Paul Mackenzie | नरसंहारी ‘धर्मगुरू’ची क्रौर्यकथा 
बहार

Paul Mackenzie | नरसंहारी ‘धर्मगुरू’ची क्रौर्यकथा

पुढारी वृत्तसेवा

प्रसाद पाटील

केनियामधील शाकाहोला जंगलात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गूढ हत्याकांडाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या नरसंहाराच्या खटल्याचा निकाल जाहीर झाला आणि त्याची पुन्हा एकदा जगभर चर्चा सुरू झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी पॉल नथंगे मॅकेन्झी याच्यावर तब्बल १९१ जणांच्या हत्येचा आरोप आहे. जगाचा अंत जवळ आला असून येशूला भेटण्यासाठी उपाशी राहून प्राणत्याग करणे, हाच पवित्र मार्ग असल्याचे मॅकेन्झी आपल्या अनुयायांना सांगत होता.

धर्म माणसाला जगण्याचा आधार देतो, असे मानले जाते. संकटाच्या काळात श्रद्धेमुळे मानसिक बळ मिळते, निराशेवर मात करण्याची प्रेरणा मिळते आणि आयुष्याला काही अर्थ प्राप्त होतो; परंतु याच शद्धेचे रूपांतर आंधळ्या समर्पणात झाले आणि एखाद्या व्यक्तीला ईश्वराचा प्रतिनिधी मानून त्याच्या प्रत्येक आदेशाचे पालन करणे हेच धर्माचरण ठरले, तर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात, याचे उदाहरण केनियामध्ये समोर आले आहे. स्वतःला धर्मगुरू म्हणविणार्‍या पॉल मॅकेन्झीने आपल्या अनुयायांना उपाशी राहून मृत्यू स्वीकारण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणात १९० लहान मुले आणि एका प्रौढ व्यक्तीच्या हत्येसाठी मॅकेन्झी आणि त्याच्या २८ सहकार्‍यांना केनियातील न्यायालयाने दोषी ठरविले. या पंथाशी संबंधित ४०० हून अधिक मृतदेह जंगलातून सापडले आहेत. आधुनिक जगात श्रद्धेच्या नावाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसांचा बळी जाणे ही घटना मानवी विवेकबुद्धी, सामाजिक व्यवस्था आणि शासनाच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली. मृतांमध्ये १९० लहान मुले आणि एका प्रौढ व्यक्तीचा समावेश असल्याचे या खटल्यात नमूद करण्यात आले. केनियातील मोम्बासा शहरात न्यायमूर्ती डायना केडा यांनी सुमारे आठ तास निकालपत्राचे वाचन केल्यानंतर मॅकेन्झी आणि त्याच्या सहकार्‍यांना दोषी ठरवले. आता ६ नोव्हेंबर रोजी त्याला शिक्षा सुनावली जाणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले.

या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूला कारणीभूत ठरलेली पद्धत. जगाचा अंत जवळ आला असून येशूला भेटण्यासाठी उपाशी राहून प्राणत्याग करणे हाच पवित्र मार्ग असल्याचे मॅकेन्झी आपल्या अनुयायांना सांगत होता. त्याच्या या उपदेशावर विश्वास ठेवून शेकडो लोकांनी अन्नपाणी सोडले. लहान मुलांनाही उपाशी ठेवण्यात आले. अन्नाची मागणी करणार्‍या किंवा जंगलातून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना मारहाण केली जात होती. काहींचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालांतून समोर आले. या सर्व प्रकारामुळे केनियातील शाकाहोला जंगल शेकडो लोकांचे सामूहिक स्मशान बनले. पॉल मॅकेन्झी धर्मगुरू होण्यापूर्वी केनियातील नैरोबी आणि मालिंदी शहरांमध्ये टॅक्सीचालक म्हणून काम करीत होता. पुढे त्याने धार्मिक उपदेश करण्यास सुरुवात केली. त्याने २००३ मध्ये ‘गुड न्यूज इंटरनॅशनल मिनिस्ट्रीज’ नावाच्या चर्चची स्थापना केली. सुरुवातीला तो बायबलमधील शिकवण सांगत असे. त्याच्या बोलण्याचा लोकांवर प्रभाव पडू लागला आणि हळूहळू अनुयायांची संख्या वाढली. पुढील काही वर्षांत केनियाच्या विविध भागांत त्याचे समर्थक तयार झाले.

मॅकेन्झीने आपला प्रभाव चर्चपुरता मर्यादित ठेवला नाही. त्याने ‘टाईम्स टीव्ही’ नावाची स्वतंत्र दूरचित्रवाणी वाहिनी सुरू केली. या वाहिनीवरून तो आपल्या धार्मिक पंथाचा प्रचार करीत असे. धार्मिक प्रवचने, भूतबाधा दूर करण्याचे दावे आणि जगाच्या अंताविषयीची भाकिते यांमुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याची प्रवचने इंटरनेटवरही प्रसारित होत होती. दूरचित्रवाणीवर दिसणारा आणि सातत्याने धार्मिक उपदेश करणारा माणूस आपली फसवणूक करू शकतो, अशी शंकाही अनेक अनुयायांच्या मनात निर्माण झाली नाही. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमधील अनेक लोक त्याच्या प्रभावाखाली आले.

मॅकेन्झीच्या उपदेशांमध्ये आधुनिक जीवनपद्धतीविषयी भीती निर्माण करण्यावर विशेष भर होता. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणे पाप असल्याचे तो सांगत असे. आजारी पडल्यास डॉक्टरांकडे जाणे किंवा औषधे घेणे हे देवाच्या नियमांविरुद्ध असल्याचा त्याचा दावा होता. आजारपणातून मुक्त होण्यासाठी प्रार्थनाच पुरेशी असल्याचे तो अनुयायांच्या मनावर बिंबवत असे. जन्मदाखले, ओळखपत्रे आणि इतर सरकारी कागदपत्रे ही सैतानाची चिन्हे असल्याचे सांगून ती नष्ट करण्यास तो प्रवृत्त करीत होता. त्याच्या सांगण्यावरून अनेकांनी नोकर्‍या सोडल्या, मुलांचे शिक्षण थांबवले, जमिनी विकल्या आणि बँकांमधील पैसे काढून घेतले. या प्रकारांमुळे स्थानिक प्रशासनाचे लक्ष मॅकेन्झीकडे गेले होते. मुलांचे शिक्षण थांबवणे आणि वैद्यकीय उपचार नाकारणे यांसारख्या प्रकरणांत २०१७ आणि २०१९ मध्ये त्याला अटकही झाली होती; मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याचे उपक्रम सुरूच राहिले. शहरात राहिल्यास कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, याची जाणीव झाल्यानंतर त्याने आपल्या अनुयायांना दूरवरच्या जंगलात नेण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये मालिंदी येथील मुख्य चर्च बंद करून त्याने शाकाहोला जंगलाकडे मोर्चा वळवला.

मालिंदी शहरापासून दूर असलेल्या या जंगलातील सुमारे ८०० एकर परिसरात मॅकेन्झीने आपले स्वतंत्र साम्राज्य उभे केले. जगाचा अंत जवळ आला असून या संकटातून वाचण्यासाठी जंगलातील पवित्र भूमीवर जाणे आवश्यक असल्याचे त्याने अनुयायांना सांगितले. त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवून अनेक कुटुंबांनी आपली घरे आणि नोकर्‍या सोडल्या. काहींनी जमा केलेली संपत्ती चर्चला दान केली. जंगलातील जमिनीचे छोटे तुकडे अनुयायांना विकण्यात आले. आपण देवाच्या आशीर्वादाने सुरक्षित ठिकाणी राहत आहोत, असा त्यांचा समज होता. प्रत्यक्षात जंगलात पोहोचल्यानंतर अनुयायांचे बाहेरच्या जगाशी असलेले संबंध तोडण्यात आले. मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली. नातेवाईकांशी संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आली. मॅकेन्झीने संपूर्ण परिसरात नियंत्रणाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली. जंगलात १२ वेगवेगळ्या वस्त्या तयार करण्यात आल्या आणि प्रत्येक वस्तीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रमुख नेमण्यात आले. त्यांच्या हाताखाली सुरक्षारक्षक कार्यरत होते. कोणालाही जंगलातून बाहेर पडता येऊ नये, याची काळजी घेतली जात होती. अशाप्रकारे धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली अनुयायांच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात आले.

जानेवारी २०२३ च्या सुमारास मॅकेन्झीने आता जग संपण्याची घटिका समीप आली, असे सांगत आपल्या अनुयायांना मृत्यू येईपर्यंत उपवास करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेसाठी त्याने वेगवेगळे टप्पे निश्चित केले होते. सर्वप्रथम लहान मुलांनी अन्नपाणी सोडायचे, त्यानंतर महिला आणि अविवाहित तरुणांनी उपाशी राहायचे आणि शेवटी पुरुष व वृद्धांनी प्राणत्याग करायचा, अशी त्याची योजना होती. स्वतः सर्वांत शेवटी उपवास करून स्वर्गात जाणार असल्याचे त्याने अनुयायांना सांगितले होते. या आदेशानंतर जंगलात मृत्यूचे थैमान सुरू झाले. शवविच्छेदन अहवालांमध्ये अनेक मृतदेहांवर गंभीर जखमा आणि गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या. मृत्यू झालेल्या व्यक्तींना जंगलातील सामूहिक कबरींमध्ये पुरले जात होते. बाहेरच्या जगाला या प्रकाराची माहिती मिळू नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात होती. जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी कबरी तयार करण्यात आल्या होत्या. काही दिवसांतच या परिसरात मृतदेहांची संख्या वाढत गेली. एकीकडे अनुयायांना उपाशी राहण्याचे आदेश दिले जात असताना मॅकेन्झी आणि त्याच्या निकटवर्तीयांकडे अन्नपाण्याचा साठा होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT