा कालबाह्य आहार

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद बेरी

वास्तव्यातील चार दिवस घरातील सर्वांचे वर्तन ती बारकाईने पाहत होती. पाचव्या दिवशी जाण्याचा दिवस आला तेव्हा जाताना मला हस्तांदोलन करून म्हणाली, 'आजोबा, यू आर कुल!' लगेच माझ्या बहिणीने मला समजावले, 'दादा, अमेरिकन तरुणाई वयस्कर लोकांना जेव्हा ‘कुल’ म्हणते तेव्हा हा त्यांचा बहुमान असतो.' म्हटलं खचितच माझ्यात थोडी फार सुधारणा झालेली दिसते. आता आमचे दोन राजपुत्र ‘मे’च्या सुट्टीत आल्यावर मला ‘कुल’ केव्हा म्हणतील त्या सुवर्णदिनाची मी वाट पाहत आहे.

जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर अलीकडे 'जेन झी'च्या भाषणशैलीचा आणि जीवनशैलीचा बोलबाला चालू आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असेलेले माझे पौगंडावस्थेतील दोन्ही टीनएजर नातू सुट्टीत कोल्हापूरला आले की, अधूनमधून माझी फिरकी ताणत असतात. गेल्या दिवाळीत आले होते तेव्हाच्या काही घटना!

पहिली घटना : एका शांत सकाळी मी व्हरांड्यात पेपर वाचनाचा आनंद घेत होतो. तेव्हा पहिला राजपुत्र विहान आला आणि गुगली टाकली, 'आजोबा डॉक्सिंग म्हणजे काय सांगा?'

'अरे डॉक्सिंग म्हणजे बॉक्सिंगचा नवीन प्रकार असेल किंवा पॅकिंगच्या बॉक्सचा नवीन प्रकार असेल.' मी त्याच्या गुगलीवर सिक्सर ठोकली; मात्र ते काही त्याला पटले नाही.

आपले आजोबा अजून ‘अनपढ’ असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि म्हणाला, 'अहो डॉक्सिंग म्हणजे माझी काही व्यक्तिगत गोपनीय माहिती समजा एका मित्राला कळाली आणि ती त्याने ग्रुपवर टाकली, तर त्याला ‘डॉक्सिंग’ म्हणतात.'

यानंतरचे काही दिवस माझ्या भाषणशैलीचा वारंवार असा फालुदा होऊ लागला व नकळत मी त्यांचा शिष्य बनत व त्यांना गुरू मानत या जेन झीकडून या नूतन ‘पॉलिटिकली करेक्ट’ भाषेचे धडे गिरवू लागलो.

अपंग व्यक्तीला 'हँडिकॅप्ड' न म्हणता 'दिव्यांग' (फिजिकली चॅलेंज्ड) म्हणायचे. मूकबधिर व्यक्तींना 'डंब अँड डेफ' अजिबात म्हणायचे नाही. त्याऐवजी त्यांना ‘स्पीच अँड हिअरिंग इंपेयर्ड’ म्हणायचे. आफ्रिकेतल्या काळ्या लोकांना ‘निग्रो’ न म्हणता त्यांना ‘ब्लॅक’ म्हणायचे एवढे मला माहीत होते; पण तेपण न म्हणता त्यांना ‘कलर्ड’ म्हणायचे असे नवीनच नामकरण कळाले! माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, असं का म्हणतात, हे आता मला पटलं. नायक (ॲक्टर) व नायिका (ॲक्ट्रेस) वेगळे न म्हणता दोघांनाही ‘ॲक्टर’ (कलाकार) म्हणायचे. स्त्रियांना मिस (कुमारी) किंवा मिसेस (सौ) असे न संबोधता या दोन्हींच्या मधले ‘मिसुज’ (Ms) म्हणायचे. मागासवर्गीय न म्हणता ‘दलित’ किंवा ‘बहुजन’ म्हणायचे. चेअरमन न म्हणता ‘चेअरपरसन’ म्हणायचे! वयस्कर पिढीला ‘म्हातारे’ ‘म्हणायचे नाही त्याऐवजी ‘सीनियर सिटीझन’ बिरुदावली वापरायची इत्यादी.

भाषेच्या बाबतीत माझ्या होणार्‍या गोंधळात भर म्हणून या दोघांकडून अलीकडे येणार्‍या व्हॉट्सॲप मेसेजमधली अनाकलनीय शॉर्टफॉर्मची भाषा पण मला समजेनाशी झाली आहे.

RN म्हणजे ‘राईट नाऊ’ (आताच), B4 म्हणजे ‘बिफोर’ (आधी), U म्हणजे तुम्ही, R म्हणजे आहात. IDK म्हणजे ‘आय डोन्ट नो’ (मला माहीत नाही) इत्यादी इत्यादी ही भाषा शिकण्याची शिकवणी लावण्याचा सध्या माझा विचार चालू आहे.

आता जेन झीच्या भाषण व लिखाण शैलीचे पुराण बाजूला ठेवूया आणि त्या दोघांकडून माझ्या जीवनशैलीवरती झालेल्या आक्रमणाचा आढावा घेऊया! त्याबद्दलचे दोन किस्से आठवतात.

पहिला किस्सा असा : बंगल्यातील वरच्या मजल्यावरच्या माझ्या पर्सनल टीव्हीवर रविवारच्या एका शांत संध्याकाळी मी माझा आवडता कलाकार गुरुदत्तच्या एका जुन्या सिनेमाचा मस्तपैकी आस्वाद घेत होतो. त्यावेळी पहिला राजपुत्र विहान काही कामानिमित्त आत शिरला. त्याने थोडा वेळ माझा सिनेमा पाहिला अन् काळजीच्या आवाजात म्हणाला, 'आजोबा, असले व्यसनाचे उदात्तीकरण करणारे घाणेरडे सिनेमे तुम्ही कसे काय बघता? (अरेरे)'

'काय वाईट पाहतो आहे, माझे आवडते जुने सिनेमे आहेत ते'

'अहो, तो तुमचा हिरो दर पंधरा मिनिटाला नवी सिगारेट ओढत आहे. सिगारेट ही शरीराला घातक आहे. गुरुदत्त तुम्हाला जीवनशैलीचे चुकीचे संदेश देत आहे.'

'अरे, आमच्यावेळेच्या सिनेमातील सगळेच हिरो सिनेमा संपेपर्यंत १५-२० वेळा सिगारेट ओढायचे. शम्मी कपूर, देवआनंद, अशोककुमार इत्यादी. हे सर्वजण स्टायलिश दिसण्यासाठी म्हणून सिगारेट ओढायचे!' माझे वाक्य त्याला पटल्यासारखे वाटले नाही आणि आजोबा बिघडत चालले आहेत अशाच अविर्भावात तो बाहेर पडला.

दुसरा किस्सा : एका रविवारी सकाळच्या नाश्त्याला मी रामभरोसे स्टॉलवरून मिनी सामोसे आणून खुशीने मस्तपैकी आस्वाद घेत होतो, तोपर्यंत धाकटा राजपुत्र अर्जुन अवतरला. अर्जुन हा या तरुणाईमधील 'दुर्मीळ नमुना' आहे. त्याला बाहेरच्यापेक्षा घरचे जेवण ज्यादा आवडते. किंबहुना बाहेर जेवायचे तो टाळतो. त्यामुळे त्याने काळजीच्या स्वरात विचारले, 'आजोबा, हे विष का खाता आहात?' मी पहिल्यांदा थोडा घाबरलो मग सावरलो आणि म्हंटलं.......

'अरे, हे विष नव्हे. रामभरोसेचे मस्त मिनी सामोसे आहेत.'

खाण्यापिण्याच्या बाबतीत आजोबा गंवार असल्याने त्यांना शिकवले पाहिजे या सुरात तो म्हणाला, 'आजोबा, तुम्हाला माहीत नाही हे सामोसे पाम ऑईलमध्ये तळतात. त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल वाढते. ते जाऊद्यात. दररोज टाकून न देता अनेक वेळा तेच तेच तेल तळायला वापरतात. त्या काळ्या तेलामध्ये तळलेला ‘कुठलाही जिन्नस’ कर्करोगाला निमंत्रण देऊ शकतो.'

एवढे सगळे प्रवचन झाल्यावर सामोस्याची चव मला का कोण जाणे कडवट लागू लागली, तरी पण त्याला सांगण्यासाठी वाक्य तोंडावर आले.

'अरे, हे 'विष' मी कॉलेजच्या दिवसातल्या प्रसिद्ध ‘मिलन’ भज्यांच्या व 'प्रभात'च्या बटाटेवड्यांच्या काळापासून गेली पाच दशके खात आलो आहे आणि हे हलाहल विष पचवून ‘महादेव’ बनलो आहे.' पण, म्हंटले जाऊद्या, उगीच आणि काहीतरी कानउघाडणी व्हायची! खाण्याचे हे मोठे पाप उघडकीस आल्यावर दुसर्‍या दिवशी म्हंटले, आज नाश्त्याला साधे ब्रेड-मेयोनिज खावे. त्याचे अतिप्रमाण न बघवल्याने शेजारी बसलेला अर्जुन म्हणाला, 'आजोबा, तुम्ही जगावेगळे (Weired) खाता आहात. एका स्लाईसवर एवढे प्रचंड मेयोनीज लावत नाहीत!' हे झंझट नको म्हणून दुसर्‍या दिवशीपासून या दोन्ही राजपुत्रांचा नाश्ता उरकल्यावरच माझे खाणे चालू केले.

या सर्व ‘कालबाह्य’ आहार-विहार घटनाक्रमाच्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे, याबद्दलचा माझा गहन विचार चालू असताना एक सुखद घटना घडली.

माझ्या नागपूरच्या बहिणीची न्यूयार्कस्थित असलेली नात ‘माया’ तिच्याबरोबर आमच्याकडे चार दिवसांसाठी कोल्हापूरला आली होती. मायाचा जन्म तिकडे अमेरिकेत झाला असल्याने भारतात वर्षातून दोन वेळा १०-१२ दिवस आली की, तिच्या सर्व पंचेंइंद्रियांवर सर्व बाजूंनी एक प्रकारचा ‘हल्ला’ होतो.

वास्तव्यातील चार दिवस घरातील सर्वांचे वर्तन ती बारकाईने पाहत होती. पाचव्या दिवशी जाण्याचा दिवस आला तेव्हा जाताना मला हस्तांदोलन करून म्हणाली, 'आजोबा, यू आर कुल!' लगेच माझ्या बहिणीने मला समजावले, 'दादा, अमेरिकन तरुणाई वयस्कर लोकांना जेव्हा ‘कुल’ म्हणते तेव्हा हा त्यांचा बहुमान असतो.'

म्हंटलं खचितच माझ्यात थोडीफार सुधारणा झालेली दिसते. आता आमचे दोन राजपुत्र ‘मे’च्या सुट्टीत आल्यावर मला ‘कुल’ केव्हा म्हणतील त्या सुवर्णदिनाची मी वाट पाहत आहे.

अरे हो राहिलेच! मीपण त्यांच्यासाठी काही ‘गुगल्या’ काढून ठेवल्या आहेत. मैलावहनामधील चेंबर्सना ‘मॅनहोल’ न म्हणता पर्यायी काय म्हणावे? स्त्री ‘पोलिसमन’ व ‘पोस्टमन’ला काय म्हणावे? त्यासाठी ते येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT