US Israel Iran tensions Pudhari
बहार

US Israel Iran tensions: स्वप्ननगरीला तडाखा

अयातुल्ला खामेनींना अमेरिका आणि इस्रायलने ठार मारल्यानंतर चवताळलेल्या इराणने प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला असून संपूर्ण जगाला वेठीस धरण्याची आपली ताकद दाखवून दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा
प्रसाद पाटील

अयातुल्ला खामेनींना अमेरिका आणि इस्रायलने ठार मारल्यानंतर चवताळलेल्या इराणने प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला असून संपूर्ण जगाला वेठीस धरण्याची आपली ताकद दाखवून दिली आहे. यादरम्यान इराणने आखातातील अमेरिकेचे लष्करी व हवाई तळ टार्गेट केलेच; शिवाय अमेरिकेच्या हुकमावर नाचणाऱ्या अरब देशांच्या मानबिंदूंनाही तडाखे दिले. खासकरून जगभरातील पर्यटकांचे आणि धनिकांचे आवडते ठिकाण असणाऱ्या स्वप्ननगरी दुबईला इराणने जाणीवपूर्वक लक्ष्य केले. याचा परिणाम म्हणजे गेल्या चार दशकांपासून सुरक्षितता आणि अभेद्यपणा ही प्रमुख वैशिष्ट्ये घेऊन चोवीस तास झगमगत राहणाऱ्या या शहरापुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई हे शहर गेल्या अनेक दशकांपासून आखाती देशांमधील समृद्धीचा ब्रँड म्हणून जगभरात ओळखले जाते. सुरक्षित आणि झगमगाटीपणा ही दुबईची ठळक बलस्थाने ठरली आहेत. अगदी अंडरवर्ल्डच्या साम्राज्यातील कुख्यात गुन्हेगारांपासून जगभरातील धनदांडग्यांपर्यंत अनेकांनी दुबईमधील वास्तव्याला पहिली पसंती देऊन या शहराची ‌‘रौनक‌’ वाढवण्याचे काम केले आहे. तप्त वाळवंटात उभ्या राहिलेल्या या जागतिक दर्जाच्या महानगराने आपल्या गगनचुंबी इमारती, विलासी जीवनशैली आणि आर्थिक स्थैर्याच्या जोरावर जगभरातील गुंतवणूकदारांना आणि पर्यटकांना आकर्षित केले आहे; मात्र मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान दुबईच्या या सुरक्षिततेच्या कवचाला मोठे तडे गेल्याचे दिसून येत आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी मारले गेल्यावर इराणने प्रतिशोधाची भूमिका घेतली आणि प्रामुख्याने अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अरब राष्ट्रांना टार्गेट केले. हे हल्ले करताना इराणने जाणीवपूर्वक जागतिक परिणामांना प्राधान्य दिले. दुबई हे धनिकांचे शहर म्हणून जसे ओळखले जाते, तसेच ते जगातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. त्यामुळे दुबईला दिलेला धक्का हा जगाच्या विमान वाहतुकीवर आणि दळणवळणावर परिणाम करणारा ठरू शकतो, हे लक्षात घेऊन इराणने दुबईला लक्ष्य केले. इराणने केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेमुळे केवळ दुबईच नव्हे, तर संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाच्या ज्वाळा केवळ लष्करी तळांपुरत्या मर्यादित राहिल्या नसून, त्या दुबईच्या झगमगाटापर्यंत पोहोचल्या असून या स्वप्नगरीच्या अभेद्यतेची प्रतिमा आता धोक्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात इराणने डागलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन दुबईच्या हवाई क्षेत्रात घुसल्यामुळे या शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठा धोका निर्माण झाला. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बुर्ज अल अरब यांसारख्या प्रसिद्ध इमारतींना लक्ष्य करण्याचाही प्रयत्न झाला. अमिरातीमधील शेअर बाजार दोन दिवस बंद ठेवावा लागला आणि अमेझॉनच्या क्लाऊड सुविधांवर झालेल्या हल्ल्यामुळे बँकिंग सेवांमध्येही तांत्रिक अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे या शहराने गेल्या 40 वर्षांत कमावलेली सुरक्षिततेची ओळख एका रात्रीत बदलून गेली.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील एकूण तेलाच्या 20 टक्के पुरवठा होतो. इराणने हा मार्ग रोखल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली असून ती 1979 च्या तेल संकटाची आठवण करून देत आहे. दुबईच्या जेबेल अली बंदरात झालेल्या अग्निकांडामुळे आणि विमानतळावर वारंवार निर्माण होणाऱ्या ड्रोन धोक्यांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दुबईतून सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. इन्व्हेस्टमेंट बँक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्या आता दुबईऐवजी इतर सुरक्षित ठिकाणांचा विचार करत आहेत. यामुळे गेली चार दशके दुबईने कमावलेली विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी शांततेचे आवाहन केले असले, तरी इराणचा आक्रमक पवित्रा थांबताना दिसत नाही. इराणने केवळ लष्करी तळांना लक्ष्य न करता दुबई, अबुधाबी आणि शारजाह यांसारख्या नागरी आणि आर्थिक केंद्रांनाही आपल्या हल्ल्याच्या कक्षेत आणले आहे. यामुळे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुबईची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, व्यापार, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवांवर अवलंबून आहे. या शहराच्या यशाचा पाया हा इथली स्थिरता आणि सुरक्षितता हाच होता. जेव्हा जेव्हा मध्यपूर्वेत युद्धे किंवा यादवी झाली, तेव्हा तेव्हा तिथली गुंतवणूक आणि लोक दुबईकडे वळले; मात्र आता स्वतः दुबईच युद्धाच्या छायेत आल्यामुळे जागतिक भांडवल इथून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरसारख्या संस्थांमध्ये शेकडो बँका आणि हजारो वित्तीय कंपन्या कार्यरत आहेत. हा तणाव दीर्घकाळ टिकला, तर गुंतवणूकदार पर्यायी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेऊ लागतील. दुबईच्या एकूण उत्पन्नामध्ये तेलाचा वाटा 2 टक्क्यांपेक्षा कमी असला, तरी आखाती प्रदेशातील स्थिरता हा दुबईच्या प्रगतीचा मुख्य स्तंभ होता. 2025 मध्ये 9,800 हून अधिक करोडपती दुबईत स्थायिक झाले होते; मात्र या युद्धामुळे हे चित्र आता पालटण्याची शक्यता आहे.

इराणच्या ड्रोन हल्ल्यांनी दुबईच्या निवासी भागांनाही लक्ष्य केले आहे. अल वसल आणि पाम जुमेराह यांसारख्या अतिशय उच्चभ्रू वस्तींमध्ये स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे केवळ भौतिक नुकसान झाले नसून लोकांमध्ये एक प्रकारचे मानसिक दडपण निर्माण झाले आहे. ज्या नैसर्गिक जलशुद्धीकरण प्रकल्पांवर आणि डेटा सेंटर्सवर दुबईचे जनजीवन अवलंबून आहे, त्यांनाही आता धोका निर्माण झाला आहे.

सद्य:स्थिती पाहता एरव्ही आलिशान गाड्यांचा, सौंदर्यवतींचा आणि पार्ट्यांचा झगमगाट चालणाऱ्या, पर्यटकांच्या गर्दीने बारा महिने गजबजलेल्या या महानगरामध्ये शांततेचे साम्राज्य वाढू लागले आहे. सुरक्षिततेच्या चिंतेमुळे पर्यटकांनी दुबईकडे पाठ फिरवल्याने जगातील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल्सचे भाडे 50 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. दुबईचा सर्वात पॉश भाग मानल्या जाणाऱ्या पाम जुमेराह येथील आलिशान हॉटेल्समध्ये तीन रात्रींचे भाडे 1,01,808 रुपयांवरून थेट 65,972 रुपयांवर आले आहे. अनेक हॉटेलमध्ये केवळ 20 टक्के खोल्या भरलेल्या आहेत, ज्यामुळे व्यवसायात मोठी मंदी आली आहे. हवाई क्षेत्र वारंवार बंद होणे आणि विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे ‌‘शॉर्ट टर्म‌’ बुकिंग पूर्णपणे ठप्प झाले आहे. दुबईतील हॉटेल उद्योग आता तोटा भरून काढण्यासाठी ‌‘राहा आणि जेवा‌’सारख्या योजनांचा आधार घेत आहे. यामध्ये राहण्याचे भाडे जेवण किंवा स्पा सुविधांमध्ये समाविष्ट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दुबईने गेल्या काही दशकांत स्वतःला एका जागतिक ब्रँडच्या रूपात प्रस्थापित केले आहे. 1985 मध्ये अमिरात एअरलाईनची सुरुवात, 1999 मध्ये बुर्ज अल अरबचे उद्घाटन आणि परदेशी नागरिकांना मालमत्ता खरेदीचे अधिकार देणे, हे या शहराच्या प्रगतीतील महत्त्वाचे टप्पे होते. ही सर्व प्रगती स्थैर्याला प्राधान्य या धोरणावर आधारित होती. ही ओळख टिकवून ठेवणे हे आता तिथल्या नेतृत्वासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. दुबईतील परिस्थिती पाहता अनेकांनी ओमान किंवा सौदी अरेबियामार्गे या भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संयुक्त अरब अमिरातीची संरक्षण यंत्रणा प्रगत असली, तरी इराणची क्षेपणास्त्र क्षमता पाहता पूर्णपणे सुरक्षित राहणे कठीण झाले आहे. ओमानसारख्या शांतताप्रिय आणि सुरक्षित देशामध्येही इराणने दणका दिला आहे. या युद्धाच्या ज्वाळा शमत नाहीत, तोपर्यंत दुबईच्या भविष्यावर टांगती तलवार कायम राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT