marriage Pudhari
बहार

Late marriage trend: उशिरा लग्न करण्याकडे ‘प्रौढ‌’ तरुणाईचा कल!

चाळिशीत किंवा चाळिशीनंतर लग्न करण्याचा निर्णय आजकाल अधिक सामान्य होताना दिसतो

पुढारी वृत्तसेवा
कावेरी गिरी

चाळिशीत किंवा चाळिशीनंतर लग्न करण्याचा निर्णय आजकाल अधिक सामान्य होताना दिसतो. समाजातील बदलती जीवनशैली, करिअरकेंद्री विचारसरणी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मिळालेलं महत्त्व यामुळे अनेक जण उशिरा लग्न करण्याचा पर्याय निवडतात. एकेकाळी पंचविशी ओलांडली की, घरात लग्नाचा विषय निघायचाच. तिशी गाठली की ‌‘आता तरी बघा‌’ असा दबाव वाढायचा; पण आज चित्र बदलताना दिसत आहे. शहरांमध्येच नव्हे, तर निमशहरी भागातही चाळिशी किंवा चाळिशीनंतर लग्न करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या वाढताना दिसते. काही जण उशिरा लग्न करतात, तर काही जण लग्न न करण्याचाही निर्णय घेतात. हा बदल केवळ वैयक्तिक नाही, तो सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर घडणाऱ्या बदलांचा परिणाम आहे. हा ट्रेंड नेमका का वाढतो आहे? तरुण पिढी नेमकं काय विचार करते?

करिअरकडे झुकलेला फोकस

आजचा तरुण वर्ग अधिक शिक्षित आहे. परदेशी शिक्षण, नोकरीच्या संधी, स्टार्टअप संस्कृती, कॉर्पोरेट जगतातील स्पर्धा या सगळ्यामुळे करिअरला प्राधान्य देणे ही गरज बनली आहे. चांगले शिक्षण घेण्यासाठी पंचविशीपर्यंत शिक्षण सुरू असते. त्यानंतर स्थिर नोकरी मिळवणे, स्वतःचे आर्थिक पाय भक्कम करणे, घर घेणे, कर्जफेड करणे या सगळ्याला वेळ लागतो.

विशेषतः महिलांमध्ये हा बदल स्पष्ट दिसतो. स्वतःच्या पायावर उभे राहणे, आर्थिक स्वावलंबन मिळवणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे याला त्या अधिक महत्त्व देतात. त्यामुळे आधी करिअर, मग लग्न असा विचार दृढ होत आहे.

स्वातंत्र्य आणि स्वतःची जागा

आजच्या तरुणांना वैयक्तिक स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे वाटते. नवीन छंद जोपासणे, मित्रपरिवारासोबत वेळ घालवणे, स्वतःच्या आवडीनिवडी शोधणे या गोष्टी लग्नानंतर मर्यादित होऊ शकतात अशी भीती काहींना वाटते. लग्न म्हणजे जबाबदारी, तडजोड आणि कुटुंबाशी बांधिलकी. अनेकांना वाटते की, अजून स्वतःला पूर्ण ओळखलेले नाही. मग, दुसऱ्याशी आयुष्यभराची बांधिलकी कशी घ्यावी? त्यामुळे आधी स्वतःला शोधूया, हा दृष्टिकोन वाढताना दिसतो. चाळिशीपर्यंत अनेकांनी प्रवास, स्वतःची वाढ (ीशश्रष सुेीींह) यावर लक्ष केंद्रित केलेलं असतं. लग्न हा आयुष्यभराचा निर्णय असल्याने काही जण स्वतःला पूर्ण ओळखल्यानंतर तो घेतात.

नात्यांविषयी बदललेली दृष्टी

पूर्वी लग्न हे समाजमान्य आणि अपरिहार्य पाऊल मानले जात असे. आज मात्र नात्यांविषयी दृष्टी बदलली आहे. प्रेमसंबंध, लिव्ह इन रिलेशनशिप, सिंगल राहणे, हे पर्याय खुलेपणाने स्वीकारले जात आहेत.

आर्थिक वास्तव आणि अस्थिरता

आजच्या काळात आर्थिक स्थैर्य सहज मिळत नाही. नोकऱ्यांमध्ये अस्थिरता, करारावर आधारित रोजगार, वाढती महागाई आणि घरांच्या किमती या सगळ्यामुळे लग्नाचा निर्णय पुढे ढकलला जातो. घर, गुंतवणूक, बचत यामध्ये स्थैर्य आल्यावर अनेकांना लग्न सुरक्षित वाटू लागतं. आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्याची तयारी झाल्यावर निर्णय घेतला जातो. लग्न म्हणजे खर्च, समारंभ, नंतर मुलांचे शिक्षण, आरोग्य या सर्व गोष्टींसाठी मोठी आर्थिक तयारी लागते. आधी स्वतःची आर्थिक सुरक्षितता निर्माण करू, मग लग्नाचा विचार करू, अशी मानसिकता अनेकांमध्ये दिसते.

योग्य जोडीदाराच्या शोधात

आजचा तरुणवर्ग जोडीदाराबाबत अधिक जागरूक आहे. केवळ कुटुंबाची पसंती किंवा समाजाची अपेक्षा यावर निर्णय घेतला जात नाही. समान विचार, करिअरची समज, वैयक्तिक स्वातंत्र्याची जाणीव, भावनिक जुळवून घेण्याची क्षमता या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. कधी कधी योग्य व्यक्ती मिळेपर्यंत थांबणे हा पर्याय निवडला जातो. त्यामुळे लग्नाचे वय पुढे ढकलले जाते.

लग्न न करण्याचा ठाम निर्णय

काही तरुण-तरुणी स्पष्टपणे सांगतात की, त्यांना लग्न करायचेच नाही. त्यांना सिंगल राहणे अधिक सोयीचे आणि आनंददायी वाटते. करिअर, प्रवास, छंद, सामाजिक काम या गोष्टींमध्ये त्यांना समाधान मिळते. समाजात अजूनही लग्न न करणाऱ्यांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते; पण शहरी भागात चॉईस म्हणून सिंगल राहणे स्वीकारले जाऊ लागले आहे.

घरचा दबाव आणि स्वतःचा निश्चय

भारतीय समाजात कुटुंबाची भूमिका मोठी आहे. विशेषतः मुलींसाठी लग्नाचे वय ओलांडले की, घरच्यांची चिंता वाढते. लोक काय म्हणतील, हा प्रश्न अजूनही अनेक घरांत महत्त्वाचा आहे. तरीही, आजचा तरुणवर्ग आपला निर्णय स्पष्टपणे मांडतो. संवाद साधतो, कारणे समजावतो आणि कधी कधी ठामपणे नकारही देतो. काही जण समुपदेशनाचा आधार घेतात. काही जण कुटुंबाला वेळ देतात आणि हळूहळू त्यांची मानसिकता बदलतात. हा बदल संघर्षाशिवाय होत नाही; पण स्वावलंबन आणि आर्थिक स्थैर्यामुळे तरुणांना स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता येते.

सोशल मीडियाचा प्रभाव

सोशल मीडियामुळे जगभरातील जीवनशैली आपल्या समोर येते. विविध पर्याय दिसतात. परफेक्ट मॅरेजचे चित्र जसे दिसते तसेच घटस्फोट, तणाव, तडजोडी याही गोष्टी समोर येतात. त्यामुळे लग्नाबाबत अधिक विचारपूर्वक निर्णय घेतला जातो.

मानसिक आरोग्याची जाणीव

आज मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढली आहे. चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटे राहणे बरे, असा विचार काहीजण करतात. भावनिक परिपक्वता आणि स्वतःची तयारी नसताना लग्न करू नये, ही समज वाढत आहे.

उशिरा लग्नाचे फायदे आणि तोटे

उशिरा लग्न केल्यास व्यक्ती अधिक परिपक्व असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम असते. स्वतःच्या अपेक्षा स्पष्ट असतात. त्यामुळे नातेसंबंध अधिक समजूतदारपणे हाताळले जाऊ शकतात; परंतु पालकत्वाची वेळ, आरोग्याच्या बाबी या गोष्टींचाही विचार करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक निर्णयाचे फायदे-तोटे आहेत.

बदल स्वीकारण्याची गरज

समाज बदलतो आहे. प्रत्येक पिढी आपले मूल्य आणि प्राधान्य ठरवते. लग्न लवकर करणे की उशिरा, हा वैयक्तिक निर्णय असावा. समाजाने त्याकडे समजूतदारपणे पाहण्याची गरज आहे. आजचा तरुण वर्ग लग्नाला विरोध करत नाही; पण तो घाई करत नाही. त्याला नात्यात गुणवत्ता हवी आहे, केवळ परंपरेपोटी निर्णय घ्यायचा नाही.

शेवटी, लग्न हा आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असला, तरी तेच अंतिम ध्येय नाही. स्वतःचा आनंद, समाधान आणि स्वातंत्र्य यांनाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे चाळिशीकडे झुकणारे लग्नाचे वय हा केवळ ट्रेंड नसून बदलत्या समाजाचे प्रतिबिंब आहे. चाळिशीत किंवा चाळिशीनंतर लग्न करणं ही चुकीची किंवा उशिराची गोष्ट नसून तो पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येकाची जीवनयात्रा वेगळी असते. परिपक्वता, स्पष्टता आणि स्वतःची तयारी या गोष्टी जुळून आल्यावर घेतलेला निर्णय अधिक स्थिर आणि समाधानकारक ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT