संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्ग महाराष्ट्र घडवत होते. या तिन्ही वर्गांमध्ये दलित, आदिवासी आणि भटके विमुक्त यांनी प्रवेश केला; परंतु नव्वदीनंतरच्या महाराष्ट्रात हे तीन वर्ग बदलले. सेवा क्षेत्रातील उच्चभ्रू मध्यमवर्ग हाच महाराष्ट्रातील मुख्य वर्ग झाला. तसेच, औद्योगिक क्षेत्रात नवभांडवलदारवर्ग हा दुसरा महत्त्वाचा वर्ग झाला. शेती क्षेत्रातून नवा सरंजामदारवर्ग प्रभावी ठरला. आजच्या महाराष्ट्रावर मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तीन क्षेत्रांचे वर्चस्व आहे. येत्या गुरुवारी (1 मे) होणार्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...
महाराष्ट्र दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तत्कालीन मुंबई राज्याचे भाषिक आधारावर विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. महाराष्ट्र दिन हा राज्याच्या स्थापनेचा दिवस असण्याबरोबरच तो मराठी संस्कृती, भाषा आणि कामगारांच्या संघर्षाचे प्रतीक आहे. हा दिवस राज्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो; परंतु याबरोबरच प्रत्येक वर्षी महाराष्ट्र बदलत चालला आहे. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेपासूनच्या काही तत्त्वांमध्ये सातत्य दिसते; परंतु त्यामध्ये नव्याने भरही घातली गेली आहे. तसेच, सातत्याच्या अंतर्गत मोठे फेरबदलही झाले आहेत.
राज्य पुनर्रचना कायद्यानुसार, भारतातील राज्यांची पुनर्रचना भाषिक आधारावर करण्यात आली; मात्र मुंबई राज्यात मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषिक लोक राहत होते. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या परिणामी, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली. या वस्तुस्थितीला एक ऐतिहासिक वारसा होता. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी या दोन राष्ट्रीय नेत्यांनी भाषावार प्रांतरचनेचा विचार मांडला होता. त्यांनी भाषावार प्रांत रचनेमुळे त्या त्या भाषेचा आणि संस्कृतीचा विकास होईल, अशी भूमिका घेतली होती. म्हणजेच भाषेचा विकास आणि संस्कृतीचा विकास हे एक महत्त्वाचे ध्येय संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीच्या मागणी पाठीमागे होते. तसेच, मराठी भाषिकांना त्यांचा विकास करून घेता येईल. मराठी भाषिकांना त्यांची भाषा त्यांच्या विकासासाठी मदत करेल, अशी भूमिका घेतली गेली होती. आजच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेबरोबर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचे महत्त्वही वाढलेले आहे. आजच्या महाराष्ट्रात ज्ञान व्यवहाराची भाषा इंग्रजी झाली आहे. सुवर्ण त्रिकोणात हिंदी आणि इंग्रजीचे वर्चस्व वाढले आहे. सुवर्ण त्रिकोणाच्या बाहेर मराठी ही प्रादेशिक भाषा म्हणून व्यवहार करते; परंतु ज्ञाननिर्मितीची भाषा म्हणून स्थान मिळवण्यासाठी तिची झुंज चालू आहे.
महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा शेतकरी आणि कामगार असे दोन महत्त्वाचे वर्ग अस्तित्वात होते. 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या लढ्यांचे स्मरण केले जाते. हा एक संदर्भ संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेशी आरंभीच जोडला गेला होता. 1960 पासून आज पर्यंत महाराष्ट्रातील कामगार आतून- बाहेरून खूप बदललेला आहे. कामगारवर्ग हा संघटित नाही. कामगारवर्गामध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गट आणि वर्गीयस्तर उदयाला आले आहेत. कामगारवर्ग महाराष्ट्रात शेतकरी कामगार यांच्या राज्याचे स्वप्न पाहत होता. आज शेतकरी व कामगार यांच्याऐवजी महाराष्ट्राचे राजकारण भांडवलदार, नव सरंजामदार व उच्चभ्रू मध्यमवर्गाच्या हाती गेले आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी घटनात्मक चौकटीत महिलांना समता देणारी धोरणे आखली जात होती. सत्तरीच्या दशकानंतर महिलांच्या मूलभूत हक्कांचा आग्रह धरला गेला. नव्वदच्या नंतरच्या महाराष्ट्रात महिला सबलीकरण धोरण राबविले. आज स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के राखीव जागा आहेत. यातून एक सुप्त क्रांती महाराष्ट्रात घडून आली आहे (ीळश्रशपीं ीर्शीेंर्श्रीींळेप); परंतु याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर झाल्या नाहीत.
त्यामुळे या सुप्त क्रांतीमध्ये मोठा खंडही पडलेला आहे. ही आजच्या महाराष्ट्राची नवी अवस्था आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी शेतकरी आणि कामगार या वर्गांप्रमाणेच 1960 मध्ये पांढरपेशा वर्गातून एक नवीन मध्यमवर्ग उदयाला आला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मध्यमवर्ग कृतिशील होता. त्याची ओळख पब्लिक इंटिलेक्च्युअल अशी होती. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती घडविण्यामध्ये या वर्गाचे मोठे योगदान होते. मध्यमवर्गाचे सामाजिक चारित्र्य हळूहळू बदलत गेले. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात लोकसाहित्याचे एक नवीन दालन उघडले गेले.
सरोजिनी बाबर यांनी या क्षेत्रामध्ये विशेष कार्य केले, तेव्हाच भालचंद्र नेमाडे यांनी ‘कोसला’ लिहिली. त्यांनी देशीवादाचा प्रवाह सुरू केला. दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या दोन्हीही प्रकारांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीमध्ये भर घातली. नव्वदीच्या दशकानंतर गौतम बुद्ध, संत तुकाराम, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी इत्यादींच्या साहित्याचा पुनर्विचार सुरू झाला. यातून नवीन साहित्य निर्माण झाले (विशेषकरून डॉ. आ. ह. साळुंखे, शरद पाटील, सदानंद मोरे यांचे वैचारिक लेखन). यादरम्यान मध्यमवर्गामध्ये बदल होऊन उच्चभ्रू मध्यमवर्ग उदयाला आला. यामुळे खासगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण या विचारसरणीला विरोध करणारा जुना मध्यमवर्ग आणि उच्चभ्रू मध्यमवर्ग म्हणजे याच विचारप्रणालीचे समर्थन करणारा वर्ग. या दोन गटांमध्ये साहित्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्रात हिंदू या संकल्पनेच्या अवतीभवती लेखन झाले. हिंदू या संकल्पनेला समाजवादाशी, राष्ट्रवादाशी, हिंदुत्वाशी, भांडवलशाहीशी जोडून घेणारा एक मोठा वर्गही उदयाला आला. यामुळे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात हिंदू या संकल्पनेची आणि विचारसरणीची डाव्या आणि उजव्या याबरोबरच मध्यम मार्गी अशा तीन क्षेत्रांमध्ये ओढाताण झाली. या तीन क्षेत्रांच्या बाहेर जाऊन हिंदूंचा विचार भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्यविश्वात मांडला. याबरोबरच राजन गवस यांनी शेतकर्यांच्या जीवनातील ज्ञानावर आधारित साहित्य निर्मिती केली. एकूण सर्वच प्रकारच्या हिंदू संकल्पनेची समीक्षा धर्मनिरपेक्ष आणि आंबेडकरवादी साहित्यिकांनी केली. याशिवाय सामाजिक समरसता साहित्य असा एक प्रवाह विकसित झाला. विमुक्तांच्या शोषणाचे विदारक स्वरूप साहित्यातून मांडले गेले. विशेषतः छत्रपती शिवरायांच्या संदर्भात रयत केंद्रित साहित्यनिर्मितीपासून हिंदूकेंद्रित साहित्यनिर्मिती झाली. समकालीन काळात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन कळंबसारख्या (उस्मानाबाद) छोट्या गावात भरले (2024). तसेच, मुस्लिम साहित्याची निर्मिती समकालीन काळात झाली. मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याशी जुळवून घेणार्या मुस्लिम साहित्याची चळवळ सुरू आहे. महाराष्ट्रात मुस्लिम साहित्यामध्ये वैचारिक साहित्याचा एक नवा धुमारा फुटलेला आहे (फक्रुद्दीन बेन्नूर, सरफराज अहमद इत्यादी). थोडक्यात, समकालीन महाराष्ट्रात मध्यमवर्ग रूढीवाद आणि परिवर्तन अशा दोन मोठ्या गटांमध्ये विभागला केला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी कृषी-औद्योगिक समाजाची संकल्पना यशवंतराव चव्हाण यांनी मांडली होती. ही संकल्पना आर्थिक आणि सामाजिक होती. आर्थिकद़ृष्ट्या कृषी आणि औद्योगिक अशा दोन क्षेत्रांचा समन्वय घालण्यात आला होता. सामाजिकद़ृष्ट्या शेतकरी आणि कामगार अशा दोन सामाजिक वर्गांचा समन्वय साधला होता. साठ आणि सत्तरीच्या दशकानंतर मात्र कृषी क्षेत्रामध्ये अधोगती दिसू लागली. कृषीबरोबरच औद्योगिक क्षेत्रातदेखील फार प्रगती झाली नाही. सेवा क्षेत्राचा विस्तार आणि विकास होत गेला. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून ‘खाऊजा’ (खासगीकरण, उदारीकरण, आणि जागतिकीकरण) हे नवीन आर्थिक प्रारूप महाराष्ट्राने राबविण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये सुमारे चाळीस वर्षे ‘खाऊजा’ प्रारूपाप्रमाणे आर्थिक विकास घडला आहे. मुंबई, पुणे, नाशिक हा विकासाचा त्रिकोण तयार झाला आहे. विशेषतः, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई असे चर्चाविश्व सुरू आहे. मुंबई आणि पुणे अशा एका आर्थिक क्षेत्राची नव्याने कल्पना पुढे आलेली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड यांच्या आर्थिक सरमिसळीचीही चर्चा होते. यामुळे जुन्या प्रशासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. कारण, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोकणातील रायगड आणि मुंबई यांचा मिळून एक स्वतंत्र आर्थिक विभागच तयार झाला आहे. या विभागाचे आर्थिक वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रावर आहे.
‘खाऊजा’ आर्थिक धोरणाला चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या मर्यादा दिसून येऊ लागल्या आहेत. विभागीय असमतोल वाढला आहे. आर्थिक संपन्नता असणार्या विकासाच्या सुवर्ण पंचकोनाकडे (मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे) स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. असंतुलित आर्थिक विकासामुळे शहरी भागात आणि ग्रामीण भागात एक भकास चित्र निर्माण झाले आहे. भकास चित्र (कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव, गुन्हेगारी, पाण्याचा अभाव, शिक्षणाच्या क्षेत्रातील अधोगती इत्यादी) बदलण्यासाठी ‘खाऊजा’ आर्थिक धोरणाची पुनर्रचना करण्याची वेळ महाराष्ट्रावर आली आहे. ‘खाऊजा’ आर्थिक धोरण पूर्णपणे सोडून देता येणे शक्य नाही; परंतु त्याची पुनर्रचना महाराष्ट्राचा समतोल विकास या चौकटीत करण्याची तीव्र इच्छाशक्ती महत्त्वाचे ठरणार आहे.
थोडक्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्ग हे तीन वर्ग महाराष्ट्र घडवत होते. या तिन्ही वर्गांमध्ये दलित, आदिवासी आणि भटके विमुक्त यांनी प्रवेश केला; परंतु नव्वदीनंतरच्या महाराष्ट्रात हे तीन वर्ग बदलले. सेवा क्षेत्रातील उच्चभ्रू मध्यमवर्ग हाच महाराष्ट्रातील मुख्य वर्ग झाला. तसेच, औद्योगिक क्षेत्रात नवभांडवलदारवर्ग हा दुसरा महत्त्वाचा वर्ग झाला. शेती क्षेत्रातून नवा सरंजामदारवर्ग प्रभावी ठरला. मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रावर उच्चभ्रू मध्यमवर्ग, नवभांडवलदारवर्ग, नवसरंजामदारवर्ग यांचे नियंत्रण आहे. आजच्या महाराष्ट्रामध्ये मोबाईल, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तीन क्षेत्रांचे वर्चस्व आहे. या तिन्ही क्षेत्रांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय अशा मूल्यांवर आधारित सार्वजनिक व्यवहार घडावा असा विचार आजच्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.