नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फिफा २०२६ च्या पहिल्या सामन्यात त्याने गोलची हॅट्ट्रिक नोंदवली. यानंतर ऑस्ट्रियाविरुद्ध गोल करत मेस्सीने विश्वविक्रम केला आहे. या स्पर्धेत एकूण १८ गोल मेस्सीने केले असून जर्मनीचा दिग्गज फुटबॉलपटू मिरास्लोव क्लोस याचा १६ गोलचा विक्रम मोडला आहे.
फुटबॉल विश्वचषकाचा थरार सध्या जगभरात अनुभवला जात आहे. खेळाडूंच्या महानतेची अंतिम परीक्षा म्हणून या स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. क्लब फुटबॉलमध्ये शेकडो सामने आणि असंख्य ट्रॉफी जिंकता येतात; परंतु विश्वचषकातील कामगिरीच एखाद्या खेळाडूचे स्थान कायमचे निश्चित करते. गेल्या दोन दशकांतील विश्वचषकाचा इतिहास लिहिताना मेस्सीला वगळून एकही प्रकरण पूर्ण होऊ शकत नाही. ज्याप्रकारे १९७० च्या दशकाचा उल्लेख पेलेशिवाय आणि १९८० च्या दशकाचा उल्लेख मॅराडोनाशिवाय अपूर्ण वाटतो, त्याचप्रकारे आधुनिक विश्वचषकाचा इतिहास मेस्सीशिवाय अपुरा ठरतो.
विश्वचषक आणि मेस्सी यांचे नाते विक्रमांबरोबरच भावनिकतेचेही आहे. २०१४ च्या अंतिम सामन्यातील अपयश, २०२२ मधील विजयाचा जल्लोष आणि त्यानंतरही सुरू राहिलेली त्याची घोडदौड या सर्वांनी त्याच्या प्रवासाला वेगळे परिमाण दिले. फिफा विश्वचषकाने मेस्सीला जागतिक व्यासपीठ दिले, तर मेस्सीनेही आपल्या प्रतिभेने त्या स्पर्धेच्या लोकप्रियतेत भर घातली. त्याचा प्रत्येक गोल, प्रत्येक पास यांना आजही एक वेगळे महत्त्व आहे. मैदानावर त्याच्या पायाशी चेंडू आला की, स्टेडियममधील वातावरण बदलते. प्रेक्षक उभे राहतात, प्रतिस्पर्धी बचावपटू सावध होतात आणि लाखो प्रेक्षकांच्या नजरा एका क्षणात त्याच्यावर खिळतात. कारण, मेस्सीकडे चेंडू असताना काहीतरी असामान्य घडू शकते, हे फुटबॉलच्या चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे.
डॅलसमधील विश्वचषक सामन्यात अर्जेंटिनाचा सामना ऑस्ट्रियाशी सुरू असताना असेच काहीसे वातावरण निर्माण झाले होते. सामन्यातील ३८ व्या मिनिटाला मेस्सीने चेंडू ताब्यात घेतला आणि संपूर्ण स्टेडियम एका क्षणात जागेवरून उभे राहिले. त्या क्षणी प्रेक्षकांना इतिहासाचा साक्षीदार व्हायचे होते. काही सेकंदांतच मेस्सीच्या डाव्या पायातून सुटलेला अचूक फटका गोलरक्षकाच्या हातांच्या पलीकडे जाऊन जाळ्यात विसावला आणि स्टेडियम आनंदाच्या प्रचंड लाटेत बुडून गेले. काही क्षणांपूर्वी शांत असलेले वातावरण 'मेस्सी, मेस्सी' या घोषणांनी दुमदुमून गेले. त्या गोलने मेस्सीने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोझेचा विक्रम मोडत पुरुष विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला. त्याच्या सहकार्यांच्या चेहर्यावरचे भाव सर्व काही सांगत होते. ते आनंदी होते; पण त्याहून अधिक ते थक्क झाले होते.
जवळपास वीस वर्षांपूर्वी २००६ च्या विश्वचषकात सर्बिया आणि मॉन्टेनेग्रोविरुद्ध मेस्सीने आपल्या विश्वचषक कारकिर्दीतील पहिला गोल केला होता. दोन दशके उलटल्यानंतर त्याच स्पर्धेत त्याने इतिहासातील सर्वोच्च स्थान मिळवले. याहूनही विलक्षण योगायोग म्हणजे अर्जेंटिनाच्या फुटबॉल इतिहासातील सर्वात चर्चित क्षणांपैकी एक असलेल्या दिएगो मॅराडोनाच्या ‘हँड ऑफ गॉड गोल’च्या चाळीस वर्षांनंतर हा विक्रम घडला. विशेष म्हणजे, सामन्याच्या सुरुवातीलाच अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली होती. मेस्सी याच संधीचा उपयोग करून विक्रम करेल असे सर्वांना वाटले होते. त्यामुळे संपूर्ण स्टेडियम शांत झाले होते. हजारो मोबाईल कॅमेरे त्याच्याकडे रोखले गेले होते; मात्र त्याचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला आणि काही क्षणांपूर्वी जल्लोषाने भरलेले वातावरण स्तब्ध झाले. मेस्सीने दोन्ही हातांनी चेहरा झाकला, तर अर्जेंटिनाचे चाहते अविश्वासाने एकमेकांकडे पाहत राहिले.
विश्वचषकातील पेनल्टी चुकवणे मेस्सीसाठी नवीन नव्हते; पण त्या क्षणी त्याच्या चेहर्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. काही मिनिटे त्याच्या खेळावरही त्याचा परिणाम जाणवत होता. तो काही वेळा चेंडू गमावत होता, त्याचे फटके लक्ष्यापासून दूर जात होते. यामुळे संपूर्ण अर्जेंटिना संघ काहीसा अस्वस्थ दिसत होता. ऑस्ट्रियाने या परिस्थितीचा फायदा घेत आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्जेंटिनाच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला; पण जागतिक विजेत्या संघाचा अनुभव अशा क्षणांत उपयोगी पडतो. हळूहळू अर्जेंटिनाने पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि त्याचवेळी मेस्सीही आपल्या जुन्या लयीत परतला. महान खेळाडूंची खरी ओळख घडलेल्या चुकीनंतर पुन्हा सावरून उभे राहण्यात असते. मेस्सीनेही तेच दाखवून दिले. त्याने दुखापतीच्या वेळेत आणखी एक गोल करत पुरुष आणि महिला विश्वचषक स्पर्धांच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणार्या खेळाडूचा मान मिळवला.
फुटबॉलविश्वात महान खेळाडू कोण, यावरून पेले, मॅराडोना, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मेस्सी यांच्याबद्दलचे वाद वर्षानुवर्षे सुरू आहेत; मात्र काही वेळा आकडे, विक्रम आणि भावना एकाच ठिकाणी एकत्र आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळतो. डॅलसमधील तो दिवस असाच काहीसा होता. मेस्सीने आपल्या खेळातून पुन्हा एकदा ‘टायगर अभी जिंदा है’ हे दाखवून दिले. अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी सामन्यानंतर सांगितले होते की, मेस्सी प्रेरित झाला की, संपूर्ण संघ प्रेरित होतो. हे वाक्य कदाचित मेस्सीच्या प्रभावाचे सर्वात अचूक वर्णन आहे. तो आपल्या उपस्थितीने संघाला आत्मविश्वास देतो, सहकार्यांना अधिक मेहनत करण्याची प्रेरणा देतो आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात भय निर्माण करतो. विशेष म्हणजे, वय त्याच्यासाठी अडथळा ठरताना दिसत नाही. चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेला हा खेळाडू अजूनही तरुण बचावपटूंना चकवत आहे, सामने जिंकत आहे आणि नवे विक्रम निर्माण करत आहे. त्याच्या विश्वचषकातील अनेक गोल हे वयाच्या पस्तिशीनंतर आले आहेत, ही बाबच त्याच्या सातत्याची आणि फिटनेसची साक्ष देते.
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आता मेस्सीच्या नावे आहे. त्याने अल्जेरियाविरुद्ध १७ वा आणि ऑस्ट्रियाविरुद्ध १८ वा विजय मिळवून क्लोसचा १७ विजयांचा विक्रम मागे टाकला. मेस्सीने विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक २८ सामने खेळण्याचा नवा टप्पा गाठला आहे. स्पर्धेच्या इतिहासात मैदानावर सर्वाधिक वेळ (२,४८९ मिनिटे) घालवणारा लिओनेल मेस्सी हा जगातील एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जाणारा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार मेस्सीने विक्रमी ८ वेळा जिंकला आहे. फुटबॉलच्या इतिहासात सहकार्यांना गोल करण्यासाठी सर्वाधिक पासेस (असिस्ट) देण्याचा विक्रम मेस्सीच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत ४१४ असिस्ट दिले आहेत. २०१२ या एकाच वर्षात मेस्सीने बार्सिलोना क्लब आणि अर्जेंटिना देशासाठी खेळताना तब्बल ९१ गोल केले होते, हाही एक विक्रम मानला जातो. ‘स्पॅनिश लीग ‘ला लिगा’मध्ये बार्सिलोनाकडून खेळताना सर्वाधिक ४७४ गोल करण्याचा ऐतिहासिक विक्रमही मेस्सीच्या नावावर आहे. युरोपमधील विविध लीग्जमध्ये सर्वाधिक गोल करणार्या खेळाडूला दिला जाणारा हा बहुमान मेस्सीने ६ वेळा पटकावला आहे.
यंदाच्या फिफा विश्वचषकाच्या माध्यमातून लिओनेल मेस्सीला फुटबॉल जगतात ‘गोट’ : ग्रेटेस्ट ऑफ ऑलटाईम अर्थात सर्वकालीन महान खेळाडू) का म्हटले जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.