Sonali Kulkarni | आई नव्हे मैत्रीण 
बहार

Sonali Kulkarni | आई नव्हे मैत्रीण

पुढारी वृत्तसेवा

सोनाली कुलकर्णीे, अभिनेत्री

आई माझी सर्वांत जवळची मैत्रीण आहे. जगण्याच्या ओघात सहजपणे आईनं माझ्यावर खूप सुंदर संस्कार केले आहेत. मूल्यं दिली आहेत. तिच्या जगण्याची शिस्त मी अत्यंत जवळून अनुभवली आहे. तिनं आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा तिनं डबे केले. चटण्या विकल्या. आईच्या आणि माझ्या नात्यातले सगळे क्षण माझ्यासाठी संस्मरणीय आहेत. आज ( दि. 10 मे) मातृदिन. त्यानिमित्ताने...

मी कोणत्याही नात्याकडे अलंकारिक पद्धतीनं पाहत नाही. प्रत्येकाचं आईशी असणारं नातं हे जगातल्या सर्व नात्यांपेक्षा खूप वेगळं आहे. माझ्या आयुष्यात आईच्या रूपानं इतकी सुंदर व्यक्ती दिल्याबद्दल मी ईश्वराची नक्कीच आभारी आहे. आम्हा दोघींमधले बंध इतर कोणत्याच नात्याशी तुलना होऊ न शकणारे आहेत. माझ्या आईचं माहेरचं नाव शकुंतला नाईक आणि सासरचं सुचिता कुलकर्णी. लहानपणी तिचं जावळ खूप छान होतं. त्यामुळं आजोबांनी तिचं नाव शकुंतला ठेवलं होतं. तिचं बालपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निपाणीजवळ गळतगा नावाच्या गावी गेलं. पुढं धारवाड, गुलबर्गा आणि कोल्हापूर इथं तिचं शिक्षण झालं. लग्नानंतर ती पुण्यात स्थायिक झाली.

सुरुवातीपासूनच आई माझी सर्वांत जवळची मैत्रीण आहे. जगण्याच्या ओघात सहजपणे आईनं माझ्यावर खूप सुंदर संस्कार केले आहेत. मूल्यं दिली आहेत. तिच्या जगण्याची शिस्त मी अत्यंत जवळून अनुभवली आहे. आईच्या आणि माझ्या नात्यातले सगळे क्षण माझ्यासाठी संस्मरणीय आहेत. आई शब्दांतून फार व्यक्त व्हायची नाही; पण चेहर्‍यावरील हावभावातून तिच्या मनातलं सगळं कळायचं. आताच्या पिढीला प्रत्येक भावना बोलून दाखवावी लागते. माझ्या मुलीकडं पाहून मी नुसती हसत नाही, तर ‘वा’, ‘छान’, ‘व्हेरी गुड’, ‘फँटास्टिक’ असं काहीतरी म्हणते. माझ्या आईची पिढी ही चेहर्‍यावरील भावनांना मानणारी होती. त्यासाठी अधोरेखित करून शब्दांमधून व्यक्त करण्याचा मोह नसायचा त्या पिढीमध्ये. माझी आई त्यासाठीचं ठळक उदाहरण आहे. त्यामुळंच शब्दांपेक्षा तिच्या चेहर्‍यावरील भावच मला अधिक आठवतात.

आईशी जोडलेल्या आठवणींमध्ये एक महत्त्वाची आठवण असते ती शाळेची. मीही आईचं बोट धरून शाळेत गेले आहे. मला आठवतंय, मी अभिनव विद्यालयात शिशू गटात गेले तेव्हा आमच्या शाळेची इमारत बांधण्याचं काम सुरू होतं. वर्गांच्या भिंतींना गिलावा केलेला नव्हता, भिंतीच्या विटा रचलेल्या होत्या. त्या कच्च्या, गार होत्या. अशा वर्गात मी बसायचे; पण आई सोडून जाणार म्हणून खूप रडायचे. मी बाहेर येईपर्यंत तू इथंच थांब असा हट्ट करायचे. तिच्याकडून वदवून घ्यायचे. वर्गातल्या भिंतीला एके ठिकाणची वीट लावायची राहिली होती. त्या छिद्रातून आई वाळूच्या ढिगार्‍यावर बसली आहे का, हे पाहायचे. तिला तिची कामं सोडून शाळेच्या बाहेर बसून राहायला लावायचं. मी पाहतेय हे तिलाही माहीत असायचं. नंतर आमच्या मंगलताईंच्या मांडीवर बसेपर्यंत आई असायची. माझ्या मते, आमच्या किंवा आताच्या पिढीमध्ये हा संयम फार कमी दिसून येतो.

आईच्या एका गोष्टीचं मला नेहमीच कौतुक आणि अभिमान वाटत आला आहे. माझ्या बाबांना लहानपणी त्यांच्या वडिलांच्या आत्याला दत्तक दिलं होतं. बाबांची दत्तक आई- आत्या बालविधवा होती. ती कर्नाटकात राहायची. लग्नानंतर आत्यांना आणि आणखी दोन विधवा आजींना आईनं आमच्याकडं पुण्याला आणलं होतं. आईनं त्यांची शुुश्रूूषा अतिशय मनोभावेपणानं केली. आम्हा सर्वांचे जन्म, बालपण, संगोपन त्यांना पाहता आलं. ही संधी आईनं त्यांना दिली. तिच्यामुळंच कुठेतरी अंधार्‍या खोलीत राहाणार्‍या या स्त्रियांचं आयुष्य भावनासंपन्न झालं. कारण, आयुष्यात राग, लोभ, आनंद या सर्व भावना आपण जगत असतो. त्या व्यक्त झाल्यामुळं आयुष्याचं संतुलन राहतं. अन्यथा आयुष्य नीरस होऊन जातं. असं आयुष्य त्या तिघींच्याही वाट्याला आलं असतं; पण आईमुळं ते टळलं, याचं मला नेहमीच कौतुक वाटतं. आजच्या काळात घरातल्या मोठ्या माणसांना मनानंही टाकाऊ करून टाकलं जातंय. त्यांच्या औषधपाण्याचा खर्च आणि त्यांची देखभाल करायला तयार नसणारी कितीतरी कुटुंबं अवतीभवती दिसतात. ती पाहिली की, आईविषयीचं ऋण मनात दाटून येतं. आईनं अशा कोणत्याच भावनांची तमा बाळगली नाही. तिनं सर्व त्रास सहन करत त्या तिघींच्या आयुष्यासाठी जे योगदान दिलं, ते अमूल्य आहे. वयानं लहान असले, तरीही तिला याबद्दल खूप आशीर्वाद द्यावेसे वाटतात. तिच्याकडून हे शिकल्यामुळंच माझ्या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार, तंत्रज्ञ, माझ्या नव्या घरातील ज्येष्ठांबद्दल माझ्या मनात आस्था आणि आदर आहे. हे संस्कार आईचे आहेत.

आई पुण्यात आली तो काळ वेगळा होता. आधुनिकतेचं वारं तेव्हा घोंघावू लागलं होतं. जुनं सगळं झुगारण्याचे ते दिवस होते. आमची मुलं इंग्लिश शाळेत जाणार, नवरा कार घेणार अशी स्वप्न पाहाण्याचे दिवस होते; पण त्या काळातही तिनं न कंटाळता सासरचे, आत्यांचे सगळे सोवळेओवळे पाळले. सणवार केले. घरच्यांना मान देत रुढी सांभाळल्या. तिला ज्येष्ठांबद्दल खूप आदर होता. माझ्या वडिलांच्या आई-वडिलांनाही तिला सांभाळावं लागलं. त्यामुळं एकाच वेळी ती घरातील स्वयंपाकीण आणि परिचारिका अशा दोन्ही भूमिका निभावत होती. त्याचवेळी आई म्हणून असणार्‍या जबाबदार्‍याही ती आनंदानं पार पाडत होती. घरातलं आजारपणाचं वातावरण, मुलांच्या शाळा, कौटुंबिक जबाबदार्‍या, स्वयंपाक हे सर्व तिनं अत्यंत छान स्मित ठेवून पार पाडलं. हे निभावणं खूप अवघड होतं. कारण, त्याकाळी बाबाही पुण्याबाहेर असायचे. त्यामुळं मधली काही वर्षे तिच्यासाठी अवघड होती; पण या सर्वांमधूनही तिनं आमचं संगोपन अत्यंत आत्मियतेनं केलं. तिच्यामुळंच मी नृत्य शिकले. जवळपास 11 वर्षे मी माणिक अंबिकेंकडे भरतनाट्यम् शिकायला जात होते. त्या काळात आईनं कुटुंबाला कशी साथ दिली, हे आता मोठं झाल्यावर जास्त जाणवतंय.

आमच्याकडच्या स्त्रिया नोकरी करणार्‍या नव्हत्या; पण आईनं कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी घरी पाळणाघर सुरू केलं. त्यासाठी तिला इतरांचा बराच रोष पत्करावा लागला. पाळणाघरातील मुले सांभाळायची असल्यामुळं तिला अनेक समारंभांना जाता आलं नाही. तिची मुलं मोठी झाल्यावरही पाळणाघरातील मुलांची आजारपणं काढावी लागली. पाळणाघर तिनं बरीच वर्षं चालवलं. मीही त्यामध्ये तिला मदत करायचे. मला लहान भावंड हवं होतं, ती इच्छा आमच्या पाळणाघरातील मुलांमुळं पूर्ण झाली. आमच्या पाळणाघराचं नाव तिनं ‘सोनाली पाळणाघर’ ठेवलं होतं. मला अजूनही आठवतंय की गल्लीच्या कोपर्‍यावर बाबांनी त्या नावाची पाटी बसवली होती. पाळणाघर चालवतानाही ती केवळ नाममात्र रक्कम घ्यायची. आपण कशाला पैसे घ्यायचे असं तिला वाटायचं. आजही ती मुलं आईला भेटायला येतात. त्यातील अनेक मुलं तिला आई म्हणतात. त्या मुलांवरही आईनं मनापासून संस्कार केले होते. जेवताना पानात काही टाकायचे नाही, शुभंकरोती म्हणायची हे सारं तिनं शिकवलं. आयुष्याच्या जडणघडणीच्या काळात ही मूल्यं रुजवणं खूप महत्त्वाचं असतं. ते सारं मी जवळून पाहिलं आहे.

आई खूप शिस्तप्रिय आहे. काम अर्धवट ठेवायचं नाही, हे आईचं नेहमीचं वाक्य. मी चहा करायला शिकले तेव्हा तो गाळून झाल्यानंतर गाळण्यातली चहाची पावडर आधी कचर्‍याच्या डब्यात टाकायची आणि मगच चहा प्यायचा असा आईचा नियम होता. त्यामुळं आजही मी चोथ्याची विल्हेवाट लावल्याशिवाय चहा पित नाही. त्याचप्रमाणे आपले कपडे आपण धुऊन टाकणं हेही तिनं लहानपणीच आम्हाला शिकवलं. एकटी राहत असताना मला या शिस्तीचा खूप फायदा झाला. त्यामुळंच मला कधीच कामाची, कष्टाची भीती वाटत नाही. श्रमाचं महत्त्व आईनं मनावर बिंबवलं.

पूर्वी आमच्या घरी पैसे कायमच कमी असायचे; पण आईनं कधी आम्हाला ते जाणवू दिलं नाही. प्राथमिक गोष्टींची चिंता कधी वाटली नाही. मला आठवतंय, चौथीत असताना विमानानं मुंबईला जाण्याची शाळेची ट्रीप होती; पण दोन दिवस आधी वाढदिवसासाठी मला 73 रुपयांचा ड्रेस घेतला होता. ट्रीपची नोटीस आली तेव्हा आई-वडिलांनी छोटीशी मिटिंग केलेली मला अजूनही आठवतेय. हॉलचं दार पुढं करून ते बोलत बसले होते. मला जायला मिळणार की नाही, याचं खूप टेन्शन आलं होतं; पण त्यांनी इतर खर्चांना कात्री लावून मला पाठवण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात, आर्थिक परिस्थितीची झळ आईनं कधीच आम्हाला लागू दिली नाही, तरीही स्वाभिमानानं जगायला शिकवलं. आमच्याकडे पैसे नव्हते तेव्हा तिनं डबे केले. चटण्या विकल्या. मीही तिला मदत करायचे. मला तेव्हा संकोच वाटायचा. याबाबतचा एक प्रसंग मला नेहमी आठवतो. एकदा मी शाळेत लोणी, भाकरी आणि चटणी नेली होती. आमच्या वीरकर बाईंना त्याचा वास आला आणि त्यांनी ‘एक घास मला देशील का’ असं विचारलं. त्यांना चटणी खूप आवडली. त्यांनी आईकडून चटणी आणशील का, असं विचारलं. मी पैसे देईन असंही सांगितलं. दुसर्‍या दिवशी आईने भरपूर चटणी दिली; पण वर्गशिक्षिका आहेत, गुरू आहेत. त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, हे बजावलं. आईच्या या भावना आठवताना आजही डोळे पाणावतात.

आर्थिक बाबतीत तिनं आव्हानात्मक काळ पाहिला; पण स्वाभिमानाला स्मरून आणि जनलज्जेचा बाऊ न करता तिनं अविरत कष्ट केले. नंतरच्या काळात घरात सुबत्ता आली तेव्हाही ती कधी फुलपाखरासारखी विहरली नाही. चित्रपट क्षेत्रात ती सुरुवातीपासूनच माझ्यासोबत राहिली. तिच्याच साड्या, ब्लाऊज मी वापरत आले. एकदा ती घरी नव्हती तेव्हा नृत्याच्या कार्यक्रमासाठी तिची साडी, सोन्याचा नेकलेस मी कपाटातून काढून घेऊन गेले होते. आईच्या काळजात धस्स झालं होतं. ती धावत माझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आली, मी ते सगळं घातलेलं पाहून तिला आनंद झाला; पण अत्यंत शांतपणानं तिनं धोकाही समजावून सांगितला.

माझ्या पहिल्या शूटिंगलाही आई-बाबा आले होते. गिरीश कर्नाडांचं नाव ऐकून त्यांना विश्वासार्हता वाटली. माझ्या तामिळ चित्रपटाच्या शूटिंगलाही ती आली होती. अमोल पालेकर, जब्बार पटेल यांच्यासारख्यांना माझं काम आवडतं, माझा मित्र सुनील सुकथनकर हे सर्व माझ्याबद्दल काय म्हणतात हे तिच्या लेखी महत्त्वाचं होतं. सचिन कुंडलकरला तिनं सांगितलं होतं की, तुझं समाधान होईपर्यंत सोनालीकडून काम करून घे. दिग्दर्शकांना काम पटलं पाहिजे, हे तिला महत्त्वाचं वाटतं. हे क्षण मलाही आत्मपरीक्षण करायला लावतात. वाटतं कुठल्या पिळाची माणसं आहेत ही! आपल्या मुलांचं मार्केटिंग करणारे खूप पालक मी पाहिले आहेत; पण त्याचा लवलेश माझ्या आईमध्ये कधीच दिसला नाही. असे आई-वडील लाभले, याचा निश्चितच अभिमान वाटतो.

(शब्दांकन : अंजली महाजन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT