अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या अहवालात पुन्हा एकदा अतिप्रक्रियायुक्त अन्नपदार्थांबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. अल्ट्राप्रोसेस्ड अन्नाचे दीर्घकाळ सेवन आरोग्यासाठी प्राणघातक ठरू शकते, असे हा अहवाल सांगतो. ब्राझीलमधील एका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आठ देशांतील सुमारे अडीच लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात अल्ट्राप्रोसेस्ड अन्न भारतात अनेक जीर्ण आजार आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत ठरत असल्याचे नमूद केले आहे. पूर्वी घरी शिजवलेले, पौष्टिक अन्न हेच आदर्श मानले जायचे; पण कुकीज, चॉकलेटस्, पॅकेज्ड स्नॅक्स आणि आईस्क्रीम यासारखे चटपटीत पदार्थ आपल्या आहाराचा अविभाज्य भाग बनले आहेत; पण यांची चटक आरोग्यासाठी सापळा ठरत आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांबाबत बदलत्या काळानुसार बदल होत गेले; पण यामधील एक विरोधाभास म्हणजे वस्त्र आणि निवारा यामधील बदल हे मानवी जीवन अधिकाधिक आरामदायी व सुखकर कसे होईल, यासाठी अनुकूल ठरले; पण अन्नपदार्थांबाबत काही अपवाद वगळता आधुनिक काळात झालेले बदल हे मानवी आरोग्य सुद़ृढ बनवण्याऐवजी आरोग्य समस्या वाढवणारे ठरले. जागतिकीकरणानंतर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा भारतासारख्या देशांमध्ये वाढत गेला. सांस्कृतिक सरमिसळ झाली. त्यातून प्रगत देशातील अनेक अन्नपदार्थांच्या संकल्पना भारतात वापरल्या जाऊ लागल्या. अर्थात, हे एक प्रकारचे अंधानुकरण होते. आपली पारंपरिक आहारपद्धती ही पूर्णतः आरोग्यदायी होती. मनुष्यप्राणी ज्या परिसरात वास्तव्य करतो त्या-त्या भागात पिकणार्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यास पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीराला ते अनुकूल ठरते. अगदी भौगोलिक द़ृष्ट्या विचार केला, तरी उष्णकटिबंधातील अन्नपदार्थ समशितोष्ण किंवा शितोष्ण कटिबंधात वास्तव्य करताना अनुकूल ठरत नाहीत; पण प्रगत राष्ट्रांच्या प्रपोगंड्यामुळे असेल, त्यांच्या विपणन कौशल्यामुळे असेल किंवा या जोडीला आपल्यामध्ये असणारे पाश्चिमात्य प्रेम असेल; पण इंग्रजी भाषेप्रमाणेच पिझ्झा, सॉफ्ट ड्रिंक, वेफर्स, सिझलर्स, बर्गर, सँडविच, चीज, नूडल्स, मोमोज, फ्रोजन फूड, कुकीज, केक यासारख्या चटपटीत पदार्थांच्या विळख्यात आपली बाल व तरुण पिढी गुरफटत गेली. यामध्ये अतिप्रक्रियायुक्त अन्न म्हणजेच अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा समावेश अधिक आहे. हे अन्नपदार्थ पारंपरिक कृतीने प्रक्रिया केलेले नसतात, तर त्यामध्ये अनेक रासायनिक घटक, कृत्रिम चवद्रव्ये, प्रिझर्व्हेटिव्हज, रंग, वास वाढवणारे पदार्थ आणि इतर कृत्रिम घटक मिसळलेले असतात. या पदार्थांची चटकदार चव, त्यांची रचना आणि आकर्षक रंग-सजावट यामुळे हे अन्नपदार्थ अधिकाधिक आकर्षित ठरत गेले; पण त्यामागील आरोग्यविघातक परिणामांचा आपण विचारच केला नाही. आज हे भारतातच घडते आहे असे नाही, तर जगभरातील विकसित व विकसनशील देशांमध्ये अल्ट्राप्रोसेस्ड फूडचा वापर मर्यादेबाहेर गेला आहे. युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये तर हे अन्न त्यांच्या एकूण आहारातील 50-60 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. भारतातही शहरी भागात झपाट्याने वाढणार्या फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स, बेकरी पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स इत्यादींचा खप दिवसागणिक वाढत चालला आहे.
भारतात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन यांच्या 2021 च्या संयुक्त अभ्यासानुसार, शहरी भागातील 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींमध्ये अतिप्रक्रियायुक्त अन्न सेवनाची सरासरी त्यांच्या आहाराच्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळले होते. विशेषतः किशोरवयीन आणि तरुणवर्ग या अन्नाच्या मोहात अधिक अडकतो आहे. कारण, या पदार्थांची सहज उपलब्धता आणि प्रसिद्धीचे प्रभावी तंत्र. तथापि, ‘लान्सेट’ या सुप्रसिद्ध आरोग्य जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, अतिप्रक्रियायुक्त अन्नाचे नियमित सेवन करणार्या व्यक्तींमध्ये हृदयरोग, टाईप-2 मधुमेह, स्थूलपणा आणि काही प्रकारच्या कर्करोगांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. अलीकडेच अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या अहवालात याबाबत पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे. अल्ट्राप्रोसेस्ड अन्नाचे दीर्घकाळ सेवन आरोग्यासाठी प्राणघातक ठरू शकते, असे हा अहवाल सांगतो.
ब्राझीलमधील एका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आठ देशांतील सुमारे अडीच लाख लोकांवर केलेल्या अभ्यासात हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. ज्या भागांमध्ये अशा अन्नपदार्थांचे सेवन कमी होते, तिथे जीवनशैली अधिक दर्जेदार आणि आयुष्यमान किंवा वयोमर्यादा अधिक असल्याचे आढळले. याउलट ज्या लोकांनी अल्ट्राप्रोसेस्ड अन्नाचे नियमित सेवन केले, त्यांना पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक आजारांचाही अधिक धोका असल्याचे आढळले. या अन्नपदार्थांचा प्रसार इतका वाढला आहे की, आता ते आर्थिक विकासाच्या केंद्रस्थानी पोहोचले आहेत. इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्सच्या एका अहवालानुसार, भारतात 2011 मध्ये अल्ट्राप्रोसेस्ड अन्नाचा बाजार 723 कोटी रुपये होता. 2021 पर्यंत तो 2535 कोटींपर्यंत वाढला आणि मागील आर्थिक वर्षात हा आकडा 6000 कोटींच्या पुढे गेला आहे. वास्तविक पाहता, भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्येही या चिंतेचा उल्लेख आहे. या सर्वेक्षणात म्हटले आहे की, जास्त साखर, मीठ आणि घातक फॅट असलेले व पोषणमूल्यांचा अभाव असणारे अल्ट्राप्रोसेस्ड अन्न भारतात अनेक जीर्ण आजार आणि मानसिक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे.
गेल्या पाच-दहा वर्षांत अनेक अहवालांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे; पण सध्याच्या वेगवान जीवनशैलीमध्ये आणि मॉडर्न राहण्याच्या भ्रामक अट्टाहासामध्ये केक, कुकीज, चॉकलेटस्, पॅकेज्ड स्नॅक्स आणि आईस्क्रीम यासारखे अल्ट्राप्रोसेस्ड पदार्थ खाण्याची जणू टूमच आली आहे. जिव्हातृप्ती, वेळेची बचत आणि सहज उपलब्धता या तीन गोष्टींमुळे हे अन्न ‘आधुनिक जीवनशैलीचे प्रतीक’ बनले आहे. महानगरांमध्ये राहणारी तरुणाई तर सातत्याने या पदार्थांचे सेवन करत असते. ग्रामीण भागात, निमशहरी भागात तसेच मध्यम विकसित शहरांमध्येही विविध माध्यमांतून असे पदार्थ विक्रीस सहजगत्या उपलब्ध होतात. या पदार्थांचे आकर्षक रॅपर आणि प्रचंड मीठ व अन्य घटकांचा वापर करून चटपटीतपणा आणलेले हे पदार्थ लहान मुलांना, तरुणांना अधिक रुचकर वाटतात.
प्रत्यक्षात ते आरोग्यासाठी सापळा ठरत आहेत. भारतासारख्या कृषिप्रधान आणि युवा देशात ही बाब अधिक गंभीर बनली आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये या अन्नपदार्थांचे आकर्षण इतके वाढले आहे की, त्यांच्या दिवसभराच्या आहाराची सुरुवात आणि शेवट हे या पदार्थांशिवाय होतच नाहीत. या अन्नपदार्थांमध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, हायड्रोजनेटेड फॅटस् (ट्रान्स फॅटस्), मोनोसोडियम ग्लुटामेट, कृत्रिम रंग व चव वाढवणारे पदार्थ हे सर्वच शरीरासाठी हानिकारक आहेत. हे पदार्थ आपल्या नैसर्गिक भूक नियंत्रण प्रक्रियेला गोंधळात टाकतात. परिणामी, शरीराची गरज नसतानाही अधिक प्रमाणात अन्न सेवनास प्रवृत्त करतात. यामुळे स्थूलपणा, लिव्हर फॅटी डीसिज, इन्सुलिन प्रतिरोधन, हायपरटेन्शन यासारख्या समस्यांना निमंत्रण मिळत आहे.
या व्यतिरिक्त मानसिक आरोग्यावरही या अन्नाचा परिणाम होतो. बीएमजे ग्लोबल हेल्थअंतर्गत एकूण 10 वेगवेगळ्या देशांमधील 90,000 लोकांवर केलेल्या एका अभ्यासात दिसून आले की, अतिप्रक्रियायुक्त अन्नाचे नियमित सेवन करणार्यांमध्ये डिप्रेशन आणि चिंतेच्या तक्रारी तुलनात्मक द़ृष्ट्या अधिक आढळतात. यामागे आहारातील पोषक घटकांची कमतरता आणि कृत्रिम पदार्थांचा मेंदूवर होणारा परिणाम हे मुख्य कारण मानले जाते. जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्राची अन्न आणि कृषी संघटन यांनीही अलीकडच्या अहवालांमध्ये अतिप्रक्रियायुक्त अन्नाविषयी धोका व्यक्त केला आहे. त्यांनी सरकारांना सल्ला दिला आहे की, अशा अन्नपदार्थांवर अचूक लेबलिंग, जाहिरातींवर नियंत्रण, शालेय परिसरात विक्रीवर बंदी आणि आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे; परंतु यासाठी केवळ सरकार किंवा तज्ज्ञांची जबाबदारी पुरेशी नाही. पालक, शिक्षक, आरोग्यसेवक आणि सामान्य जनतेनेही आपल्या अन्न निवडीबाबत सजग राहण्याची गरज आहे. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून आरोग्य टिकवण्याचे मूलभूत साधन आहे, हे लक्षात घेऊनच आपण आपल्या आणि पुढच्या पिढीच्या आरोग्याची दिशा ठरवू शकतो. खरे पाहता, भारत सरकारने भरडधान्य म्हणजेच मिलेटस्, पारंपरिक अन्नपदार्थ व स्थानिक आहार यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे; पण शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयीन ठिकाणी आरोग्यदायी आहाराला प्राधान्य देणारे उपक्रम राबवले जावेत. जागरूकता मोहिमा राबवून नागरिकांना आरोग्याच्या द़ृष्टीने योग्य पर्याय निवडण्यास प्रवृत्त केले पाहिजे.