Lenyadri Ganesh Caves | लेण्याद्रीची गणेश लेणी 
बहार

Lenyadri Ganesh Caves | लेण्याद्रीची गणेश लेणी

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

'लेण्याद्री' या सध्याच्या नावाचा शब्दशः अर्थ 'डोंगरातील गुहा' असा आहे. ज्या गोलाकार टेकडीवर लेण्याद्रीची लेणी कोरली आहेत, ती हटकेश्वर आणि सुलेमान पर्वतरांगांमधील मैदानी भागापासून सुमारे ३० मीटर उंच आहे. लेण्याद्री ही खडकात कोरलेल्या सुमारे ३० बौद्ध लेण्यांची मालिका आहे. ही सर्व लेणी नैसर्गिक कड्यामध्ये किंवा तीव्र उतारावर कोरली आहेत. लेण्याद्री लेण्यांचा काळ इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यानचा आहे, असं अभ्यासकांचं मत आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नर शहरात अर्थात पूर्वाश्रमीच्या जीर्णनगरात अनेक लेणी आहेत. खरं तर लेणीसमूहच आहेत. इतकं जुन्नर समृद्ध का, तर त्याची उकल लपलीय सातवाहन काळात. त्या काळात व्यापारउदीम फारच भरभराटीला आला होता. कल्याण, श्रीस्थानक, चौल, डहाणू, सोपारा या समुद्रकाठच्या बंदरांतून आलेला माल घाटमार्गांवरून पैठण, तेरसारख्या राजधानीच्या शहरांना पोहोचवला जात असे. या घाटमार्गांमध्ये व्यापाऱ्यांसोबत बौद्ध धर्माचे प्रचारक भिख्खूदेखील प्रवास करत होते. त्यांनी वर्षावासात निवासासाठी लेणी खोदली ती या घाटमार्गांमधल्या डोंगरांमध्ये. जुन्नरमधून काही प्राचीन घाटमार्ग जातात. त्यांवर शिवनेरी किल्ल्याच्या पोटातली शिवनेरी लेणी, मानमोडी डोंगरातली अंबा-अंबिका समूह, भूत लेणीसमूह, भीमाशंकर समूह आणि लेण्याद्री डोंगरातला गणेश लेणीसमूह हे प्रचलित लेणीसमूह बघायला मिळतात. पैकी लेण्याद्री डोंगर अधिक प्रसिद्ध झाला तो अष्टविनायकांपैकी गिरिजात्मज गणेशाच्या लेणी मंदिरामुळे.

जुन्नर शहरापासून लेण्याद्री डोंगर सुमारे ५ किमी.वर आहे. हे ठिकाण गोळेगाव आणि जुन्नर यांच्या दरम्यान वाहणाऱ्या कुकडी नदीच्या वायव्य तीरावर वसलेले आहे. गणेश स्थान असल्यामुळे साहजिकच गणेश चतुर्थी व गणेशोत्सवात लेण्याद्रीला भाविकांची प्रचंड गर्दी असते. सहसा प्रत्येक लेण्याच्या डोंगराला विशेष नामकरण असतं. इथल्याच एका शिलालेखात या ठिकाणाचा उल्लेख 'कपिचिता' (किंवा कपिचिट्टा/ कपिचित्त) पर्वत असल्याचे समजतं. हा शिलालेख व्हरांड्यातच कोरलेला आहे. 'सामरूपासकस पुतस सिवभूतिस देयधम लेणं कपिचिते संघस नियुतं क.. ' याचा अर्थ 'सामर या उपासकाचा पुत्र सिवभूति याची कपिचित संघाला लेण्याची देणगी' असा आहे. संशोधकांनी यावरून या पर्वताचं नामकरण कपिचित्त केलं आहे.

'लेण्याद्री' या सध्याच्या नावाचा शब्दशः अर्थ 'डोंगरातील गुहा' असा आहे. ज्या गोलाकार टेकडीवर लेण्याद्रीची लेणी कोरली आहेत, ती हटकेश्वर आणि सुलेमान पर्वतरांगांमधील मैदानी भागापासून सुमारे ३० मीटर उंच आहे. लेण्याद्री ही खडकात कोरलेल्या सुमारे ३० बौद्ध लेण्यांची मालिका आहे. ही सर्व लेणी नैसर्गिक कड्यामध्ये किंवा तीव्र उतारावर कोरली आहेत. लेण्याद्री लेण्यांचा काळ इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकादरम्यानचा आहे, असं अभ्यासकांचं मत आहे. यातील काही लेण्यांचा नंतरच्या काळात हिंदू उपासनेसाठी वापर केला जाऊ लागला. यातील २६ लेण्यांना स्वतंत्र क्रमांक देण्यात आले आहेत. या लेण्यांची मुखे दक्षिणेकडे आहेत आणि त्यांना पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रमाने क्रमांक दिले आहेत. लेणे क्रमांक ६ आणि १४ ही चैत्यगृहे असून उर्वरित लेणी विहार (भिख्खूंच्या निवासाची ठिकाणे) आहेत. येथे खडकात कोरलेली पाण्याच्या अनेक टाक्याही आहेत. त्यापैकी दोन टाक्यांवर शिलालेख आहेत. गणेश लेण्यांमध्ये असे साधारण ६ शिलालेख आहेत आणि ते सगळे दानलेख आहेत. शिलालेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत.

लेणे ६ हे लेण्याद्री लेण्यांमधील मुख्य चैत्यगृह असून ते हीनयान पंथाच्या चैत्यगृहांचे एक अत्यंत प्राचीन उदाहरण आहे. याची रचना अजिंठा लेण्यांमधील चैत्यगृहासारखीच आहे; मात्र आकाराने ते लहान आहे. या लेण्यात एक ओसरी (व्हरांडा), प्राण्यांची शिल्पे असलेली स्तंभशीर्षे असलेले खांब व भिंतीला जोडलेले खांब आणि प्रवेशद्वाराशी ५ पायऱ्या असलेले गर्भगृह आहे. कक्षाच्या मागील बाजूस असलेला स्तूप आणि त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी पाच खांब आणि एक भिंतीला जोडलेला खांब यांची रांग आहे. व्हरांड्याच्या मागील भिंतीवर प्रवेशद्वाराच्या वर छताखाली एक शिलालेख 'कल्याण येथील हेरानिकाचा पुत्र, प्रतिष्ठित सुलासदात याने दिलेली ही पुण्यकारक चैत्य लेण्याची देणगी' अशा आशयाचा कोरलेला दिसतो. लेणे क्रमांक १४ देखील एक चैत्यगृह असून त्याचे छत सपाट आहे; मात्र या सभागृहात कोणतेही खांब नाहीत. या गुहेला अष्टकोनी खांब असलेला व्हरांडा आहे. येथील स्तूप तीन पायऱ्यांचा आहे. येथेदेखील व्हरांड्याच्या मागील भिंतीवरील शिलालेख दानलेख असून या शिलालेखाचा अर्थ 'उपासक तापस याचा पुत्र आणि उपासक कपिल यांचा नातू आनंद याने दिलेली ही चैत्याची पुण्यकारक भेट' असा आहे. यावरून एका घरात तीन पिढ्या उपासना केली जात असून बौद्ध धर्माच्या प्रसाराची परंपरा व व्याप्ती लक्षात येते.

लेणे क्रमांक ७ (जे मूळतः बौद्ध विहार होते) हे जुन्नर परिसरातील सर्वात मोठे लेणे असून त्याच्या मध्यभागी असलेल्या दोन कक्षांचा वापर नंतरच्या काळात हिंदू देवता गणेशाच्या उपासनेसाठी केला जाऊ लागला. लेणे क्रमांक ७ मधील उर्वरित कक्ष आणि मुख्य सभागृह मात्र त्यांच्या मूळ स्वरूपातच आहेत. हे 'गणेश लेणे' विहार 'अष्टविनायक' तीर्थक्षेत्रांपैकी एक समजले जाते. यात खांब नसलेला एक मुख्य कक्ष आणि विविध आकारांच्या २० खोल्या आहेत. सध्या या कक्षाचा वापर गणेश मंदिराचा 'सभा मंडप' म्हणून केला जातो. ओसरीमध्ये सहा खांब आणि दोन अर्धखांब आहेत. खांबांचे दंड अष्टकोनी असून त्यांच्या वरच्या भागात उलटा 'घट', दोन चौरस पट्ट्यांच्यामध्ये चपटे 'आमलक', उलट्या पायऱ्यांची पिरॅमिड रचना आणि शेवटी वाघ, हत्ती आणि बैल ज्यावर कोरले आहेत ते आधारक आहेत. सर्व प्रवेशद्वारांवर लाकडी दरवाजे बसवण्यासाठी केलेल्या खाचांच्या खुणा दिसतात. 'गॅझेटिअर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी' (१८८२) मध्ये नमूद केले आहे की, या कक्षाला प्लास्टर आणि चुना लावला गेला होता. या चित्रांमध्ये गणेशाचे बालपण, लग्नाची तयारी, असुरांशी झालेले युद्ध इत्यादी प्रसंगांसोबतच देवी, कृष्ण, विष्णू आणि शिव यांसारख्या इतर हिंदू देवतांची दृश्येही रेखाटलेली आहेत. इतर अष्टविनायक मंदिरांच्या तुलनेत गुहेच्या मागील भिंतीवर असलेल्या गणेशाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये सर्वात कमी स्पष्ट आहेत. या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिणेकडे असले, तरी स्थानिक समजुतीनुसार देवतेचे मुख उत्तरेकडे आहे. म्हणजेच गणेशाची पाठ भक्ताकडे असून त्याचे मुख पर्वताच्या दुसऱ्या बाजूला आहे. लेण्यांना सहसा आख्यायिका चिकटलेल्या नसतात; पण लेण्याद्रीचा धार्मिक संदर्भ पाहता एक आख्यायिका सांगितली जाते.

गणेश पुराणानुसार सिंधू नावाच्या असुराचा वध करण्यासाठी त्रेतायुगात शिव आणि पार्वती यांच्या पोटी त्याचा जन्म झाला, ती गोष्ट इथे घडली. एके दिवशी पार्वतीने (हिमालयाची मुलगी म्हणून गिरिजा नाव) पती शिवाला विचारले की, ते कोणाचे ध्यान करत आहेत? तेव्हा शिवाने सांगितले की, ते संपूर्ण विश्वाचा आधार असलेल्या गणेशाचे ध्यान करत आहेत आणि त्यांनी पार्वतीला 'गं' हा गणेश मंत्र दिला. पुत्रप्राप्तीची इच्छा धरून पार्वतीने लेण्याद्री येथे बारा वर्षे गणेशाचे ध्यान करत कठोर तपश्चर्या केली. तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणेशाने तिला वर दिला की, तो तिचा पुत्र म्हणून जन्म घेईल. त्यानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला (गणेश चतुर्थीच्या दिवशी) पार्वतीने गणेशाच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली आणि ती मूर्ती सजीव झाली. अशाप्रकारे लेण्याद्री येथे पार्वतीच्या पोटी गणेशाचा जन्म झाला. गणेशाचं बालपण लेण्याद्रीलाच व्यतीत झालं. गणेशाच्या हातून आपला मृत्यू होणार आहे, हे माहीत असलेल्या सिंधू दैत्याने त्यांना मारण्यासाठी क्रूर, बलासुर, व्योमासुर, क्षेम, कुशल अशा अनेक असुरांना पाठवले; परंतु त्या सर्वांचा गणेशानेच वध केला. वयाच्या सहाव्या वर्षी वास्तुशिल्पकार देवता विश्वकर्माने गणेशाची मौंज केली आणि त्यांना पाश, परशू, अंकुश आणि पद्म ही लांछनं प्रदान केली. गणेशाने मोरावर स्वार होऊन 'मयुरेश्वर' हे नाव धारण केले. पुढे मयुरेश्वराने पुण्यातील मोरगाव येथे सिंधू दैत्य आणि त्याच्या सेनापतींचा वध केला, अशा आशयाची ही आख्यायिका आहे. इतर विहार लेणी असून त्यातली काही लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

लेणी क्रमांक २ मध्ये खांबांवर 'रेल'ची नक्षी असलेला खडकातील तुळईवजा भाग आहे आणि त्याच्यावर छत आहे. तुळईच्या वरच्या बाजूला लाकडी वासे (rafters) असल्याचा आभास निर्माण करणारे खडकातील नमुने कोरलेले आहेत, ते अप्रतिम आहेत. ५ क्रमांकाचे लेणे तीन भागांत विभागलेले आहे. व्हरांडा, मध्यवर्ती सभागृह आणि विविध आकारांचे सात कक्ष (मागील भिंतीत तीन आणि दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये प्रत्येकी दोन). म्हणूनच याला 'सप्तगर्भ लयन' (सात कक्षांचे निवासस्थान) असं म्हणतात. इथे व्हरांड्याच्या मागील भिंतीवर, मध्यवर्ती सभागृहाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला आणि व्हरांड्याच्या तुटलेल्या छताच्या अगदी खाली एका ओळीचा 'धान्य-व्यापाऱ्यांच्या श्रेणीची सातकक्षीय लेणे आणि पाण्याची टाकी ही एक पुण्यकारक देणगी' असा शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखाच्या सुरुवातीला व शेवटी स्वस्तिक चिन्ह आहे. लेणे १० व ११ लेणी अधिक उंचीवर स्थित असून त्यांचे दर्शनी भाग भग्न असल्याने तिथे पोहोचणे कठीण आहे. त्यांच्या छतांवर चित्रकामाचे अवशेष दिसून येतात. बाराव्या लेण्याच्या मधल्या खोलीच्या छतावर एकाच केंद्राभोवती काढलेली समकेंद्री वर्तुळे रंगवलेली दिसतात.

गुहा १७ मध्ये एका रांगेत असलेली तीन छोटी निवासस्थाने आहेत, ज्यांना सामायिक ओसरी आहे. लेणे १७ आणि लेणे १८ यांच्या दरम्यान आणखी तीन पाण्याच्या टाक्या आहेत. पैकी दोन टाक्यांच्या भिंतीवर दानलेख कोरलेले आढळतात. १८ क्रमांकाच्या लेण्याला प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना खिडक्या आहेत. मागील आणि बाजूच्या भिंतींच्या कडेने बसण्यासाठी ओटे केले आहेत. समोर एक मोकळे अंगण आहे. अंगणाच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे. यावरून ही भोजनशाळा असावी असं वाटतं. गुहा २५ च्या खोल्यांमधील कोनाड्यांमध्ये बसण्याची सोय आहे; मात्र येथील खोदकाम अनियमित स्वरूपाचे आहे. हे खडकाच्या खराब स्थितीचे निदर्शक असून, कदाचित याच कारणामुळे या गुहेतील पुढील काम थांबवण्यात आले असावे.

या समूहातील सर्वात पूर्वेकडील लेणे हे एक लहान चैत्य लेणे आहे. या लेण्यातील भिंती सरळ नाहीत आणि जमीनही सपाट नाही. बाजूच्या मार्गिकांचे काम सुरू झालेले नाही आणि दागोबाचा वरचा भाग वगळता आतील भागाचा कोणताही भाग पूर्णपणे तयार झालेला नाही. बाहेरच्या बाजूला, दर्शनी भागावर चैत्य खिडकीच्या आकाराची नक्षी कोरलेली आहे. काही ठिकाणी खिडकीच्या आत दागोबा, तर काही ठिकाणी कमळाचे फूल कोरलेले दिसते. तसेच नेहमीच्या पद्धतीनुसार वेदिकेवरची नक्षीही मोठ्या प्रमाणावर आढळते. खिडकीभोवतीच्या दर्शनी भागावर भौमितीय नक्षीकामही केलेले आहे. या लेण्यातील तपशील असे दर्शवतात की, हे लेणे कदाचित बेडसे आणि कार्ले येथील लेण्यांइतकेच जुने असावे आणि परिणामी जुन्नर परिसरातील सुरुवातीच्या काळातील लेण्यांपैकी एक असावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT