अंजली महाजन, महिला विषयांच्या अभ्यासक
महिला बॉक्सर लव्हलीना बोर्गोहाईन ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारी भारतातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी तिने भारतीय बॉक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक अरुण मलिक यांच्यावर लैंगिक भेदभाव आणि अपमानास्पद वर्तनाचे जे आरोप केले, ते अत्यंत मर्मभेदी आहेत. मलिक यांनी हे आरोप नाकारले असले, तरी ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलीना एखादा आरोप करत असतील, तर काहीतरी घडलेले असणे निश्चित आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रीडापटूंनी आपल्या कर्तृत्वाने आणि जिगरबाज कामगिरीने जागतिक पटलावर भारताचा सन्मान वाढवण्याचे कार्य केले आहे. क्रिकेटचा संघ असो, हॉकीचा संघ असो किंवा वैयक्तिक पातळीवरील नेमबाजी, बुद्धिबळ यांसारखे क्रीडा प्रकार असोत, भारतातील क्रीडा प्रतिभेचा बोलबाला जगभरात होत आहे. आंतरराष्ट्रीय पटलावर चमकदार कामगिरी करणार्या या खेळाडूंना क्रीडा रसिकच नव्हे, तर समस्त तरुण पिढी आपला आदर्श किंवा हीरो मानत असते. यामागचे मुख्य कारण म्हणजे, ते आपला बहुतांश वेळ राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी खर्च करतात. अशा परिस्थितीत जेव्हा कधी या खेळाडूंसोबत अपमानास्पद घटना घडते, तेव्हा ती चाहत्यांच्या मनाला अतिशय वेदना देणारी ठरते. प्रसंगी चाहत्यांचा संताप अनावरही होतो. आपण अद्याप ऑलिम्पिकसारख्या खेळांमध्ये अन्य देशांच्या तुलनेत फार मोठी झेप घेतलेली नाही. कशीबशी मोजकी पदके जिंकून आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे. अशा खेळांमध्ये पदक मिळविणार्यांप्रती विशेष आदर व्यक्त करणे हे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. असे असताना ऑलिम्पिक पदकविजेत्या एका महिला बॉक्सरला लैंगिक भेदभाव आणि अपमानजनक वर्तणूक मिळत असेल, तर ती निश्चितच निषेधार्ह बाब आहे.
भारताच्या महिला बॉक्सर लव्हलीना बोर्गोहाईन ही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणार्या भारतातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. ती आसाम राज्यातील क्रीडापटू असून टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकून तिने आपल्या कामगिरीची झलक दाखवून दिली होती. आक्रमक बॉक्सिंग शैली, मानसिक ताकद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करण्याची क्षमता ही त्यांची खासियत मानली जाते. काही दिवसांपूर्वी तिने भारतीय बॉक्सिंग महासंघाचे कार्यकारी संचालक अरुण मलिक यांच्यावर लैंगिक भेदभाव आणि अपमानास्पद वर्तनाचे जे आरोप केले, ते अत्यंत मर्मभेदी आहेत. मलिक यांनी हे आरोप नाकारले आहेत आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यामुळे खरी परिस्थिती काय आहे, हे तर चौकशीनंतरच स्पष्ट होईल; परंतु ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलीना एखादा आरोप करत असतील, तर काही तरी घडलेले असणे निश्चित आहे.
राष्ट्रासाठी आपले जीवन अर्पण करणार्या खेळाडूंप्रती सन्मान व्यक्त करता आला नाही, तरी किमान त्यांचा अवमान तरी केला जाऊ नये. अनेकदा खेळांचे संचलन करणारे पदाधिकारी हे विसरतात की, त्यांना मिळणारी सगळी वाहवा खेळाडूंच्या यशामुळेच आहे. म्हणून ज्या खेळाडूंच्या जोरावर तुम्हाला मान मिळत आहे, त्यांनाच अपमानित केले, तर ती गंभीर चूक आहे. लव्हलीनाच्या प्रकरणात मुख्य मुद्दा तिच्या खासगी प्रशिक्षकाला राष्ट्रीय शिबिरात आणि परदेशातील प्रशिक्षणात सोबत ठेवण्याचा आहे. महासंघाकडून असे सांगण्यात आले की, राष्ट्रीय शिबिरात खासगी प्रशिक्षकांना सोबत ठेवण्याची परवानगी नाही. विचार करण्यासारखी बाब म्हणजे, संध्या गुरंग या लव्हलीनाच्या कोच असून त्या भारतीय संघाच्या सहायक कोचही आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारही मिळालेला आहे. अशा स्थितीत महासंघाने असा नियमच का केला, हे समजण्यापलीकडचे आहे.
एका बाजूला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा बोलतो आणि दुसर्या बाजूला याच प्रयत्नामध्ये महासंघ स्वतःच अडथळा निर्माण करतो. लव्हलीनाने क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अनेकांना दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले की, तिला सांगण्यात आले की, ‘गप्प बसा, डोके खाली ठेवा, जे सांगितले जाते ते करा.’ ही बाब खरी असेल, तर ती अत्यंत दुःखद आहे. अशी भाषा एखाद्या सामान्य व्यक्तीसाठीही वापरली जाता कामा नये. कारण, ती गुलामगिरीदर्शक आहे. देशाचे नाव उज्ज्वल करणार्या खेळाडूंप्रती तर ही भाषा कदापि क्षम्य ठरत नाही. ही चर्चा ऑनलाईन झाली होती. त्यामुळे त्याचे फुटेज सहज उपलब्ध होऊ शकते. हे खरे ठरले, तर हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे.
आपण एकीकडे जगात क्रीडाशक्ती होण्याची स्वप्ने पाहतो. दुसरीकडे आपले वर्तन त्या उलट असते. भारतीय महिला टेनिसला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात कोणाचा हात सर्वात जास्त आहे, तर तो नक्कीच सानिया मिर्झाचा आहे. सानियाने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्येही यश मिळवले, ज्याबद्दल याआधी कोणी भारतीय महिला खेळाडू विचारही करू शकत नव्हती; परंतु 2005 मध्ये काही मौलवींनी त्यांच्या स्कर्ट घालून खेळण्याला इस्लामविरोधी ठरवत फतवे काढले; मात्र पक्का निर्धार केलेल्या सानियाने आपल्या मार्गानेच जाणे सुरू ठेवले. महान टेनिसपटू लिएंडर पेस यांनाही अनेकदा ऑलिम्पिकमध्ये जोडी बनविण्याच्या बाबतीत अपमान सहन करावा लागला.
भारतामध्ये क्रिकेटवर प्रचंड प्रेम केले जाते. काही काळापूर्वी के. एल. राहुल लखनौ सुपर जायंटस्च्या नेतृत्वात होता आणि त्याची टीम हैदराबाद संघाकडून मोठ्या फरकाने हरली तेव्हा त्याच्या मालकाने राहुल यांना मैदानावरच अपमानित केले. या घटनेची सर्वांनी निंदा केली; परंतु प्रश्न असा आहे की, एखाद्या क्रीडा संचालकाच्या मनात असे करण्याची वेळच का आली? यामागचे एक कारण असे दिसते की, आयपीएलसारख्या स्पर्धांमध्ये मालक मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवतात आणि त्यांना वसुलीची घाई असते. त्यामुळे राग अनावर होण्याची शक्यता कायम राहते. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याला रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले तेव्हा त्याच्यावर अपमानाचा प्रसंग ओढवला. अशा घटना कधीच खेळाच्या भल्यासाठी नसतात.
देशासाठी सक्षम खेळाडू घडवून ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि कॉमनवेल्थसारख्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके मिळवावीत, हे क्रीडा महासंघाचे मूळ उद्दिष्ट असले पाहिजे. आपण सर्वजण जाणतो की, लव्हलीनाने ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहे आणि येणार्या काळात आणखी पदके मिळविण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. अशावेळी महासंघाने तिला तिच्या पद्धतीने तयारी करण्याची संधी द्यायला हवी. महासंघाचे नियम हे खेळाडूंचे हित साधले जाईल, असे असायला हवेत. तसे झाले, तरच आपण ऑलिम्पिकसारख्या खेळांमध्ये डझनभर पदके मिळवून खर्याअर्थाने आनंद साजरा करू शकू.