महेश कोळी, आय.टी.तज्ज्ञ
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात तंत्रज्ञान कंपन्या सर्वोत्तम संशोधक मिळवण्यासाठी जणू खेळाडू खरेदीच्या हंगामात उतरल्याप्रमाणे धडपड करत आहेत. मॅट डिट्के या 24 वर्षीय एआय संशोधकाला तब्बल 250 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 2,080 कोटी रुपये) पॅकेज - दरमहा 200 कोटी रुपये पगार देऊन मेटाने आपल्या संघात सामील करून घेतले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील संगणकशास्त्रातील पीएच.डी. कार्यक्रम सोडून उद्योग क्षेत्रात आलेल्या मॅटने सुरुवातीला मेटाकडून मिळालेल्या 125 दशलक्ष डॉलर्सच्या चार वर्षांच्या ऑफरला नकार दिला होता.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सुरू केलेली धडाकेबाज भरती मोहीम सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या मोहिमेत अमेरिकेतील ‘थिंकिंग मशिन्स लॅब’ या स्टार्टअपमधील कुशल कर्मचार्यांना झुकेरबर्ग यांनी अतिशय आकर्षक ऑफर दिल्या. त्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिला तो 24 वर्षीय तरुण संशोधक मॅट डिट्के. त्याला सुरुवातीला तब्बल 125 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे एक हजार कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, डिट्केने ही ऑफर नाकारली. यापुढे स्वतः झुकेरबर्ग त्याला भेटण्यासाठी गेले आणि ऑफर दुप्पट करत 250 दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास 2200 कोटी रुपयांची केली. इतकी मोठी रक्कम ऐतिहासिक मानली जात आहे. कारण, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील पगार पॅकेजेसमध्ये ही ऑफर अत्यंत दुर्मीळ आहे. डिट्केने त्वरित होकार न देता मित्रांशी सल्लामसलत करण्याचा निर्णय घेतला. अखेरीस त्याने ही ऑफर स्वीकारली.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधन क्षेत्रात मॅट डिट्के हे एक प्रसिद्ध नाव आहे. वॉशिंग्टन विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात पीएच.डी.साठी प्रवेश घेतल्यानंतर त्याने अभ्यासक्रम अपूर्ण सोडून प्रत्यक्ष संशोधनात उतरायचा निर्णय घेतला. यानंतर त्याने सिएटल येथील ‘अॅलन इन्स्टिट्यूट फॉर एआय’मध्ये काम सुरू केले. येथे असताना त्याने ‘मोल्मो’ नावाच्या अत्याधुनिक मल्टिमोडल चॅटबॉटच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. ‘मोल्मो’ हे केवळ मजकूर समजणारे साधन नव्हते, तर ते प्रतिमा, ध्वनी आणि त्यांचा संदर्भही समजून घेत होते. या प्रकल्पावर सादर केलेल्या संशोधनपत्राला 2022 मध्ये नेयुरआयपीएस या जगातील प्रतिष्ठित परिषदेत ‘आऊटस्टँडिंग पेपर अॅवॉर्ड’ मिळाला. दहा हजारांहून अधिक संशोधनपत्रांमधून मोजकीच निवडली जातात. त्यामुळे डिट्केचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावले.
डिट्केने 2023 च्या अखेरीस ‘व्हरसेप्ट’ नावाचे स्वतःचे स्टार्टअप सुरू केले. त्यात केवळ 10 कर्मचारी असून, माजी गुगल सीईओ एरिक श्मिट यांचा समावेश गुंतवणूकदारांमध्ये आहे. ‘व्हरसेप्ट’चे उद्दिष्ट पारंपरिक एआय साधनांपेक्षा वेगळे आहे. इथे विकसित होणारे एआय एजंटस् केवळ आदेश मिळाल्यावरच कार्य करत नाहीत, तर स्वतःहून उद्दिष्ट ठरवतात. इंटरनेटवर शोध घेतात, विविध डिजिटल वातावरणात क्रिया करतात आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात.
उदाहरणार्थ, वापरकर्त्याने एखाद्या प्राण्याचा फोटो अपलोड केला, त्याचवेळी आवाजातील प्रश्न विचारला आणि लिखित स्वरूपात पूरक माहिती दिली, तरीही ‘मोल्मो’ने तिन्ही माध्यमांचा संदर्भ एकत्रित करून उत्तर देण्याची क्षमता विकसित केली होती. ही मानवी मेंदूच्या जाणिवेसारखी प्रक्रिया मानली जाते. यामुळे मेटासारख्या कंपन्यांना असे संशोधक हवे होते, जे केवळ सैद्धांतिक नव्हे, तर वास्तवात परिणामकारक असे तंत्रज्ञान तयार करू शकतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ‘सुपरइंटेलिजन्स लॅब’ ही मेटाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या लॅबमध्ये आधीच गुगल, अॅपल, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधून अब्जावधी खर्च करून टॅलेंट आणले गेले आहे. अलीकडेच अॅपलच्या एआय मॉडेल्स टीमचे प्रमुख राहिलेले रुओमिंग पांग यांना 200 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त मानधन देऊन मेटाने जोडले. त्या पार्श्वभूमीवर डिट्केसाठी केलेली 250 दशलक्ष डॉलरची ऑफर ही मेटाच्या धोरणाची पुढची पायरी होती.
डिट्केचा प्रवास आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलते समीकरण दाखवतो. आजचे सर्वोच्च संशोधक केवळ कर्मचार्यांच्या भूमिकेत न राहता स्वतंत्र विचारवंत आणि उद्योजक म्हणून पुढे येत आहेत. डिट्केने सुरुवातीला मेटाची ऑफर नाकारून स्वतःचे संशोधन आणि स्टार्टअपला प्राधान्य दिले, यावरून या क्षेत्रातील आत्मविश्वास किती वाढला आहे, हे दिसते. अखेरीस मेटाशी केलेला करार बिग टेक कंपन्यांचे वर्चस्व दाखवत असला, तरी संशोधक आता त्यांच्या अटींवर करार करण्याच्या स्थितीत आहेत.
आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता शर्यतीत पैसा पुरेसा नाही, तर द़ृष्टी, स्वातंत्र्य आणि संशोधनाच्या पुढील टप्प्यांचे नियोजन हेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. मेटा, गुगल, अॅपल आणि ओपन एआय यांच्यातील ही स्पर्धा पुढील काही वर्षांत मानवी तंत्रज्ञानाच्या इतिहासातील सर्वात मोठा टप्पा ठरू शकते.
येत्या काही वर्षांत आरोग्यसेवा, उद्योग, शिक्षण, सुरक्षा आणि दैनंदिन जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत आमूलाग्र बदल होणार आहेत. मानवाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल; परंतु त्यासोबत नैतिकता, गोपनीयता आणि रोजगार यांसारखी आव्हानेही तीव्र होणार आहेत. मॅट डिट्केचा प्रवास हे दाखवतो की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासातील पुढचे पर्व केवळ संशोधन प्रयोगशाळांमध्ये नाही, तर अशा धाडसी तरुणांच्या हातात आकार घेणार आहे, जे आपल्या कल्पकतेला व्यावसायिक आणि तांत्रिक दोन्ही पातळ्यांवर यशस्वी करू शकतात.
जगाच्या तंत्रज्ञान नकाशावर ही घडामोड नवा अध्याय लिहीत आहे. एकेकाळी शांत प्रयोगशाळांत सुरू असलेले संशोधन आता अब्जावधींच्या व्यवहारांमध्ये बदलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्पर्धेत आता मेंदूच सर्वात मोठी भांडवल ठरला आहे आणि पुढील दशकात याच भांडवलावर डिजिटल जगाचे भविष्य उभे राहणार आहे.