ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि.)
विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्रांनी सज्ज युद्धनौका हे कोणत्याही राष्ट्राच्या नौदलाचे सामर्थ्य असतेच; मात्र आधुनिक सागरी युद्धामध्ये मोठ्या युद्धनौकांबरोबरच समुद्राच्या पृष्ठभागाखाली सुरू असलेली हालचाल, पाण्याखालील दुरुस्ती, दुर्घटनांमधील बचावकार्य, स्फोटकांचा शोध, समुद्रतळावरील तपासणी आणि संवेदनशील उपकरणांची पुनर्प्राप्ती यांसारखी कामे तितकीच महत्त्वाची असतात. यासाठी विशेष प्रकारच्या सहायक जहाजांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेल्या डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (डीएससी) मालिकेतील डीएससी ए-२४ या पाचव्या जहाजाचे कोलकाता येथे नुकतेच जलावतरण झाले. भारतीय नौदलाच्या पाण्याखालील कार्यक्षमतेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट म्हणजे नौदलाच्या डायव्हिंग टीम्सना समुद्राच्या तळाशी विविध मोहिमा पार पाडण्यासाठी मदत करणारे विशेष प्रकारचे नौदल जहाज. युद्धकाळात किंवा शांततेच्या काळात समुद्रात अनेक वेळा जहाजांमध्ये तांत्रिक बिघाड होणे, उपकरणे हरवणे, पाणबुड्यांच्या हालचालींची तपासणी, समुद्रतळावरील संवेदनशील यंत्रणांचे निरीक्षण किंवा अपघातग्रस्त जहाजांमधील बचावकार्य अशी अनेक आव्हाने समोर येतात. अशावेळी हे जहाज तरंगते कार्यकेंद्र म्हणून काम करते. यामध्ये अत्याधुनिक डायव्हिंग प्रणाली, संप्रेषण यंत्रणा, क्रेन, पाण्याखालील उपकरणे आणि गोताखोरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे पाण्याखाली अनेक तास चालणार्या मोहिमा अधिक सुरक्षित, वेगवान आणि परिणामकारक ठरतात.
भारतीय नौदलासाठी तयार करण्यात येत असलेल्या पाच डायव्हिंग सपोर्ट क्राफ्टपैकी हे पाचवे जहाज आहे. कोलकाता येथील टीटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेडने त्याची निर्मिती केली असून भारतीय नौदलाच्या तांत्रिक आवश्यकता लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. रेल्वे डबे आणि अभियांत्रिकी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेडने या प्रकल्पाद्वारे प्रथमच नौदल जहाजबांधणी क्षेत्रात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालमधील खासगी जहाजबांधणी कंपनीने भारतीय नौदलासाठी बांधून सुपूर्द केलेले हे पहिले युद्धसहायक जहाज ठरले.
भारताकडे सुमारे ७,५०० किलोमीटरहून अधिक किनारपट्टी, अंदमान-निकोबार व लक्षद्वीपसह विस्तीर्ण सागरी क्षेत्र आणि सुमारे २.३७ दशलक्ष चौरस किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र (एएन) आहे. या विशाल सागरी क्षेत्रात एकाच वेळी अनेक मोहिमा सुरू असतात. याच गरजेतून भारतीय नौदलाने अशा पाच डायव्हिंग सपोर्ट क्राफ्टची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. विविध नौदल तळांवर ही जहाजे तैनात झाल्यानंतर पूर्व किनारा, पश्चिम किनारा आणि बेटांवरील कार्यवाही अधिक वेगाने करता येणार आहे. यामुळे कोणतीही दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रतिसादाचा कालावधी कमी होईल.
सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नौदल म्हणजे सागरी मार्गाने होणार्या आक्रमणांना रोखणारे दल. प्रत्यक्षात नौदल वर्षभर विविध प्रकारच्या शांतता मोहिमा राबवत असते. समुद्रात पडलेली महागडी उपकरणे शोधणे, जहाजांच्या तळाची तपासणी करणे, बंदरांतील सुरक्षेची पाहणी, नैसर्गिक आपत्तीनंतर बचावकार्य, समुद्रातील तेल वाहिन्या किंवा इतर पायाभूत सुविधांची तपासणी अशा अनेक जबाबदार्या नौदल पार पाडते. अनेकदा एखादे जहाज समुद्रात अडकते किंवा अपघातग्रस्त होते. अशावेळी युद्धनौका नव्हे, तर डायव्हिंग सपोर्ट जहाजेच सर्वप्रथम मदतीला धावून जातात. त्यामुळे ही जहाजे युद्धनौकांइतकी प्रसिद्ध नसली, तरी त्यांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे.
पाण्याखालील सुरक्षेचे वाढते महत्त्व
गेल्या दशकात जगभरात समुद्रतळातील पायाभूत सुविधांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आंतरराष्ट्रीय इंटरनेट वाहतुकीपैकी सुमारे ९५ टक्क्यांहून अधिक डेटा समुद्राखालून जाणार्या फायबर ऑप्टिक केबल्सद्वारे प्रवास करतो. याशिवाय तेल आणि वायू वाहिन्या, वैज्ञानिक उपकरणे, समुद्री निरीक्षण प्रणाली आणि संरक्षणाशी संबंधित यंत्रणाही समुद्रतळावर कार्यरत असतात. या सुविधांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे प्रत्येक सागरी राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे पाण्याखाली काम करणार्या विशेष जहाजांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान आणि चीन यांसारख्या सागरी महासत्तांकडे विशेष डायव्हिंग सपोर्ट जहाजे, सबमरीन रेस्क्यू व्हेसल्स आणि समुद्रतळावरील संशोधनासाठी स्वतंत्र ताफे आहेत. अमेरिकन नौदलाकडे खोल समुद्रातील बचावासाठी अत्याधुनिक प्रणाली आहेत, तर ब्रिटन आणि फ्रान्सकडे पाणबुड्यांच्या आपत्कालीन मदतीसाठी विशेष जहाजे कार्यरत आहेत. चीननेही गेल्या काही वर्षांत आपल्या नौदलाचा वेगाने विस्तार करताना समुद्रतळातील संशोधन आणि पाण्याखालील क्षमतांवर मोठी गुंतवणूक केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही केवळ युद्धनौका वाढविण्याऐवजी सहायक आणि विशेष क्षमतांच्या जहाजांवर भर देणे ही दीर्घकालीन सागरी धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब मानली जाते.
भारतातील खासगी उद्योग संरक्षण क्षेत्रात अधिक सक्रिय होत आहेत. युद्धनौका, गस्ती नौका, इंटरसेप्टर बोटी, पाणबुड्यांचे घटक, रडार प्रणाली आणि नौदलासाठी लागणारी विविध उपकरणे आता देशातच तयार केली जात आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि निर्यात क्षमतेलाही चालना मिळत आहे. हिंदी महासागर हा जगातील सर्वाधिक व्यस्त सागरी व्यापारमार्गांपैकी एक आहे. जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा आणि ऊर्जा पुरवठा याच मार्गाने होतो. त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. समुद्री चाचेगिरी, तस्करी, दहशतवादी हालचाली, नैसर्गिक आपत्ती, पाणबुड्यांची वाढती उपस्थिती आणि समुद्रतळावरील पायाभूत सुविधांचे संरक्षण या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदलाला अत्याधुनिक साधनांची आवश्यकता आहे. डीएससी ए-२४ सारखी जहाजे या सर्व मोहिमांमध्ये पूरक भूमिका बजावू शकतात. या संपूर्ण प्रकल्पाची किंमत १७४.७७ कोटी रुपये असून, प्रत्येक नौकेची अंदाजे किंमत ३५ कोटी रुपये आहे.
पाण्याखालील मोहिमा अत्यंत धोकादायक असतात. कमी दृश्यमानता, प्रचंड पाण्याचा दाब, प्रवाह, मर्यादित वेळ आणि तांत्रिक अडचणी यामुळे डायव्हर्सपुढे मोठे आव्हान असते. अशावेळी जहाजावरील आधुनिक उपकरणे, संप्रेषण व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा त्यांचे संरक्षण करतात. आधुनिक जहाजामुळे डायव्हर्स अधिक काळ सुरक्षितपणे कार्य करू शकतात. तसेच एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित मदत मिळण्याची शक्यता वाढते. भारतीय नौदल सध्या विमानवाहू नौका, स्वदेशी विध्वंसक, फ्रिगेटस्, पाणबुड्या, मानवविरहित प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वेगाने स्वीकार करत आहे. या आधुनिकीकरणात सहायक जहाजांनाही समान महत्त्व दिले जात आहे. कारण, कोणतीही युद्धनौका तिच्या सहायक पायाभूत सुविधांशिवाय प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. डीएससी ए-२४ हे जहाज थेट युद्धात सहभागी होत नसले, तरी युद्धनौकांना कार्यक्षम ठेवणे, पाण्याखालील मोहिमा यशस्वी करणे आणि समुद्री सुरक्षेला बळ देणे, यासाठी ते अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
भविष्यातील सागरी संघर्ष समुद्रतळाशीही लढले जातील, अशी जगभरातील संरक्षणतज्ज्ञांची धारणा आहे. अशा स्थितीत पाण्याखाली कार्य करण्याची क्षमता, तातडीने बचावकार्य करण्याची तयारी आणि समुद्रतळावरील संवेदनशील पायाभूत सुविधांचे संरक्षण हीच खरी सामरिक ताकद ठरणार आहे. डीएससी ए-२४ मुळे भारतीय नौदलाच्या डायव्हिंगला आणि पाण्याखालील कार्यक्षमतेला नवे बळ मिळणार असून, स्वदेशी संरक्षण उद्योगालाही मोठी चालना मिळेल.