देशाच्या इतिहासात अनेक विक्रम नोंदविणार्या प्रयागराजमधील महाकुंभाचा समारोप येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीला होत आहे. तोपर्यंत सुमारे 60 कोटी भाविकांनी संगमावर पवित्र स्नानाचा प्रसन्न अनुभव घेतला असेल. तोही एक नवा विक्रम ठरेल. महाकुंभबाबतचे राजकीय वाद बाजूला ठेवून त्याचा आनंद देशवासीयांनी घेतला. या सोहळ्याने त्यांना परस्परांशी ऐक्य भावनेने जोडले. हीच यातील मोठी जमेची बाजू आहे. हिंदू संस्कृती आणि धर्माच्या संपन्न वारशाचा अभिमान आणि अस्मिता इथे आलेल्यांना सुखावून टाकणारी होती.
तब्बल 144 वर्षांनंतर त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याचा दुर्मीळ योग आपण गमावता कामा नये, असे मनापासून वाटत होते; पण प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनांमुळे हे धाडस करावे की नाही, या संभ्रमात असताना अचानक कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरीत्या जगातील या सर्वात मोठ्या आनंद सोहळ्याला जाण्याचा निर्णय घेतला. बनारस ते प्रयागराज हे अंतर मोटारीने सव्वाशे किलोमीटरचे. म्हणजे अवघ्या 3 तासांचा हा प्रवास. 15 फेब्रुवारीला बनारसला आल्यावर 16 फेब्रुवारीला सकाळी प्रयागराजला पोहोचून संध्याकाळी पुन्हा बनारसला मुक्कामी पोहोचायचे, असे नियोजन होते. शाही स्नानाचे बहुसंख्य दिवस पार पडले असल्याने गर्दी ओसरली असेल, अशी अटकळ बांधली होती; पण हा अंदाज साफ चुकला. त्या दिवशी तब्बल सव्वा कोटीवर भाविकांनी पवित्र स्नानाची पर्वणी अनुभवली होती. या गर्दीत प्रचंड ट्रॅफिक जामला तोंड देत आरवली घाटाच्या 10 किलोमीटर अंतरावर पोहोचायला 10 तासांहून अधिक वेळ लागला. त्यानंतर काही अंतर चालत, तर काही तेथील खचाखच प्रवाशांनी बसलेल्या टुकटुकीने पार करत दुपारी 4 वाजता संगमाजवळ पोहोचण्यात यश मिळाले. त्यावेळी मोठी लढाई जिंकल्याचा आनंद तर होताच; पण तिथे स्नान करण्याचा आध्यात्मिक अनुभव हा अधिक आनंददायी आणि मन प्रसन्न करणारा होता. कोणतीही तीर्थयात्रा कष्टाशिवाय पार पडली तर ती यात्रा म्हणता येत नाही, अशीच भावना तिथे येणार्या लाखो भाविकांची होती. त्यामुळे डोक्यावर बॅगा, हातात पिशव्या घेऊन रेल्वेचा अवघड प्रवास करून आलेले स्त्री पुरुष आणि मुलांचे जथ्थे यांच्या चेहर्यावर आनंदाचे, समाधानाचे प्रसन्न भाव होते. 20 ते 25 किलोमीटर पायी चालत आले तरी त्याचा थकवा त्यांना जाणवत नव्हता. महासागरासारख्या पसरलेल्या या सर्व भाविकांना एकत्र आणणारा समान धागा त्रिवेणी संगमावरील स्नानाचा होता.
यंदाचा महाकुंभ हा देशातील सर्वांना जोडणारा ऐक्याचा एक अभूतपूर्व सोहळा ठरला. सध्याच्या राजकारणात त्याचा राजकीय फुटबॉलसारखा वापर केला जात असला, तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचे जे अभ्यासपूर्वक, कल्पकता दाखवत नियोजन केले, त्यामुळे तब्बल साठ कोटींहून अधिक देशवासीय याचा आनंद घेऊ शकले, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. वाहतूक कोंडीत अडकून पडण्यासारखे प्रसंग आले; पण एवढ्या अफाट गर्दीत हे अपरिहार्य होते. प्रयागराजचा एकूण घाट आणि परिसर कमालीचा स्वच्छ होता. गंगा, यमुनाच्या पाण्याबद्दल केंद्रीय प्रदूषण मंडळाने आपल्या अहवालात चिंता व्यक्त केली असली, तरी सर्वत्र तशी स्थिती नसावी. आम्ही ज्या घाटाजवळ स्नान केले तिथे पाणी स्नान करण्याजोगे होते, आता 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला या सोहळ्याचा समारोप होत असून, तोपर्यंत 60 कोटींहून अधिक भविकांनी इथे स्नान केल्याचा विश्वविक्रम केला असेल.
बनारस हिंदू विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, अशा यात्रेवर आलेला भाविक माणसी किमान साडेतीन हजार ते 4 हजार रुपये खर्च करतो. 2019 च्या कुंभमेळ्यासाठी योगी सरकारने त्यावर 4 हजार कोटी रुपये खर्च केले होते. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज म्हणजेच ‘सीआयआय’च्या अहवालानुसार त्यातून 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची अर्थव्यवस्था निर्माण झाली. हे लक्षात घेता आता त्यापेक्षा तिप्पट लाभ झाल्यास नवल नाही. या मेळ्याच्या निमित्ताने विविध आखाडे आणि सामाजिक संस्थांनी 10 हजारांवर छावण्या उभारल्या. त्यातून हजारोंना रोजगार मिळाला. रिक्षावाले, नौकानयन करणारे, बाईकवरून संगमावर भाविकांना पोहोचविणारे तरुण, फूल, पूजा साहित्य विक्रते, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक, टपरीवर चहा, स्नॅक्स विकणारे इत्यादी अनेक याचे लाभार्थी ठरले.
प्रयागराज महाकुंभमेळा शहर सुमारे 4 हजार हेक्टर इतके विस्तीर्ण असून, 25 सेक्टरमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. विविध संस्थांनी 2 लाखांवर तंबू इथे उभारले, 5 लाखांवर पार्किंग स्लॉट तयार करण्यात आले. 25 हजारांवर मोफत निवास व्यवस्था, दीड लाखावर स्वच्छतागृहे, 25 हजारांवर स्वच्छता कर्मचारी, 25 हजार कचरापेट्या, नदीवर 30 पाँटून पूल, 67 हजार स्ट्रीट लाईटस्, 50 हजारांवर पोलिस, गर्दीवर देखरेख ठेवण्यासाठी 2,600 कॅमेरे आणि ड्रोन्स अशी जबरदस्त व्यवस्था 12 किलोमीटर क्षेत्रात केली होती. प्रयागराजची लोकसंख्या 15 लाखांच्या घरात आहे. त्याच्या तीनशे पटींहून अधिक पाहुण्यांचे यजमानपद या शहराने हसतमुखाने सांभाळले. या गर्दीमुळे त्यांची गैरसोय झाली; पण त्याबाबत त्यांचा तक्रारीचा सूर नव्हता. या कालावधीत शाळा, घरे इथे या पाहुण्यांची राहण्याची व्यवस्था केली गेली. अनेक ठिकाणी भंडारा होता, तिथे अनेकांना मोफत भोजनही मिळत होते. यावेळी राज्य सरकारने श्रीमंत भाविकांचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली. सुमारे 2 हजार स्विस कॉटेज शैलीचे तंबू आलिशान टेंट सिटीमध्ये उभारण्यात आले. त्यात पंचतारांकित सुविधाही पुरविण्यात आल्या होत्या.
आलेल्या पाहुण्यांना सन्मानाने वागवण्याच्या सूचना पोलिसांना होत्या. पोलिस सौजन्याने वागत असल्याचा सुखद अनुभव अनेकांना आला. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या किती तरी अधिक भाविकांसाठी एक तात्पुरते शहर निर्माण करून नागरी नियोजन आणि व्यवस्थापनाच्या केस स्टडीचे एक मॉडेल योगी सरकारने यानिमित्ताने निर्माण केले. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयआयएम्स, आयआयटीज, स्टॅनफोर्ड, हार्वर्डसारख्या 25 संस्था इथे आलेल्या आहेत. योगी यांनी वयाच्या 22 व्या वर्षी एमएस्सीचा अभ्यास करीत असताना संन्यास घेतला. त्यांनी गेल्या 3 दशकांत आपल्या गुरूंसमवेत अनेक कुंभमेळ्यांना भेटी दिल्या. त्यामुळे त्यांना भाविकांपासून ते संत-महंत-साधूंचे प्रश्न माहीत आहेत. महाकुंभ 2025 सुरू होण्यापूर्वी प्रत्येक आखाड्याला पायी जाऊन त्यांनी भेटी दिल्या. यातील स्वच्छता कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा सुरू करण्याची योजनाही त्यांनी राबविली. आपल्या नियोजनात त्यांनी या सोहळ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. अंडरवॉटर ड्रोनपासून रोजच्या भाविकांच्या संख्येची मोजणी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. क्यूआर कोड वापरून ठिकाणे शोधता येत होती. या उत्सवाला डिजिटल आयाम देण्याची किमयाही दखल घेण्याजोगी होती. रस्ते शोधणे सोपे व्हावे म्हणून राज्य सरकारने गुगल मॅपशी सामंजस्य करार केला होता. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) शहराच्या मध्यवर्ती भागात होते. याद्वारे सर्व बारीकसारीक बाबींवर नजर ठेवणे शक्य झाले. वाहतूक नियंत्रण, पार्किंग, लाखो भाविकांच्या हालचाली यावर त्यामुळे लक्ष ठेवणे सोपे झाले. हजारो एआय चलित स्मार्ट कॅमेर्यांच्या साहाय्याने टिपलेले लाईव्ह फीडस् पाहण्यासाठी अगदी छतापर्यंत उंचीचे स्क्रीन लावले होते. विविध भाषिकांसाठी संपर्क साधणे सोपे व्हावे म्हणून ‘भाषिणी अॅप’चा वापर, कुंभमेळ्यात मुले हरवतात, त्यांचा शोध घेण्यासाठी ‘लॉस्ट अँड फाऊंड’चा तंत्रज्ञान सुसज्ज विभाग याचाही वेगळा प्रयत्न म्हणून उल्लेख करावा लागेल.
भारतीय रेल्वेने यासाठी 13 हजारांवर गाड्या सोडल्या. त्यापैकी 3 हजार खास गाड्या होत्या. काही लोकांनी मात्र शिस्त धाब्यावर बसवल्याने आरक्षित एसी, तसेच प्रथम वर्गातील डब्यांमधून प्रवास करणार्यांचे हालच झाले, आपल्याला जागा मिळावी म्हणून काहींनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. काहींनी बांबू आत मध्ये घुसवून आतील प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. स्वयंशिस्तीच्या अभावाचा फटका सर्वांनाच बसतो. त्याबाबत अशा समाजकंटकांना आळा घालणे हे मोठे आव्हान आहे. या महाकुंभमेळ्यामुळे देशातील आध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे, हेही लक्षात घ्यायला हवे, आमच्या या दौर्यात ट्रेड विंगच्या वाराणसी कार्यालयाचे प्रमुख शैलेंद्र सिंह यांनी हे प्रामुख्याने निदर्शनास आणून दिले. त्यांचे म्हणणे हे की, तीर्थस्थळी लोक वारंवार येणे पसंद करतात, तसे बाली किंवा थायलंडसारख्या ठिकाणी होत नाही; पण अयोध्येचे राम मंदिर असो, काशी विश्वेश्वराचे दर्शन असो किंवा प्रयागराज असो, इथे भाविकांना अनेकदा यावेसे वाटते. पर्यटन व्यवसायाच्या द़ृष्टीने हे स्वागतार्ह आहे. अॅटलिस या व्हिसा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्मच्या पाहणीनुसार, आध्यात्मिक कारणासाठीच्या पर्यटनात देशात 21.4 टक्के वाढ दिसून आली आहे. महाकुंभसारख्या सोहळ्यांमुळे हे आकर्षण वाढत असून, यात तरुण पिढी मोठ्या संख्येने दिसत आहे, हे विशेष. त्यामुळे या महाकुंभसाठी अमेरिका, इंग्लंड आदी देशांतून परदेशी नागरिक त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आलेले होते. त्यात 66 टक्के तरुण महिला होत्या.