नीती मेहेंदळे
मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला एक जोडलेणं आहे. त्यात कोणतीही मूर्ती नाही. कदाचित इथे पूर्वी विहार किंवा निवासाची व्यवस्था होत असावी. पोर्तुगीजांनी या लेण्यांसमोर मोठी भिंत उभारली. आजही तिचे अवशेष शिल्लक आहेत. सध्या या गुंफांच्या भिंतींवर जे काही अवशेष दिसतात, त्यातील बहुतांश भाग नष्ट झालेला आहे. कान्हेरीप्रमाणे या मुख्य गुंफेच्या बाहेरही पाण्याचं टाकं आहे.
भारतामध्ये सुमारे बाराशेच्या वर लेणी आहेत. त्यातली सर्वाधिक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याला कारणही सबळ आहे. महाराष्ट्राचा खडक लेणी कोरण्यासाठी मऊ व चांगला आहे. लेण्यांचं आयुष्य मंदिरांहून निश्चितच प्राचीन असल्याने जिथे लेणी आहेत त्या गावांचा इतिहास आणि काळ समजायला मदत होते. उदाहरणार्थ मुंबई. एकट्या मुंबईतच पाच लेणीसमूह आहेत. कान्हेरी तर सुपरिचित आणि सर्वात मोठा आहे. उरलेल्या चार लेणीसमूहांपैकी मंडपेश्वर हा एक लहानसा समूह बोरिवली उपनगरात आहे. जोगेश्वरी आणि महाकाली समूह जोगेश्वरीजवळ, तर मंडपेश्वर, कान्हेरी, मागाठाणे बोरिवली उपनगराच्या आसपासच आहेत. मंडपेश्वर लेणी बोरिवली पश्चिमेला माऊंट पॉइन्सुर टेकडीच्या पूर्व भागाच्या पायथ्याशी वसलेली आहेत. असा समज आहे की, ‘माऊंट पोइन्सुर’ टेकडीचे नाव हे मंडपेश्वर या नावाचाच एक अपभ्रंश आहे. मूळतः या गुंफा दहिसर नदीच्या काठावर होत्या; परंतु कालांतराने नदीचा प्रवाह बदलला. या परिसराचे नाव लेण्यातील मंडपेश्वर शिवमंदिरावरून पडले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खडकाळ पर्वतरांगांमध्ये कोरलेली ही प्राचीन लेणी शहराच्या सांस्कृतिक वारशाचा आणि रंजक कथांनी भरलेल्या भूतकाळाचा एक भाग उलगडतात नि त्या शतकांच्या प्रवासाचे आणि साम्राज्यांच्या आगमनाचे मूक साक्षीदार ठरतात.
अभ्यासकांच्या मते, या गुंफांची निर्मिती साधारणपणे 1,500 ते 1,600 वर्षांपूर्वी झाली असावी, असे मानले जाते. काही तज्ज्ञांच्या मते, ही निर्मिती साधारणपणे जोगेश्वरी गुंफांच्या निर्मितीच्याच काळात (इ.स. 520-550 दरम्यान) म्हणजे सहाव्या शतकात झाली असावी. त्या काळात भारतात खडकात कोरलेल्या मंदिरांची आणि गुहांची परंपरा मोठ्या प्रमाणावर विकसित होत होती. या गुंफांमधील शिल्पे, जोगेश्वरी गुंफांमध्ये आढळणार्या शिल्पांच्याच काळात कोरली गेली असावीत, असा अंदाज आहे. कारण, त्यांच्या रचनेत पुष्कळसे साम्य आहे. मंडपेश्वर लेणी संपूर्णपणे एका मोठ्या दगडात कोरून तयार करण्यात आलेली आहेत. मुंबई शहरात खडकात कोरलेली लेणीरूपातली अशी चार प्रमुख धार्मिक स्थळे आहेत : घारापुरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा आणि मंडपेश्वर गुंफा. या चारही गुंफांमध्ये आढळणारी शिल्पे एकाच शैलीतील आहेत.
काळाच्या ओघात या गुंफेने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत; यात जागतिक युद्धाचाही (जेव्हा सैनिकांनी तिचा वापर केला होता) समावेश आहे. सहाव्या शतकातही मुंबई व्यापार व वाणिज्याचे केंद्र होते आणि व्यापारी मार्गावर लेणी असणं सयुक्तिक ठरतं. ज्या काळात या गुहा बांधल्या गेल्या, त्या काळात महाराष्ट्रातील पर्वतांमधून जाणारे अनेक मार्ग व्यापारी मार्गांवरील महत्त्वाची केंद्रे होती. विशेषतः भारतातील पश्चिम घाट, सागरी व्यापारी मार्गांनी वारंवार प्रवास करणार्या व्यापार्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र होते. असं मानलं जातं की, पहिल्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत मधल्या काळात या खडकात कोरलेली लेणी बौद्ध भिक्षू आणि ज्ञानप्राप्तीच्या शोधात असलेल्या साधकांच्या उपासना व ध्यानासाठी कोरल्या गेल्या होत्या. भगवान बुद्धांचा संदेश आणि शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भिक्षूंवर होती. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतातील पश्चिम घाट योग्य मानला गेला. म्हणून भिक्षूंनी डोंगराच्या आत या गुहा बांधल्या आणि प्रशस्त सभागृह, स्तूप आणि विहार म्हणून स्वतंत्र खोल्या तयार केल्या. त्यानंतर त्यांनी या रचनेला मंडपेश्वर गुहा असे नाव दिले. मंडपेश्वर लेणी हे मुंबईतील शैलगृह वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. या लेण्यांची निर्मिती पारंपारिक बौद्ध लेणी वास्तुकलेनुसार करण्यात आली असून, या संकुलात ‘चैत्यगृहे’ म्हणून ओळखली जाणारी प्रार्थना दालने, ध्यानधारणेसाठी दालने आणि भिख्खूंच्या निवासासाठी अनेक खासगी खोल्यांचा समावेश आहे. ही दालने प्राचीन खडकांमध्ये कोरून तयार करण्यात आली असून, त्यांच्या बाहेरील बाजूस कोरीव खांब असलेला ‘ङ’ आकाराचा मार्ग आहे. वेळोवेळी, हिंदू राजे आणि आश्रयदात्यांनी आपापल्या वास्तुरचना आणि धार्मिक प्रतिमांनी या संकुलाला समृद्ध केल्यामुळे या गुहांमध्ये वास्तुशास्त्रीय आणि धार्मिक स्थित्यंतरांची मालिका घडली असावी.
लेण्यांसमोर मोकळवण आहे. लेण्याच्या सभामंडपाचं मोजमाप 51 फूट, 21 फूट इतकं भव्य आहे. दर्शनी भागात चार मोठे खांब आहेत. लेण्यांची आठवण करून देतात; पण त्यांवर भरपूर कोरीव काम आहे, जसं घारापुरीत बघायला मिळत नाही. यावरून ही लेणी त्यानंतरच्या काळातली असावीत असा तर्क करता येतो. मुख्य दर्शनी सभा मंडपानंतर अंतराळ व मोठे प्रशस्त गर्भगृह आहे. हीही रचना जोगेश्वरी गुंफांसारखीच आहे. गर्भगृहात अलीकडच्या काळात स्थापन केलेले शिवलिंग आहे. गाभार्याच्या दरवाज्यातून आत शिरताना त्या भिंतीत उजव्या बाजूला एक शिलालेख दिसतो. इ.स. 1739 मध्ये पेशव्यांनी मुंबईच्या या भागावर आक्रमण केले. वसई जिंकून घेतल्यावर मंडपेश्वरही त्यांच्या अखत्यारीत आलं. त्याचा निर्देश करणारा हा शिलालेख आहे. गर्भगृहाच्या बाहेर दोन बाजूंना लहान आकाराच्या गुंफा असून त्यात मोठ्या खोल्या आहेत. पैकी डाव्या बाजूच्या गुंफेत तांडवनृत्य करत असलेल्या नटेशाचं भव्य शिल्प भिंतभर बघायला मिळतं. त्याबरोबर शिवगण, विविध वाद्ये वाजवणार्या वादकांचा तसेच शेजारी विष्णू, ब्रह्मा, गणपती, पार्वती, यक्ष यांचाही या शिल्पात समावेश आहे. या गुंफांमध्ये नटेशाबरोबर सदाशिव आणि अर्धनारीश्वराची शिल्पे पाहायला मिळतात. इथे लकुलीशची मूर्तीही बघायला मिळते.
या गुंफांच्या दक्षिण दिशेला असलेल्या एका मोठ्या चौकोनी खिडकीतून भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचे चित्रण करणारे म्हणजे भव्य कल्याणसुंदर शिल्प पाहता येते. या कलाकृतींच्या माध्यमातून हिंदू देव-देवतांच्या पौराणिक कथांचे चित्रण करण्यात आले आहे. या गुंफेला जोडून आत अजून 2 खोल्या आहेत. पोर्तुगीजांनी या खोल्यांचा वापर सामानसुमान ठेवायला केला असावा. सोळाव्या शतकात आलेल्या पोर्तुगीजांनी आपल्याबरोबर त्यांनी धर्मही आणला. या गुंफांच्या परिसराच्या वरच्या बाजूला त्यांनी पोर्तुगीज चर्च व दफनभूमी स्थापन केली; पण खाली असलेल्या हिंदू लेण्यांची नासधूस केली. त्याचा मार्ग लेण्यांच्या उजव्या बाजूने आहे. गुंफांच्या वरच्या भागात एका जुन्या वास्तूचे अवशेषही आढळतात. हे अवशेष इ.स. 1544 मध्ये बांधल्या गेलेल्या त्या चर्चचे आहेत. त्याची स्थापना एका फ्रान्सिस्कन धर्म प्रचारकाने केली होती. हे अवशेषही सध्या ‘भारतीय पुरातत्त्व संस्थे’च्या संरक्षणाखाली आहेत. ‘इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च’ या गुंफांच्या दक्षिणेकडील टोकास स्थित आहे. यावरून असे स्पष्ट होते की, पोर्तुगीज लोकही या प्रदेशात वास्तव्य करत होते आणि प्रवास करत होते. त्यांनी शिवमंदिराचं रूपांतर कॅथलिक चर्चमध्ये केलं.
नटेशाच्या दालनाचे दोन खांब तोडले आणि त्या दालनाचं रूपांतर अल्तारमध्ये केलं. लाकडी तुळई लावण्यासाठी केलेल्या खोबणी त्याचेच निदर्शक आहेत. काही खोबण्यांमध्ये आजही लाकडी अवशेष शिल्लक आहेत. गाभार्याबाहेर नंदीची प्रतिमा दिसते. त्यावरच्या छतावर एक वर्तुळाकार आकृती दिसते. तीही पोर्तुगीजांची लुडबुड. बाहेर एका दगडात कोरलेल्या मूर्तीच्या जागी क्रॉस कोरला. देवदयेने उजव्या बाजूच्या मूर्तीचं काही करता आलं नाही म्हणून ती उरली. क्रॉस कोरला त्या ठिकाणी अजून दोन मोठी दालनं असावीत; मात्र तिथल्या भिंती आणि फरशी सुबक नसाव्यात. पोर्तुगीजांनी आतल्या शिल्पांपुढे भिंती उभारून फरशीला गिलावा केला असावा. हे दोन्ही उद्ध्वस्त केल्यानंतर लेण्यांचं मूळ रूप जगासमोर उघड झालं.
शिवाय मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला एक जोडलेणं आहे. त्यात कोणतीही मूर्ती नाही. कदाचित येथे पूर्वी विहार किंवा निवासाची व्यवस्था होत असावी. पोर्तुगीजांनी या लेण्यांसमोर मोठी भिंत उभारली. आजही तिचे अवशेष शिल्लक आहेत. सध्या या गुंफांच्या भिंतींवर जे काही अवशेष दिसतात, त्यातील बहुतांश भाग नष्ट झालेला आहे. कान्हेरीप्रमाणे या मुख्य गुंफेच्या बाहेरही पाण्याचं टाकं आहे.
पुढे 18 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मंडपेश्वर गुंफांचा वापर स्थानिक रहिवासी, प्रवासी आणि इतरांकडून उपासनास्थळ म्हणून किंवा विश्रांती घेण्यासाठी केला जात असे. त्यानंतरच्या काळात मात्र या गुंफा ओस पडल्या आणि त्यांच्या सभोवताली वाढलेल्या दाट अरण्यात त्या लुप्त झाल्या. पुढे विसाव्या शतकात मंडपेश्वर गुंफांचा पुन्हा शोध लागला. मंडपेश्वर लेणी केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळ नाही, तर त्या मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. इतिहासातील अनेक मौल्यवान वास्तूंप्रमाणे मंडपेश्वर लेण्यांनाही संवर्धनाची आवश्यकता आहे. काही शिल्पे काळाच्या ओघात खराब झाली आहेत. त्यामुळे या वारशाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.