Karthiki Ekadashi | ऐसा हा योगिराजु, तो विठ्ठल मज उजु 
बहार

Karthiki Ekadashi | ऐसा हा योगिराजु, तो विठ्ठल मज उजु

पुढारी वृत्तसेवा

डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ

महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाच्या मुख्य स्रोताच्या केंद्रस्थानी आहे पंढरीचा श्री विठ्ठल आहे. श्री विठ्ठलाच्या पायी माथा टेकण्यासाठी असंख्य वारकरी तसेच भक्तिवंत मोठ्या श्रद्धेनं त्याच्याकडं जातात. जणूकाही ‘विठो पालवीत आहे’ या भावनेनं त्याच्या पायी माथा टेकतात. असा देवही कुठं नाही अन् असे भक्तही नाहीत.

आज कार्तिकी एकादशी, त्यानिमित्त...

आपल्याकडे धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक पंधरवड्यातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्याचे पंधरा दिवसांचा एक असे दोन भाग असतात. पहिल्या भागाला शुक्ल किंवा शुद्ध पक्ष असे म्हणतात, तर दुसर्‍या पंधरवड्याला कृष्ण किंवा वद्य असे म्हणतात. त्यामुळे प्रत्येक महिन्यात शुद्ध किंवा शुक्ल आणि वद्य किंवा कृष्ण अशा दोन एकादशी असतात. चैत्र महिन्यापासून शुद्ध पंधरवड्यातील चौथी दशी म्हणजे शयनी एकादशी असते. तिला महाएकादशी असेही म्हटले जाते. महाएकादशीच्या दिवशी कसा दिनक्रम पाळावा, याबाबतची सविस्तर माहिती ‘धर्मसिंधु’, ‘निर्णयसिंधु’ या ग्रंथांमध्ये दिलेली आहे.

एकादशीची उत्पत्ती कशा प्रकारे झाली, याबद्दलची माहिती पद्मपुराणाच्या उत्तरकांडामध्ये सांगितलेली आहे. यासंदर्भात एक कथा यामध्ये सांगितली असून ती थोडक्यात अशी आहे. मूर नावाचा एक अत्यंत उन्मत्त राक्षस देवांना अतिशय छळत होता. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना करून त्यांना या दैत्याचा वध करण्याची विनंती केली. या कामामध्ये भगवान विष्णूंना एका देवतेचे साहाय्य झाले. तिच्या साहाय्याने विष्णूंनी त्या राक्षसाचा वध केला. त्यावेळी तिन्ही लोकांत, चारही युगांत आपले श्रेष्ठत्त्व असावे असे मागणे त्या देवतेने भगवान विष्णूंकडे मागितले. सर्व तीर्थांहून ती श्रेष्ठ समजली जावी, तसेच जो कोणी या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची भक्ती करेल त्यावर विष्णूंनी प्रसन्न व्हावे, असाही वर तिने मागितला. विष्णूंनी तो वर दिला आणि त्यांनी त्या देवीचे नाव एकादशी असे ठेवले. ज्या पद्मपुराणात एकादशीच्या उत्पत्तीसंबंधीची ही कथा आहे, त्यातच पुढे वर्षातील बारा एकादशींसंबंधितदेखील एकेक कथा आहेत.

एकादशी हे एक व्रत असून ते काम्य व नित्य अशा दोन प्रकारचे असते. एकादशीमध्ये स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत. पंचांगाप्रमाणे एकापाठोपाठ दोन एकादशी आल्या, तर पहिली एकादशी स्मार्त आणि दुसरी एकादशी भागवत असे म्हणतात. ती भागवत एकादशी वारकर्‍यांना अभिप्रेत असते. आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात येणारी प्रबोधिनी एकादशी व्रताच्या द़ृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. आषाढातील एकादशीला भगवान विष्णू निद्रा घेत असतात म्हणून तिला शयनी एकादशी असे म्हणतात, तर कार्तिक महिन्यातील एकादशीला ते जागृत होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात. या चातुर्मासात वारकरी मंडळी आणि इतर अनेक लोक व्रतवैकल्ये तसेच अनुष्ठान, विविध ग्रंथांचे पारायणे करतात. भागवत पुराणाचे वाचन या चार महिन्यांत रोज केले जाते. भाद्रपद महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सात दिवस भागवताचे वाचन करून आठव्या दिवशी गोवर्धन काला प्रसाद म्हणून वाटला जातो. पंढरपुरामध्ये देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरीचे पारायण, प्रवचन आदी कार्यक्रम नित्यनेमाने वारकर्‍यांनी समूहाने करावयाची असतात. यामध्ये अक्षरशः हजारो मंडळींचा दरवर्षी सहभाग असतो. पंढरपुरात तर याप्रमाणे कार्यक्रम करण्यासाठी किंवा श्रवण करण्यासाठी हजारो मंडळी वास्तव्य करून असतात. कारण, विठ्ठल किंवा पांडुरंग हे वारकर्‍यांचे दैवत आहे. ‘चंद्रभागेत करू स्नान। घेऊ पुंडलिकाचे दर्शन। किंवा ‘विठ्ठल मंदिराच्या कळसाचे घेऊ दर्शन अथवा पादस्पर्शपूर्वक विठ्ठलाचे दर्शन अशाप्रकारे यावेळी दर्शन घेतले जाते.

वारकर्‍यांच्या आणि भक्तांच्या द़ृष्टीने विठ्ठलच सर्व काही आहे. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, वाचावा विठ्ठल’ अशा प्रकारे सर्वत्र हा विठ्ठलच भरून राहिलेला आहे, असा भक्तांचा द़ृढ विश्वास आणि श्रद्धा आहे. उपासकांच्या कल्पनेनुसार देवतेची मूर्ती घडवली जाते. मूर्तीच्या माध्यमातून तत्त्वविचार, अध्यात्म सांगितले जाते. मूर्तिशास्त्राला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख आढळतात. सुरुवातीला पाषाणखंडरूपात आढळणार्‍या मूर्ती कालांतराने मनुष्यरूपात घडविल्या जाऊ लागल्या. देवतेचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी मूर्तीला अधिक हात, मस्तके, अलंकार अशी सजावट सुरू झाली. मूर्तिशास्त्राने सर्वसामान्यांचे चर्मचक्षू आणि भावचक्षू यांचा सूक्ष्म विचार केला. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन विखुरलेल्या समाजाने एकाच देवतेची उपासना करावी म्हणून संतांनी विठ्ठलमूर्तीचा विचार केला. विठ्ठलाच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला.

विठ्ठलाची मूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे. योग, भोग, वीर आणि अभिचारिक हे मूर्तीचे चार प्रकार असतात. पैकी भोग मूर्ती असते, ती ऐहिक प्राप्त करून देणारी, समृद्धी देणारी असते. जशी बालाजी-व्यंकटेशाची मूर्ती. वीर मूर्तीची उपासना सामर्थ्याचे उपासक करतात, जशी मारुतीची किंवा महिषासुरमर्दिनीची मूर्ती. योग मूर्ती भारतात उपलब्ध आहेत. विष्णूच्या मूर्ती आहेत. विठ्ठलाची मूर्तीही योगशास्त्राप्रमाणे आहे. विठ्ठलाच्या या मूर्तीला दोनच हात आहेत. एका हातात शंख आहे, तर दुसर्‍या हातात कमळ आहे. म्हणजे गदा आणि चक्र ही शस्त्रं त्याच्या हातात नाहीत. कारण, तो योगी आहे. ‘चित्तवृत्ति निरोध:’ असं पतंजलींनी म्हटलं आहे. योग करताना छाती, मान आणि डोकं एका ओळीत पाहिजे. तेही विठ्ठलाच्या या मूर्तीचं आहे आणि ती मूर्ती उभी आहे, म्हणून तिला स्थानक म्हणायचं.

वारकरी पंथातील आद्यगुरू संत ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याला योगीराज असे संबोधले आहे. म्हणूनच त्यांच्या समोर गेल्यानंतर प्रत्येकाचे भान हरपून जाते आणि कुठल्याही प्रकारचे मागणे मागितले जात नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘ऐसा हा योगिराजु, तो विठ्ठल मज उजु।’ उजु म्हणजे आवडणे. हा योगिराज आहे म्हणून मला आवडतो, असं कोणी म्हणावं? तर स्वत: योगी असलेल्या ज्ञानदेवांनी. याशिवाय शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकामध्ये ‘महा योगपीठे, तटे भीमरथ्याम, वरं पुंडरिकाय धातुमुनिंद्रै’ अशी सुरुवात आहे. म्हणजे, हे महायोगपीठ आहे. तिथे हा योगी विठ्ठल आहे. ज्ञानेश्वरही त्याला योगी म्हणतात. म्हणूनच विठ्ठलाचे परमभक्त हे निरिच्छ, संपत्तीचा मागे नसलेले, निर्मोही योगी आहेत असं आपल्याला दिसतं.

संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत जनाबाई, संत सखुबाई या सार्‍यांमुळे वारीला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि हिमालयात उगम पावणार्‍या गंगोत्रीची काशीला येईपर्यंत ज्याप्रमाणे सागरवत गंगा झाली तद्वत ज्ञानेश्वरांच्या काळापासून वारीला पूर येत गेला आणि आज तर लाखो लोकांच्या समुदायाने वारी दुथडी भरून वाहत असल्याचे दिसते. कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात वारकरी संप्रदायाचा चांगला प्रभाव आहे, हे सर्वांना ज्ञात आहे; पण तामिळनाडूतसुद्धा अगदी चेन्नईपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक ठिकाणी विठ्ठल- रुक्मिणीची मंदिरे आढळतात. त्यामुळे हा संप्रदाय सर्व दक्षिण भारतातदेखील पसरलेला आहे, हे लक्षात येते. महाराष्ट्राच्या तर धार्मिक जीवनाच्या मुख्य स्रोताच्या केंद्रस्थानी पंढरीचा श्री विठ्ठल आहे. आषाढी-कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठलाच्या पायी माथा टेकण्यासाठी असंख्य वारकरी तसेच भक्तिवंत मोठ्या श्रद्धेनं त्याच्याकडं जातात आणि बुद्धिवंत संशोधक त्याच्याकडं चिकित्सकपणे पाहतात. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी अनंत हालअपेष्टा सहन करीत, उन्हा-पावसाची पर्वा न करता आषाढीसाठी जणू काही ‘विठो पालवीत आहे’ या भावनेनं त्याच्या पायी माथा टेकण्यासाठी निरपेक्षपणे जातात, त्याचं तरी रहस्य काय आहे? ‘योगिया दुर्लभ’ अशा त्याचं केवळ दर्शन घडावं, या असीम श्रद्धेनं! असा देवही कुठं नाही अन् असे भक्तही नाहीत.

(शब्दांकन : विधिषा देशपांडे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT