प्रथमेश हळंदे
तीन वर्षांपूर्वी रीलिज झालेला ‘कांतारा’ हा कन्नड सिनेमा कन्नड सिनेसृष्टीइतकाच भारतीय सिनेमाच्या द़ृष्टीनेही एक महत्त्वाचा सिनेमा होता. ‘जे जास्त लोकल असेल तेच जास्त ग्लोबल होईल’ असा युक्तिवाद अनेकदा कॉर्पोरेट जगतात केला जातो. काळाच्या ओघात सिनेक्षेत्राला चकाकी आली आणि स्थानिक लोकजीवन, लोकसंस्कृतीवर आधारित सिनेमा व्यावसायिक सिनेमांच्या गर्दीपासून लांब गेला. असा सिनेमा बनवणं म्हणजे मर्यादित यश अशी धारणा होऊन बसली; पण ही धारणा खोडून काढण्याचं महत्कार्य ‘कांतारा’ने केलं.
कांतारा म्हणजे पवित्र जंगल. कर्नाटकच्या किनारी प्रदेशातली म्हणजेच तुळुनाडूमधली लोकसंस्कृती ‘कांतारा’ने मोठ्या पडद्यावर आणली. सुरुवातीला फक्त कन्नड भाषेत रीलिज झालेला हा सिनेमा मौखिक प्रसिद्धीच्या जोरावर दोन आठवड्यांतच इतर भाषांमध्येही रीलिज केला गेला. 400 कोटींहून अधिक कमाई केलेल्या या सिनेमाने व्यावसायिक यशाच्या पलीकडे जाऊन एका प्रादेशिक लोकसंस्कृतीला जगभरात पोहोचवलं. तांत्रिकद़ृष्ट्या कित्येक पटीने सरस असलेल्या या सिनेमाचं बजेट अवघ्या 16 कोटींचं होतं, हे विशेष!
नुकताच रीलिज झालेला ‘कांतारा : चाप्टर 1’ हा सिनेमा या पहिल्या सिनेमाचा प्रिक्वेल आहे. पहिला सिनेमा अर्थात ‘कांतारा : चाप्टर 2’मध्ये कथानायक शिवा हा आपल्या वस्तीच्या, जंगलाच्या रक्षणासाठी कसा लढतो आणि त्यासाठी तिथली लोकदैवतं अर्थात ‘दैव’ त्याला कशाप्रकारे मदत करतात, हे दाखवलं गेलं होतं. या सिनेमात ‘भूता कोला’ या धार्मिक लोकनृत्यासोबतच पंजुर्ली आणि गुलिगा या क्षेत्रपाल दैवतांचीही ओळख करून दिली गेली.
या सिनेमाच्या पूर्वार्धात शिवाचे वडील हे ‘भुता कोला’ सादर करत असतानाच अद़ृश्य होतात. त्यानंतर क्लायमॅक्समध्ये शिवाही अशाच पद्धतीने अद़ृश्य होतो आणि त्याच्या मुलाच्या मनात हे रहस्य जाणून घेण्याची उर्मी येते. या रहस्याचं उत्तर आता दोन वर्षांनी रीलिज झालेल्या ‘कांतारा : चाप्टर 1’मध्ये मांडण्याचा प्रयत्न या सिनेमाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीने मांडण्याचा प्रयत्न केलाय.
या नव्या सिनेमातल्या ‘भुता कोला’च्या द़ृश्यांमध्ये पंजुर्लीसोबतच जुन्या भागात केवळ अॅक्शन सीन्सपुरत्या मर्यादित राहिलेल्या गुलिगाचंही दर्शन होतं. यासोबतच गुलिगाची काही नवी रूपं या भागात पाहायला मिळतात, तसंच बेर्मे, कोरगज्जा स्वामी आणि चावुंडी या तीन नव्या दैवांचंही अनोखं रूप या सिनेमात दिसतं. ही दैव परंपरा तुळुनाडूच्या लोकांसाठी केवळ एक श्रद्धास्थान नसून, त्यांच्या जगण्याचा आणि त्यांच्या न्यायव्यवस्थेचा आधार आहे. तुळुनाडूतल्या सर्वात महत्त्वाच्या आणि लोकप्रिय दैवांपैकी पंजुर्ली हा एक देव. कैलास पर्वतावर एका मृत रानडुकराजवळ पार्वतीला त्या डुकराचं पिलू मिळालं. तिनं ते सांभाळून मोठं केलं. हे पिलू कैलासावर धुडगूस घालत असल्याने महादेवाने त्याला रक्षक देवतेच्या स्वरूपात तुळुनाडूमध्ये पाठवलं. स्थानिकांच्या मान्यतेनुसार, पंजुर्ली हा महादेवाच्या भूतगणांपैकी एक आहे. तुळू भाषेत रानडुकरासाठी पंजी हा शब्द वापरला जातो. रानडुकरांपासून शेतकर्यांच्या शेताचं आणि गावाचं रक्षण करण्यासाठी या दैवाची महादेवाने नेमणूक केल्याचं मानलं जातं. वर्षातून एकदा ‘कोला’ हा लोकनृत्याचा उत्सव साजरा करून पंजुर्लीची पूजा केली जाते. या उत्सवात पंजुर्लीसारखा वेष आणि वराहरूपाचा मुखवटा धारण करून एक पुजारी हे लोकनृत्य सादर करतो.
अतिशय उग्र स्वरूपाचं लोकदैवत म्हणून गुलिगाची ख्याती आहे. गुलिगाचं स्वरूप हे एका राक्षसासारखं असल्याचं मानलं जातं. पार्वतीला सापडलेला दगड महादेवाने रागाने जमिनीवर फेकला आणि त्यातून गुलिगाचा जन्म झाला, अशी एक दंतकथा आहे. या कथेनुसार, विष्णूच्या सांगण्यावरून गुलिगाने सांके या स्त्रीच्या पोटी जन्म घेतला. आईचं पोट फाडून आलेल्या गुलिगाने आपल्या प्रचंड भुकेने सर्वांना त्रस्त केलं. त्याचं हे संहारक रूप शांत करण्यासाठी विष्णूने त्याला आपली करंगळी खाऊ घातली.
त्यानंतर गुलिगाला क्षेत्रपाल म्हणून पंजुर्लीसोबत नेमलं गेलं. अतिशय न्यायप्रिय असलेला गुलिगा हा स्थानिक लोकदैवतांचा आणि भक्तांचा अपमान झाल्यास रागावतो आणि अपमान करणार्याला शिक्षा करतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. एकवेळ पंजुर्ली दैव घडलेला गुन्हा माफ करतील; पण गुलिगा मात्र कोणत्याही गुन्ह्याला माफी देत नसल्याने त्याच्याबद्दल स्थानिकांच्या मनात सामान्य देवतांहून अधिक आदर असल्याचं दिसतं.
गुलिगा हा जनसामान्यांच्या हाकेला धावून येणारा देव असून, भूता कोलामध्ये पंजुर्लीसोबत त्यालाही पूजलं जातं. नव्या ‘कांतारा’मध्ये प्रथमच गुलिगा आणि पंजुर्ली एकत्र भूता कोला सादर करताना दिसताहेत. त्याचबरोबर या सिनेमात गुलिगाची वेगवेगळी रूपंही पाहायला मिळतात. गुलिगाच्या भूमिकेतल्या रिषभ शेट्टीचा त्या प्रसंगांमधला अभिनय कौतुकाच्याही पलीकडला आहे.
गुलिगा आणि पंजुर्ली यांच्यासोबतच बेर्मे, कोरगज्जा स्वामी आणि या तीन दैवांची महती आपल्याला नव्या सिनेमात पाहायला मिळते. चावुंडी ही मुळात गुलिगाची बहीण; पण तुळुनाडूमध्ये वेद आणि पुराणांचा प्रभाव वाढल्यानंतर तिला चामुंडी या रूपाशी जोडलं गेलं. हे दैवही गुलिगासारखंच उग्र स्वरूपाचं आहे. या सिनेमात एक वृद्ध व्यक्ती कथानायकाची मदत करताना दिसतो. ही वृद्ध व्यक्ती म्हणजे कोरगज्जा स्वामी. अर्थात, ‘कोरगा’ जमातीतला ‘अज्जा’ किंवा आजोबा.
हा देव तुम्हाला हरवलेल्या गोष्टी शोधायला, तुमचे आजार बरे करायला आणि अडकलेल्या स्थितीतून बाहेर निघायला मदत करतो, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे आणि सिनेमातही या देवाला अशीच मदत करताना दाखवलंय.
नव्या ‘कांतारा’च्या नायकाचं नाव बेरमे आहे. तुळुनाडू आणि पश्चिम घाटाचा निर्माता म्हणून पुजल्या जाणार्या बेरमेर या तुळू दैवाचं हे रूप. त्यानेच या प्रदेशाच्या रक्षणासाठी महादेवाच्या भूतगणांना क्षेत्रपाल म्हणून नेमलं असंही म्हटलं जातं. स्थानिक संस्कृतीत जशी चावुंडीची चामुंडी झाली, तसंच बेरमेरला ब्रह्माचं स्वरूप दिलं गेलंय; पण असं असलं, तरी बेरमेरची पूजा ही इतर दैवांसारखीच केली जाते.
मुळात सर्व दैव हे शिवशंकराचे गण असल्याची समजूत इथं रूढ असल्याने त्यांच्या गोष्टी आणि पूजा पद्धती या शैवपंथाशी तसंच स्थानिक लोकसंस्कृतीशी संबंधित आहेत. तुळू संस्कृतीचे अभ्यासक प्रा. पी. गुरुराजा भट यांच्या ‘स्टडीज इन तुळूवा हिस्टरी अँड कल्चर’मध्ये याबद्दल भाष्य केलं गेलंय. तुळुनाडूच्या घराघरांमध्ये गायिल्या जाणार्या पददान या ओव्यांच्या स्वरूपातल्या मौखिक साधनांनी या दैवांची महती वर्षानुवर्षं जपली. आता ‘कांतारा’च्या निमित्ताने हे दैव रूपेरी पडद्यावर झळकताहेत. या सिनेमाचा आधार घेऊन एक फारशी प्रसिद्ध नसलेली लोकसंस्कृती उजेडात येतेय.