येत आहे स्वदेशी रोबो सेना Pudhari File Photo
बहार

येत आहे स्वदेशी रोबो सेना

पुढारी वृत्तसेवा
महेश कोळी, संगणक अभियंता

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ मानवसदृश म्हणजेच ह्युमोनाईड रोबोच्या विकासावर काम करत आहेत.

हे रोबो केवळ लष्करी कारवाईत मानवी सैनिकांना मदत करणार नाहीत, तर स्वत:देखील युद्धात सहभागी होतील. या रोबोच्या निर्मितीचा उद्देश दुर्गम भागात लढाईसाठी सज्ज राहणे हा आहे. यामुळे मानवी रक्त सांडण्याची वेळच येणार नाही. हे रोबो नियंत्रण रेषेवर प्रामुख्याने दहशतवाद्यांचा गड असलेल्या भागात लष्कराच्या कारवाईला बळ देण्यासाठी आणि सुरक्षा दलाच्या संरक्षणासाठी मोलाची भूमिका बजावतील.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडविली. भारताच्या संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानच्या चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची पोलखोल केली. अर्थात, सध्या शस्त्रसंधी असली, तरी पाकिस्तानकडून त्याचे वारंवार उल्लंघन होत आहे. संघर्ष कोणताही असला, तरी यामध्ये होणारी मनुष्यहानी हा चिंतेचा विषय ठरतो. प्रामुख्याने सीमेवरचे जवान आणि नागरिकांचे जीव हे मृत्यूच्या छायेत असतात. अशा स्थितीत त्यांचे प्राण वाचावेत, यासाठी भारतीय लष्करात आता रोबो सैनिक सामील करण्यात येणार आहेत. या माध्यमातून रक्तपात न करताही पाकिस्तानसारख्या शत्रूला वठणीवर आणणे आणखी सोपे जाणार आहे.

मनुष्याच्या विचारात असंख्य संकल्पना दडलेल्या असतात. कल्पनेच्या विश्वात डुबक्या मारणारे विचार प्रत्यक्षात उतरतात तेव्हा जग आश्चर्यचकीत होते. असाच एक आश्चर्याचा धक्का देण्याचा प्रयत्न भारतीय शास्त्रज्ञ करत आहेत. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ मानवसृद़ृश म्हणजेच ह्युमोनाईड रोबोच्या विकासावर काम करत आहेत. हे रोबो केवळ लष्करी कारवाईत मानवी सैनिकांना मदत करणार नाहीत, तर स्वत:च देखील युद्धात सहभागी होतील. या रोबोंच्या निर्मितीचा उद्देश दुर्गम भागात लढाईसाठी सज्ज करणे. यामुळे मानवी रक्त सांडण्याची वेळच येणार नाही.

डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅबिलशमेंट (इंजिनिअर्स) या ह्युमोनाईड रोबोंचा विकास करत आहेत. या मानवी रोबोचा वरचा आणि खालचा भाग मानवी अवयवाप्रमाणे तयार करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चाचण्या पाहता हा प्रयोग यशस्वी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुण्यात आयोजित नॅशनल वर्कशॉप ऑन अ‍ॅडव्हान्स लेग्ड रोबोटिक्समध्ये या रोबोंचे सादरीकरणही करण्यात आले. रोबो तयार करण्याचे काम पुढे नेण्यात सेंटर फॉर सिस्टम अँड टेक्नॉलॉजी अँड अ‍ॅडव्हान्स रोबोटिक्सची मदत घेतली जात आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर कामाला वेग

पाकिस्तानात पोसल्या जाणार्‍या दहशतवाद्यांविरोधात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर ‘डीआरडीओ’ या अभियानाला वेग देत आहे.

21व्या शतकातील युद्धं ही केवळ बंदुका, रणगाडे आणि सैनिकांपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्वयंचलित तंत्रज्ञान, यंत्रमानव (A°obots) यांचा लष्करी वापर हे आता केवळ विज्ञान कथांतील विषय राहिलेले नाहीत. रोबो सोल्जर्स म्हणजे स्वयंचलित, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे यंत्रसैनिक हे भविष्यातील युद्धाचे वास्तव ठरण्याच्या मार्गावर आहेत; पण या कल्पनेचं मूळ कुठं आहे? दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि अमेरिका यासारख्या देशांनी स्फोटके टाकणार्‍या रेडिओ-नियंत्रित बोटी आणि टोचून स्फोट करणार्‍या उपकरणांचा वापर केला. हा अनमॅनड वेपन्सचा प्रारंभ मानला जातो. 1980 ते 90 च्या काळात अमेरिकेने आणि इतर प्रगत राष्ट्रांनी ड्रोनचा वापर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी सुरू केला. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांमध्ये ड्रोनचा वापर वाढला आणि हळूहळू मानवविरहित युद्ध सज्जता हे केंद्रबिंदू बनले. 2000 नंतरच्या काळात डिफेन्स अ‍ॅडव्हॉन्स्ड रिसर्च प्रोगे्रस एजन्सी आणि इतर संस्था या काळात स्वयंचलित यंत्रसैनिकांच्या संकल्पना विकसित करू लागल्या. बिगडॉग, अ‍ॅटलास, मार्ससारखे (मॉड्युलर अ‍ॅडव्हान्सड आर्मड रोबोटिक सिस्टीम) ग्राऊंड यंत्रमानव युद्धासाठी प्रयोगात आणले गेले. आधुनिक युद्धात आता काही रोबोटस् शत्रू ओळखून गोळीबार करण्यास सक्षम झाले आहेत. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, 2040 पर्यंत जगात अशा यंत्रसैनिकांची तुकडी अस्तित्वात येईल जी मानवाच्या मदतीशिवाय युद्ध करू शकेल. सैनिकांच्या ताकदीत आणि चपळतेत वाढ करणारे यांत्रिक सुटस् विकसित होत आहेत. हे एक प्रकारचे अर्धरोबोटिक सोल्जर रूप असते.

इस्रायलने अगोदरच अशाच प्रकारचे ‘रोक रोबो सैन्य’ तयार केले असून ते केवळ युद्ध लढणारे नाही, तर सीमेवर माणसांची जागादेखील घेऊ शकेल. इस्रायलची प्रसिद्ध संरक्षण कंपनी इल्बिट रोबो टीमने रोबो सैनिकांची निर्मिती केली आहे. रोबो टीमचे सीईओ इलाजलेव्ही यांच्या मते, ड्रोन आणि हवाई रोबोच्या माध्यमातून होणारे काम आता प्रत्यक्षपणे जमिनीवरही होईल. मानवरहित रोक रोबो हा धोक्याचे आकलन करत निर्णय घेऊ शकणार आहे. एआययुक्त रोबो हा युद्धाच्या मैदानात खराब झाल्यास त्याच्यासमवेत असणारा रोबो सैनिक हे त्याचा सुटा भाग बदलण्याचे काम करतील. या वैशिष्ट्यामुळे रोबो सैनिक अचानक निकामी होण्याची भीती राहणार नाही. 200 किलो वजनाच्या या रोक रोबोची धावण्याची क्षमता तीस किलोमीटर प्रतितास आहे. हा 1200 किलोमीटर मारक क्षमतेचे शस्त्र घेऊन जाण्यास सक्षम आहे. त्याची किंमत दीड लाख डॉलरपासून तीन लाख डॉलरपर्यंत आहे. एकंदरीतच भविष्यातील युद्ध रोबोत होईल.

चर्चेच्या केंद्रस्थानी एआय

आर्टिफिशियल इंटिलिजन्सने दहा वर्षांपासून असामान्यपणे कामगिरी केली आहे. त्यामुळे जगभरात सध्या एआयचा बोलबाला आहे; पण एलॉन मस्क, बिल गेटस्, स्टिफन हॉकिंग यांनी मात्र एआयच्या अद्भुत शक्तीबाबत जगाला वारंवार सजग केले आहे, तरीही गुंतवणूकदार आणि शास्त्रज्ञ एआयकडे एक उज्ज्वल भवितव्य म्हणून पाहत आहेत. कारण, आज रोबो हा कारखान्यात मजुरी करण्यापासून शिक्षक, टीव्ही समालोचक, परिचारिका आणि आता सैनिकी भूमिकेत अवतरत आहे. मानव आणि मशिन यांच्यात होणारे द्वंद्व हे कोणत्या रूपातून समोर येईल, हे भविष्यातच कळेल; मात्र आतापर्यंत ‘एआय’चे नवे आविष्कार अनेक प्रश्नांना जन्माला घालणारे ठरले आहेत.

भारत सरकारदेखील एआयनिर्मित रोबोटिक शस्त्रांची संख्या वाढविण्याचा विचार करत आहे. यानुसार एक महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश मानवरहित रणगाडा, लढाऊ जहाज, स्वयंचलित रायफल आणि रोबो लष्कर उभारण्याची तयारी हा आहे. विमानांनादेखील रोबोटिक शस्त्रांनी सज्ज केले जाणार आहे. ही योजना अमलात येईल तेव्हा भारत जमीन, आकाश आणि पाणी या तिन्ही ठिकाणी लढासाईठी नवीन तंत्र वापरण्यास सज्ज असेल. टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालचा एक उच्चस्तरीय गट या योजनेला अंतिम रूप देत आहे. यात डीआरडीओदेखील मदत करत आहे. प्रत्यक्षात भविष्यात युद्धात रोबो आणि मानविरहित शस्त्रांचा अधिक वापर केला जाईल.

भारताच्या द़ृष्टीने सैनिकांना बदलत्या काळानुसार तयार करणे गरजेचे आहे. कारण, पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर द़ृश्य शत्रूंपेक्षा अद़ृश्य शत्रूंचा अनुभव गेल्या तीन दशकांपासून अधिक प्रमाणात येत आहे. त्यांचा मुकाबला करणे सोपे नाही. कारण, ते समोर दिसत नाहीत; परंतु त्यांच्या आडून झालेला हल्ला हा गंभीर राहू शकतो. अशा माध्यमातून झालेल्या हल्ल्यांमुळे आपण काश्मीर खोरे आणि पाकिस्तान सीमेवर 42 हजारांपेक्षा अधिक नागरिक आणि जवान आजवर गमावले आहेत. अलीकडेच पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 नागरिकांचा जीव घेतला. त्याची प्रतिक्रिया म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्यात आले; परंतु फसव्या शक्तींचा मुकाबला हा दर्जेदार शस्त्रांनीच करावा लागणार आहे. या श्रेणीत आता भारतीय रोबो सैनिक दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी उतरविण्यात येत आहेत. हे रोबो दहशतवाद्यांची गुप्त ठिकाणं शोधून काढतील आणि त्यांची अचूक माहिती उपलब्ध करून देण्याचे काम करतील. एवढेच नाही, तर काही क्षणांतच त्यांची ठिकाणे नष्ट करतील. हे रोबो नियंत्रण रेषेवर प्रामुख्याने दहशतवाद्यांचा गड असलेल्या भागात लष्कराच्या कारवाईला बळ देण्यासाठी आणि सुरक्षा दलाच्या संरक्षणासाठी मोलाची भूमिका बजावतील. सीमेवर रोबो सैन्य असल्याने संपूर्ण लष्कर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. एवढेच नाही, तर शत्रूंची घुसखोरी हाणून पाडणे आणि पाकिस्तानी सैनिकांचे हल्ले परतावून लावण्याचे कामदेखील रोबो सैन्य करतील.

एआययुक्त रोबो सैनिकांच्या रूपातून सीमेवर नवी शक्ती म्हणून नावारूपास येतील आणि शत्रूंवर प्रहार करतील. या उद्देशानेच संरक्षण मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात 550 रोबोटिक्स सर्वेलान्स युनिट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेप मिळताच त्यास लष्कराच्या हवाली केले जाईल. हे रोबो सैनिक कोणत्याही दहशतवादविरोधी अभियानात हल्ला करण्यासाठी सहाय्यकाची भूमिका बजावतील. अशा प्रकारच्या कारवाईत दहशतवाद्यांचे संख्याबळ किती आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. अशावेळी रोबो सैनिक त्यांची संख्या आणि शस्त्रांची माहिती मिळवू शकतील.

एकंदरीतच, भारतीय युद्ध आणि संरक्षण प्रणालीत सर्वंकष बदल केले जात आहेत. सैनिकांना रोबोटिक तंत्रज्ञानाने जोडण्यासाठी आयआयटी शास्त्रज्ञांनी आधुनिक संरक्षण उपकरण विकसित करत इतिहास घडविला आहे. सैनिकांचा एक विश्वासू साथीदार म्हणून इंटिलिजंट रोबो तयार केला आहे. आता दुसरा शोध थर्मल जॅकेटचा असून तो जीवघेण्या उष्म्यापासून सैनिकांचा बचाव करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT