करुण नायर Pudhari File Photo
बहार

कोण आहे हा करुण नायर?

यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा
विवेक कुलकर्णी

‘तुम्हारे जीत से जादा चर्चे हमारे हार के है,’ असे कोणाबद्दल म्हणावे तर ते म्हणजे क्रिकेटपटू करुण नायरबद्दल! अभिजात गुणवत्ता असलेला एखादा आघाडीचा, मध्यफळीतील फलंदाज आंतरराष्ट्रीय पटलावर येतो काय, त्रिशतक झळकावत सेहवागच्या मांदियाळीत थाटाने दाखल होतो काय अन् पाहता पाहता इतके करूनही अचानक क्रिकेटच्या पटलावरून बाजूला फेकला जातो काय? सारेच अनाकलनीय... हाच अवलिया यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

इंग्रजीमध्ये क्रिकेटविषयक एक संकल्पना आहे, ज्याचा आशय सांगतो की, सर्व बॉक्सेसना ‘टिक’ करतो, तो खेळाडू सर्वाधिक महत्त्वाचा! करुण नायर हा असाच एक खेळाडू, जो सर्व बॉक्सेसना हमखास ‘टिक’ करून जातो! विजय हजारे चषक स्पर्धेत 779 धावांची रास ओतल्यानंतर आणि तोच धडाका रणजीत 863 धावांसह गाजवल्यानंतर आता हा खेळाडू आयपीएलचे रणांगण गाजवण्यासाठी डेरेदाखल सज्ज झालाय... आश्चर्य म्हणजे ही तीच आयपीएल आहे, जेथे करुण नायरसारखा अभिजात गुणवत्तेचा खेळाडू अक्षरश: एक संधी मिळावी, यासाठी कळवळत होता... कित्येक उंबरठे झिजवत होता!

करुण नायरने यापूर्वी आपली शेवटची आयपीएल खेळली ती 2022 मध्ये... त्यानंतर मात्र त्याच्यासाठी गर्भश्रीमंतीची रास ओतून गलेलठ्ठ पॅकेज देणार्‍या आयपीएल नामक या ‘अलीबाबा’चे दरवाजे बंद झाले ते 3 वर्षांसाठीच! 10 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 7 वाजून 34 मिनिटांनी टाकलेली पोस्ट भल्याभल्यांचे डोळे उघडवणारी होती... अभिजात गुणवत्ता असतानाही कधी कधी नियती कशी थेट जमिनीवर येणे भाग पाडते, ते दर्शवणारी होती... करुण आपल्या त्या पोस्टमध्ये म्हणाला होता, ‘डियर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स!’

नंतर तीन वर्षांनी का होईना; पण अखेर नियतीने त्याला आणखी एक संधी दिलीच... चार-पाच महिन्यांपूर्वी सालाबादप्रमाणे मेगा ऑक्शन झाले आणि त्यात दिल्ली कॅपिटल्सने नायरसाठी दरवाजे उघडले... आता हे दरवाजे उघडले गेले तेही जेमतेम 50 लाखांच्या त्याच्या बेस प्राईसपुरते... पण जवळपास तीन वर्षे आ वासून प्रतीक्षा करणार्‍या करुणसाठी हेदेखील खूप होते... त्याची धावांची भुकेली बॅट एका संधीसाठी, ज्यात तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्यासाठी शिवशिवतच होती... म्हणतात ना, लोहा गरम है... मार दो हातोडा... नायरने नेमके तेच केले... त्याची बॅट सफाईने तुटून पडत राहिली... अगदी अंतिम क्षणी सामना गमवावा लागला असला तरी दिल्ली कॅपिटल्ससाठी आशेचा आणखी एक किरण उगवला होता!

तारीख होती 13 एप्रिल... ती लढत होती मुंबई इंडियन्सविरुद्धची... समोर 205 धावांचे मोठाले आव्हान होते... पण इकडे 3 वर्षे संधीच्या (नव्हे सुवर्णसंधीच्या!) प्रतीक्षेत असलेल्या करुण नायरचे इरादे अतिशय बुलंद होते! त्याने समोर येणार्‍या जवळपास प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याचा शिरस्ताच सुरू केला... मुंबईची क्षेत्ररचना हळूहळू पांगवली गेली... गोलंदाजीत अनेक कल्पक बदल केले गेले... पण या सर्व प्रयत्नांचा जिगरबाज नायरसमोर अजिबात तग लागत नव्हता... नायर हळूहळू विजयाचा आपला हातातोंडातील घास हिसकावून घेणार, याची भीती मुंबईला जाणवू लागली होती... पण एक क्षण कलाटणी देणारा असाही आला, ज्यात करुण नायरने आपली विकेट गमावली... प्रचंड डोकेदुखी ठरत आलेल्या नायरला सँटेनरने त्रिफळाचीत करत मोठा अडसर दूर केला... तसे पाहता नायर बाद झाला, त्यावेळी दिल्लीने 11.4 षटकांत 3 बाद 135 धावांपर्यंत मजल मारली होती... विजयासाठी उर्वरित 8.2 षटकांत 70 धावांची आवश्यकता होती... पण नायर बाद झाला आणि दिल्लीच्या अन्य फलंदाजांनी जणू शस्त्रे खाली टाकली... पडझड होत राहिली... डावातील 19 व्या षटकात चौथ्या चेंडूवर आशुतोष शर्मा, पाचव्या चेंडूवर कुलदीप यादव व शेवटच्या चेंडूवर मोहित शर्मा असे चक्क 3 फलंदाज हॅट्ट्रिक धावचित झाले आणि 7 बाद 193 वरून सर्वबाद 193 धावांसह दिल्लीच्या संघर्षाला विराम मिळाला... मुंबईने नाट्यमय आणि तितकीच अनपेक्षित बाजी मारली!

आता भले दिल्लीने तो सामना गमावला असेल... पण करुण नायर नामक लढवय्या फलंदाजाला जो सूर सापडला, तो त्यांच्यासाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा होता! तसे पाहता, बुमराहसारख्या कसलेल्या जागतिक दर्जाच्या अव्वल गोलंदाजाची धुलाई करणे हे कोणासाठीही कमालीचे अवघड... अगदी विराटनेदेखील बुमराहला सामोरे जाणे आव्हानात्मक वाटते, असे खुल्या दिलाने कबूल केले होते... पण त्याच बुमराहची या करुण नायरने जी धुलाई केली, ती निव्वळ डोळ्यांत साठवण्यासारखी होती... खर्‍या अर्थाने त्या दिवशी नायरने शिवधनुष्य लीलया उचलले! पाहता पाहता त्याने 22 चेंडूंत धुमधडाक्यात अर्धशतक साजरे केले. 40 चेंडूंत 89 धावांची डोळे दीपवणारी ती इनिंग खेळली! नायरच्या या पराक्रमाचीच एक पोचपावती म्हणजे त्या दिवशी गुगल सर्चमधील ट्रेंड! 13 एप्रिलच्या त्या रात्री 10 वाजून 13 मिनिटांपर्यंत गुगलवर एक विषय ट्रेंडमध्ये होता.... नेटिझन्सनी त्यावेळी करुण नायर डीसी, करुण नायर आयपीएल, करुण नायर स्टेट, करुण नायर व्हर्सेस बुमराह अशा सर्चची जणू मालिकाच लावली... सारांशात, गुगलला एकच प्रश्न विचारला जात होता, कोण आहे हा करुण नायर?

आता, आयपीएलमध्ये करुण नायरची बॅट सध्या तळपली असली तरी त्याचा पूर्वानुभव फारसा लक्षवेधी अजिबात नाही, हे त्याच्या आकडेवारीवरून जरूर जाणवते... याचे कारण म्हणजे 2025 पूर्वी त्याचे आयपीएलमधील शेवटचे अर्धशतक होते 2018 मध्ये... त्याने पंजाब किंग्जतर्फे त्या हंगामात 13 सामने खेळले... यानंतर मात्र बरीच ओहोटी लागली... 2019 मध्ये केवळ एकच सामना, 2020 मध्ये 4, तर 2022 मध्ये तीनच सामने त्याच्या वाट्याला आले... दरवाजे बंद झाले... यंदा मात्र दरवाजेही उघडले आणि करुण नायरला सूरही सापडला! तब्बल 2,520 दिवसांनी त्याने आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले! पुढे राजस्थान रॉयल्सविरुद्ध शून्यावर बाद व्हावे लागल्यानंतर नायर पुन्हा अपयशाच्या गर्तेत लोटला जाणार का, अशीही चिंतेची लकेर जरूर उमटून गेली... पण विजयश्री नेहमी शुराच्या गळ्यातच यशाची माळ घालते, हा पूर्वेतिहास नायरने लक्षात ठेवला तरी ते ही भरपूर असेल, यशाच्या भक्कम पायाभरणीची आणखी एक नांदी असेल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT