‘मुंज्या’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींचा गल्ला मिळवला  pudhari file photo
बहार

Munjya Horror Movie : हॉरर कॉमेडीचा सुपरहिट मंत्र!

‘मुंज्या’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

पुढारी वृत्तसेवा

प्रथमेश हळंदे

मुंज्या’ हा हिंदी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. मराठी लोककथांवर आधारित असलेल्या या सिनेमाला सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. यामागचं खरं कारण आहे तो या सिनेमाचा जॉनर - हॉरर कॉमेडी. हा जॉनर भारतीयांना नवा निश्चितच नाही; पण या जॉनरची गेल्या दोनेक दशकांत वाढत गेलेली लोकप्रियता मात्र नोंद घेण्यासारखीच आहे.

बॉक्स ऑफिसवर 80 कोटींचा गल्ला

दोन आठवड्यांपूर्वी बॉक्स ऑफिसच्या झाडावर चढलेला ‘मुंज्या’ आता चांगलाच ठाण मांडून बसलाय. गेल्या दोन दशकांत वेगळ्या धाटणीच्या सिनेमांची निर्मिती करत नावारूपाला आलेल्या ‘मॅड्डॉक फिल्म’ या निर्मिती संस्थेचा हा सिनेमा. गेल्या दोनेक आठवड्यांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींचा गल्ला कमावलाय. या यशामागे गेल्या काही वर्षांत हॉरर कॉमेडी जॉनरला मिळालेल्या लोकप्रियतेचं योगदान नाकारता येणार नाही. गेल्या दशकभरात, हॉरर कॉमेडी या जॉनरला ‘मॅड्डॉक फिल्म्स’ने नवसंजीवनी दिल्याचं दिसून येतं. याचं प्रमुख उदाहरण म्हणजे त्यांची ‘मॅड्डॉक सुपरनॅचरल युनिव्हर्स.’ या सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये 2018 मध्ये आलेल्या ‘स्त्री’, 2021 मध्ये आलेल्या ‘रुही’ आणि 2022 मध्ये आलेल्या ‘भेडिया’चा समावेश आहे. आता ‘मुंज्या’च्या निमित्ताने यात चौथ्या सिनेमाची भर पडलीय. विशेष म्हणजे, या चारही सिनेमांची प्रेरणा ही भारतीय लोककथांमध्ये दडलेली आहे.

मुंजा हे मराठी लोककथांमधलं पात्र

पश्चिम महाराष्ट्रातल्या हाकामारीच्या गाजलेल्या आख्यायिकेचं एक कन्नड व्हर्जन ‘नाळे बा’ या नावाने लोकप्रिय आहे. याच ‘नाळे बा’चा आधार घेऊन ‘स्त्री’ या सिनेमाची निर्मिती करत ‘मॅड्डॉक’ने आपल्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या ‘रुही’मध्ये उत्तर भारतीय लोककथांमध्ये हमखास आढळणार्‍या उलट्या पायाच्या हडळीची गोष्ट सांगितली होती, तर ‘भेडिया’मध्ये अरुणाचल प्रदेशातल्या ‘यापम’ या इच्छाधारी लांडग्याची लोककथा चंदेरी पडद्यावर आणली गेली. ‘मुंज्या’मध्येही मुंजा हे मराठी लोककथांमधलं पात्र दाखवलं आहे. पूर्वेकडचा यापम, उत्तरेकडची मुडियापैरी, दक्षिणेकडचं नाळे बा आणि पश्चिमेकडचा मुंजा अशा भारतातल्या स्थानिक दंतकथांमधल्या पात्रांच्या जोरावर ‘मॅड्डॉक सुपरनॅचरल युनिव्हर्स’ सध्या उभं आहे. या युनिव्हर्सचं वेगळेपण हे हॉरर कॉमेडी जॉनरमध्ये दडलंय. वर्षानुवर्षे ज्या कथा गंभीरपणे सांगितल्या जात होत्या, त्यांना विनोदी तडका देऊन पडद्यावर आणण्याचा फॉर्म्युला ‘मॅड्डॉक’ने व्यवस्थित जमवलाय. लहानपणी वडीलधार्‍यांकडून ऐकलेल्या भुतांच्या गोष्टींचा धसका बसतो खरा; पण मोठे झाल्यावर त्याच गोष्टी ऐकून आपण पोट दुखेस्तोवर हसतो. क्वचितच असे काही अनुभव येतात, ज्याने मग पोटात गोळा येतो आणि या गोष्टी खर्‍या वाटू लागतात. भयकथांची गोडी असणार्‍या जवळपास सार्‍यांचाच हा अनुभव असतो. अगदी हाच प्रेक्षकवर्ग हेरून ‘मॅड्डॉक फिल्मस्’ हॉरर कॉमेडीचं अलौकिक विश्व भारतीयांसमोर उभं करतंय.

कशासाठी? बॉक्स ऑफिससाठी!

खरं तर, हॉरर आणि कॉमेडी म्हणजेच भीती आणि हास्यविनोद या दोन भिन्न कलाशैली आहेत. त्यांना आपापला एक हक्काचा, पण मर्यादित स्वरूपाचा प्रेक्षकवर्ग आहे; पण आता हॉरर कॉमेडीच्या रूपाने ‘अगदीच थरकाप उडवणारी, भीतीदायक, रक्तरंजित भयपटही नको आणि रंजकतेसाठी रटाळ कथेला विनोदाची फोडणी देणारे साचेबद्ध हास्यपटही नको,’ असा मध्यममार्गी विचार करणार्‍या कुंपणावरच्या प्रेक्षकांना हवा तसा सिनेजॉनर मिळालाय. अशा सिनेमांमध्ये भय उत्पन्न करणारे घटक तर असतातच; पण त्याचबरोबर, निखळ विनोदनिर्मिती करणारे प्रसंगही असावे लागतात. त्रास देणार्‍या भुतापासून सुटका हे खरं तर सगळ्याच भयपटांचं कथाबीज. हॉरर कॉमेडीमध्ये एक तर हे भूत किंवा त्याची त्रास देण्याची पद्धत किंवा त्याच्या त्रासापासून सुटका करून घेण्याचा मार्ग, यापैकी एखादा घटक किंवा सगळेच घटक विनोदी शैलीत रंगवले जातात. यात प्रामुख्याने ब्लॅक कॉमेडीचा सढळहस्ते वापर केला जातो. या जॉनरमध्ये भय किंवा हास्यापैकी कोणताही एकच जॉनर पुरेपूर वापरण्याची सक्ती नसल्याने प्रयोगशीलतेला वाव मिळतो. त्यामुळे अनेक दिग्दर्शक हा जॉनर हाताळण्यास उत्सुक असतात. त्याचबरोबर या सिनेमाला येणारा प्रेक्षकवर्ग हा साधारणतः कौटुंबिक असतो, असंही मानलं जातं. त्यामुळे, अर्थातच बॉक्स ऑफिसवरच्या अतिरिक्त कमाईचा विचार करून निर्मातेही अशा सिनेनिर्मितीला भरभरून प्रोत्साहन देतात.

भारतीय हॉरर कॉमेडी सिनेमा

1948 च्या ‘अ‍ॅबॉट अँड कॉस्टलो मीट फ्रँकेस्टाईन’ या हॉलीवूडपटापासून सुरू झालेला हॉरर कॉमेडीचा प्रवास आजही अव्याहतपणे चालू आहे. भारतात बॉलीवूडसह इतरही प्रादेशिक भाषांमध्ये हॉरर कॉमेडी सिनेमांची निर्मिती केली जाते. विशेषतः, दक्षिणेकडच्या तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम सिनेमांचा प्रभाव बॉलीवूडवर प्रामुख्याने जाणवतो. अगदी काही वर्षांपूर्वी आलेला ‘भूलभुलैया’ हा सिनेमाही ‘मनिचित्रदळू’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक होता, हे विसरून चालणार नाही. याच प्रभावाच्या यशाबद्दल बोलायचं झालं, तर ‘भूलभुलैया’ हे एकच नाव प्रकर्षाने डोळ्यांसमोर येतं. काही वर्षांपूर्वी ‘कंचना’ हा गाजलेला तमिळ सिनेमा खूप गाजावाजा करून हिंदीत ‘लक्ष्मी’ या नावाने बनवला गेला; पण त्यातून अपेक्षित परिणाम इथल्या सिनेनिर्मात्यांना साधता आला नाही; पण रिमेक्स फसले तरी ओरिजनल गाजतात, असं म्हणण्यासारखी सिनेनिर्मिती करण्यातही बॉलीवूडला यश आलेलं आहे, हे ‘मॅड्डॉक फिल्मस्’ने दाखवून दिलंय.

हॉरर कॉमेडीचं विश्व हे फक्त भुतांपुरतं मर्यादित न ठेवता, त्यात झॉम्बींचाही समावेश करून दर्जेदार सिनेनिर्मिती भारतातही झाली आहे. हिंदीतला ‘गो, गोवा, गॉन’, तेलुगू ‘झॉम्बी रेड्डी’ किंवा अलीकडचा मराठी ‘झोंबिवली’; प्रयोगशीलतेचं उदाहरण म्हणून या सिनेमांकडे बघता येतं. विशेष म्हणजे, ‘गो, गोवा, गॉन’ ही ‘मॅड्डॉक फिल्मस्’चीच एक निर्मिती आहे, तर ‘झोंबिवली’ आणि ‘मुंज्या’चा दिग्दर्शक एकच - आदित्य सरपोतदार आहे! आता ‘मुंज्या’च्या निमित्ताने, मराठीतही अशी दर्जेदार हॉरर कॉमेडी सिनेनिर्मिती का होत नाही, हा प्रश्न स्वाभाविकपणे येतोच. यावर उत्तर म्हणून अगदी ‘भुताचा भाऊ’पासून आताच्या ‘अल्याड पल्याड’पर्यंत व्हाया ‘झपाटलेला-पछाडलेला’ असा एक सिनेप्रवास प्रश्नकर्त्यांनी नक्कीच करायला हवा. योग्य आणि पुरेसं आर्थिक आणि तांत्रिक पाठबळ असेल, तर मराठीतही उत्तम हॉरर कॉमेडी सिनेनिर्मिती होऊ शकते, हे मराठी कलाकारांचा भरणा असलेला, मराठी लोककथांवर आधारित असलेला आणि मराठी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला ‘मुंज्या’ पाहून एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT