Lancet report on junk food | ‘लॅन्सेट’चा इशारा File Photo
बहार

Lancet report on junk food | ‘लॅन्सेट’चा इशारा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. संजय गायकवाड

गेल्या काही दशकांत जगभरात झपाट्याने वाढलेल्या अल्ट्रा प्रोसेस्ड किंवा अतिप्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या अतिसेवनाचा नागरिकांच्या आरोग्यावर कसा प्रतिकूल परिणाम झाला आहे, याचे बहुआयामी विश्लेषण ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकाच्या तीन भागांच्या मालिकेतील पहिल्या संशोधनपत्रात करण्यात आले आहे. यामध्ये तीन मुख्य गृहितकांची तपासणी केली गेली असून उपलब्ध पुरावे त्यातील प्रत्येक गृहितकाला ठोसपणे आधार देणारे आहेत.

जगप्रसिद्ध वैद्यकीय पत्रिका ‘द लॅन्सेट’ने अलीकडेच मानवी आहारात वाढत चाललेल्या अल्ट्रा प्रोसेस्ड फूड अर्थात अत्यधिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांवर आधारित सखोल संशोधन शृंखला प्रकाशित केली आहे. या शृंखलेचे सार असे की, जंक फूड मानल्या जाणार्‍या या पदार्थांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. दीर्घकालीन आजार वाढत आहेत आणि समाजात आरोग्याशी संबंधित असमानता अधिक गडद होत आहे. बहुतेक खाद्यपदार्थ काही प्रमाणात प्रक्रियेतून जात असतात. गहू दळून पीठ करणे किंवा तांदूळ-दाळ मिलिंग करून टिकाऊ बनवणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण जेव्हा शेतीमालावर कारखान्यांमध्ये अतिरेकी प्रक्रिया केली जाते, रासायनिक बदल घडवले जातात, अ‍ॅडिटिव्हज मिसळून ते पदार्थ कृत्रिमरीत्या आरोग्यदायी असल्याचा भ्रम निर्माण करत बाजारात मोठ्या ब्रँडिंगसह विकले जातात तेव्हा समस्या निर्माण होते.

पारंपरिक प्रक्रियांनुसार वाळवणे, थंड करणे, गोठवणे, पाश्चराईज करणे, बेक करणे, आंबवणे किंवा बाटलीबंद करणे या पद्धतींनी अन्नपदार्थांचा नैसर्गिकपणा टिकून राहतो, त्याचे आयुष्य वाढते आणि चवही सुधारते; पण अल्ट्रा प्रोसेसिंगमुळे अन्नपदार्थांमध्ये खोल रासायनिक बदल होतात. त्यांना दीर्घकाळ टिकणार्‍या, रेडी टू ईट उत्पादनांमध्ये रूपांतरित केले जाते आणि त्यांना दीर्घकाळ टिकणार्‍या, रेडी टू ईट उत्पादनांमध्ये रूपांतरित केले जाते. अशा उत्पादनांमध्ये साखर मिसळलेले पेय, पॅकेज्ड स्नॅक्स, चिप्स, इन्स्टंट नूडल्स, तयार मांस, काही नाश्त्याचे सीरियल्स आणि फ्लेवर्ड योगर्ट यांचा समावेश आहे. या प्रकारच्या अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन वाढल्याने ताजे, कमी प्रक्रिया केलेले अन्न आपोआपच दैनंदिन आहारातून कमी होत जाते आणि त्याऐवजी शरीरासाठी हानिकारक कॅलरी, चरबी, साखर व मीठ वाढत जाते. यातून स्थूलता, हृदयविकार, मधुमेह आणि अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

अल्ट्रा प्रोसेसड फूड हे केवळ मानवी शरीरासाठीच नव्हे, तर पृथ्वीच्या आरोग्यासाठीही घातक आहे. कारण, अशा उत्पादनांच्या निर्मिती आणि वाहतुकीसाठी प्रचंड जैविक इंधनाचे ज्वलन होते. तसेच त्यांचे पॅॅकेजिंग बहुतेकदा प्लास्टिकचे असल्याने पर्यावरणात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. ‘द लॅन्सेट’च्या या शृंखलेत जगभरातून गोळा केलेल्या पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्या पुराव्यांनुसार पारंपरिक, पोषणप्रधान खाद्य संस्कृती वेगाने नष्ट होत चालली असून तिची जागा अल्ट्रा प्रोसेसड खाद्यपदार्थ घेत आहेत. आतापर्यंत जंक फूडचे प्रमाण तुलनेने कमी होते, अशा प्रदेशांमध्येही ही सवय पसरण्यास सुरुवात झाली आहे. अल्ट्रा प्रोसेसड पदार्थांची सवय लागल्याने आहाराची गुणवत्ता लक्षणीयरीत्या घसरते, हेही या अभ्यासातून समोर आले आहे. जागतिक अभ्यासानुसार, आधुनिक खाद्य संस्कृतीत अल्ट्रा प्रोसेसड पदार्थांनी व्यापलेली जागा ही दीर्घकालीन आजारांच्या वाढत्या ओझ्याचे एक प्रमुख कारण ठरली आहे. इतक्या स्पष्ट पुराव्यानंतरही सरकारे आणि धोरणकर्ते या उद्योगावर कठोर नियमन लागू करण्यास कचरतात, ही खरी शोकांतिका आहे. यामागचे कारण, जंक फूड उद्योग इतका ताकदवर झाला आहे की, तो सतत लॉबिंग, मार्केटिंग आणि जनसंपर्क मोहिमांद्वारे धोरणनिर्मितीवर जबरदस्त प्रभाव टाकतो.

‘द लॅन्सेट’ शृंखलेत दाखवलेल्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये कोका-कोला, पेप्सिको आणि मोंडेलेझ या तीन मोठ्या कंपन्यांनी मिळून एकूण 13.2 अब्ज डॉलर केवळ जाहिरातींवर खर्च केले. ही रक्कम जागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक बजेटपेक्षा जवळजवळ चारपट अधिक आहे. जंक फूड मार्केटिंगचा उद्देश लोकांच्या सांस्कृतिक आवडीनिवडी बदलणे, मागणी निर्माण करणे आणि आरोग्यास हानिकारक पदार्थांना सामान्य व स्वीकारार्ह बनवणे हा आहे. कोका-कोला दररोज 200 देशांमध्ये 2.2 अब्ज बाटल्या किंवा कॅन विकते, ज्यांची निर्मिती 950 बॉटलिंग प्लांटद्वारे केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्पादन व वितरण क्षमता त्यांना प्रचंड राजकीय प्रभाव देते. त्या पुरवठा, रोजगार आणि गुंतवणूक थांबवण्याची धमकी देऊन सरकारांवर दबाव आणतात. सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञांनी या कॉर्पोरेट राजकीय हस्तक्षेपाला अल्ट्रा प्रोसेसड फूडमुळे होणारे नुकसान नियंत्रित करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हटले आहे.

या मोठ्या कंपन्या तंबाखू आणि मद्य उद्योगाच्या धर्तीवरच आपली रणनीती आखतात. त्यांचा मुख्य हेतू विरोध दडपणे आणि नियामक अडथळे रोखणे हा असतो. त्यासाठी त्या आपले हितसंबंधी गट, प्रायोजित संशोधन संस्था आणि जागतिक नेटवर्कचा वापर करतात. लॉबिंगव्यतिरिक्त त्या सरकारी यंत्रणांमध्ये आपले लोक बसवतात, कॉर्पोरेट अनुकूल नियमन मॉडेल पुढे करतात आणि ‘वैज्ञानिक गोंधळ’ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जंक फूड उद्योगातील मोठे गट खाद्य नियामक संस्थांसोबत विविध ‘आरोग्य-जागृती’ कार्यक्रम चालवतात. प्रत्यक्षात ही सार्वजनिक आरोग्याची चेष्टा आहे; पण दुर्दैवाची बाब म्हणजे सरकार अद्याप स्पष्टपणे अतिरिक्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या अल्ट्रा प्रोसेसड पदार्थांची व्याख्या करू शकलेले नाही. 2017 मध्ये या पदार्थांच्या जाहिरातींवर निर्बंध आणण्याची सूचना देण्यात आली होती; परंतु ती अद्याप लागू झालेली नाही. अन्नधान्य प्रक्रिया मंत्रालयाची स्थापना शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी झाली होती. प्रत्यक्षात ते जंक फूड उद्योगाला प्रोत्साहन देणारे आणि त्यांना सबसिडी देणारे मंत्रालय बनले आहे. आता तरी प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ आणि अतिप्रक्रियायुक्त अन्नपदार्थ यात स्पष्ट फरक करण्याची वेळ आली आहे.

‘द लॅन्सेट’ शृंखलेचा स्पष्ट निष्कर्ष असा आहे की, पाकीटबंद उत्पादनांच्या पुढच्या बाजूस ठळक इशारा छापला गेला पाहिजे. एका बाजूला आरोग्य मंत्रालय असंसर्गजन्य रोगांच्या वाढीचा इशारा देत असताना दुसर्‍या बाजूला अन्नप्रक्रिया मंत्रालय जंक फूड उद्योगाला सबसिडी देते, ही परिस्थिती अत्यंत विसंगत आहे. योग्य आहार घेणे आणि तंदुरुस्त राहणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असते; परंतु सरकारने नागरिकांना योग्य निवड करता येईल, असे वातावरण तयार करणे, हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT