Metro 
बहार

आहे मेट्रो तरी...

पुढारी वृत्तसेवा

सुनील माळी

मेट्रो हे सार्वजनिक वाहतुकीचे सर्वात समर्थ साधन आहे. अत्यंत गर्दीच्या म्हणजेच ताशी ४० हजार ते एक लाख प्रवासी संख्या असलेल्या मार्गांवर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन अत्यंत स्वागतार्ह आहे. कारण, मेट्रो हा शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा रामबाण उपाय आहे; मात्र केवळ मेट्रो मार्गांची आखणी झाली म्हणजे प्रश्न सुटत नाही, तर इतर सर्व वाहतूक साधनांची एकात्मिक गुंफण करायला हवी.

पुण्यातील मेट्रो या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेच्या तिसऱ्या मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच हिरवा झेंडा दाखवला आणि पुण्याच्या वाहतूक यंत्रणेला आणखी बळ मिळाले. राज्यातल्या मुंबई, नवी मुंबई, नागपूर या शहरांमधील मेट्रोसेवेचा विस्तार कार्यक्रम वेगाने होत असल्याने मेट्रोचाच सर्वत्र बोलबाला सध्या होतो आहे. असे असले, तरी या महानगरांतील वाहतूक समस्या संपूर्णपणे सोडवण्यासाठी केवळ मेट्रो योजनाच पुरेशी ठरेल, असा भ्रम निर्माण झाला, तर तो चुकीचा ठरेल. मेट्रो हे सार्वजनिक वाहतुकीचे सर्वात समर्थ साधन आहे; पण वाहतूक समस्या समग्ररीत्या सोडवण्यासाठी साध्या सायकलीपासून ते बससेवेपर्यंतच्या आणि लाईट रेल ट्रान्झिटपासून ते उपनगरी रेल्वेपर्यंतच्या अनेक साधनांचा समावेश असलेली एकात्मिक वाहतूक व्यवस्था हवी, तसेच हवे आहे ही योजना शास्त्रशुद्धरीत्या उभारण्याचे व्यवस्थापकीय कौशल्य आणि भान.

प्रत्येक क्षेत्राचे स्वतंत्र असे शास्त्र असते. घरबांधणी करण्याचे काम प्राध्यापक करू शकत नाही, तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम कपडे शिवण्याचे काम करणारा कारागीर करू शकत नाही. घर बांधण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीचे, तर शिकवण्यासाठी अध्यापनाचे रीतसर शिक्षण घ्यावे लागते. ही दोन्ही कामे जशी शास्त्राधारित आहेत, तसेच महानगरांमधील वाहतूक यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया करण्यासाठीही स्वतंत्र वाहतूक शास्त्राचे धडे घ्यावे लागतात. प्रत्यक्षात वाहतूक शास्त्राचा काडीचाही गंध नसणारी, नेत्यांपासून ते महसूल विभागापासून ते लेखा विभागापर्यंतचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या अनेकांकडून महानगराच्या वाहतुकीचे आराखडे बनवले जातात आणि अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने ते राबवले जातात. त्यातूनच महानगरांमधील वाहतूक समस्या अधिकाधिक गंभीर बनत जाते.

सुरुवातीला एक मुख्य सूत्र लक्षात ठेवले पाहिजे की, महानगरांतील वाहतुकीची समस्या सोडवायची म्हणजे केवळ रुंद रस्ते, टोलेजंग, लांबचलांब उड्डाणपुलांची उभारणी करायची, ही चुकीची समजूत काढून टाकली पाहिजे. नवे, रुंद रस्ते आणि पुलांची मर्यादित अर्थाने गरज आहेच; पण पुलांच्या जाळ्यांनी शहर भरले म्हणजे वाहतूक समस्या सुटली असे होत नाही. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी गरजेची आहे ती सार्वजनिक वाहतूक यंत्रणा. आता सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतील कोणताही प्रकार कुठेही वापरला म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यासाठी शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करावा लागतो आणि त्यामध्ये कोणता वाहतूक प्रकार कुठे वापरायचा, याचे अचूक शास्त्रीय उत्तर तुमच्याकडे लागते. तुमच्या शहरातील नागरिक रोज कोणकोणते मार्ग वापरतात, त्यापैकी कोणते मार्ग मध्यम गर्दीचे, तर कोणते मार्ग प्रचंड गर्दीचे आहेत. त्यावरून त्या त्या मार्गावर कोणता वाहतूक प्रकार वापरायचा ते ठरते. वाहतूक शास्त्राच्या भाषेत एका दिशेला एका तासाला किती प्रवासी जातात म्हणजेच पँसेंजर पर अवर पर डायरेक्शन - पीपीएचपीडी किती आहे, त्यावरून कोणता वाहतूक प्रकार योग्य ते ठरते. सर्वसाधारण शहर बसची क्षमता ताशी १ ते ४ हजार प्रवासी, उच्च वारंवारितेची बससेवा ४ ते ८ हजार प्रवासी, बस प्राधान्य मार्गिका म्हणजेच बस रॅपिड ट्रान्झिट-बीआरटी साडेसात ते १५ हजार प्रवासी, ट्राम वे ५ ते १५ हजार प्रवासी, लाईट रेल ट्रान्झिट १५ ते ४५ हजार प्रवासी, लाईट आणि मीडियम मेट्रो ४० ते ७५ हजार प्रवासी, तर अतिउच्च क्षमतेची मेट्रो ७५ हजार ते १ लाख प्रवासी अशी असते. म्हणजेच तुमच्या शहरातील काही मार्गांवर साधी बस, काही मार्गांवर बीआरटी, तर काही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करावी लागेल. पूर्वी 'बसचा मार्ग आमच्या वॉर्डातल्या अमुक रस्त्यापर्यंत आणा' अशा प्रकारे मागण्या जशा करण्यात येत, तशीच मागणी मेट्रोबाबतही करण्यात येऊ लागल्याचे ऐकायला येते... असो.

जवळच्या वाहतुकीसाठी सायकलीसारखी नॉनमोटराईज्ड ट्रान्स्पोर्ट तसेच इतर मार्गांसाठी साधी बस, बीआरटी, एलआरटी, ट्राम वे, मेट्रो आदी विविध प्रकारच्या वाहतूक यंत्रणांचे जाळे अचूक विणले गेले पाहिजे. शहरे आणि महानगरांतील बससेवा मजबूत असेल, तर वाहतुकीची समस्या बऱ्याच अंशी सुटू शकते आणि अगदी प्रचंड गर्दी होणाऱ्या मार्गांवर मेट्रो सेवा उभारली, तर यंत्रणा परिपूर्ण होऊ शकते. बससेवा मजबूत म्हणजे नेमके काय, तेही वाहतूक शास्त्रात सांगितले आहे. शहरातील प्रत्येक एक लाख लोकसंख्येला किती बसगाड्या लागतील, याचेही निकष आहेत आणि ते प्रत्येक महानगराच्या स्थितीनुसार कमी-अधिक होऊ शकत असले, तरी सरासरीने प्रत्येक लाख लोकसंख्येला साठ बसगाड्या एवढे ढोबळ सूत्र आहे.

मेट्रोसेवा सुरू झालेल्या या महानगरांतील बससेवा गरजेच्या निम्मीही नाही. केवळ नवी मुंबईत ती कशीबशी निम्मी आहे. राज्यातील शहरांमधील बससेवा पुरेशी, बळकट नसल्यानेच या शहरांतील खासगी वाहनांची संख्या वाढली आणि वाहतुकीची समस्या निर्माण झाली, असा निष्कर्ष काढता येतो.

महानगरांतील अनेक मार्गांवरील प्रवासी संख्येसाठी आता बससेवा पुरी पडत नाही आणि त्या मार्गांवर मेट्रोसेवा सुरू करावी लागते, ही बाबही निर्विवाद सत्य आहे. अशा अत्यंत गर्दीच्या म्हणजेच ताशी ४० हजार ते एक लाख प्रवासी संख्या असलेल्या मार्गांवर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन अत्यंत स्वागतार्ह आहे. कारण, मेट्रो हा शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा रामबाण उपाय आहे; मात्र केवळ मेट्रो मार्गांची आखणी झाली म्हणजे प्रश्न सुटत नाही, तर इतर सर्व वाहतूक साधनांची एकात्मिक गुंफण करायला हवी. घरातून बाहेर पडल्यानंतर पाचशे मीटर म्हणजेच अर्ध्या किलोमीटर अंतरामध्ये कोणती ना कोणती सार्वजनिक वाहतूक सेवा असली पाहिजे. नागरिकांच्या घरापासून ते मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीपर्यंत पोहोचण्यासाठी फिडर बससेवा म्हणजेच लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सक्षम असणे गरजेचे असते. प्रत्येक महानगरांतील वाहुतकीच्या नियोजनाचा प्राधान्यक्रम थोडाबहुत बदलतो. मुंबईत उपनगरी रेल्वे, हेवी मेट्रो, बेस्ट बससेवा आणि फिडर बस यांची एकात्मिक यंत्रणा हवी. पुण्यात मेट्रो, बससेवा, फिडर सेवा गरजेची आहे. नागपुरात मेट्रो बससेवा आणि इलेक्ट्रिक फिडर बस, तर नवी मुंबईत मेट्रो, नवी मुंबई महानगर ट्रान्स्पोर्ट बससेवा, रेल्वे आणि फिडर बससेवा यांचा समन्वय करावा लागेल. याशिवाय सर्वच शहरांत सुरक्षित आणि सलग पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि सार्वजनिक म्हणजेच भाडेतत्त्वावरील सायकल सेवा, शेअर रिक्षा, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांना जोडणारी फिडर बससेवा, एकात्मिक तिकीट कार्ड, पार्किंगचे शास्त्रीय नियोजन, वाहतुकीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा सार्वजनिक वाहतुकीचे नागरिकांना परवडणारे दर यांचाही विचार होणे अगत्याचे ठरते.

थोडक्यात काय, तर मेट्रो आली अन्‌ वाहतूक कोंडीतून सुटका झाली, अशी भावना चुकीची ठरते आणि सर्वंकष वाहतूक आराखड्याचा गांभीर्याने विचार तसेच अंमलबजावणी आवश्यक ठरते, एवढे लक्षात आले तरी पुरे!

महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये आतापर्यंत १९६ किलोमीटर मेट्रो मार्ग तयार झाले आहेत. मुंबई ९०.५, नवी मुंबई ११.१, नागपूरमध्ये ३८.२, तर पुण्यात ५६.३ किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार होऊन त्यांचा वापर सुरू झाला आहे. त्याचप्रमाणे या सर्वच ठिकाणी नव्या मार्गांचे नियोजनही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT