आधी संस्कार, मग साधने! Pudhari File Photo
बहार

आधी संस्कार, मग साधने!

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सुनीता चव्हाण

काळाबरोबर आज मुलांच्या सवयी बदलल्या आहेत. त्याला त्यांचे पालकही कारणीभूत आहेत. आपल्या भावी पिढ्या संस्कारक्षम बनवायच्या असतील, तर मुलांबरोबर पालकांनीही स्वतःचे प्रबोधन करून घेतले पाहिजे. सध्याचा तंत्रज्ञानाचा वेग पाहिला, स्पर्धेची तीव्रता पाहिली, तर त्याला तोंड देण्यासाठी आपले मूल सक्षम, संस्कारक्षम होणे तितकेच आवश्यक आहे.

‘मोबाईल आणि टी.व्ही. बघत जेवण करणे’ हा हल्लीच्या मुलांबरोबरच मोठ्या माणसांनाही झालेला असाध्य रोग. तो सर्वत्र पाहायला मिळतो आहे. जेवण कसे आहे, यापेक्षा टीव्हीकडे पाहत घशाखाली अन्न ढकलण्याचे काम सुरू असते. आमच्या लहानपणी चिऊ-काऊचा घास भरवला जायचा. कंटाळा करत खाणार्‍या मुलाला तो घास आईचा म्हणून भरवले जायचे. आपल्या आई-बाबांसाठी आपण खाल्ले पाहिजे, ही एक आदरयुक्त भावना रुजवली जायची. हल्ली मुले आधीच्या अन्नाचे पचन होत नाही, तोवर भुकेशिवाय वेळी-अवेळी काहीही खातात. यामुळे पोटाच्या तक्रारी सुरू होतात. म्हणूनच औषधापेक्षा यांच्या सवयी बदलल्या तर... मुलांना मोबाईल, टी.व्ही. या साधनांची सवय न लावता त्यांच्याशी गप्पा-गोष्टी करीत त्यांना खाऊ घातले पाहिजे. जेवणावर मन केंद्रित झाल्याने अन्न नीट चावून खाल्ले जाते. तोंडातील लाळस्राव घासामध्ये मिसळतो. पोटातील पाचकस्राव व्यवस्थित स्रवले जाऊन अन्नाचे पचन आणि आतड्यांतील शोषणाचे कार्य उत्तम होते.

ही मोबाईलची सवय फक्त भुकेवरच परिणाम करते असे नाही, तर त्यांच्या कोवळ्या डोळ्यांवर मोबाईलच्या प्रकाशाचा वाईट परिणाम होतो. आजच्या मुलांना कॉम्प्युटर, लॅपटॉप याचे ज्ञान हवेच. कारण, त्यांचे क्लासेस ऑनलाईन असतात. सध्याचे युगच असे आहे की, वाहत्या प्रवाहाबरोबर वाहावे लागत आहे, लागणार आहे. त्यासाठी काही संरक्षणात्मक गोष्टीही हाताळल्या पाहिजेत. क्लासव्यतिरिक्त मोबाईल वापरू नये. मोबाईलच्या तीव्र प्रकाशापासून बचाव करण्यासाठी त्यावर ‘फिल्टर ग्लास’ बसवली पाहिजे. क्लास झाल्यानंतर पालकांनी मुलांच्या डोळ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. क्लास झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांना दहा ते पंधरा मिनिटे विश्रांती द्यावी. आपल्या हाताचे तळवे दोन्ही डोळ्यांवर ठेवून हळुवार गोलाकार फिरवावेत. रात्री झोपताना डोळ्यांवर काकडीच्या रसात किंवा गुलाबजलात भिजवलेला कापूस ठेवावा. यामुळे डोळ्यांतील उष्णता कमी होऊन डोळ्यांवरचा ताण कमी होतो. डोळ्यांचे त्राटकादि व्यायाम, प्राणायाम शिकवले, तर मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य नीटनेटके राहील, नाही तर चष्मा हा लागणारच.

मुलांना नकळत्या वयातच आकार द्यावा लागतो. त्यांना लहानपणापासून प्रेमाने, समजतूदारपणे चांगल्या गोष्टींचे, संस्कारमय धडे शिकवले पाहिजेत. याचा अर्थ असा नव्हे की, त्यांना कायमच शिस्तबद्ध, काटेकोर, नियमबद्ध बेडीत अडकवले पाहिजे. आमच्या लहानपणी आई आमच्यासोबत सायंकाळी शुभंकरोती म्हणायची. नकारात्मक विचारांचा नाश होऊन विवेकी विचारांचा प्रभाव पडावा आणि नैराश्य दूर होऊन आरोग्य लाभावे, अशी सकारात्मता आपोआप रुजली जायची. मुलांमध्ये संस्कार निर्माण करायचे असतील, तर ते आधी पालकांनी जोपासले पाहिजेत. मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करीत असतात. अनुकरण वाईट गोष्टींचे नाही, तर ते चांगल्या गोष्टींचे करावे. अंगाई गाणार्‍या आया आता फार क्वचित दिसतील. लिंबोणीच्या झाडामागे केवळ चंद्रच झोपला नाही, तर ती अंगाई पण झोपून गेली आहे. झोपताना रोज आजी-आजोबा मुलांना काल्पनिक गोष्टींतून आदर, प्रेम, दया अशा भावनात्मक संस्काराचे बोध द्यायचे; पण आता ‘हम दो हमारा एक’ असल्यामुळे आजी-आजोबांसारखे विद्यापीठ शोधूनही सापडत नाही. संस्काराचे बीज रुजले जात नाहीत. मग, सदाचरणाचा वृक्ष फोफावणार कसा?

आई-वडील करिअरच्या मागे, मुले पाळणाघरात. मुलाला जे हवे ते आणून दिले की, कर्तव्य झाले. वेगवेगळ्या क्लासला घालून त्यांना या स्पर्धेच्या दुनियेत सोडले जाते आणि एक नंबरवर कसे पोहोचेल, याची तजवीज केली जाते. ‘अमुकअमुक टक्के मार्क्स आण, तमुकतमुक भेट मिळेल’ अशा आमिषामुळे आपण त्यांच्या मनात नक्की काय रुजवतोय, याची कल्पना आई-वडिलांना नसते का?

जे हवे ते देण्याच्या हव्यासापायी मुले हट्टी आणि दुराग्रही बनत चालली आहेत. त्याची सुरुवात आपणच करतो. टिफिनच्या नावाखाली बिस्किटे, वेफर्स असा सुका नाश्ता दिला जातो. एकदा का जिभेला चव लागली की, मुले आपसूकच घरातील खाण्याला नापसंती दाखवतात. बालपणापासूनच त्यांना थालीपीठ, पोहे, शिरा, उपमा यांची सवय केली पाहिजे. पालेभाज्या खाण्याचा कंटाळा असलेल्या मुलांना त्याचे पराठे करून दिले, तर ते आवडीने खातील. नावडत्या बीट, गाजर, कोबी या भाज्यांमध्ये विविधता आणून कटलेट वगैरे बनवले, तर ते त्यावर तुटून पडतील. याप्रकारे या पौष्टिक भाज्या मुलांच्या पोटात जातील. आता बर्‍याचशा शाळेत ‘पोळी-भाजी’ हाच डबा सक्तीचा’ असा उपक्रम सुरू आहे. याचा अर्थ असा नव्हे की, मुलांना जंक फूड देऊ नये. ते त्यांना कधीतरी द्या; पण त्याची सवय करून देऊ नका. आधी घरातील पौष्टिक आहार घेऊन शारीरिक क्षमता, व्याधी प्रतिकारक शक्ती वाढवा जेणेकरून बाहेरचे पदार्थ पचवण्याची ताकद पोटाला मिळावी. बाहेरचे खाणे हे किती झाले तरी अपथ्यकारकच!

मुले आजी व आजोबांचे ऐकतात. त्यांनी नातवांचे लाड जरूर करावेत; पण त्यांना प्रत्येक वस्तू पुरवून हट्टी करू नये. त्यांच्या आरोग्यास जे चांगले आहे, ते शरीराला किती हितकर आहे हे पटवून द्या. मुलांसाठी आई नेहमी जेलरच असते. त्यामुळे ते आईने सांगितलेले नियम तोडण्यासाठीच असतात, याकडे मुलांचा पवित्रा असतो. काही गोष्टींसाठी मात्र मुलांच्या हितासाठी आईने परखडपणे बोललेच पाहिजे. मुलांना घरचा संतुलित आहार वेळेवर खाण्याची सवय लावली पाहिजे. काही मुलांनाच नव्हे, तर मोठ्या माणसांनाही ताटात अन्न टाकण्याची सवय असते. काही लोकांना एकवेळचे जेवण मिळणेही शक्य नसते, हे आपल्या मुलांना सांगून अन्नाचे महत्त्व पटवून द्यावे. इतर मुलांकडे बघून आपल्याकडे ते नाही म्हणून मुले असंतुष्ट राहतात. त्यांना दिलेल्या पॉकेटमनीमधून वायफळ खर्च न करता बचत करून पैशाचे महत्त्व सांगा. ते सांगूनही त्यांच्या वागण्यात फरक पडत नसेल, तर काही उपाय करता येतील. जसे की, मुलांना अनाथाश्रमाची भेट घालून द्या किंवा एखादा वाढदिवस त्या मुलांबरोबर साजरा करा. जे आपल्याला मिळते ते खूप आहे, याची जाणीव त्यांना होत जाईल. त्यांना वस्तूंचे मोल आणि गरजेतला फरक समजेल. मुलांच्या अंतरमनात या गोष्टी रुजल्या पाहिजेत. मग, कोणत्याच गोष्टी त्यांना शिकवाव्या लागणार नाहीत.

काही पालक ‘गरिबीमुळे आम्हाला काही मिळाले नाही; पण मुलांच्या नशिबाने त्यांना मिळतेय’ म्हणून त्यांना हव्या त्या गोष्टींचा पुरवठा करतात. अशा मुलांची मग लिस्टही वाढत जाते. माझ्या मित्राकडे लॅपटॉप आहे.. त्याला पाच हजार पॉकेटमनी मिळतो... तुम्ही मला काही आणूनच देत नाही म्हणून आई-वडिलांवर नाराज होतात, उद्धट बोलतात. अशावेळी आई-वडील ‘आम्ही याच्यासाठी इतके कष्ट घेतोय, त्याची याला जाणीवच नाही’ अशी तक्रार करतात; पण त्या मुलांना ती जाणीव कशी असणार? त्याचे लाड पुरवता पुरवता त्याला आपल्या परिस्थितीची कधी जाणीवच करून दिली नाही. मुलांना घरातील ताणतणाव नका सांगू; पण त्याच्या प्रत्येक मागणीला नका पुरे करू. त्यांना सांगणे जरुरी आहे की, ‘सध्या माझ्याकडे इतके पैसे नाहीत. जमवाजमव झाली की घेऊन देईन.’ त्याला नकारही देऊ नका आणि जाणीवपण करून द्या की, सध्या ती वस्तू घेण्यास पुरेसे पैसे नाहीत. तेव्हाच त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होईल. हे आधीपासूनच करा म्हणजे, अपेक्षांची लिस्ट वाढणार नाही. इतरांकडे आहे म्हणून माझ्याकडेही हवे, ही तुलनात्मक शृंखला वेळीच तोडली पाहिजे. गरज असेल तेव्हाच ती वस्तू आई-वडील घेऊन देतील, हा संस्कार त्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे.

आपल्याकडील गरज नसलेली वस्तू इतरांच्या उपयोगी पडेल ती देण्याची दानत मुलांमध्ये रुजवा. मग, ती एक कंपासपेटी असेल की एखादे खेळणे! छोट्या छोट्या गोष्टीतूनच दान करण्याचे महत्त्व समजते. मुलांमध्ये स्त्रीचा आदर व तिचा सम्मान करण्याच्या संस्काराची पेरणी करा. ती पेरणी प्रामुख्याने घरातील वडिलांनी, भावांनी करून द्यावी. आई-बहिणीला दिलेला आदर, प्रेम यावरून मुलेपण ते अनुकरण करतील. तेव्हाच त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन बदलेल आणि बलात्काराच्या, मुलीच्या विनयभंगाच्या तक्रारी कमी होतील. स्त्रीची कदर करणे हा त्यांचा स्वाभिमान आणि तोच त्यांचा अभिमान झाला पाहिजे, असे संस्काराचे बीज त्यांच्या मनात लहानपणापासूनच अंकुरित करा म्हणजे मोठे होऊन स्त्रियांप्रती सदाचरणाचा संस्कार वटवृक्षात रूपांतर होईल.

आपली संस्कारशील संस्कृती आपल्याला ‘माणूस’ बनवते. ते संस्कार आधी मुलांमध्ये रुजवा. मग, तुम्ही कोणतीही साधने दिलीत, तर ती केव्हा हाताळायची, कशी वापरायची याचे ज्ञान त्यांना आपसूकच झालेले असेल. यालाच आपण ‘आधी संस्कार... मग साधने!’ असंही म्हणूया!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT