Lab Grown diamonds 
बहार

Lab Grown diamonds : आव्हान लॅब ग्रोन डायमंडचे

पुढारी वृत्तसेवा
सतीश पोतदार

लॅब ग्रोन डायमंड म्हणजेच प्रयोगशाळेत बनणार्‍या हिर्‍यामुळे खाणीतून सापडणार्‍या नैसर्गिक हिरे उद्योगाला चिंतेत टाकले आहे. याचे कारण, हा लॅब ग्रोन डायमंड दिसायला हुबेहूब अस्सल हिर्‍यासारखा असूनही त्याची किंमत तुलनेने अत्यल्प आहे. सत्य-असत्याच्या लढाईत जसा सत्याचा विजय होतो, तसेच नैसर्गिक हिर्‍याबाबतही घडेल का?

‘हिरा म्हणजे दुर्मीळ म्हणून मौल्यवान’ हे शतकानुशतके चालत आलेले बाजाराचे गणित आता बदलू लागले आहे. पृथ्वीच्या पोटात कोट्यवधी वर्षांच्या प्रक्रियेत तयार झालेल्या हिर्‍यासमोर काही आठवड्यांत प्रयोगशाळेत तयार होणारा हिरा आव्हान बनून उभा राहिला आहे. याचे कारण दिसण्यातच नव्हे, तर रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांतही तो नैसर्गिक हिर्‍याशी साधर्म्य राखणारा आहे. असे असूनही त्याची किंमत कितीतरी कमी आहे. ग्राहकाला तेवढ्याच पैशात मोठा हिरा मिळत असल्याने अमेरिका आणि इतर प्रमुख बाजारांत ‘लॅब ग्रोन डायमंड’ची मागणी वाढत आहे. साहजिकच याचा थेट फटका नैसर्गिक हिर्‍यांच्या मागणीला बसत असून भारतातील विशेषतः सुरतमधील हिरे उद्योगासमोर हा बदल मोठे आव्हान घेऊन आला आहे.

हिर्‍याची किंमत नेमकी कशासाठी मोजायची, त्याच्या नैसर्गिक दुर्मीळतेसाठी की त्याच्या सौंदर्य आणि आकारासाठी, या ग्राहकाच्या पारंपरिक मानसिकतेतच बदल होत आहे. त्यामुळे खाण कंपन्यांपासून कापणी करणार्‍या, पैलू पाडणार्‍या कारखान्यांपर्यंत, घाऊक व्यापार्‍यांपासून किरकोळ दागिने विक्रेत्यांपर्यंत संपूर्ण साखळी अस्वस्थ झाली आहे.

प्रयोगशाळेतील हिरा नकली नाही!

‘लॅब ग्रोन’ हिरा म्हटले की, तो क्युबिक झिरकोनिया किंवा मॉईसनाईटसारखा हिर्‍याचा केवळ पर्याय आहे, असा गैरसमज होऊ शकतो. प्रत्यक्षात तसे नाही. प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिर्‍याचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म नैसर्गिक हिर्‍याशी मिळतेजुळते असतात. मुख्य फरक त्याच्या उत्पत्तीचा आहे. नैसर्गिक हिरा पृथ्वीच्या अंतरंगातील प्रचंड दाब आणि तापमानाखाली तयार होतो. याउलट प्रयोगशाळेतील हिरा नियंत्रित परिस्थितीत तयार केला जातो.

यासाठी प्रामुख्याने ‘एचपीएचटी’ म्हणजे उच्च दाब-उच्च तापमान आणि ‘सीव्हीडी’ म्हणजे केमिकल व्हेपर डिपॉझिशन या दोन पद्धती वापरल्या जातात. नैसर्गिक हिर्‍याच्या निर्मितीसाठी लागणारी परिस्थिती एचपीएचटी पद्धतीत कृत्रिमरीत्या निर्माण केली जाते, तर सीव्हीडीमध्ये कार्बनयुक्त वायूपासून नियंत्रित वातावरणात हिरा वाढविला जातो. नैसर्गिक हिर्‍याला तयार होण्यासाठी भूगर्भात प्रचंड काळ लागतो. प्रयोगशाळेत मात्र काही आठवड्यांत हिरा तयार करता येतो. यामुळेच हिरे व्यवसायातील मूलभूत अर्थशास्त्र बदलले. नैसर्गिक हिर्‍यांचा पुरवठा नवीन खाणी सापडणे, त्या विकसित करणे आणि उत्खनन करणे यावर अवलंबून असतो. प्रयोगशाळेतील हिर्‍यांच्या बाबतीत उत्पादन क्षमता वाढविली की, पुरवठाही वाढविता येतो.

२०१९ पासून किमतीत ९० टक्के घसरण

व्यापार्‍यांच्या चिंतेचे सर्वांत मोठे कारण किंमत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार, प्रयोगशाळेत तयार होणार्‍या हिर्‍यांच्या घाऊक किमती २०१९ पासून सुमारे ९० टक्क्यांनी घसरल्या आहेत. २०१५ च्या आसपास दागिन्यांच्या बाजारात या हिर्‍यांचा व्यावसायिक विस्तार सुरू झाला, तेव्हा उत्पादन १० लाख रफ कॅरेटपेक्षाही कमी होते. २०२५ मध्ये दागिन्यांसाठी वापरल्या जाणार्‍या प्रयोगशाळेतील कच्च्या हिर्‍यांचे उत्पादन सुमारे २.५ कोटी कॅरेटपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. चीन आणि भारत हे त्यांचे प्रमुख उत्पादक बनले आहेत.

किमतीतील फरक किती मोठा आहे, हे १ कॅरेटच्या हिर्‍याच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातील बाजारमूल्यानुसार १ कॅरेटचा नैसर्गिक हिरा सुमारे ४,२२० डॉलरला मिळत असताना त्याच आकाराचा प्रयोगशाळेतील हिरा सुमारे ८०० डॉलरमध्ये मिळतो. तीन कॅरेटमध्ये हे अंतर आणखी वाढते. नैसर्गिक हिर्‍याची किंमत सुमारे ५५,२५५ डॉलर, तर प्रयोगशाळेतील हिर्‍याची किंमत सुमारे ३,७३५ डॉलर अशी नोंदविण्यात आली आहे. मध्यम उत्पन्न गटातील तरुण ग्राहकासाठी हे अंतर दुर्लक्ष करण्यासारखे नाही. ठरावीक रकमेत छोटा नैसर्गिक हिरा घेण्याऐवजी त्याच रकमेत मोठा प्रयोगशाळेतील हिरा मिळत असेल, तर दागिन्याचा आकार आणि देखणेपणाला प्राधान्य देणारा ग्राहक दुसरा पर्याय निवडणे स्वाभाविक आहे. नैसर्गिक हिर्‍यांच्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या श्रेणीवर याच बदलाचा अधिक दबाव येत आहे.

अमेरिकेतील बदल महत्त्वाचा

या उलथापालथीचा केंद्रबिंदू अमेरिका आहे. जगातील प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या मागणीपैकी ७५ टक्क्यांहून अधिक मागणी अमेरिकेतून येते, असे आयएमएफने नमूद केले आहे. त्याचबरोबर २०२४ मध्ये जागतिक डायमंड ज्वेलरी विक्रीतील प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांचा वाटा २० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचा अंदाजही अहवालात आहे.

लॅबग्रोन डायमंडमुळे नैसर्गिक हिर्‍यांचा बाजार संपत आहे, असा निष्कर्ष यावरून काढणे घाईचे ठरेल. याचे कारण डी-बिअर्सच्या जून २०२६ च्या अहवालानुसार अमेरिकेतील एकूण डायमंड मागणीच्या मूल्यामध्ये २०२५ मध्ये नैसर्गिक हिर्‍यांचा वाटा ७५ टक्के होता. स्वतंत्र ज्वेलर्सच्या विक्रीत तो ८५ टक्के होता. नैसर्गिक हिर्‍याला ‘खरा’, दुर्मीळ, पिढ्यान्‌पिढ्या देता येणारा आणि भावनिक मूल्य असलेला दागिना मानणारा ग्राहकवर्ग अजूनही मोठा आहे; मात्र दुसर्‍या बाजूला प्रयोगशाळेतील हिर्‍यांची खरेदीही वाढत आहे. डी-बिअर्सच्या पाहणीनुसार २०२५ मध्ये अमेरिकेतील प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या खरेदीचे प्रमाण ९ टक्क्यांपर्यंत पोहोचले. अशा हिर्‍यांच्या खरेदीची सरासरी किंमत २,७८६ डॉलर होती, तर नैसर्गिक हिर्‍यांसाठी ती ४,०६३ डॉलर होती. प्रयोगशाळानिर्मित हिर्‍याची ४८ टक्के खरेदी १,००० डॉलरपेक्षा कमी किमतीत झाली. नैसर्गिक हिर्‍यांमध्ये हे प्रमाण ३४ टक्के होते.

बदलाचे प्रतिबिंब

जागतिक हिरे व्यापारातील कोणताही बदल भारतासाठी दूरचा विषय राहत नाही. सुरत हे जगातील नैसर्गिक हिर्‍यांच्या कापणी आणि पैलू पाडण्याचे सर्वांत मोठे केंद्र आहे. आता हेच शहर प्रयोगशाळेत तयार होणार्‍या सीव्हीडी हिर्‍यांचेही प्रमुख उत्पादन केंद्र बनले आहे. अनेक भारतीय कंपन्या नैसर्गिक आणि प्रयोगशाळानिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या हिर्‍यांमध्ये काम करीत आहेत.

२०२६ मध्ये या बदलाने आणखी महत्त्वाचा टप्पा गाठला. ‘जीजेईपीसी’च्या माहितीनुसार मार्च २०२६ मध्ये भारतातून १३ लाख कॅरेट लूज लॅब ग्रोन हिर्‍यांची निर्यात झाली, तर नैसर्गिक हिर्‍यांची निर्यात १२ लाख कॅरेट होती. एप्रिलमध्ये लॅब ग्रोन निर्यात १४ लाख कॅरेट आणि नैसर्गिक हिर्‍यांची १३ लाख कॅरेट होती. म्हणजे सलग दोन महिन्यांत निर्यातीच्या आकारमानात प्रयोगशाळेतील हिर्‍यांनी नैसर्गिक हिर्‍यांना मागे टाकले. २०२०-२१ मध्ये लॅब ग्रोन हिर्‍यांची निर्यात सुमारे ४० लाख कॅरेट होती. २०२४-२५ मध्ये ती १.५ कोटी कॅरेटच्या पुढे गेली. याच काळात नैसर्गिक हिर्‍यांची निर्यात सुमारे २.२ कोटी कॅरेटवरून १.६६४ कोटी कॅरेटपर्यंत खाली आली.

उत्पादन वाढतेय; पण कमाईचे काय?

प्रयोगशाळेतील हिर्‍यांच्या उद्योगाबाबत एक विरोधाभासही आहे. उत्पादन आणि निर्यातीचे प्रमाण वाढत असले, तरी किमती झपाट्याने घसरत असल्यामुळे अधिक हिरे विकूनही अधिक उत्पन्न मिळेलच असे नाही. जीजेईपीसीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये निर्यातीचे आकारमान वाढूनही भारताची पॉलिश्ड लॅब ग्रोन हिर्‍यांची निर्यात मूल्याच्या दृष्टीने १०.५५ टक्क्यांनी घटून १.१३ अब्ज डॉलर झाली. यामागे बाजारातील सातत्यपूर्ण ‘प्राईस करेक्शन’ हे कारण असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. याचाच अर्थ नैसर्गिक हिरे व्यापार्‍यांनाच संकट आहे आणि लॅब ग्रोन उद्योगात सर्वत्र भरभराट आहे, असे चित्र नाही. प्रयोगशाळेतील हिर्‍यांचा पुरवठा जितक्या वेगाने वाढतो, तितक्याच वेगाने त्यांची किंमत कमी होण्याचा धोका आहे. किरकोळ विक्रेत्याला आज चांगले मार्जिन मिळत असले, तरी ग्राहकाने काल अधिक किमतीला घेतलेल्या हिर्‍याची बाजारातील किंमत काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कमी झाली, तर त्याच्या दीर्घकालीन मूल्याविषयी प्रश्न निर्माण होतो.

रोजगारावरही परिणाम

भारतासाठी या बदलाचा सर्वांत संवेदनशील भाग रोजगाराचा आहे. सुरतचा हिरे उद्योगावर लाखो कारागीर, लहान पॉलिशिंग युनिट, दलाल, वाहतूकदार आणि संबंधित व्यवसाय अवलंबून आहेत. आजघडीला या उद्योगाशी सुमारे ८ लाख कामगार जोडलेले आहेत. नैसर्गिक हिर्‍यांच्या व्यवसायातील मंदीमुळे काही कारागीर प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या कापणी-पॉलिशिंगकडे वळले आहेत; पण हा पर्यायही पूर्ण सुरक्षित नाही. दोन वर्षांपूर्वी लॅब ग्रोन हिर्‍यांच्या किमतीतील घसरणीमुळे या क्षेत्राशी संबंधित सुमारे ४ लाख कामगारांमध्ये रोजगाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यामुळे बदलत्या बाजारात कामगारांची कौशल्ये, लहान उद्योगांचे भांडवल आणि निर्यातदारांचे उत्पन्न कसे टिकवायचे, हा अधिक मोठा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT