प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून निश्चित फलनिष्पत्ती देणारा हा एक पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे) म्हणजे कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती हे आपले वेगळेपण होय. भारतीय संस्कृतीच्या एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. आजच्या शुभदिनी ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता भाव प्रकट करणे, हाच खरा या उत्सवाचा संदेश होय.
अक्षय तृतीया हा उत्सव भारतीय संस्कृतीमधील कृषी संस्कृतीशी नाते जोडणारा उत्सव होय. गुढीपाडव्याला शेतीमधील कामांची मशागत सुरू होते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी धूळ पेरणी केली जाते. म्हणजे, शेतीमधील पूर्व तयारी आणि पेरणीची पर्वणी यातील सुवर्णधागा प्रकट करतो तो उत्सवाचा दिवस म्हणजे ‘अक्षय तृतीया’ होय. भारतीय संस्कृतीची महानता ही आहे की, आपण आपल्या बळीराजाच्या हिताचा व कल्याणाचा विचार करून सण व संस्कृती उत्सवाचे नियोजन केले आहे. अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. हा पेरणीचा मुहूर्त असून ऐश्वर्य व संपन्नता आणणारा आहे. या दिवशी पेरणी केल्यास धनधान्याची विपुलता होते, असा समज प्राचीन काळापासून रूढ आहे व तो गतकालीन इतिहास व अनुभवाने सिद्ध केलेला आहे.
शेतीसंबंधीच्या परंपरा
अक्षय तृतीयेच्या इतिहासात डोकावले असता अनेक आख्यायिकांचे गुंफण त्याभोवती झाले आहे. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करण्यात येते. मातीत आळी घालणे व पेरणी या प्रक्रिकेस या दिवशी प्रारंभ होतो. अक्षय तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. थोडक्यात काय, तर मशागत म्हणजे नांगरलेल्या शेत जमिनीची साफसफाई करून खतमिश्रित मातीच्या थरांना खाली-वर करणे होय. बळीराजा आपल्या काळ्या आईची सेवा करताना ही मशागत मोठ्या निष्ठेने करीत असतो. या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. खासकरून महाराष्ट्रातील कोकण भागात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धारणा आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे. वनौषधीच्या आधारे आयुर्वेदीय वनस्पतीची लागवड करून नव्या जगावर भारतीय आरोग्य पद्धतीचा प्रभाव टाकण्याचा आपण पुनश्च: संकल्प केला पाहिजे.
पारंपरिक संदर्भ व नवा अर्थ
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. ‘कालविवेक’ ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशेष आहे. या दिवसाला ‘आखा तीज’ असेही म्हटले जाते. अक्षय तृतीया या उत्सवाचे पारंपरिक संदर्भ लक्षणीय आहेत. त्यामागे इतिहास, परंपरा व विज्ञान याचा मनोज्ञ संगम घडून आला आहे. या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती साजरी केली जाते. तसेच इतिहासात डोकावून पाहिले असता असे दिसते की, या दिवशी परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंतीही विशेषत्वाने साजरी केली जात असते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचा लेखनिक म्हणून गणपतीने कार्य केले अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. महर्षी व्यासांनी श्री गणेशाच्या साह्याने महाभारतासारखे महान काव्य रचले. त्याप्रमाणे वर्तमान युगातही नव्या ज्ञानरचना या पवित्र दिवसाच्या शुभ मुहूर्तावर केल्या पाहिजेत, असा आग्रह धरला जातो, तो सार्थ होय. याचा अर्थ असा की, अक्षय तृतीयेच्या शुभदिनी भारताने ज्ञानयुगात प्रवेश केला व उभ्या विश्वाच्या इतिहासावर भारतीय ज्ञान परंपरेचा ठसा उमटविला. महर्षी व्यासांपासून आधुनिक काळातील डॉ. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत सर्व विद्वज्ञांनी ज्ञानाची अखंड उपासना करून अशक्य ते शक्य करून दाखविले आणि म्हणूनच ते तेजपुंज हिरा ठरले.
भारतामध्ये चारधाम यात्रेत बद्रिकेदार या देवस्थानास विशेष महत्त्व आहे. जन्माला आलेला प्रत्येक भारतीय या बद्रिकेदाराचे दर्शन घेऊन धन्य होतो. परंपरा असे सांगते की, या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रिनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. याचा अर्थ असा की, या पवित्र देवस्थानाचे अक्षय तृतीयेस खुले झालेले दरवाजे हे प्रत्यक्ष दीपावलीच्या पाडव्यापर्यंत खुले असतात. नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते, असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते आणि त्याच्या क्षात्र तेजाला नमन केले जाते. परशुरामाचा हा अवतार अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी उदयास आला असे मानले जाते. तसेच मध्ययुगात विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजाला समता व बंधुत्वाचा संदेश देणार्या महात्मा बसवेश्वरांचा जन्मसुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला. आपल्या परंपरेतील दोषांविरुद्ध बंड करावयाचे आणि मुख्य प्रवाहाशी भक्कम नाते ठेवायचे हा आपल्या सुधारणांचा आत्मा होय. दोषांचे निदार्र्लन आणि प्रगतीचा व परिवर्तनाचा पुनरुच्चार हा आपल्या परंपरेचा मध्यवर्ती धागा होय. तो अक्षय तृतीयेने जपला आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभदिनी आणखी काही संदर्भ लक्षात घेण्यासारखे आहेत. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. भारतीय पुरातत्त्व विद्येतील मूर्ती विज्ञानाचे काही अद्भुत व अनाकलनीय संकेत आहेत, त्यापैकी हा होय. परंपरा आणि नवता याचा विचार करता काही सूत्रे संपूर्णपणे स्वीकारायचे की नाहीत, हे ज्याचे त्याने ठरवायचे; परंतु असे मानले जाते की, जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो. विज्ञान युगात अशा कल्पना स्वीकारता येत नाहीत; परंतु आध्यात्मिक अनुभव म्हणून लोक त्याचे शतकानुशतके पालन करत आहेत. त्यामागील वैज्ञानिक द़ृष्टी समजून घेतली पाहिजे.
दानाचे आगळे महत्त्व
अक्षय तृतीया हा दिवस ज्ञान पूजनाप्रमाणेच दानाच्या संदर्भातही महत्वाचा आहे. महाकाव्यकालीन संदर्भ असे सांगतात की, कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षय तृतीया’ असे म्हटले आहे. कोणतेही दान हे पवित्र भावनेने केलेले असल्यास त्याचा र्हास होत नाही, ते सत्पात्री दान ठरते. त्यागापेक्षा दान श्रेष्ठ मानावे काय, याचे उत्तर ज्याचे त्याला द्यावे लागेल. या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे. भगीरथाने अखंड तपश्चर्या केली आणि हिमालयातून गंगा अवतरली. गंगेच्या खोर्यात कृषी व फलोत्पदानाची क्रांती झाली आणि आर्यानी पहिला वेद ऋग्वेद लिहिला. ऋग्वेदाचे लेखन म्हणजे कृषी क्रांतीची पहाट होय असे मानले जाते. त्याचासुद्धा सांकेतिक दिवस अक्षय तृतीयेशी निगडीत आहे.
जैन परंपरेचा अर्थ
विविधतेतील एकता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होय. अक्षय तृतीयेचा त्यामुळे जैन, बौद्ध व शिख परंपरेशी संदर्भ जोडला जातो. पहिले तीर्थंकर व जैन धर्माचे आद्य संस्थापक भगवान वृषभदेव हे होते. त्यांना पूर्णता प्राप्त करण्यासाठी वर्षभर तप करावे लागले. त्याकाळात त्यांनी अन्न-पाणी ग्रहण केले नव्हते. अंगीकृती व्रताचे त्यांनी निश्चयाने पालन केले. वर्षभरानंतर व्रत समाप्ती झाल्यावर हस्तिनापूर येथे त्यांचे आगमन झाले, तेव्हा तेथील हिंदू राजाने त्यांना उसाचा रस पाजला. हा दिवस अक्षय तृतीयेचा होता अशी जैन धर्मात धारणा आहे. यावरून प्राचीन काळात असलेली धर्म सहिष्णुता आणि सौहार्द भाव याचे दर्शन घडते. विविधतेतील एकता हा सुवर्णधागा अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी अधिक भक्कम होतो.
सांस्कृतिक विविधतेचा धागा
अक्षय तृतीया हा उत्सव सांस्कृतिक विविधतेचा धागा बळकट करणारा आहे. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजन करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने आपल्या सहकार्यांना घरी बोलावून मोगर्याची फुले किंवा गजरा, आंब्याची डहाळी आणि पन्हे देतात. त्या हळदी-कुंकू समारंभांचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो. त्याचा अर्थ असा की, सामाजिक जीवनात स्नेहबंध जोपासणे ही बाब महत्त्वाची असून ती परस्पर सहजीवनाचा नवा आदर्श सांगते.
अक्षय तृतीया या दिवसाचा भारतीय कालगणनेत विशेष संदर्भ आहे. त्याचे कारण असे की, अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी दुसर्या युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्षे मिळून होणार्या काळाला ‘महायुग’ असे म्हणतात. ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादी’ तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे ‘युगादी’चा क्षण होय. त्यामुळे दक्षिण भारतात व कर्नाटकात हा सण युगादी म्हणून ओळखला जातो. नव्या ज्ञानयुगाची सुरुवात या दिवशी होते, असा अन्वयार्थ काढता येईल.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरवड्या इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट दान केला जातो. असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते. श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यामध्ये एक पुसट रेषा असते. त्यामध्ये अंधश्रद्धांचा शिरकाव होणार नाही, एवढी काळजी निश्चित घेतली पाहिजे.
भारताच्या विविध प्रांतात हा उत्सव वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. राजस्थानात हा दिवस शुभ मुहूर्त म्हणून साजरा केला जातो. राजस्थानात या दिवसाला ‘आखा तिज’ असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह संपन्न करण्याची पद्धत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील काही प्रथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या प्रदेशातील व्यापारीवर्गात अक्षय तृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. ‘हालकटा’ या नावाने गणपती आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी लोक नव्या हिशेबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात. ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा जगन्नाथाच्या इतिहास व परंपरेशी संबंध आहे. या प्रांतात शेतकरीवर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला ‘मुठी चूहाणा’ म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो.
उत्तर भारतात काही वेगळ्या परंपरा आहेत. या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात. परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे, असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू व केरळातही अक्षय तृतीया विविध परंपरेतून साजरी केली जाते. महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात. कर्नाटकात उगादी या नावाने हा सण साजरा केला जातो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतीय जीवनातील अपूर्व व अद्भुत असा सांस्कृतिक परंपरेचा सुवर्णधागा अक्षय तृतीयेच्या उत्सवाने जोडलेला आहे.
समारोप
भारतीय संस्कृती समृद्ध व संपन्न आहे. आपण आपल्या उत्सवातून सांस्कृतिक परंपरेचा हा ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे दिला आहे, याची नोंद मा. स. गोळवलकर यांनी ‘आपले उत्सव’ या पुस्तकात केली आहे. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असून निश्चित फलनिष्पत्ती देणारा हा एक पवित्र दिवस असल्याचे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय’ (न संपणारे) म्हणजे कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणार्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. तसेच आपल्या पूर्वजांच्या, ऋषीजनांच्या पूजनामुळे ज्ञान परंपरा अधिक संपन्न होते.
ज्ञान- विज्ञानाच्या उपासनेतून सांस्कृतिकतेची जडणघडण होते. कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती हे आपले वेगळेपण होय. भारतीय संस्कृतीच्या एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. आजच्या शुभदिनी ज्ञान, विज्ञान व संस्कृतीची पूजा करणे व आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता भाव प्रकट करणे, हाच खरा या उत्सवाचा संदेश होय.